मुंबई | 25 डिसेंबर 2023 :पुण्याच्या पानशेत खोऱ्यातील डावजे येथे 1 डिसेंबरपासून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले साखळी उपोषण मागे घेण्याते आले. जरांगे पाटील यांनी बीडच्या सभेतून आंदोलनाची पुढची दिशा सांगितल्यानंतर 24 दिवसांपासून सुरू असलेल्या या साखळी उपोषणाची सांगता करण्यात आली. गोवा राज्यात जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना आता टोल भरावा लागणार आहे. हे टोलनाके गोव्याच्या एन्ट्री पॉईंट म्हणजेच ‘पत्रादेवी’ ते ‘ कोळे या ठिकाणी बसवण्यात येणार आहेत. कोरोनाच्या नवीन व्हेरीयंटचे रुग्ण आता ठाणे आणि पुणे शहरात मिळाले आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. अटल गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर आहेत.
मावळच्या लोकसभा जागेसंदर्भात आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ नेत्यांसोबत मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीत एकमताने जो उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आणण्याचा विश्वास सर्वांनी उद्धव ठाकरे यांना दिला. पक्षात आणि पक्षाबाहेरील अनेक लोक या जागेसाठी इच्छुक आहेत त्याबाबत लवकरच स्वतः उद्धव ठाकरे बोलतील. मात्र जो उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आणण्याचं काम आमचं असणार आहे हा विश्वास आम्ही उद्धव ठाकरे यांना दिलेला आहे. असं सचिन आहिर यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांनी आज स्पष्टपणे सांगितले की काही खासदारांनी मतदार संघात कामे केली नाही आणि आता शेतकरी आक्रोश मोर्चा काढत आहे. शिरूर मतदारसंघात पाच वर्षे लोकांनी आक्रोश केलाय की खासदार येत नाही. आता तेच खासदार सरकारच्या विरोधात आक्रोश करायला लागले तेही निवडणुका आल्या म्हणून. अजित पवार बोलले ते योग्य आणि वस्तुस्थिती आहे. शिरूरमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार असेल की महायुतीचा हे माहिती नाही. पण शिरूर लोकसभेत महायुतीचा उमेदवार महत्वाचा. असे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटले आहे,
ओबीसी समाजाचे नेते हरिभाऊ राठोड मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. गॅलक्षी हॉस्पिटलमध्ये जाऊन ते त्यांची भेट घेणार आहेत. मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते जरांगे यांची भेट घेणार आहेत.
राज्य सरकारने अरबी सागरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बनवण्याचा निर्णय घेतला होता त्याचे काय झाले? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जुमलेबाजी करू नये, हे जाहिरात बाजांचे सरकार असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.
राम मंदिर कार्यक्रमाला सर्व राजकीय पक्षांनी जावं दर्शन घ्यावं, तिथे कुणाला अडवल जाणार नाही. यांना जायचं नसेल तर त्यांनी म्हणाल असेल तर त्यांचा प्रश्न आहे. प्रत्येक वेळेला खुर्चीच अपेक्षा का करता. बाळासाहेबांचं योगदान आहे. मात्र मुलगा नातू यांचं श्रेय होऊ शकत नाही. शिवाजी महाराज, बाबासाहेब कुणी होऊ शकत नाही. एक कोटी पाठवले त्यात अमाच श्रेय नाही.ज्या पडद्या अडच्या गोष्टी तशा राहू द्या आनंदाच्या क्षणात सहभागी व्हा, असं अध्यात्मिक सेलचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी म्हटलं आहे.
