जालना | 14 फेब्रुवारी 2024 : मराठा आरक्षणासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्याकरिता आज मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी बंद पुकारला आहे. राज्यातील अनेक भागात बंद पुकारण्यात आला आहे. या भागात बंदला चांगला प्रतिसाद मिळत असून शुकशुकाट पसरला आहे. तर, काही ठिकाणी मराठा आंदोलकांनी आंदोलन केलं आहे. भररस्त्यावरच टायर जाळून निषेध नोंदवल्याने वाहतूककोंडीचीही समस्या उद्भवली आहे. दरम्यान, आम्ही शांततेत आंदोलन करणार आहोत, असं मराठा आंदोलकांनी म्हटलं आहे.
सोलापुरात शुकशुकाट
सोलापूर जिल्हातील माढा शहरात मराठा समाजाने बंद पुकारला आहे. बाजारपेठेतील दुकाने बंद ठेऊन शहरातील व्यापाऱ्यांकडून या बंदला चांगला प्रतिसाद देण्यात आला आहे. शासनाकडून सगे सोयरेच्या निर्णयाचा अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. याच मागणीसाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार माढ्यात बंदला प्रतिसाद मिळाला आहे.
मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी तुळजापूर शहर कडकडीत बंद करण्यात आला आहे. तुळजाभवानी मंदिर परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. व्यापारी, स्थानिक नागरिक यात सहभागी झाल्याने बंद यशस्वी झाला आहे. धाराशीवमध्ये तरुण आक्रमक झाले होते. या तरुणांनी मोटर सायकल रॅली काढत सरकारला निर्णय घेण्यासाठी तीन तासांचा अल्टिमेटम दिला आहे. तीन तासात निर्णय न घेतल्यास आक्रमक आंदोलन करू, असा इशाराच या तरुणांनी दिला आहे.
राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी गेल्या चार दिवसापासून अंतरवेली सराटी येथे मनोज जरांगे पाटील अमर उपोषण करत आहेत. त्यांची तब्येत खालवली असून आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाने बीड जिल्ह्यातील परळीत बंद पुकारला आहे. आज सकाळपासूनच परळीत कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
सकल मराठा समाजाने हिंगोली जिल्ह्यात बंद पुकारला आहे. कळमनुरी, वसमत, सेनगाव, औंढा नागनाथसह इतर ठिकाणी अत्यावश्यक सेवा आणि शाळा महाविद्यालय सोडून छोटया मोठ्या बाजारपेठ कडकडीत बंद आहेत.
मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आज नगरमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. महाराष्ट्र बंदच्या हाकेला अहमदनगर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. कर्जत, पारनेर, जामखेड तालुक्या कडकडीत बंद पुाकरमअयात आला आहे. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी बारामतीत बंद पुकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये सहभाग घेतला असून त्यांनी शंभर टक्के दुकाने बंद ठेवली आहेत. आज दुपारपर्यंत हा बंद पाळण्यात येणार आहे. सकल मराठा समाजाने हा बंद पुकारला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज लातूरमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. लातूरमधील मुख्य बाजारपेठ असलेली गंजगोलाई व्यापाऱ्यांनी बंद ठेवली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणी बरोबरच मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यानी बंदची हाक दिली असून शहरातील नागरिकांनी या बंदला चांगला प्रतिसाद दिला आहे.
आळंदीतही बंदला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे वारकऱ्यांची मांदियाळी असणारी अलंकापुरी ओस पडली आहे. शहरात बंद शांततेत असून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाने बीड जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून काल मध्यरात्रीपासून जिल्ह्यात 27 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत. जमावबंदीच्या काळात मोर्चा, सभा, मिरवणूकीसाठी सक्षम पोलिस अधिकार्यांची मान्यता घेणे बंधनकारक असणार असल्याचं आदेशात म्हटलं आहे. बीडमध्ये बंदला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र, शहरातील बस सेवा सुरळीत सुरू आहे.
अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील आखेगावमध्ये ग्रामस्थांनी कडकडीत बंद पुकारला आहे. मराठा संघटनांच्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला गावकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. गावातील मार्केट, सर्व दुकाने बंद ठेवत ग्रामस्थांनी बंदला पाठिंबा दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाने आज महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या बंदला मनमाडमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. संपूर्ण शहरात शंभर टक्के कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यावर शुकशुकाट पसरला असून बंदमधून मेडिकल, हॉस्पिटल यासह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा वगळण्यात आल्या आहेत.