छ. संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात संजय शिरसाट यांचं पारडं जड पण पेपर अवघड; कोण मारणार बाजी?

| Updated on: Oct 28, 2024 | 4:05 PM

दोन्ही उमेदवारांची तुलना केल्यास संजय शिरसाट यांचं पारडं या मतदारसंघातून सध्या तरी जड वाटत आहे. मात्र शिरसाट यांच्यापुढे शिंदे मोठं आव्हान निर्माण करू शकतात.

छ. संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात संजय शिरसाट यांचं पारडं जड पण पेपर अवघड; कोण मारणार बाजी?
Follow us on

राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता यावेळी अनेक मतदारसंघांमध्ये अटितटीची लढत होणार आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे. या मतदारसंघामध्ये कायमच शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे. सध्या या मतदारसंघात संजय शिरसाट हे विद्यमान आमदार आहेत. शिवसेनेते फूट पडल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी देखील पुन्हा एकदा संजय शिरसाट हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता ही निवडणूक निश्चितपण संजय शिरसाट यांच्यासाठी सोपी नसणार आहे. कारण या मतदारसंघात महाविकास आघाडीनं देखील मोठा डाव खेळला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून राजू शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील मतदार आता कोणाच्या बाजूनं कौल देणार शिवसेना शिंद गट की शिवसेना ठाकरे गट हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दोन्ही उमेदवारांची तुलना केल्यास संजय शिरसाट यांचं पारडं या मतदारसंघातून सध्या तरी जड वाटत आहे. कारण ते सलग तिनवेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. 2009, 2014 आणि 2019 ला ते या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. 2014 च्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता. तर यावेळी चौथ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुसरीकडे राजू शिंदे हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत, त्यांची देखील स्थानिक राजकारणावर चांगली पकड आहे. मात्र शिरसाट यांच्या तुलनेत अनुभवाची कमतरता दिसून येते. मात्र शिवसेना ठाकरे गटाला मिळणाऱ्या सहानुभुतीचा फायदा त्यांना या मतदारसंघात होऊ शकतो, त्यामुळे इथे संजय शिरसाट यांच्यापुढे एक तगडं आव्हान असणार आहे.

छत्रपती संभाजीनगर पश्चिम हा मतदारसंघ शहरी मतदारसंघ आहे. मात्र या मतदारसंघात अनेक ग्रामीण भागांचा देखील समावेश होतो. ग्रामीण भागांमध्ये शिवसेना ठाकरे गटाची पकड अधिक मजबूत दिसून येते. त्यामुळे ही देखील राजू शिंदे यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते.या मतदारसंघात एकूण 2,87,468 एवढं मतदान आहे, त्यापैकी पुरुषांची संख्या ही 1,54,431 एवढी आहे तर महिला मतदारांची संख्या 1,33,036 एवढी आहे.हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.