महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर आता निकालाचे वेध लागले आहेत. विविध संस्थांचे निकालाबाबत एक्झिट पोल समोर आले आहेत. याबाबत ज्येष्ठ राजकीय पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक संदीप आचार्य यांनी मुंबईतील जागांबाबत महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. “अँटी इन्कबन्सीचा राग लोकसभेला निघाला होता. दलित, मुस्लिम मत एकगठ्ठा झालेलं. यंदा चार टक्क्यांनी मतदान वाढलं, हे मतदान लाडक्या बहिणींचं असू शकतं किंवा नवं मतदार असू शकतं, त्याचे फायदे महायुतीला मिळेल. मुंबईतील मतदार हा इंडिपेंडेंट, महाविकास आघाडी मुंबईमध्ये आघाडीवर राहील. मुंबईत उद्धव ठाकरे यांना 14 ते 17 जागा मिळू शकतात. भाजपच्या जागा मागच्या वेळी 16 होत्या, त्यात दोन-तीन जागा कमी होतील. शिंदेंच्या मुंबईतील 6 पैकी एखादी जागा निवडून येऊ शकते, ती देखील प्रकाश सुर्वे यांची जिंकून येऊ शकते”, अशी प्रतिक्रिया संदीप आचार्य यांनी दिली आहे.
“मनसे किती मतं खाते, कोणाची मतं खाते हा भाग देखील महत्त्वाचा आहे. वरळीत आदित्य ठाकरे जिंकून येतील. बाळा नांदगावकर यांच्यापेक्षा अजित चौधरी वरचढ ठरतील. दादर माहीममध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढाई दिसते, महेश सावंत आघाडी घेईल, असं दिसतं. मुंबईमधला कार्यकर्ता उद्धव ठाकरेंसोबतच आहे. मुंबईत 5 ते 7 जागा काँग्रेसच्या येऊ शकतात”, असं संदीप आचार्य म्हणाले.
“मुंबईवरती महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसेल. बाबा सिद्धीकींची हत्या झाली होती. त्याची झिशानला सहानुभूती मिळू शकते. मात्र वरूण सरदेसाई पहिल्या दिवसापासून तेथे काम करतोय, जिंकण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांना राज ठाकरेंनी गद्दार शब्द वापरला. मनसे भाजपची लाईन वापरत आहे का? असा प्रश्न पडेल”, अशी प्रतिक्रिया संदीप आचार्य म्हणाले.
“ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व, ते स्वतः भरघोस मतांनी निवडून येतील. प्रताप सरनाईक देखील येत आहेत. ठाणे शहरामध्ये काँटे की टक्कर होईल. अविनाश जाधव यांनी वातावरण तयार केलं. राजन विचारे कुठेतरी मागे आहेत. लोकसभेला संविधान बदलणाऱ्याचा आरोप करणाऱ्यांना जास्तीत जास्त मतदान झालं. त्यात महाविकास आघाडीला मतदान मिळून झालंय. आता वाढलेलं मतदान हे नव मतदार किंवा लाडक्या बहिणीचं, यात मेजॉरिटी महायुतीकडे जाईल”, असा दावा संदीप आचार्य यांनी केला.
ज्येष्ठ पत्रकार राम तरटे यांनी नांदेड जिल्ह्यातील मतदारसंघांबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “नांदेड जिल्ह्यात महायुतीला 5 आणि महाविकास आघाडीला 4 जागा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देगलूर, मुखेड, किनवट आणि नांदेड उत्तर महाविकास आघाडीला मिळतील. या वेळेस जरांगे फॅक्टरचा 50 टक्के फरक पडेल. वंचित बहुजन आघाडीला फार जास्त चालल्याचे दिसून आले नाही. हिंदू-मुस्लिम असं मतांचे ध्रुवीकरण झालं. नांदेड जिल्ह्यात मुखेडला अपक्ष उमेदवार बालाजी खतगावकर होते. नांदेड उत्तर मध्ये महाविकास आघाडीचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात सोडता याचा मैत्रीपूर्ण लढतेचा अर्थ लोकांनाही कळाला नाही”, अशी प्रतिक्रिया राम तरटे यांनी दिली.
“नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीने नवीन चेहरा वापरला. तो करेक्ट वापरला. संतुक हंबर्डे यांच्या उमेदवारीबाबत शंका घेण्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत असल्यामुळे विकासाचा मुद्दा घेऊन भारतीय जनता पार्टी प्रचार करताना दिसली. दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांना वडिलांच्या निधनाची सहानुभूती मोठ्या प्रमाणात दिसली. नायगावमध्ये क्रॉस व्होटिंग झाली. मुखेडमध्ये क्रॉस व्होटिंग झाली. भोकरमध्ये क्रॉस व्होटिंग झाली. भोकरमध्ये क्रॉस व्होटिंग झाली. क्रॉस व्होटिंग का झाली की ती करून घेतली याचं आत्मचिंतन भारतीय जनता पार्टीला करावं लागणार आहे. सर्वसामान्य लोकांनी रवींद्र चव्हाण यांना खासदार म्हणून स्वीकारलं आहे. काही प्रशासकीय यंत्रणाचं म्हणणं आहे की, रवींद्र चव्हाण बऱ्याच फरकाने खासदार होतील”, अशी पत्रकार राम तरटे यांनी दिली.
ज्येष्ठ पत्रकार नरेश दंडवते यांनीदेखील महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. “नांदेड जिल्ह्यात 9 पैकी 5 ते 6 जागा महायुतीला मिळतील. यावेळेस उर्वरित जागेवर सांगणं अवघड होणार आहे. नांदेड उत्तर मध्ये हिंदू-मुस्लिम अशी निवडणूक झाली. नांदेड शहरात अशी परिस्थिती आहे की काही सांगता येणार नाही. तीन अपक्षाने राष्ट्रीय पक्ष समोर दावेदारी केली आहे. नेमका त्यांना निकाल काय लागतो हे चांगलं कठीण वाटतं”, अशी प्रतिक्रिया नरेश दंडवते यांनी दिली.
“विधानसभेचे सार्वत्रिक चर्चा होती. लोकसभेला मतदारांनी गांभीर्याने घेतलं नाही. काँग्रेसने जेवढी ही निवडणूक गांभीर्याने घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही. मला वाटते जनता पक्षाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे मला वाटतं की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कदाचित निवडून येऊ शकतो”, असं नरेश दंडवते म्हणाले.
राजकीय विश्लेषक वसंत मुंडे यांनी बीड जिल्ह्याबाबत माहिती दिली आहे. “बीड जिल्ह्यात एकूण 67.79 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात तीन ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये थेट लढत आहे. तर इतर तीन ठिकाणी अपक्ष उमेदवारांचा बोलबाला आहे. केज मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लढत आहे. इथे महायुतीचे पारडे जड आहे. परळीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये थेट लढत आहे. इथे निकाल संभाव्य आहे. या निकालाकडे राज्याचे लक्ष आहे”, असं वसंत मुंडे म्हणाले.
“माजलगाव मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीत तुल्यबळ लढत झाली असली तरी इथे अपक्ष उमेदवारांनी मोठी ताकद लावली आहे. त्यामुळे इथलाही निकाल संभाव्य आहे. गेवराई मतदारसंघात तिरंगी लढत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत थेट लढत असली तरी इथे अपक्ष उमेदवाराने मुसंडी मारली आहे. आष्टीत महायुतीत मैत्रीपूर्ण लढत आहे. शिवाय अपक्ष उमेदवाराचा देखील बोलबाला आहे. बीडमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीत थेट लढत आहे. इथे देखील अपक्ष उमेदवारांनी मुसंडी मारली आहे”, अशी प्रतिक्रिया वसंत मुंडे यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगरचे ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांनीदेखील महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्रात महायुतीचं पारडं जड असलं तरीही अपक्षांशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही. त्याचबरोबर जे छोटे-छोटे पक्ष आहेत त्यांचं फारसं अस्तित्व नसेल”, अशी प्रतिक्रिया विधानसभा निवडणुकीवर ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांनी दिली आहे.