Vidhan Sabha Election : उद्धव ठाकरेंच्या मनात काय? बैठकीनंतर बाळासाहेब थोरात स्पष्टच बोलले

| Updated on: Oct 22, 2024 | 2:58 PM

बाळासाहेब थोरात यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अडीच तास चर्चा झाली. या भेटीनंतर थोरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Vidhan Sabha Election : उद्धव ठाकरेंच्या मनात काय? बैठकीनंतर बाळासाहेब थोरात स्पष्टच बोलले
Follow us on

विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. मात्र भाजप वगळता अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीमधील एकाही घटक पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाहीये. महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची यादी कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते अशी माहिती समोर येत आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीमधील जागा वाटापाचा तिढा अद्यापही सुटला नसल्याचं पाहायला मिळत आहे. जागावाटपावरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये तणावाची स्थिती आहे. त्यामुळे उमेदवाराच्या यादीला देखील विलंब होत आहे. दरम्यान आता घडामोडींना वेग आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेतला आहे.

बाळासाहेब थोरात यांनी जागा वाटपाच्या मुद्द्यावर आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जागा वाटपासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अडीच तास चर्चा झाली. या बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना थोरात यांनी म्हटलं की, आमच्यात कोणताही वाद नाही, एकत्र बसून मार्ग काढू. ठाकरेंच्या मनात काय आहे, पवारांना काय वाटतं हे या बैठकीत समजून घेतलं. उमेदवारांची यादी कधीही येऊ शकते. साडेतीन वाजता महाविकास आघाडीची बैठक आहे, या बैठकीमध्ये चर्चा करू असं थोरात यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे महायुतीमध्ये देखील भाजप वगळता अजूनही शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे महायुतीत शिवसेनेचं घोडं 25 जागांवर आडलं आहे, त्यामुळेच उमेदवारांच्या यादीला विलंब होत असल्याची चर्चा आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावणकुळे आणि प्रफुल पटेल यांच्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे. त्यामुळे आता लवकरच उमेदवारांची पहिली यादी समोर येण्याची शक्यता आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता कोणत्या पक्षाला किती आणि कोणत्या जागा मिळणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.