2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होण्यापासून कोणी अडवू शकत नाही. आज पर्यंत निवडणुका संदर्भात अनेक पोल येऊन गेलेले आहेत मात्र प्रत्यक्षात तो हे आपण पाहिलेला आहे, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने सहा आणि सात जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड मध्ये शंभरावे नाट्यसंमेलन होणार आहे. या नाट्यसंमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
आम्ही पण पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फार काही गंभीर घेत नाही. कारण हे भाजप वाले म्हणतात राहुल गांधीला आम्ही गंभीर घेत नाही म्हणून हे मी सांगतो त्यांना लोकशाही मान्य नाही म्हणून ते असे बोलत असेल पण आम्ही लोकशाही ला मानणारे आहोत. त्यामुळे देशाच्या पंतप्रधान यांचा आणि सगळ्याच नेत्यांचा आम्ही सन्मान करतो पण ते जर अस बोलत असेल तर आम्हाला तसं बोलावं लागेल, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
नाशिक : विश्वप्रवक्ते संजय नाशिकला येतात त्या त्या प्रत्येक वेळी नाशिकला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. खोटं बोलतात, हे आता अधिक किळसवाणे होत चाललंय. ते स्वतला संपादक म्हणवून घेतात, मग पॅरोल कोण देत हे त्यांना माहीत नाही का? वारंवार गृहमंत्र्यांवर आरोप करत आहेत. जे घडलच नाही ते सांगणं कितपत योग्य आहे? भाजपच्या पदाधिकाऱ्याची देखील चौकशी होतेय. आमचा पदाधिकारी असला, तरी दूजाभाव होणार नाही असा टोला भाजपचे सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी संजय राऊत यांना लगावला.
नागपूर : नागपुरातून इंग्रजांच्या विरोधात असहकार आंदोलन सुरू झालं होतं. त्याच नागपुरातून आता लोकशाहीला संपविणाऱ्या केंद्र सरकार विरोधात एल्गार उभा केला जात आहे. नागपुरात स्थापना दिवस रैली होत आहे याचा कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि काँग्रेस प्रणित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत. ‘है तय्यार हम’ हे स्लोगन घेऊन आम्ही पुढे जात आहोत, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
पंढरपूर : शिवसेनेच्या भक्ती शक्ती संवाद यात्रेदरम्यान वारकऱ्यांनी एक मोठी मागणी केलीय. चंद्रभागा नदीतील अवैध वाळू उपशाविरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. चंद्रभागा येथील दगडी पूल गोपाळपूरपर्यंतचा वाळवंटाचा पट्टा याची पवित्रता जपावी यासाठी हा पट्टा मिलिटरीच्या ताब्यात देण्यात यावा अशी मागणी वारकऱ्यांनी केली.
पुणे : अजित पवार हे मोठे नेते आहेत. त्यांची खासियत म्हणजे ते बोलले तरी बातमी आणि नाही बोलले तरी बातमी होते. माझ्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याची त्यांनी दखल घेतली. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आज काही तरी वेगळं वक्तव्य केलं तर त्यावर लगेच टीका करणे योग्य नाही. पण ते जेव्हा आमचे नेते होते तेव्हाच दादांनी कानउघाडणी करायला हवी होती. आता कानउघाडणी केली आता सुधारणा करू असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना लगावला.
कल्याण : श्रेयाची लढाई प्रत्येक जण करत असत. त्यामुळे कदाचित आता आदित्य ठाकरे पण उतरले, असे मला वाटायला लागले आहे. उद्घाटनासाठी आणि श्रेयासाठी हे सरकार थांबत नाही. आता याचे उद्घाटन केले नाहीं, त्याच उद्घाटन केल नाही, अशा ज्या गोष्टी करतात. गेली अडीच वर्षे जी होती या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष झाले होते असा टोला मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.
मुंबई : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून कुणाला उमेदवारी द्यायची यावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय. मात्र, मावळ मतदारसंघासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॅाग्रेस गट आग्रही आहे.
पुणे : जयंत पवार यांच्या घरी आज ख्रिसमसची पार्टी आहे. या पार्टीला सगळं पवार कुटुंब एकत्रित येणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, ख्रिसमस पार्टी निमित्त आयोजित या पार्टीला अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का? याची चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार आज दुपारनंतर पिंपरी चिंचवडला जाणार आहेत. त्यानंतर ते या घरगुती कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? याची चर्चा होत आहे.
पुणे : गेले 10 ते 15 वर्ष झालं बारामतीत मी लक्ष घातलं नाही. मी कधीच तिथं कोणता निर्णय घेतला नाही. नवीन पिढी पुढे येऊन त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे असं मला वाटतं. आता तिथल्या सगळ्यांना त्यांनी बरोबर घ्यावं. नावलौकिक वाढेल असे निर्णय घ्या. आमच्या काळात बंड नव्हत. आम्ही बसून निर्णय घेत होतो. यात कुठलीच तक्रार नसायची, असा टोला शरद पवार यांनी अजित पवार यांना लगावला.
