Worli Assembly constituency 2024: आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघाची विधानसभा निवडणूक ‘हाय व्होल्टेज’, कारण…

| Updated on: Oct 08, 2024 | 2:20 PM

worli assembly constituency history: आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या मतदार संघांमध्ये वरळी मतदार संघ असणार आहे. राज्यातील राजकारणात ठाकरे आणि पवार परिवारांचा वरचष्मा आहे. त्यामुळे ज्या मतदार संघात ठाकरे आणि पवार कुटुंबांमधील उमेदवार असणार ते मतदार संघ हाय व्होल्टेज होणार आहे.

Worli Assembly constituency 2024: आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघाची विधानसभा निवडणूक हाय व्होल्टेज, कारण...
Worli Assembly constituency
Follow us on

Worli Assembly constituency 2024: देशात हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभेचे निकाल आज जाहीर होत आहे. त्यावेळी महाराष्ट्रात राजकीय पक्षांकडून विधानसभेची जोरदार तयारी आहे. महायुती अन् महाआघाडीमधील जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. महायुती आणि महाआघाडीसोबत तिसरी आघाडी रिंगणात उतरणार आहे. तसेच राज ठाकरे यांनी सुद्धा स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत महायुतीचे टारगेट उद्धव ठाकरे असणार आहे. परंतु उद्धव ठाकरे स्वत: निवडणूक रिंगणात उतरणार नाही. त्यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे पुन्हा वरळी विधानसभेतून निवडणूक रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे वरळी विधानसभा मतदार संघ आतापासून चर्चेत आला आहे. आदित्य ठाकरे यांचा पराभव करण्यासाठी महायुती नाही तर मनसेनेसुद्धा कंबर कसली आहे. कसा आहे हा ‘हाय व्होल्टेज’ वरळी विधानसभा मतदार संघ? या मतदार संघात आतापर्यंत कोणाचे अन् कसे वर्चस्व राहिले आहे? पाहू या…

असा आहे वरळी मतदार संघाचा इतिहास

मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात वरळी हा विधानसभा मतदारसंघ येतो. विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार वरळी मतदारसंघांत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. ८३८ – लव्ह ग्रोव्ह, वॉर्ड क्र.८३७ चिंचपोकळी मधील इन्युमरेशन ब्लॉक २७ ते १८६, १८८ ते १९४, जनगणना वॉर्ड क्र.८३६ वरळी मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते ११९, १२१, १२३ ते १२६,१२८, १५८ ते २८३, २८५, २८६, ८०१, ८०२ आणि १००१ यांचा समावेश होतो. वरळी विधानसभा मतदार संघावर कोणी एकाचे वर्चस्व राहिले नाही. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. १९९० पासून या मतदार संघावर शिवसेनेने आपले वर्चस्व निर्माण केले. १९९० पासून ते २००४ पर्यंत शिवसेनेचे दत्ताजी नलावडे हे या मतदार संघाचे आमदार होते. त्यानंतर २००९ मध्ये मतदार संघाच्या पुनर्रचनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर यांना विजय मिळला. २०१४ पासून पुन्हा शिवसेनेचे उमेदवार विजयी होत आले आहे. आता २०२४ मध्ये कोण विजयी होणार हा प्रश्न आहे.

वरळी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास
उमेदवार वर्ष
माधव नारायण बीरजे (काँग्रेस) १९६२
माधव नारायण बीरजे (काँग्रेस) १९६७
शरद शंकर दीघे  (काँग्रेस) १९७२
प्रल्हाद कृष्णा कुरणे ( कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया) १९७८
शरद शंकर दीघे ( काँग्रेस) १९८०
विनिता दत्ता सामंत ( अपक्ष) १९८५
दत्ताजी नलावडे (शिवसेना)
१९९०, १९९५, १९९९, २००४
सचिन अहिर ( राष्ट्रवादी काँग्रेस) २००९
सुनील शिंदे ( शिवसेना) २०१४
आदित्य ठाकरे (शिवसेना) २०१९

वरळी विधानसभा मतदार संघाचे राजकीय गणित

वरळी मतदार संघामध्ये मोठमोठ्या चाळी आहेत, तसेच मोठ मोठे टॉवरसुद्धा आहे. रेसकोर्स, ऑर्थर रोड जेल या मतदार संघात आहे. मुंबईतील सर्वात मोठे धोबीघाट या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातल्या सर्वच भागातील लोक या ठिकाणी वास्तव्याला आहेत. गुजराती लोकांची संख्या चांगली आहे. वरळी विधानसभा मतदार संघामध्ये उच्चभ्रू, मध्यमवर्गीय, कामगार वर्ग मोठया संख्येने आहे. वरळीमध्ये बीडीची चाळीचा विषय चर्चेत राहिला आहे. म्हणजेच या ठिकाणी संमिश्र स्वरूपाची वस्ती आहे. वरळी विधानसभा मतदार संघात 11.58% एससी मतदार आहेत. एसटी मतदार संघाची संख्या 1.41% आहे. 9.2 टक्के मुस्लिम उमेदवार आहेत. शंभर टक्के शहरी मतदार संघ हा आहे. 2011 च्या जनगणनेनुसार 2,83,507 मतदार या ठिकाणी आहे. त्यात महिला मतदार 1,22,866 तर पुरुष मतदार 1,60,641 आहेत. मतदार संघात 243 बुथ आहेत.

