मुंबई, दि. 6 फेब्रुवारी 2024 | लातूर शहरातल्या बोधे नगर भागात एका कार चालकाने मद्यधुंद अवस्थेत दहा ते बारा वाहनांना धडक दिली. या घटनेत अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पुण्याहून अयोध्येला राममंदिर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना पुण्यातील संघर्ष सेनेकडून मेडिकल किटचे वाटप करण्यात आले. ग्रँड मास्टर अभिजीत कुंटे यांचा कल्याणमधील 14 वर्षीय विद्यार्थ्याने बुद्धीबळ स्पर्धेत पराभव केला. एकादशी निमित्त त्रंबकेश्वरच्या संत निवृत्तीनाथ मंदिरात भाविकांची रीघ लागली आहे. शेकडो दिंड्या त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाल्या आहेत. टाळ मृदुंगांच्या गजरात त्रंबकनगरी दुमदुमली आहे. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
मुंबई | मनसे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अर्धा तास चर्चा झाली आहे. मनसेच्या नेत्यांमध्ये आणि फडणवीस यांच्यात सागर बंगल्यावर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्धा तास चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे. या भेटीत मनसेकडून बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई उपस्थित होते.
आळंदी | मनोज जरांगे पाटील यांचे पुण्यातील आळंदी येथे आगमन झालं आहे. जरांगे पाटील आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. दर्शन घेतल्यानंतर आळंदी शहरातून सकल मराठा समाजाच्या वतीने मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणूक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सभा होणार आहे.
पुणे | कोरोना काळात शहरातील व्यापाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह मुरलीधर मोहोळ यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर आता गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग मिळणार आहे. राज्यात 21 मार्च 202 ते 31 मार्च 2022 या दरम्यान नोंद करण्यात आलेले खटले मागे घेण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला होता. या संदर्भात जिल्हास्तरावर समिती गठीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मध्य प्रदेशातील हरदा फटाका कारखान्याच्या दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे, माहितीसाठी घटनास्थळी एक हेल्पडेस्क स्थापन करण्यात आला आहे. गोदामातील आग अजूनही धुमसत असून, केवळ दोन गोदामांची आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगता रॉय यांनी म्हटले आहे की ते भाजपशासित राज्यांमध्ये यूसीसी लागू करू शकतात, परंतु पश्चिम बंगालमध्ये ते लागू केले जाणार नाही.
भारत नेहमीच निसर्ग, संस्कृती आणि वारसा या बाबतीत समृद्ध राहिला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यात सांगितलं. प्रत्येक प्रकारचे पर्यटन एकाच देशात उपलब्ध आहे. 2014 पूर्वी देशात जे सरकार होते त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. पूर्वीच्या सरकारांकडे पर्यटनस्थळे आणि बेटांच्या विकासाची दृष्टी नव्हती. चांगले रस्ते, रेल्वे आणि विमानतळ नसल्यामुळे अनेक पर्यटनस्थळे अज्ञातच राहिली. “गेल्या 10 वर्षांत, आम्ही या सर्व कमतरता दूर करण्याचा प्रयत्न केला.”
उत्तराखंड विधानसभेत यूसीसी विधेयक सादर झाल्यानंतर आता राजस्थानमध्येही ते लागू करण्याची तयारी सुरू आहे. राजस्थानचे कॅबिनेट मंत्री कन्हैया लाल चौधरी यांनी याला दुजोरा दिला आहे. यूसीसी लागू करणारे उत्तराखंड हे पहिले राज्य ठरले आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. राज्यातही त्याची अंमलबजावणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
सासवड : येथील तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीन चोरीला गेल्यानंतर पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. प्रशासनाने नवीन इमारतीमध्ये प्रशासकीय कार्यालय हलवले असते तर ही वेळ आली नसती असे आमदार संजय जगताप यांनी म्हटले. ईव्हीएम मशीनची चोरी होण्याचा उद्देश आणि आगामी निवडणुक याबद्दल शंका उपस्थित करताना पुढील निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून घेतल्या जाव्यात अशी मागणीही त्यांनी केली.
माळशिरस : भाजपच्या बालेकिल्ल्यात शरद पवार गटाचां विजय निश्चय मेळावा होत आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढविलेले उत्तमराव जानकर मात्र या मेळाव्यास गैरहजर आहेत. या मेळाव्यात बोलताना युवक राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी भाजपने सविधान धोक्यात आणले आहे. पवार साहेबांचे पुरोगामी विचार तळागाळापर्यंत पोहचवा असे आवाहन केले.
