स्पेशल रिपोर्ट : 9 किंवा 10 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीची घोषणा?

| Updated on: Sep 19, 2024 | 10:55 PM

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखांची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. मात्र ही घोषणा 9 किंवा 10 ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. नेमका कशाप्रकारे मतदान आणि मतमोजणीचा कालावधी असू शकतो? पाहुयात त्यावरचा हा रिपोर्ट!

स्पेशल रिपोर्ट : 9 किंवा 10 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीची घोषणा?
9 किंवा 10 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीची घोषणा?
Follow us on

महाराष्ट्रात विधानसभेची आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणेसाठी आणखी 20 लागतील, अशी शक्यता आहे. निवडणुकीची घोषणा सहसा 45 दिवसांआधी होते. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपतेय. म्हणजे 26 नोव्हेंबरपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी आवश्यक आहे. त्यामुळं इथून 45 दिवस आधी दोन चार दिवस मागे पुढे जरी झाले तरी 9 किंवा 10 ऑक्टोबरला आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा होणं अपेक्षित आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम बघितला तर, यावेळी महिनाभर निवडणूक उशीरा होतेय. 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुका सोबत घेतल्या होत्या. यावेळी हरियाणाच्या निवडणुका घोषित झाल्या असून प्रचारही सुरु झाला. पण महाराष्ट्राची निवडणूक अद्याप घोषित झालेली नाही.

2019 मध्ये 21 सप्टेंबरला आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा झाली होती. 21 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात सर्व 288 जागांवर मतदान झालं आणि 24 ऑक्टोबरला मतमोजणी झाली. यावेळी समजा 9 किंवा 10 ऑक्टोबरला निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेवून जर आचारसंहिता किंवा निवडणूक घोषित केली. तर शक्यता अशी आहे की 2 टप्प्यात मतदान, 10 नोव्हेंबर आणि 12 नोव्हेंबर अशा 2 दिवसांच्या अंतरानं मतदान होऊ शकते आणि निकाल 3 किंवा 4 दिवसाने म्हणजे 15 किंवा 16 नोव्हेंबरला लागू शकतो.

निवडणुकीची घोषणा अद्याप झाली नसली तरी महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी मेळावा आणि कार्यक्रम सुरु केलेत. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुतीनं जोरदार प्रचार सुरु केलाय. तर काँग्रेसनंही मेळावे सुरु केलेत. “आधीचं सरकार हफ्ते घेणारं, आमचं सरकार हफ्ते भरणार”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. “काँग्रेस लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेली”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. तर तुमच्या बाप जाद्याचे पैसे लाडकी बहिणीला देत आहात काय? असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. दुसरीकडे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादवांनीही भाजपवर निशाणा साधताना हरियाणानंतर महाराष्ट्रातही पराभवच होणार असल्याचं म्हटलंय.

महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीचं समीकरण बदललंय. 2 शिवसेना आणि 2 राष्ट्रवादी जनतेच्या समोर आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची पसंती कोण महायुती की महाविकास आघाडी याचा फैसला होण्यासाठी घोडा मैदान जवळ आहे.