महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरु होत आहे. देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर पहिल्यांदा होणाऱ्या या अधिवेशनात महायुतीकडे प्रचंड बहुमत आहे. दुसरीकडे विरोधकांकडे विरोधी पक्षनेते बनण्याइतके संख्याबळ नाही. परंतु संख्या नसली तरी आपण आक्रमक राहणार असल्याचे विरोधकांनी दाखवून दिले. रविवारी अधिवेशाच्या पूर्वंसंध्येला सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. त्यानंतर महाविकास आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर हल्लाबोल केला. नाना पटोले, अंबादास दानवे, जितेंद्र आव्हाड, विजय वड्डेटिवार, सुनील प्रभू यांनी सरकारवर घाणाघाती टीका केली.
शिवसेना उबाठा नेते अंबादास दानवे म्हणाले, हे खूनी सरकार आहे. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत. परंतु मुख्यमंत्री मिरवणुकीत व्यस्त आहेत. अधिवेशन फक्त देखावा आहे. त्यात ना प्रश्न आहे, ना उत्तर आहे. मात्र आम्ही या सरकारला जाब विचारणार आहे. बीडमधील जिल्हाधिकारी आणि एसपींना त्वरित निलंबित केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
विजय वड्डेटीवार यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर सर्वाधिक कमी दिवसांचे हे अधिवेशन आहे. विदर्भातील मुख्यमंत्री आहेत. तसेच विदर्भात हे अधिवेशन आहे. त्यामुळे किमान तीन आठवड्यांचे अधिवेशन अपेक्षित होते. विदर्भात अनेक प्रश्न आहेत. त्याची चर्चा होणे अपेक्षित होते. त्याला हरताळ फासण्याचे काम या सरकारने केले आहे. महाराष्ट्रात सोयाबीन शेतकरी रडत आहे. उद्योग बाहेर जात आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था नाही एका सरपंचाला उचलून नेले जाते. त्याचा खून होतो. ज्यांचे याला पाठबळ आहे त्याला आज मंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. खून करणाऱ्यांना राजकीय आश्रय दिला जातो आहे.त्यामुळे चहापानावर आम्ही बहिष्कार घालत आहोत, असे वड्डेटीवार यांनी म्हटले.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, परभणीत आंबेडकरी विचाराच्या एका कार्यकर्त्याच्या बेदम मारहाणीत मृत्यू होतो. परभणीत पोलीस बळाचा गैरवापर केला गेला आहे. बीडमध्ये सरपंचाची हत्या होते. त्याला पाय चाटायला लावले जाते. तोंडावर लघु शंका केली गेली. त्यानंतर त्याची हत्या झाली. मागील दोन वर्षांत बीडमध्ये 32 खून झाले आहेत. कोणालाही उचलून त्यांचे खून केले जात आहेत. मंत्रिमंडळाची स्थापना होत असताना हे सगळे घडत आहे, त्याची दखलही घेतली जात नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
ईव्हीएम विरुद्ध महाराष्ट्र अशी लढाई सुरू झाली आहे. त्याचा वनवा देशभर पेटणार आहे, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला. ते म्हणाले, बीड आणि परभणी घटनेची चौकशी व्हावी. बीडमधील घटना पाहता अशा माणसाचा महाराष्ट्र मंत्रिमंडळात समावेश व्हावा याचा आम्ही निषेध करतो.
नाना पटोले म्हणाले, विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. बेरोजगारीचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. लाडक्या बहिणींची संख्या अटी शर्ती लावून आता कमी केले जात आहे. त्यांना संख्या कमी न करता तातडीने सरसकट 2100 रुपये लाडक्या बहिणींना दिले पाहिजेत. वाल्मीक कराड यांचा फोटो धनंजय मुंडे यांच्यासोबत आहे. बीड प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागमी पटोले यांनी केली.