मेहकर : मेहकर तालुक्यातील सावकाराच्या जाचाने आत्महत्या केलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. हे सरकारचं अपयश आहे. आपण राज्य कारभार कसे चालवतो हे राज्यकर्त्यांना समजले पाहिजे. जो कोणी सावकार असेल त्याला पोलिस स्टेशनमध्ये फरफटत आणून त्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या पाहिजेत, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली. तसेच आत्महत्या करण्यापासून शेतकऱ्यांना परावृत्त केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
मुंबई : नारायण राणे हे एमएसएमईचे मंत्री आहेत. या अंतर्गत साडेसहा लाख उद्योग येतात. त्याचे ते नेतृत्व करतात. त्यांची इंग्रजी पहा कशी आहे? त्यांना जर इंग्रजी येत नसेल तर त्यांनी एखादा ट्यूटर ठेवावा किंवा कामकाज हिंदीत चालू ठेवावं अशी विनंती स्पिकरला करावी. यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत आहे. महाराष्ट्राचे खासदार संसदेत जाऊन काय दिवे लावतात हे संपूर्ण देश पाहतोय. हे फार निंदनीय आहे आणि हास्यस्पद आहे अशी टीका अंजली दमानिया यांनी केली.
कराड : उद्धव ठाकरे गेल्या दीड दोन वर्षांपासून गद्दारांना गाडण्याची भाषा बोलत आहेत. एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत होते तोपर्यंत ते साधुसंत होते. पण, आता तेच गुंड वाटत आहेत. ओबीसीबाबत भुजबळ यांची भूमिका वेगळी आहे. मात्र, छगन भुजबळ वेगळा पक्ष काढण्याचा चुकीचा निर्णय घेणार नाहीत अशी प्रतिक्रिया मंत्री ग्लाब्राव पाटील यांनी दिली.
15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान कोल्हापुरात शिवसेना शिंदे गटाचे अधिवेशन होणार आहे. राज्यातील आणि देशातील लाखो शिवसैनिक या अधिवेशनात सहभागी होतील. पहिले दोन दिवस एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन असेल. त्यानंतर तिसऱ्या दिवशी भव्य सभा होणार आहे.
कोल्हापूर महापालिकेतील अधिकाऱ्यांची मानसिकता जुन्या सरकार बरोबर आहे.आमची कामं दिसू नये म्हणून विरोधकांचे काही अधिकारी ऐकत आहेत, असा आरोप राजेश क्षीरसागर यांनी केला आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोट्यवधी रुपये कोल्हापूर शहराच्या विकासासाठी दिले आहेत. तीन-तीन वर्षे निधी येऊन सुद्धा का खर्च केला जात नाही. जो जो कोल्हापूर शहराच्या विकासाच्या आडवे येतील त्यांना पायदळी तुडवून कामं केलं जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
पुण्यातील कांग्रेस नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. व्हीव्हीपॅट मशिनवर येणाऱ्या स्लिपवर मतदानाची वेळ आणि तारीख प्रिंट करुन यावी अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयात याचिकेवर सुनावणी होईल. अभय छाजेड आणि रमेश अय्यर यांनी याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.
पुण्यातील काँग्रेस शहराध्यक्ष आणि महिला आघाडीने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. पुणे शहरात लगेच हेल्मेट सक्ती न करता आधी जनजागृती करावी, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेसचं सुरुवातीचं गाय वासरू हे चिन्ह देऊन आयुक्तांचा सत्कार करण्यात आला.
मुंबई – मुंबईत वर्षा बंगल्यावर बैठक. पंढरपूर विकास आराखडा सादर करण्याबाबत बैठक. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती. मंत्री सुधीर मुनगंटीवार देखील बैठकीसाठी दाखल.
मुंबईत वर्षा बंगल्यावर पंढरपूर विकास आराखड्याबाबत बैठक होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होईल. मंत्री सुधीर मुनगंटीवार हे पण बैठकीसाठी दाखल झाले आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची कौन्सिल बैठक होत आहे. काही सदस्य बैठक उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला आहे. नाटकाच्या नावाखाली रामाचा अपमान करण्यात आला, याचा निषेध म्हणून सभा उधळून लावणार असल्याचे समोर आले आहे.
