महाराष्ट्रात आज निवडणूक झाली तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? सर्व्हेतून धक्कादायक माहिती उघड

| Updated on: Sep 11, 2024 | 10:28 PM

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी आगामी काळात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत 145 हा बहुमताचा आकडा आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टाईम्स नाऊ नवभारत मॅट्रीजचा ओपिनियन पोल समोर आला आहे. या पोलमध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे.

महाराष्ट्रात आज निवडणूक झाली तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? सर्व्हेतून धक्कादायक माहिती उघड
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

देशात दोन महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत देशभरात भाजपला चांगलं यश मिळालं. पण महाराष्ट्रात भाजपला पाहिजे तसं यश मिळालं नाही. या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला. फक्त भाजपलाच नाही तर महायुतीमधील तीनही पक्षांना या निवडणुकीत महाराष्ट्रात फटका बसला. या निवडणुकीतून धडा शिकून महायुतीने नव्या योजना आणि घोषणांचा पाऊस सुरु केला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची प्रचंड महत्त्वकांक्षी आणि गेमचेंजर योजना ठरण्याची चिन्हं आहेत. कारण लोकसभेत जसा फटका बसला तर फटका महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता कमी आहे. पण तरीदेखील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काँटे की टक्कर असणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? आणि कोण बाजी मारेल? याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टाईम्स नाऊ नवभारत मॅट्रीजकडून सर्वेक्षण करण्यात आलं आहे. या सर्वेक्षणातून समोर आलेली आकडेवारी ही आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड रणधुमाळी रंगणार असल्याचे संकेत देत आहेत. महाराष्ट्रात आज निवडणूक झाली तर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात प्रचंड चुरस होणार असल्याचं पोलमध्ये म्हटलं आहे. पोलनुसार, महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष हे आघाडीवर आहेत. पण तरीदेखील महाविकास आघाडीतील ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस हे महायुतीपासून फार लांब राहणार नाहीत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतील लढाई कोणत्याच पक्षासाठी सोपी राहणार नाहीय.

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी आगामी काळात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत 145 हा बहुमताचा आकडा आहे. पोलनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला 137 ते 152 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 129 ते 144 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती बहुमताचा आकडा गाठू शकते. पण तो आकडा गाठणं महायुतीलादेखील सोपं होणार राहणार नाही.

ओपिनियन पोलची आकडेवारी काय सांगते?

टाईम्स नाऊ नवभारत मॅट्रीजच्या पोलनुसार, भाजप महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. पण तरीही भाजपच्या जागा घटण्याची शक्यता आहे. पोलनुसार, महाराष्ट्रात भाजपला 83 ते 93 जागावर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. तर शिवसेना शिंदे गटाला 42 ते 52 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर अजित पवार गटाला फार कमी अवघ्या 7 ते 12 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.

पोलनुसार, महाविकास आघाडीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गट आणि त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचा नंबर लागण्याची शक्यता आहे. या ओपिनियन पोलनुसार, महाराष्ट्रात काँग्रेसला 58 ते 68, शरद पवार गटाला 35 ते 45 जागा आणि शिवसेना ठाकरे गटाला 26 ते 31 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तसेच इतरांना 3 ते 8 जागा मिळण्याचा शक्यता आहे.