Maharashtra Election : हरियाणासारखं सेम कनेक्शन, महाराष्ट्रात मविआचं टेंशन ?

| Updated on: Oct 10, 2024 | 11:25 PM

हरियाणानंतर महाराष्ट्रातही विजय मिळवणार असा दावा भाजपकडून सुरु झाला आहे. त्यात हरियाणा प्रमाणंच छोट्या आघाड्याचं समीकरण महाराष्ट्रातही आहे. याच आघाड्यांमुळं हरियाणात काँग्रेसला फटका बसला. त्यामुळं महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीचा फटका कोणाला बसणार ?, पाहुयात

Maharashtra Election : हरियाणासारखं सेम कनेक्शन, महाराष्ट्रात मविआचं टेंशन ?
Follow us on

हरियाणा सारखा मोठा विजय महाराष्ट्रात मिळवायचा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. भाजपसाठी हरियाणात कठीण स्थिती असतानाही, भाजपनं बहुमत मिळवलं आणि तिसऱ्यांदा सत्ता खेचून आणली. हरियाणात नेमकं काय घडलं आणि भाजप बाजी कशी पलटली. आता महाराष्ट्राकडे कसा मोर्चा वळवलाय हे समजून घेण्याआधी जरा निकालाचे आकडे समजून घेतले पाहिजे. हरियाणात 90 जागांपैकी भाजपनं 48 जागा जिंकल्या. तर काँग्रेसचे 37 आमदार निवडून आले आहेत. तर अभय सिंग चौटाला यांच्या INLD ला 2 जागा आणि 3 अपक्ष निवडून आले आहेत.

हरियाणातल्या विजयानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांकडून महाराष्ट्रातही विजयाचा दावा होतोय. हरियाणा आणि महाराष्ट्राचा विचार केला, तर आघाड्यांचं समीकरण दोन्हींकडे सारखंच आहे. हरियाणात मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच झाली. महाराष्ट्रात मुख्य लढत महायुती आणि महाविकास आघाडीत आहे.

हरियाणात दुष्यंत सिंग चौटालांची जेपीपी आणि खासदार चंद्रशेखर आझादांच्या आझाद समाज पार्टीची आघाडी झाली आणि दुसरी आघाडी होती, मायावतींची बसपा आणि आयएनएलडी यांची. महाराष्ट्रातही 2 वेगळ्या आघाड्या आहेत. प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी आणि
बच्चू कडू, राजू शेट्टी तसंच छत्रपती संभाजी राजेंची तिसरी आघाडी.

हरियाणात, काँग्रेसच्या जाट तसंच दलित मतांचं जेपीपी-आझाद समाज पार्टी आणि बसपा-आयएनएलडी आघाडीनं विभाजन केलं. त्याचा थेट फटका काँग्रेसला बसला. आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा साडे 4 हजारांपेक्षा कमी मतांनी 9 ठिकाणी पराभव झाला. महाराष्ट्रातही, वंचित आणि तिसऱ्या आघाडीची प्रामुख्यानं मतं ही दलित, काही प्रमाणात अल्पसंख्याक आणि शेतकरी वर्गाची आहेत. त्यामुळं या मतांचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो.

या व्यतिरिक्त मनोज जरांगे पाटीलही विशेषत: मराठवाड्यात मराठ्यांच्या मतांच्याआधारे उमेदवार देवून खेळ बिघडवण्याचा इशारा देत आहेत. तसं पाहिलं तर जरांगेंची मतं ही महायुतीच्या विरोधातही आहेत. जर जरांगेंनी उमेदवार दिले नाही तर ही मतं सरकारविरोधी रोष म्हणून महाविकास आघाडीकडे जावू शकतात. मात्र जरांगेंनी निवडणुकीत उतरण्याची घोषणा केलेलीच आहे.

हरियाणात बारीक बारीक गोष्टींवर भाजपनं काम केलं. 5 महिन्याआधीच मुख्यमंत्री बदलून 10 वर्षांच्या अँटीइंन्कन्सीला कमी करण्याचा प्रयत्न केला आणि नायब सिंग सैनींच्या रुपात ओबीसी चेहरा देत 35% ओबीसींसह सवर्णांकडे खास लक्ष केंद्रीत केलं. महाराष्ट्रातही भाजपची नजर ओबीसींसह लाडकी बहिणीच्या माध्यमातून 50 पर्सेट असलेल्या महिला व्होटरवर आहे.

हरियाणात विजय मिळाल्यानं भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. आठवड्याभरातच प्रचारालाही सुरुवात होईल. महाराष्ट्रात लोकसभेत भाजपला झटका देण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली. पण, विधानसभेत महाविकास आघाडीचा सामना भाजपसह वंचित आणि तिसऱ्या आघाडीशीही असेल.