मुंबई, दि. 18 फेब्रुवारी 2024 | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरुच आहे. सगेसोयरेसंदर्भात कायदा करण्यासाठी हे उपोषण सुरु आहे. देशातील पहिला सागरी पूल असलेल्या अटल सेतूवरून मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत अक्षय कुमार, टायगर श्रॉफ देखील आले आहेत. भांडुपमधील शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य माजी महापौर दत्ता दळवी यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली. नवी मुंबईत फ्लेमिंगो पक्षी येण्यास सुरूवात झाली आहे. विदेशातून हजारो मैलाचे अंतर कापत हे पक्षी अन्नाच्या शोधात नवी मुंबईत येत आहेत.यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
नांदेड | माजी मंत्री काँग्रेस नेत्या रजनी सातव यांचं निधन झालं आहे. वयाच्या 76 व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. नांदेडच्या एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या त्या मातोश्री होत्या.
नवी दिल्ली : राज्यसभा उमेदवार मेधा कुलकर्णी आणि मंत्री भारती पवार यांची दिल्लीत भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात भेट झाली. भाजप महिला पदाधिकाऱ्यांसोबत मंत्री भारती पवार यांनी चर्चा केली. पवार यांच्याकडून मेधा कुलकर्णी यांना शुभेच्छा देण्यात आल्या. मेधा कुलकर्णी लवकरच राज्यसभेच्या खासदार होणार आहेत.
नवी दिल्ली | केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी हटवत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिसा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कांदा निर्यातील मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने देशातील कांद्याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी निर्यातीवर बंदी घातली होती. सरकारने मुदतीआधीच ही बंदी हटवली आहे. आता यावरुन अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. निर्यातबंदी हटवल्यावरुन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी काय म्हटलं हे आपण जााणून घेऊयात.
– व्यवस्थेच्या माध्यमातून चुकीची आकडेवारी आली होती म्हणून सरकारने हा निर्णय घेतला होता.
– नेमकी आकडेवारी समजल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
– शेतमालाचे सगळे प्रश्न आता मार्गी लागायला सुरू होतील.
– आता सोयाबीनवर देखील निर्णय घ्यावा अशी विनंती करतो.
– खाद्य तेलावरची आकडेवारी देखील आता समोर यावी ही मागणी मी करत आहे.
– घोळ झालेली आकडेवारी मी पियूष गोयल यांना सांगितली होती.
आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहोत. शिवाजी महाराजांनी राज्यभिषेक झाला आणि त्यानंतरही भरपूर काम केलं. भाजपची तिसरी टर्म मी सत्ता उप भोगण्यासाठी मागत नाहीये. आम्ही सत्ता उपभोगण्यासाठी घेतली असती तर गरिबांची घर नसती बांधली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
जळगावच्या अमळनेरमध्ये अग्निशमन कार्यालयात मद्यप्राशन करतानाचा अधिकाऱ्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अमळनेरमधील नगरपरिषदेचं अग्निशमन कार्यालयात भर दिवसा अधिकारी मद्यप्राशन करत होता.
जे करायचे ते कर असे म्हणत मुजोर मद्यप्राशन करणाऱ्या अधिकाऱ्याकडून व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाला दमदाटी केली. प्रकाराबाबत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करूनही कारवाई न झाल्याने तक्रारदार परेश उदेवाल या तरुणाचा उपोषणाचा इशारा दिला आहे.
कॉंग्रेसपासून देश वाचविणे, देशाची पिढी वाचविणे ही प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यांची जबाबदारी आणि कर्तव्य असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना सांगितले.
आधीचे सरकार नॉर्थ ईस्टच्या विकासाकडे लक्ष देत नव्हते. कारण तेथे लोकसभेच्या जास्त जागा नाहीत. परंतू आम्ही नॉर्थ-ईस्टलाही विकासाची संधी दिली, जी राज्ये देशाची शेवटची राज्ये मानली त्यांना देशाच्या पहिल्या क्रमांकावर आणले. नॉर्थ ईस्टचे अनेक मंत्री संसदेत आणले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना सांगितले.
देशातील शेतकरी भविष्यात खाद्य तेलाचे परकीय अवलंबित्व संपणार आहे. त्यामुळे भविष्यात खाद्य तेल बाहेरुन आणण्याची गरज राहणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना सांगितले.
भाजपा तिसऱ्या कार्यकाळात भारताला जगातील तिसरी मोठी आर्थिक ताकद बनविणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना सांगितले.
