राज्यात विधानसभेचं बिगूल वाजलं आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. महायुतीच्या तीनही घटक पक्षांकडून आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये भाजपनं 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटानं 38 आणि शिवसेना शिंदे गटानं 45 उमेदवारांची नावं आपल्या पहिल्या यादीमध्ये जाहीर केली आहेत. मात्र अजूनही अशा काही विधानसभेच्या जागा आहेत, ज्यावर अद्यापही तोडगा निघाला नसल्यानं तिथे महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही.
या विधानसभा मतदारसंघावर महायुतीमधील एका पेक्षा अधिक उमेदवारांनी दावा केला आहे. आता हा तिढा दिल्ली दरबारीच सुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह यांंनी आज बैठक बोलावली आहे, या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती आहे.
दरम्यान महायुतीच्या जाहीरनाम्याबाबत देखील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेले भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी आपला वेगवेगळा जाहीरनामा सादर करणार नसून, एकच जाहीरनामा सादर करणार आहेत. पुढच्या आठवड्यात महायुतीचा जाहीरनामा समोर येण्याची शक्यात आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी तीनही पक्ष वेगवेगळा प्रचार करणार नसून, एकत्रच प्रचार देखील केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान
दरम्यान महायुतीसमोर बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान असणार आहे. ज्या इच्छुकांना विधानसभेचं तिकिट मिळालं नाही ते बंडखोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून भाजप नेत्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न करा, बंडखोरी होऊ देऊ नका. कोणत्याही परिस्थितीमध्ये बंडखोरांची समजूत काढा. राज्यातील प्रमुख नेत्यांनी बंडखोरीवर लक्ष ठेवा अशा सूचना महायुतीच्या बैठकीमध्ये अमित शाह यांनी नेत्यांना दिल्या आहेत.