वसई – वसई विरार महापालिकेतील प्रशासनाच्या मनमानी कारभारा विरोधात वसई काँग्रेस आक्रमक झाली आहे. शहरातील प्रमुख समस्यांना घेऊन काँग्रेस जिल्ह्याच्या वतीने वसई पश्चिमेतील प्रभाग समिती आयच्या कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी पालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या मनमानी कारभारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहरात पाण्याची समस्या, सत्ताधारी पक्षाचे खोटे आश्वासन, प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांची मनमानी याच्या विरोधात आंदोलनकर्ते आक्रमक झाले होते.
36 लाख क्विंटल धान जिल्ह्यातील शासकीय केंद्रावर पडून. राइस मिलर्सचा बहिष्कारामुळे शासकीय धान खरेदी ठप्प होण्याच्या मार्गावर. राईस मिल बंद असल्यामुळे आधुनिक मजुरांवर उपासमारीची वेळ. जोपर्यंत केंद्र शासन भरडाई वाढून देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा राईस मिल चालकांच्या इशारा.
मध्यप्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखाण्याला भिषण आग लागली आहे. आगीचे लोण शेजारच्या साठहून अधिक घरात पसरले आहे.
पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या दिवसंदिवस वाढतच चाललेली आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार वाहतुक कोंडीच्या बाबतीत पुणे जगातील सातवे शहर ठरले आहे.
मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणात बॅक डोअर ऐंट्री होत असल्याने ओबीसींच्या आरक्षणावर आक्रमण होतंय असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलंय.
नाभिकांबद्दल केलेलं वक्तव्य गावापूरतं होतं असं म्हणत छगन भुजबळ यांनी आपल्या वक्तव्याची सारवासारव केली. ओबीसी आरक्षण वाचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
दत्ता गोर्डे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यानी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. भगवं वादळ दिल्लीच्या तख्तावर आदळणार आहे असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
अजित पवार गटाला धक्का देत दत्ता गोर्डे यांनी ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. दत्ता गोर्डे यांच्या पक्षप्रवेशाने ठाकरे गटाची ताकत वाढली आहे.
जालना- मनोज जरांगे पाटील हे आळंदी (पुणे), मुंबई, नाशिक, बीड दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. जरांगे पाटील आजपासून 4 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या आजच्या दौऱ्याचा नियोजित मार्ग हा अंतरवाली सराटीहून सिक्रापूर मार्गे – चाकण आळंदी देवाची असा असेल. आळंदी येथे सायंकाळी 6 वाजता नियोजित कार्यक्रम असून तिथेच त्यांचा मुक्काम असेल. या दौऱ्यात जरांगे पाटील यांच्यासोबत सुरक्षेसाठी दोन पोलीस असतील.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाबाबत मनसेची बैठक संपली. शिवतीर्थावर ही बैठक सुरू होती. दक्षिण मुंबई मतदारसंघातील विधानसभेच्या सहा जागांसाठी ही चर्चा झाली. पक्षात कुणी गटबाजी करू नका आणि निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागा, अशा सूचना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
“कारसेवक म्हणून गेलो तेव्हा आम्हाला माहीतही नव्हतं की जिवंत येऊ की नाही. पण बाळासाहेबांचा आदेश होता आणि तिथला सगळा परिसर राममय झाला होता. फक्त जय श्रीरामच्या घोषणा देत ढाचा पाडला होता. जेव्हा कधी भविष्यात त्याठिकाणी राम मंदिर होईल, तेव्हा ती वीट मी बाळासाहेबांना भेट देईन, अशी माझी इच्छा होती. त्याला आज 32 वर्षे झाली. पण आता बाळासाहेब नाहीत. पण आमच्या दृष्टीने आमचे राजसाहेबच बाळासाहेब आहेत. म्हणून मी त्यांना वीट भेट म्हणून दिली,” अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली.
“ही वीट म्हणजे ढाचा पाडल्याचा पुरावा आहे. आता मला राम मंदिर ज्या वीटांनी बांधलं, त्याचीही वीट आणायची आहे. म्हणजे जी उरली असेल ती. मंदिर अजून बांधायचं आहे, पूर्ण व्हायचंय. ती एक वीट मी लवकरच मिळवेन. आज बाळासाहेबांना खूप आनंद झाला असता,” असं राज ठाकरे म्हणाले.
“6 डिसेंबर 1992 रोजी जेव्हा बाबरीचा ढाचा पडला, त्यावेळी महाराष्ट्रातून जे शिवसैनिक गेले होते, त्यात बाळा नांदगावकर यांचाही समावेश होता. तो ढाचा जेव्हा पडला, तेव्हा तिथली वीट बाळा नांदगावकर घेऊन आले होते. त्यांच्याकडे अशा दोन वीटा आहेत. ही वीट हातात घेतली तर याचं वजन पाहून लक्षात येतं की त्यावेळचं बांधकाम कसं होतं. तेव्हाचे कन्स्ट्रक्शन्स का चांगले होते? कारण तेव्हा टेंडर्स निघत नव्हते,” अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली.