महिलांसाठी आपले सरकार अनेक योजना आणीत आहे. आता निमलष्करी दलात महीलांची भरती होणार आहे. देशातील 25 कोटी पेक्षा महिलांची बॅंक खाती काढली. तीन दशकानंतर महिलांना संसदेत आरक्षण दिले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना सांगितले.
आम्ही राज्यनीतीसाठी जगत नाही आम्ही राष्ट्रनीतीसाठी जगत आहोत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना सांगितले.
गेल्या दहा वर्षांत देश प्रगतीपथावर आहे. देशातील 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढणे ही मोठी गोष्ट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.
भाजपाला कार्यकर्त्यांना प्रत्येक घरात पोहचायचं आहे. सर्व मतदारांचा विश्वास जिंकायचा आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना सांगितले.
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा जवळील कार कालव्यात पडून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
केंद्र सरकाने कांदा निर्यातीवरील बंदी हटवली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कांदा निर्यातील मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने देशातील कांद्याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी निर्यातीवर बंदी घातली होती. या निर्यात बंदीची डेडलाईन 31मार्चपर्यंत होती. मात्र डेडलाईन संपण्याच्या आधीच सरकारने ही बंदी हटवली आहे.
शासनाने काढला जीआर अनुकंपवार अन्याय करणारा आहे. प्रतीक्षा यादीत असताना 2005 नंतर नियुक्त झाल्या त्यांच्या संदर्भात कुठलाही उल्लेख नाही त्यांचा समावेश करावा, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.
नातवाच्या नोकरीचं आमिष दाखवत आजीला 21 लाखांचा गंडा घातल्याची घटना नागपूरमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज अकोला हिंदू जन आक्रोश मोर्चा आहे. अकोल्यामध्ये ज्या काही घटना मागील काही दिवसात घडल्या.. टिपू सुलतान उदात्तीकरण आणि छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्याचा बसवण्यासाठी विरोध आहे… सगळ्या विरुद्ध हिंदू समाजाला जागृत करत ताकद देण्यासाठी आज सगळे हिंदुत्ववादी संघटना मिळून मोर्चा काढत आहे… त्यात सहभागी होणार आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले.
महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन. आशा गटप्रवर्तक कर्मचारी यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत शासनाने GR काढावा अशी मागणी. आंदोलनाला खासदार अरविंद सावंत यांनी भेट दिली
मुख्यमंत्री शिंदे आज सातारा दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री साताऱ्यातून आज काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
अमित शाह यांनी विरोधकांवर शाब्दिक हल्ला चढवला. राहूल गांधी यांना पंतप्रधान बनवणं हे सोनिया गांधी यांचं लक्ष आहे तर आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवणं हे उद्धव ठाकरे यांचं लक्ष असल्याचं ते म्हणाले.
अभिनेता रितेश देशमुख नुकताच भाषणामध्ये भावूक झाल्याचे बघायला मिळाले.
साखर कारखाण्याच्या कार्यक्रमात भाषणादरम्यान रितेश देखमुख विलासराव देखमुख यांच्या आठवणीने भावून झाले. राजकारणात वैयक्तिक टिका करू नये असं मत ही त्यांनी व्यक्त केलं.
आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. गाफील राहू नका. कुणी काही वक्तव्यं करतं तसं करू नका. जर असं कुणी वक्तव्य केलं तर त्याची नोंद देवेंद्र फडणवीस , रविंद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे घेतात. आमची यावर व्यवस्थित चर्चा झालेली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या भावना दुखवून घेऊ नका, असं अजित पवार म्हणाले.
पुण्यातील एशडन प्रॉपर्टीजसाठी सर्वाधिक बोली 760 कोटी रुपयांची लावण्यात आली आहे. पण या आयटी कंपनीसाठी स्वदेशी कंपनी, पतंजलीने योग साधला आहे. बाबा रामदेव यांच्या पतंजलीने 830 कोटी रुपयांची बोली लावली आहे. या आयटी कंपनीच्या महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी मालमत्ता आहेत.
फेब्रुवारी महिन्यात पण मौल्यवान धातूत पडझडीचे सत्र सुरु होते. या आठवड्यात बुधवारी सोन्याच्या किंमती 800 रुपयांनी घसरल्या. तर चांदी 14 फेब्रुवारीला 1500 रुपयांनी घसरली होती. त्यानंतर शुक्रवार, शनिवारी किंमतीत वाढ झाली.
