संदीप राजगोळकर, Tv9 प्रतिनिधी, नवी दिल्ली | 11 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीबाबत दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीतील बैठकीत महाराष्ट्रातील उमेदवारांची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत राज्यातील काही उमेदवारांच्या नावाची चर्चा झाली आहे. कोल्हापूरसाठी समरजित घाटगे यांच्या नावाची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जागा सोडली नाही तर समरजित घाटगे हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढणार, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सांगलीतून खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा आहे. बीडमधून खासदार प्रितम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची नवी दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते दिल्लीला गेले आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला गेले आहेत. केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीआधी महाराष्ट्र भाजप राज्य कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत विविध मतदारसंघांसाठी उमेदवार ठरवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजपच्या राज्याच्या कोअर कमिटीच्या बैठकीत उमेदवार ठरवण्याबाबत चर्चा झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत कोल्हापूरच्या जागेवर चर्चा झाली आहे. कोल्हापूरची जागा सध्या शिवसेनेकडे आहे. पण भाजप या जागेसाठी आग्रही आहे. महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात शाहू छत्रपती महाराज यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे भाजप या मतदारसंघात राजर्षी शाहू महाराजांचे जनक घराण्याचे वंशज समरजित घाटगे यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने कोल्हापूरची जागा सोडली नाही तर भाजप शिवसेनेच्या चिन्हावर समरजित घाडगे यांना निवडणुकीच्या मैदानात उतारण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. भाजपच्या आजच्या बैठकीत तशी चर्चा झाली आहे.
दुसरीकडे भाजप सांगलीत विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनाच उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे. ठाकरे गटाकडून सांगलीत डबल केसरी चंद्रहार पाटील हे निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा आज ठाकरे गटात प्रवेशही झाला आहे. त्यामुळे संजयकाका पाटील विरुद्ध चंद्रहार पाटील अशी लढत सांगलीत होण्याची शक्यता आहे.
पुण्यात भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा आहे. आजच्या बैठकीत मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर बीडमध्ये मुंडे बघिणींपैकी कुणाला उमेदवारी मिळणार? याबाबत सर्वत्र चर्चा सुरु आहे. आजच्या बैठकीतही याबाबत चर्चा झाली आहे. बीडमध्ये खासदार प्रितम मुंडे यांना ब्रेक दिला जाऊ शकतो. त्यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना संधी दिली जाण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगरमधून भागवत कराड हे निवडणूक लढवणार नाहीत. भाजप ही जागा लढवणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ही जागा देण्यात येणार आहे. त्यामुळे इथे शिंदेंच्याच शिवसेनेचा उमेदवार असणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.