Maharashtra Assembly Election : बॅनर्स जोरात पण मुख्यमंत्रीपद कोणाच्या गळ्यात?

| Updated on: Oct 10, 2024 | 11:15 PM

महाराष्ट्रात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीआधी जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु झालंय. गणशोत्सव आणि नवरात्रीत जोरदार बॅनरबाजी सुरु आहे. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आपल्या नेत्याला मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून पाहतोय. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे.

Maharashtra Assembly Election : बॅनर्स जोरात पण मुख्यमंत्रीपद कोणाच्या गळ्यात?
Follow us on

निवडणुका घोषित होण्याआधी भावी मुख्यमंत्र्यांचे पोस्टर्स महाराष्ट्रात झळकत आहेत. उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे मोठे कटआऊट्स मुंबई, नांदेड आणि नाशिकमध्ये लागले आहेत. मुख्यमंत्रिपदावरुन आपल्या नेत्यांसाठी कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे भावी मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आणि शिंदेंनाच परत मुख्यमंत्री कर असे देवीला नवस करणारे पोस्टर झळकत आहेत. निवडणूक घोषित होण्याची वेळ जवळ आली आहे आणि मुख्यमंत्रिपदावरुन उद्धव ठाकरेंपासून देवेंद्र फडणवीस ते मुख्यमंत्री शिंदेंचे पोस्टर्स झळकू लागले आहेत.

शिवसेना भवनाच्या बाहेर, दसरा मेळाव्याच्या निमित्तानं लागलेल्या बॅनरवर, उद्धव ठाकरेंना भावी मुख्यमंत्री असं म्हटलंय. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, महाराष्ट्राच्या मनातले निष्ठावंत, शिवसैनिकांच्या हृदयातले भावी मुख्यमंत्री असा मजकूर या पोस्टरवर झळकतो आहे. एक दिवसाआधीच उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्याची मागणी केली आणि हरियाणात काँग्रेसच्या पराभवानंतर शिवसेना भवनाच्या बाहेर उद्धव ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले.

नांदेडमध्ये फडणवीसांचे पुन्हा येणार असे बॅनर्स लागलेत. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, पुन्हा येणार असं या पोस्टरवर ठळकपणे लिहिण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोस्टरसमोर फडणवीस नतमस्तक होत असल्याचं दाखवण्यात आलंय…नांदेडमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत…त्याआधी लागलेलं हे पोस्टर नांदेडमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

फडणवीसांचं दुसरं बॅनर अमरावतीत लागलंय. महाराष्ट्रासाठी झटला, बहुजनांसासाठी राबला, म्हणूनच सामान्यांना भावला…अशा आशयाचे पोस्टर अमरावतीत लागले आहेत. वृद्ध आजी फडणवीसांना आशीर्वाद देत असल्याचं या पोस्टरमध्ये दाखवण्यात आलंय.

तर मुलुंडमध्ये पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री कर, असं देवीला नवस करणारं पोस्टर लावण्यात आलं आहे. मुलूंड टोलनाका इथं, नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं देवीकडे नवस करणारं पोस्टर लावण्यात आलंय. नवस करतो दुर्गा मातेला पुन्हा मुख्यमंत्री होऊ दे आपल्या भाईंना. शारदीय नवरात्र घटस्थापना व विजयादशमीच्या शुभेच्छाही या पोस्टरमधून देण्यात आले आहेत.

याआधी छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यात शिंदेंचे कॉमन मॅन म्हणून मोठ मोठे कट आऊट्स लागलेत. आता नाशिकमध्ये मंत्री दादा भूसेंनी मुख्यमंत्री शिंदेंचे कॉमन मॅनचे कटआऊट्स लावलेत. शिंदेंच्या फोटोसह,सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री…कॉमन मॅन, एकनाथ शिंदे….मेहनती, सेवाभावी, निडर आणि सामान्य लोकांसाठी झटणारा असं कटआऊट्सवर लिहलंय.

कॉमन मॅनचे असे पोस्टर लागल्यानं, शिंदेंच्या शिवसेनेकडून नाशिक शहरात 4 पैकी एका विधानसभेच्या जागेवर दावा केला जाण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. महायुती असो की महाविकास आघाडी…नेतृत्व करणारे एकूण 6 चेहरे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. त्याआधी आपआपल्या नेत्यांचे पोस्टर्स लावणं सुरु झालं आहे.