बंडोबांमुळे खेळखंडोबा होणार, महाराष्ट्रात दोन्ही बाजूने चिक्कार बंडखोरी, कोणकोणत्या जागांवर पेच?

| Updated on: Oct 29, 2024 | 10:37 PM

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी दिसून येत आहे. मविआ आणि महायुती या दोन्ही ठिकाणीबंडखोरी उफाळून आली आहे. अनेक ठिकाणी एकाच पक्षाचे किंवा युतीतील वेगवेगळे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न केला, तरीही ते यशस्वी झाले नाहीत. या बंडखोरीचा फटका मविआ आणि महायुतीला बसण्याची शक्यता आहे.

बंडोबांमुळे खेळखंडोबा होणार, महाराष्ट्रात दोन्ही बाजूने चिक्कार बंडखोरी, कोणकोणत्या जागांवर पेच?
बंडोबांमुळे खेळखंडोबा होणार, महाराष्ट्रात दोन्ही बाजूने चिक्कार बंडखोरी
Follow us on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस होता. राज्यभरात विविध पक्षांच्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पण असं असलं तरीही अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी बघायला मिळाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जाहीर करण्यात आलेल्या उमेदवार याद्यांनंतर काही मतदारसंघांमध्ये पक्षांतर्गत नाराजी समोर आली. याच नाराजीतून अनेक ठिकाणी एकाच पक्षाचे दोन-दोन उमेदवार बघायला मिळत आहेत. तर काही ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीचे प्रत्येक दोन उमेदवार बघायला मिळत आहेत. पण याचा फटकाच त्या त्या पक्षांना आणि युती-आघाडीला बसण्याची जास्त शक्यता आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात दिल्लीत झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महायुतीमधील बंडखोरी रोखण्याचं आवाहन केलं होतं. बंडखोरी रोखण्यात यश आलं तरच महायुतीला सर्वाधिक यश येईल, असं त्यांनी महाराष्ट्रातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांना म्हटलं होतं. पण तरीही महायुतीच्या नेत्यांना बंडखोरी रोखण्यात यश आलेलं नाही. राज्यात कुठे-कुठे बंडखोरी झाली याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शिंदेंच्या शिवसेनेविरोधात भाजपचे बंडखोर

  1. पाचोऱ्यात शिंदे गटाचे किशोर पाटील महायुतीचे उमेदवार आहेत. तिथं भाजपच्या अमोल शिंदेंनी बंडखोरी केलीय
  2. बुलढाण्यात शिंदेंचे संजय गायकवाड अधिकृत उमेदवार आहेत. इथं भाजपच्या विजयराज शिंदेंची बंडखोरी केली आहे.
  3. मेहकरमधुन रायमुलकरांना शिंदेंचं तिकीट, भाजपच्या प्रकाश गवईंचं बंड
  4. ओवळा माजीवाड्यातून शिंदेंच्या प्रताप सरनाईकांविरोधात भाजपचे उपमहापौर राहिलेल्या हसमुख गेहलोतांचं बंड
  5. पैठणमध्ये शिंदेंच्या विलास भुमरेंविरोधात भाजपच्या सुनिल शिंदेंची बंडखोरी
  6. जालन्यात शिंदेंच्या अर्जुन खोतकरांविरोधात भाजपचे भास्कर दानवेंची बंडखोरी
  7. सिल्लोडमधून अब्दुल सत्तारांच्या विरोधात भाजपच्या सुनिल मिरकरांची बंडखोरी
  8. सावंतवाडी शिंदेंच्या दिपक केसरकरांविरोधात भाजपच्या विशाल परबांचं बंड
  9. घनसावंगीत शिंदे गटाच्या हिमकत उढाणांविरोधात भाजपचे सतिश घाटगेंची बंडखोरी
  10. कर्जतमधुन शिंदेंच्या महेंद्र थोरवेंविरोधात भाजपच्या किरण ठाकरेंची बंडखोरी

अजित पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात भाजप उमेदवारांची बंडखोरी

  1. अहेरीत दादा गटाच्या धर्मराव अत्रामांविरोधात भाजपचे अंबरिश अत्रामांची बंडखोरी
  2. अमळनेरात दादा गटाच्या अनिल पाटलांविरोधात भाजपच्या शिरिश चौधरींची बंडखोरी
  3. अमरावतीत सुलभा खोडके विरोधात भाजपचे जगदिश गुप्तांकडून बंडखोरी
  4. वसमतमध्ये राजू नवघरेंविरोधात भाजपचे मिलिंद एंबलांची बंडखोरी
  5. पाथरीत राजेश विटेकरांविरोधात भाजपचे रंगनाथ सोळंकेची बंडखोरी
  6. शाहपूरमधुन दौलत दरोडांविरोधात रंजना उगाडाची बंडखोरी
  7. जुन्नरमध्ये अतुल बेनकेंविरोधात भाजपच्या आशा बुचकेंची बंडखोरी
  8. मावळात सुनिल शेळकेंविरोधात भाजपच्या भेगडे बंधूंची बंडखोरी
  9. उदगीरमध्ये संजय बोनसोडेंविरोधात भाजपच्या दिलीप गायकवाडांची बंडखोरी
  10. कळवणमध्ये नितिन पवारांविरोधात रमेश थोरातांची बंडखोरी

