Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakh : गेल्या काही महिन्यांपासून लंडनहून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात येणार असल्याचे बोललं जात आहे. आता अखेर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांबाबत विधानसभेत निवेदन सादर केलं. यावेळी त्यांनी ही वाघनखं महाराष्ट्रात कधी, कुठे आणि किती काळ दर्शनासाठी ठेवली जाणार आहेत? याची माहिती दिली. तसेच ही वाघनखं आणण्यासाठी नेमका किती खर्च आला, याबद्दलही घोषणा करण्यात आली.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लंडनच्या संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या वाघनखांच्या मुद्द्यांवरुन चर्चा करण्यात आली. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी भाषणात लंडनच्या म्युझियममधील वाघनखं किती काळ महाराष्ट्रात राहणार? याबद्दल सविस्तर माहिती दिली. “ही वाघनखं लंडनला गेल्यानंतर ब्रिटनमध्ये प्रदर्शनातही ठेवण्यात आली होती. 1875 आणि 1896 साली ही प्रदर्शनं भरवण्यात आली. त्यासंदर्भात तेव्हाच्या वर्तमानपत्रातही बातम्या आल्या. त्यानुसार ही वाघनखं त्या संग्रहालयात असल्याचं सांगण्यात आलं. आपला पत्रव्यवहार पाहिल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा वर्षभरासाठी ही वाघनखं दर्शनासाठी देऊ असं सांगितलं होतं. पण यानंतर आम्ही पुन्हा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी तीन वर्षांसाठी वाघनखं आपल्याकडे राहतील, असा निर्णय झाल्याचे सांगितले.
येत्या १९ जुलैला ही वाघनखं साताऱ्याच्या शासकीय म्युझियममध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि तिथले सरदार यांच्या उपस्थितीत ही वाघनखं दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी वाघनखं भारतात आणण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आल्याच्या मुद्द्यावरही भाष्य केले. आपल्या अधिवेशनाचा एका दिवसाचा खर्च जेवढा आहे, त्याच्या कितीतरी पट कमी खर्च हा वाघनख आणण्यासाठी झाला. वाघनखं आणण्यासाठी 14 लाख 8 हजारांचा खर्च झाला. ही वाघनखं आणण्यासाठी कुठल्याही प्रकारचे भाडे दिले जाणार नाही. ते कधीही दिले जात नव्हते, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.
“शिवाजी महाराज आपला आत्मा आहे. अनेकांनी ही वाघ नखं मिळावी यासाठी पत्रव्यवहार केला. त्यानुसार आपण भारत आणि ब्रिटन यांच्यात एक सामंजस्य करार केला. त्यानंतर ही वाघ नखं आपल्याकडे तीन वर्ष राहील असा निर्णय झाला”, असेही त्यांनी पुन्हा नमूद केले.