हे सुद्धा वाचा
वरळी विधानसभा मतदार संघातील एकूण मतदार 283,507
पुरुष मतदार 122,866
महिला मतदार 160,641
मुस्लिम मतदार 24,957
एससी मतदार 31,414
एसटी मतदार 3,825

2019 मध्ये वरळी विधानसभेचा असा राहिला निकाल

2019 मधील विधानसभा निवडणुकीत वरळीत शिवसेनेचे आदित्य ठाकरे विजय झाले. त्यांनी 67,427 मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसेचे सुरेश माने यांचा पराभव केला. आदित्य ठाकरे हे ठाकरे घरण्यातील निवडणूक लढवणारे पहिले उमेदवार ठरले. त्यावेळी मनसे नेते राज ठाकरे यांनी शिवसेनेविरोधात मनसेचा उमेदवार दिला नव्हता. ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या व्यक्तीने वरळी मतदार संघाची निवड का केली? त्याला कारण हा शिवसेनेसाठी सुरक्षित मतदार संघ राहिला आहे. 1990, 1995, 1999, 2004 असे सलग चारवेळा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे या मतदारसंघात विजयी झाले होते. त्यानंतर 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर वरळीचे आमदार झाले होते. ते ही शिवसेनेत आले आहेत. 2014 मध्ये शिवसेनेचे सुनील शिंदे विजयी झाले. यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा मतदारसंघ निवडण्यात आला होता.

2019 विधानसभा निवडणूक वरळी मतदार संघाचा निकाल
उमेदवार पक्ष मते टक्केवारी
आदित्य ठाकरे शिवसेना 89248 69.14%
सुरेश माने राष्ट्रवादी 21821 16.91%
गौतम गायकवाड वंचित 6572 5.09%
नोटा 6305 4.88%
अभिजित बिचकले अपक्ष 781 0.61%
विक्रम पदम बहुजन समाज पक्ष 1932 1.50%

अभिजित बिचुकले यांनी प्रचारात आणली होती चर्चा

कला, साहित्य आणि राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी करणारे बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी आदित्य ठाकरे विरोधात 2019 मध्ये आपले नशिब अजमवले होते. निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी रंगत आणली होती. परंतु प्रत्यक्षात मतदारांवर ते प्रभाव टाकू शकले नव्हते. त्यांना केवळ 781 मते मिळाली होती. आदित्य ठाकरे यांना आव्हान देण्यापूर्वी बिचुकले यांनी छत्रपती उदयनराजे यांनाही आव्हान दिले होते.

मनसे, भाजप, शिवसेना आदित्य विरोधात

आता 2024 आदित्य ठाकरे यांच्यासाठी लढत सोपी नाही. कारण 2019 मध्ये शिवसेना-भाजप युती होती. भाजपचा उमेदवार नव्हता. राज ठाकरे यांनी उमेदवार दिला नव्हता. एकनाथ शिंदे यांची शिवसेना नव्हती. आता आदित्य ठाकरे यांना चेकमीट करण्यासाठी मनसे, भाजप आणि शिवसेना तिन्ही पक्ष आहेत. मनसेकडून वरळीतून संदीप देशपांडे यांना तिकीट देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. संदीप देशपांडे यांनी तुमचं व्हिजन. आमचं व्हिजन. आपलं व्हिजन. व्हिजन वरळी असे ट्वीट काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे अशी लढत रंगण्याची शक्यता आहे. वरळीत संदीप देशपांडे घरोघरी फिरत आहेत. भाजप आणि शिवसेनेकडूनही संदीप देशपांडे यांना पाठिंबा दिला जाऊ शकतो. तसेच नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वरळी विधानसभा मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांना अगदीच कमी मताधिक्य मिळाले होते. ही आदित्य ठाकरे यांच्यासाठी आणखी एक चिंतेची बाब आहे. वरळी विधानसभेत ठाकरे विरुद्ध ठाकरे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनसे नेते राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे सुद्धा ही चर्चा सुरु आहे.

वकील गुणरत्न सदावर्ते उतरणार मैदानात

2024 आदित्य ठाकरे यांना यावेळी आव्हान देणारा आणखी एक जण तयार झाला आहे. नेहमी चर्चेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यासाठी त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघाची निवड केली आहे. आदित्य ठाकरे यांना धूळ चारणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महायुतीकडून उमेदवारी मिळाली तर आपण युतीकडून लढू, अन्यथा अपक्ष म्हणून रिंगणात उतरु, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले.

निवडणूक लढती हाय व्होल्टेज होणार

आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघाची आगामी निवडणूक लढती हाय व्होल्टेज होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. आदित्य ठाकरे यांनी वरळी A+ संकल्पना आणली आहे. त्याला मनसे वरळी व्हिजनने उत्तर दिले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित होणाऱ्या वरळी व्हिजन कार्यक्रमाला शिवसेना आणि भाजपचा पाठिंबा असल्याचीही जोरदार चर्चा सध्या आहे. ”संदीप खरंच हिरा आहे. राजकीयदृष्ट्या तो अत्यंत जागरूक आहे. आज त्यानेच हा वरळी व्हिजन ठेवला आहे’, असे राज ठाकरे यांनी वरळी व्हिजन कार्यक्रमात म्हटले होते.

एकंदरीत आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या मतदार संघांमध्ये वरळी मतदार संघ असणार आहे. राज्यातील राजकारणात ठाकरे आणि पवार परिवारांचा वरचष्मा आहे. त्यामुळे ज्या मतदार संघात ठाकरे आणि पवार कुटुंबांमधील उमेदवार असणार ते मतदार संघ हाय व्होल्टेज होणार आहे. त्यातच त्या कुटुंबातील उमेदवारास पराभूत करण्यासाठी इतर सर्व जण एकत्र आल्यावर चर्चा तर होणारच…