बाळा नांदगावकरांनी बाबरी मशिदीची वीट ‘शिवतीर्थ’वर आणली. ही वीट त्यांनी राज ठाकरेंना भेट म्हणून दिली. आज आमच्यासाठी राजसाहेब हेच बाळासाहेब, अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकरांनी यावेळी दिली.
पुणे जिल्ह्यातील सासवड मधील धक्कादायक प्रकार… सासवडमधील तहसील कार्यालयातून चोरट्यांनी पळवले EVM मशीन… EVM मशीन चोरतानाचा CCTV समोर… निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सासवड तहसीलदार कार्यालयात तपासणीसाठी ठेवण्यात आल्या होत्या 40 EVM मशीन… सासवड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात करण्यात आला गुन्हा दाखल… पुणे ग्रामीण पोलिसांकडून तपासासाठी पथके तैनात
मनोज जरांगे पाटील यांची बार्शीत लवकरच जाहीर सभा होणार… याच महिन्यात मनोज जरांगे यांची सभा होणार असल्याची माहिती… बार्शी तालुक्यातील मराठा समन्वयकांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिले निमंत्रण… मनोज जरांगे पाटील यांनी सभेसाठी होकार दिला असून लवकरच याबाबत तारीख कळवणार… मराठा समन्वयक आनंद काशिद यांची माहिती
चेंबूरमध्ये चोरांचा धुमाकूळ… सोमवारी रात्री लालडोंगर रोड इथले मॅनहोल्स चोरट्यांनी केले लंपास… २० फुट खोल मॅनहोलच्या चोरीची माहिती मिळाल्यानंतर मनपा कर्मचारी घटनास्थळी दाखल , मॅनहोल्स झाकण्याचा काम सुरू… मनपा कर्मचार्यांकडून आसपासच्या परिसरात गस्त सुरू
नागपूरच्या सदर पोलिसांच्या अटकेत असलेला युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत मेयो रुग्णालयात भरती… कुणाल राऊत यांना काल 2 दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावण्यात आली होती. कुणाल राऊत यांनी जिल्हा परिषद समोर आंदोलन करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होर्डिंगला काळ फासल होत. त्यामुळे अटक करण्यात आली होती. पोटात दुखत असल्याने करण्यात आलं रुग्णालयात भरती .
शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट लीलावती दाखल झाले आहेत. आज दुपारी संजय शिरसाट यांच्या मानेवर शस्त्रक्रिया होणार आहे. पुढील चार दिवस संजय शिरसाट हे रुग्णालयातच राहणार आहेत.
नागपूरच्या सदर पोलिसांच्या अटकेत असलेला युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत याला मेयो रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. पोटात दुखत असल्याने रुग्णालयात भरती करण्यात आलं.
कुणाल राऊत याने जिल्हा परिषद समोर आंदोलन करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होर्डिंग ला काळ फासल होतं. त्यानंतर त्याला अटक करत काल 2 दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली होती.
मालेगावचा ‘मिनी पाकिस्तान’ उल्लेख केल्याने भाजप आमदार नितेश राणेंना नोटीस पाठवण्यात आली आहे. आसिफ शेख, समाजवादीच्या नेत्या नाशेहिंद यांच्याकडून नोटीस. मालेगावकरांची माफी मागा अन्यथा खटला दाकल करणार असा इशारा या नोटीशीमधून राणेंना देण्यात आला आहे.
जालन्याचे नवीन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. अंतरवाली सराटी येथे दोघांची भेट झाली.
अजित पवार गटाची दुपारी 12 वाजता महत्वाची बैठक पार पडणार आहे. अजित पवार हे आजी-माजी आमदार आणि जिल्हाध्यक्षांसोबत झूम मीटिंग करणार आहेत.
पक्षाची पुढील वाटचाल आणि अजित पवार यांचा राज्यभर दौरा यासदंर्भात बैठकीत चर्चा केली जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्यामध्ये माढा लोकसभेचा उमेदवार ठरण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जयंत पाटील माढा लोकसभा मतदार संघातील सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात बैठका घेणार आहेत. त्याचबरोबर शरद पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष जाहीर होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूरमधील कसबा बावडा इथल्या जन्मस्थळी शस्त्र दालन उभारलं जाणार आहे. लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये शस्त्रदलान उभारायला संस्कृती कार्य मंत्रालयाची मंजुरी दिली आहे. शस्त्र दालनासाठी पहिल्या टप्प्यात सहा लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. प्रस्तावित शौर्य दालनात शिव शौर्य शस्त्र प्रदर्शन भरवण्याचं नियोजन आहे.
