लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ‘संविधान आणि आरक्षण बचाओ’ घोषणा दिली होती. त्याचा फायदा काँग्रेसला झाला. काँग्रेस 52 जागांवरुन 99 जागांवर पोहचली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौरा केला होता. त्या दौऱ्यात आरक्षण संपवण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. सर्वांना समान संधी उपलब्ध झाल्यावर आरक्षण संपणार असल्याचे म्हटले होते. त्यावरुन वाद निर्माण झाला होता. त्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावल्याचे स्पष्टीकरण केले होते. राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्याचा संदर्भ घेत केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांना घेरले आहे. ते म्हणाले, राहुल गांधीच्या बापाचा बाप आला तरी संविधान बदलणार नाही.
पनवेलचे भाजप महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराची सभा कामोठे येथे पार पडली. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती होती. यावेळी रामदास आठवले यांनी प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. तसेच यावेळी झालेल्या सभेत त्यांनी कवितेतून चांगलीच फटकेबाजी केली.
राहुल गांधी काय माझ्या बापाचा बाप जरी आला तरी संविधान बदलल जाणार नाही आणि जर कोण बदलेल त्याला आमचा समाज टराटरा फाडून टाकेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा पाटील हेच नाव मिळणार आहे. लोकसभा निवडणूक प्रचारात काँग्रेसने खोटे सांगून थोडे यश मिळाले. मात्र यावेळी असे होणार नाही. यावेळी आम्हाला यश मिळेल आणि महायुती सत्तेत येईल. शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांनी आमच्याकडे यायला हवे होते. मात्र त्यांनी आम्हाला सोडले. आता आम्हाला त्यांची गरज नाही. आम्हाला क्लिअर मेजोरीटी मिळणार आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जत मतदार संघात अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. यावर बोलताना राज ठाकरे यांच्या पाठिंब्यामुळे कर्जतमध्ये काही फरक पडणार नाही असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. राज ठाकरे स्वबळावर निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे त्यांनी काय करायचे तो त्यांचा अधिकार आहे. राज ठाकरे यांच्या पाठींब्या शिवाय रिपब्लिकन पक्ष, शिवसेना, भाजपच्या पाठिंब्यावर महेंद्र थोरवे निवडून येतील अस देखील आठवले म्हणाले