आघाडीच नाही, महायुतीतही जागांची बिघाडी, किती जागांचा तिढा, दिल्लीतील हा नेता तोडगा काढणार

| Updated on: Oct 23, 2024 | 11:00 PM

महाविकासआघाडी आणि महायुती दोन्ही आघाड्यांमध्ये काही जागांचा तिढा अजून कायम आहे. महायुतीचे नेते उद्या दिल्लीत अमित शाह यांची भेट घेणार आहेत. उद्या उर्वरीत जागांवर निर्णय होईल. उद्या निर्णय करुनच येथून जाणार असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.

आघाडीच नाही, महायुतीतही जागांची बिघाडी, किती जागांचा तिढा, दिल्लीतील हा नेता तोडगा काढणार
Follow us on

महाविकासआघाडीत गेल्या काही दिवसांपासून फिस्टकलेली चर्चा आज पुन्हा एकदा रुळावर आली. शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर महाविकासआघाडीची आज एकत्र बैठक झाली. ज्यामध्ये 270 जागांवरच तोडगा निघालाय. त्यातही आतापर्यंत प्रत्येकाच्या वाट्याला
85 जागा आल्यात. तर 110 जागांच्या अपेक्षा असलेल्या काँग्रेसला शंभरच्या आतच जागा मिळतील असं चित्र आहे. 18 जागा सोडून महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर झालंय. एकूण 270 जागांवर महाविकास आघाडीत तोडगा निघाला आहे.

दुसरीकडे महायुतीत देखील काही जागांचा तिढा कायम आहे. उद्या दिल्लीत अमित शाह यांच्या सोबत तिनही पक्षाच्या नेत्यांची बैठक होणार असून यामध्ये या जागांवर एकमताने निर्णय घेतला जाणार आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, ‘बाकी जागांवर चर्चा होऊन उद्या 288 जागांचा तिढा सुटेल. आम्हाला काही जागांवर चर्चा करायची होती. उद्या अमित शाह यांची भेट घेऊन चर्चा करू. देवेंद्र फडणवीस, बावनकुळे हे देखील भेटीत असतील.’

‘केंद्रीय नेतृत्वासोबत सगळ्यांनी एकत्र भेट घ्यावी हा माणस आहे. उद्या निर्णय करूनच आम्ही इथून जाणार आहोत. उद्या काही ठिकाणी आम्ही अर्ज भरण्यासाठी जाणार होतो मात्र या बैठकीमुळे तिकडे जाणार नाही.  त्यांना इथूनच शुभेच्छा देतो. उद्या निर्णय अपेक्षित आहेच. तिघांनी एकत्र बसूनच निर्णय घेणे आवश्यक असल्याने आम्ही एकत्र बसणार आहोत. काल परवा मुख्यमंत्री व्यस्त होते, दादा व्यस्त होते, फडणवीस व्यस्त होते. त्यामुळं हा विषय सुटला नाही. हा निकडीचा विषय असल्याने आम्ही एकत्र आलो आहोत. असं ही ते म्हणाले.

सुनील तटकरे म्हणाले की, ‘मेरिटवर निर्णय आम्ही घेणार आहोत. 288 पैकी 260 जागांवर आमचं एकमत झालं आहे. मुख्यमंत्री कुडाळ दौऱ्यावर असल्याने ते उद्या येतील. आजची आमची नियोजित बैठक उद्या होईल.’

भाजपने ९९ उमेदवारांंची यादी जाहीर केली आहे. शिंदे गटाने ४५ जागा तर अजित पवार गटाने ३८ उमेदवारांची घोषणा केली आहे. दुसरीकडे महाविकासआघाडीत ठाकरे गटाने ६५ उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने अजून यादी जाहीर केलेली नाही.