छ. संभाजीनगरमध्ये एकच वेळी चार ठिकाणी कॅव्हेट दाखल… सुप्रीम कोर्ट, उच्च न्यायालय मुंबई, संभाजीनगर आणि नागपूर खंडपीठात कॅव्हेट दाखल करण्यात आला आहे. मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी कॅव्हेट दाखल केला आहे. सगे सोयरेबाबत काहीही निर्णय घेण्यापूर्वी आम्हाला अवगत करा. आमची बाजू ऐकून घेईपर्यंत कोणताही निर्णय देवू नये, अशी मंगेश ससाणे यांनी मराठा आरक्षण अध्यादेशाविरुद्ध याचिका दाखल केली होती. याच याचिकेवरून विविध ठिकाणी कॅव्हेट दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी पुणे शहरातील काही भागातील पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. पर्वती, सहकारनगर,कात्रज धनकवडी, बिबवेवाडी आणि पद्मावती या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पर्वती भागातील जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी पाणीपुरवठा उशिरा आणि कमी दाबाने होणार आहे.
शिवसेना शिंदे गटाचे कोल्हापुरात दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन. 15 आणि 16 फेब्रुवारीला होणार अधिवेशन. अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांची हजेरी. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचं अधिवेशन. 27 आणि 28 जानेवारीला होणार होतं शिवसेनेच अधिवेशन. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे पुढं ढकलल होतं अधिवेशन.
मनोज जरांगे यांचा आळंदी, मुंबई, नाशिक, बीड दौरा. जरांगे पाटील आजपासून 4 दिवसाच्या दौऱ्यावर. मनोज जरांगे पाटील यांच्या आजच्या दौऱ्याचा नियोजित मार्ग. अंतरवालीहून 12 वाजता निघणार. सिक्रापूर मार्गे- चाकण आळंदी देवाची, आळंदी येथे नियोजित कार्यक्रम सायंकाळी 6 वाजताआळंदी येथेच मुक्काम.
राज्यातील 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची यांची बदली झाली आहे. सौरभ राव हे आता सहकार आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत. त्याचबरोबर सध्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांची देखील बदली करण्यात आली आहे. अनिल कवडे यांची साखर आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सौरभ राव यांच्या जागी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची पुण्याचे नवीन विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे शहरातील एक लाख 84 हजार घरांनी दिला सर्वेक्षण करण्यास नकार. मराठा समाजाचा मागासलेपणा तपासण्यासाठीच्या महापालिकेने शहरात सर्वेक्षण मोहिम राबविली होती. त्यामध्ये 14 लाख 30 हजार 62 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी एक लाख 84 हजार घरांमध्ये नागरिकांनी सर्वेक्षण करण्यास नकार दर्शविला. सर्वेक्षणाच्यावेळी तीन लाख 93 हजार 819 घरे बंद असल्याची माहिती आता पुढे आली.
सातारा कराड येथे मुख्यमंत्री चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांना प्रारंभ झाला. या स्पर्धेत राज्यातील 22 संघ सहभागी झाले आहेत. कबड्डी स्पर्धांचे आयोजन लिबर्टी मजदूर मंडळ व रणजीत पाटील यांनी केले आहे. पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी स्पर्धेचे उद्घघाटन केले.
वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घाम गाळून मोत्यासारखं सोयाबीन पिकवला आहे. पण आता बाजारात त्याला कवडीमोल भाव मिळत आहे. सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षाही कमी दराने सोयाबीन विकले जात असल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे.
कल्याणामध्ये नमो चषक बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ग्रँड मास्टर अभिजीत कुंटे सहभागी झाले. त्यांनी एकाच वेळी 25 विद्यार्थ्यांबरोबर बुद्धिबळ खेळण्याचा विक्रम केला. यावेळी कल्याणमधील 14 वर्षीय विद्यार्थ्याने मात्र कुंटे यांचा पराभव केला.
परभणीत ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ निमित्त परभणीत 7 ते 11 फेब्रुवारी दरम्यान महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या माध्यमातून परभणीकरांना विविध सांस्कृतिक कार्यक्रम पाहता येणार. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी ही माहिती दिली.