सुप्रिया सुळेंनी भाजप नेते चंद्रराव तावरे,पृथ्वीराज जाचक यांची भेट घेतली. काटेवाडीत एका कार्यक्रमा दरम्यान ही भेट झाली.शरद पवारांचे कट्टर विरोधक समजल्या जाणाऱ्या तावरेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. पृथ्वीराज जाचक यांनी पवारांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळेंनीही जाचकांची भेट घेतली.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंकडून दुरावलेल्याना पुन्हा सोबत घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे कारण मराठे ओबीसी मध्येच आहेत, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. शंभर दोनशे लोकांसाठी मराठ्यांचे वाटोळे होईल, सहा कोटी मराठ्यांचे मागणे आहे ओबीसीतून आरक्षण पाहिजे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.
अजित दादा हे उत्साह मूर्ती दादांच्या नेतृत्वावरती तरुणाई वृद्ध महिला मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवतात. दादा हे अजब रसायन त्याच्यामुळे कार्यकर्ते त्यांच्याकडून ऊर्जा घेतात आणि त्यांच्या भेटीने सर्वांना आनंद मिळत असून जोशमध्ये कार्यकर्ते कामे करतात, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.
सग्या सोयऱ्याची सरकारने अंमलबजावणी केली पाहिजे, अशी आग्रही मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली. ज्यांची नोंद मिळाली त्या नोंदी आधारे सग्या सोयऱ्यांना आरक्षण द्यावे. 20, 21 तारखेला सग्या सोयऱ्याची अध्यादेशाची अंमलबजावणी करावी.आंदोलनाची दिशा 20 तरखेनंतर ठरवणार असल्याचे ते म्हणाले. आंदोलन दरम्यान विद्यार्थ्यांना त्रास झाला नाही पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
सरकारने दिलेलं आरक्षण रद्द झालं तर काय? असा प्रश्न जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. आरक्षण रद्द झाल्यास मराठा तरुणांना पुन्हा लढा द्यावा लागेल. ओबीसीतून आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरु राहणार.. असा उशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मागच्या काळात काही गोष्टी वेदना देणाऱ्या झाल्या… आधी अडीच वर्ष आम्ही मविआसोबत होतो… मविआच्या नंतर मी वेगळी भूमिका घेतली… महाराष्ट्राचे प्रश्न आम्हाला सोडवायचे आहे… लोकांच्या मनातील निर्णय घेणार… असं अजित पवार म्हणाले आहेत.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघ आणि रानगव्याच्या थरारक झुंझीचा व्हीडीओ समोर आला आहे. चंद्रपूर शहरातील वन्यजीव प्रेमी भूषण थेरे यांनी काल आपल्या कॅमेऱ्यात हा थरारक प्रसंग कैद केला. मोहर्ली परिसरातील पाणवठ्यावर छोटा दडियल या वाघाने एका रानगव्यावर घात लावून हल्ला केला. रानगवा वाघाच्या तावडीतून निसटण्याचा निकराने प्रयत्न करत होता. मात्र वाघाने रानगव्याची मान आपल्या जबड्यात अतिशय मजबुतीने पकडून धरली होती. मात्र अचानक रानगव्याच्या कळपातील अल्फा नराने मदतीसाठी वाघावर प्रतिहल्ला चढविला. अल्फा नराच्या ताकतीचा अंदाज असल्याने छोट्या दडीयलने शिकार सोडून पळ काढला. अल्फा नर गव्याच्या ताकतीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक होणार आहे. राष्ट्रीय अधिवेशन संपल्यानंतर दुपारी बैठक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब बैठकीत होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला उपस्थित असणार आहेत. या महिन्याच्या शेवटी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यावर भाजपचा प्रयत्न आहे.
औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवड आणि मावळ तालुक्याची तहान भागवणाऱ्या पवना धरणात केवळ 59 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा जून अखेर पर्यंत पुरणार असला तरी पाऊस लांबणीवर गेला तर पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. पवना धरणात सध्या 59.2 टक्के पाणीसाठा असून गतवर्षी 59.41 टक्केइतका पाणीसाठा होता हा साठा शहराला जून महिन्याच्या अखेरपर्यंत पुरला होता. हा पाणीसाठा जूनअखेर पर्यंत पुरणार असला तरी उन्हाळ्याची दाहकता वाढल्यास पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अमरावती नांदगाव खंडेश्वर रोडवर ट्रॅव्हल आणि सिमेंट काँक्रीट मिक्सर मशीनचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू, तर 10 गंभीर जखमी झालेत. यवतमाळ येथे क्रिकेट मॅच खेळण्यासाठी हे 14 तरुण अमरावती वरून यवतमाळ साठी जात असताना नांदगाव खंडेश्वर जवळ शिंगणापूर जवळ अपघात झाला. जखमींना नांदगाव खंडेश्वर येथील तालुका आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. नांदगाव खंडेश्वर येथे जखमींवर उपचार सुरू …तर काही गंभीर जखमींना अमरावती येथे पुढील उपचारासाठी रेफर केले.
नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा अल्पसंख्यांक मेळावा होत आहे. दुसरीकडे पक्षाच्या महिला पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्याकडे तक्रार करणार आहेत. नवी मुंबईच्या जिल्हाध्यक्ष नामदेव भगत अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप महिला पदाधिकाऱ्यांनी केलाय. माजी महिला जिल्हाध्यक्ष सुनीता देशमुख यांच्यासह अनेक महिला तालुकाध्यक्ष, सरचिटणीस जिल्हाध्यक्ष नाराज आहेत. या सर्व महिला अजित पवार यांची भेट घेऊन भूमिका मांडणार आहेत.
नाशिक : घोटी पोलिसस्टेशन हद्दीतील टोलनाका येथे मिळालेल्या माहितीच्या आधारे मद्याची चोरटी वाहतूक करताना पोलिसांनी लाखो रुपयांचा माल हस्तगत केला आहे. यात एकाला अटक करण्यात आली आहे, हा मद्यसाठा चारचाकी वाहनाने सुरतकडे तस्करी करण्यात येत होता. विशेष म्हणजे वाहनात छूपे कप्पे बनवण्यात आले होते. त्यात हा माल लपवून तस्करी करण्यात येत होती.
नागपूर : इंजिनिअरिंग झालेल्या नातवाला सरकारी नौकरी लावून देण्याचा नावावर आजीची फसवणूक करण्यात आलीय. हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडलीय. नातवाला नौकरीचे आमिष देत तीन जणांनी आजीकडून 21 लाख रुपये घेतले होते. भामट्यांनी 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर लिहून देत नोकरीची हमी दिली होती, या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी तीन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
पुणे : पुण्यातील शिवभक्त दीपक घोलप यांनी तब्बल 79,307 रुपये किंमतीची 22,301 नाणी वापरत आकर्षक असे शिवलिंग निर्माण केले आहे. यामध्ये 10 रुपये किंमतीची 2510 नाणी, 5 रुपये किंमतीची 4875 नाणी तर 2 रुपये किंमतीची 14,916 नाणी वापरली आहेत. ह्या नाण्याच्या शिवलिंगाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालीय.
नाशिक : नाशिकमध्ये पोलिसांचे अद्यावत सायबर लॅब उभारण्यात येणार आहे. सोशल मीडियाद्वारे धार्मिक तेढ निर्माण करण्यासारख्या प्रकारांवर, सायबर फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मुंबई, पुणे पोलिसांच्या धर्तीवर नाशकात अत्याधुनिक सायबर लॅब उभारण्यात येणार आहे. नागरीकांच्या मनातील अभिप्राय जाणून घेण्यासाठी पोलिस आता जॉगिंग ट्रॅकवर नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
मुंबईतील अटल सेतूवर आज पहाटे पाच वाजल्यापासून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. ४२ किमी, २१ किमी, १० किमी आणि पाच किमी अशी ही स्पर्धा आहे. सिने कलाकार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी स्पर्धेला झेंडा दाखवून सुरुवात केली आहे.
नवी मुंबईत फ्लेमिंगो पक्षी येण्यास सुरूवात झाली आहे. विदेशातून हजारो मैलाचे अंतर कापत हे पक्षी अन्नाच्या शोधात नवी मुंबईत येत आहेत. गेल्या काही वर्षांत नवी मुंबई शहरातील असलेले अनुकूल वातावरण, खाडी किनाऱ्यालगत असलेले मुबलक अन्नामुळे हजारो फ्लेमिंगो शहरात दाखल होत आहेत.
हिंगणघाट येथे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचा भूमीपूजन व कोनशिला समारंभ पार पडला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन करण्यात आले.
हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कवठा या गावात विनायक पाटील हे गेली आठ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये मराठवाड्यातील 38% जनता कुणबी असल्याच्या नोंदी आहेत शिवाय शिंदे समितीने देखील ते गॅझेट लागू करण्याचे शिफारस केली आहे.तरी देखील राज्य सरकार सगळे सोयऱ्याच्या भानगडीत अडकवून अवहेलना करू नये, असे त्यांनी म्हटले आहे.