भाजपविरोधात शिंदेंच्या शिवसेनेची बंडखोरी

  1. ऐरोलीत भाजपच्या गणेश नाईकांविरोधात शिंदे गटाच्या विजय चौघुलेंचं बंड
  2. बेलापूरात भाजपच्या मंदा म्हात्रेंविरोधात विजय नहाटांची बंडखोरी
  3. कल्याण पुर्वमधुन भाजपच्या सुलभा गायकवाडांविरोधात महेश गायकवाडांची बंडखोरी
  4. विक्रमगडमधुन भाजपच्या हरिश्चंद्र भोयेंविरोधात प्रकाश निकमांची बंडखोरी
  5. फुलंब्रीत भाजपच्या अनुराधा गायकवा़डांविरोधात रमेश पवारांची बंडखोरी
  6. सोलापूर शहर मध्यमध्ये देवेंद्र कोठेंविरोधात मनीष काळजेंची बंडखोरी

अजित पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात शिंदेंच्या शिवसेनेची बंडखोरी

  1. पाथरीत राजेश विटेकरांविरोधात शिंदे गटाच्या सईद खानांची बंडखोरी
  2. आळंदीतून दिलीप मोहितेंविरोधात अक्षय जाधवांचं बंड
  3. जुन्नरमध्ये अतुल बेनकेंविरोधात माजी आमदार शरद सोनवणेंचं बंड
  4. येवल्यात छगन भुजबळांविरोधात सुहास कांदेंच्या पत्नीचं बंड
  5. वाईमधुन मकरंद पाटलांविरोधात पुरूषोत्तम जाधवांची बंडखोरी
  6. अनुशक्तीनगर मधुन सना मलिकांविरोधात अविनाश राणेंची बंडखोरी
  7. देवळालीत सरोज अहिरेंविरोधात राजश्री अहिररावांचं बंड
  8. दिंडोरीत नरहरी झिरवाळांविरोधात धनराज महालेंना बंडखोरी
  9. बीडमध्ये योगेश क्षिरसागरांविरोधात अनिल जगतापांची बंडखोरी

मविआतल्या तीनही पक्षात कुठे-कुठे बंडखोरी?

  1. कसब्यात काँग्रेसच्या रविंद्र धंगेकरांविरोधात काँग्रेसच्याच कमल व्यवहारेंची बंडखोरी
  2. पारोळा-एरंडोल मतदारसंघात शरद पवार गटाच्या सतिष पाटलांविरोधात ठाकरे गटाच्या हर्षल मानेंची बंडखोरी
  3. पारोळ्यात सतिष पाटलांविरोधात ठाकरे गटाच्याच नानाभाऊ महाजन यांचीही बंडखोरी
  4. परळीत शरद पवार गटाचे उमेदवारी राजेसाहेब देशमुखांविरोधात पवार गटाचेच राजभाऊ फड यांचं बंड
  5. बीडमध्ये शरद पवार गटाच्या संदीप क्षीरसागरांविरोधात पवार गटाच्याच ज्योती मेटेंची बंडखोरी
  6. भायखळ्यात ठाकरे गटाच्या मनोज जामसुतकरांविरोधात काँग्रेसच्या मधु चव्हाणांची बंडखोरी
  7. राजापूरमध्ये ठाकरे गटाच्या राजन साळवींविरोधात काँग्रेसच्या अविनाश लाडांची बंडखोरी
  8. जिंतूरमध्ये शरद पवार गटाच्या विजय भांबळेंविरोधात काँग्रेसच्या सुरेश नागरेंची बंडखोरी…
  9. राजापूरमध्ये ठाकरे गटाच्या राजन साळवींविरोधात ठाकरे गटाच्याच उदय बनेंची बंडखोरी
  10. श्रीगोंद्यात ठाकरे गटाच्या अनुराधा नागवडेंविरोधात शरद पवार गटाच्या राहुल जगतापांची बंडखोरी
  11. सांगोल्यात ठाकरे गटानं दीपक साळुंखेंना तिकीट दिल्यानंतर मविआतील शेकापच्या बाबासाहेब देशमुखांनी बंडखोरी केलीय
  12. दक्षिण सोलापुरात शिवसेना ठाकरे गटानं अमर पाटलांना तिकीट दिलंय. इथं काँग्रेसच्या दिलीप मानेंनी बंड केलंय
  13. पंढरपुरात आधी काँग्रेसनं भगीरथ भालकेंना तिकीट दिलं., त्यानंतर शरद पवार गटाच्या यादीत पंढरपुरातच अनिल सावंतांचं नाव जाहीर झालंय
  14. परांड्यात ठाकरे गटानं रणजीत पाटलांना तिकीट दिलंय.. इथंच शरद पवार गटानं राहुल मोटेंनाही उमेदवारी जाहीर केलीय
  15. कुर्ल्यात ठाकरे गटानं प्रविणा मोरजकरांना तिकीट दिलंय. पण शरद पवार गटाकडून मिलिंद कांबळेंनाही उमेदवारी जाहीर झालीय.