इथेनॉलच उत्पादन वाढवाव. हा परिसर उसाच्या शेतीचा आहे. देशात वाहने वाढत आहेत. इथेनॉलला आम्ही प्रोत्साहन दिले. पणं आत्ताच्या केंद्र सरकारच्या नितीमध्ये कमतरता आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.
राज्य सरकार ज्या पद्धतीने काम करते जनतेला दिलासा नाही. शेतकऱ्यांच्या पदरात मदत नाही. सरकार टक्केवारीत गुंग झाले. बदल्यांसाठी पैसे वसुली सुरू आहे.असे असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे तीन तीन आहे, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांचे अँनिमेशन कॉलेजचे संचालक चित्रकार तथा त्यांचे जवळचे मित्र विजय राऊत यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. हा विवाह सोहळा अमरावती येथे पार पडतोय.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांच्या तक्रारीचा पाढा वाचत, ते निष्क्रिय खासदार असल्याचं म्हटले. त्याच शिरूर लोकसभेसाठी आता त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देणार असल्याचे म्हणत तो मी जिंकून आणणारच असा विश्वास व्यक्त केलाय.
राज्यातील सहा विभागातून ही भक्ति शक्ति यात्रा निघणार आहे. हिदुत्वाचा विचार आणि प्रचार संपुर्ण महाराष्ट्रभर करणार आहे.
बारामतीकरांनी पवार कुटुंबाला साथ दिली. लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे.. लोकशाहीत स्वतंत्र आहे.. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. शिवाय ‘अजित पवारांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी. अजित पवारांनी राज्यात सरसकट शेतकरी कर्जमाफी करुन द्यावी. अजित पवारांनी शेतकऱ्यांचा प्रश्न दिल्ली दरबारी मांडावा…’ असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या…
सरकारनं राज्याची तिजोरी साफ केली. तिजोरीकडे लक्ष जायला नको म्हणून 2 समाजात भांडण लावलं.. मराठा आणि ओबीसी वादावर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया…
कांदा निर्यातबंदीनंतर कांद्याच्या बाजार भावात 60 टक्क्यांची मोठी घसरण… आज लासलगाव बाजार समितीत कांद्याला मिळाले जास्तीतजास्त 1752 रुपये कमीतकमी 800 रुपये तर सरासरी 1500 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव… कांद्याच्या बाजारभावात दररोज घसरण होत असल्याने कांदा उत्पादनच्या चिंतेत वाढ..
पुणे येथील गणेश पेठ, दारुवाला पूल मस्जिद ट्रस्ट आवारामध्ये गादी कारखान्याला आगी लागल्याची घटना समोर येत आहे. अग्निशमन दलाकडून 2 फायरगाड्या आणि 2 वॉटर टँकर दाखल झाले आहेत. सध्या आग विझवण्याचे काम सुरु आहे
साईबाबांच्या दर्शनाला मोठी गर्दी झाली आहे. सलग सुट्ट्यांमुळे भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. नवीन वर्षांच्या स्वागतापर्यंत शिर्डीत ही गर्दी राहणार आहे. 31 डिसेंबर रोजी रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. मोठ्या संख्येनं पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत.
नाताळानिमित्त माऊंट मेरी चर्चला सकाळपासून गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. या संपूर्ण परिसरात फुलांची सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे. भगवान येशु ख्रिस्तांच्या जन्मदिनानिमित्त प्रार्थना करण्यासाठी देशभरातून ख्रिश्चन बांधव आणि पर्यटक माऊंट मेरी या ठिकाणाला भेट देतात.
शरद पवार थोड्या वेळात भीमथडी जत्रेला भेट देणार आहेत. पवारांचं मुलींकडून लेझीमच्या तालावर स्वागत होणार आहे. एग्रीकल्चर डेवलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या वतीने या जत्रेचं आयोजन केलं जात आहे.
नवीन लाल कांद्याची आवक राज्यातील प्रमुख बाजारात मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. महिनाभरापूर्वी कांदा तेजीत होता. नवीन लाल कांद्याची नगर, सोलापूर, पुणे बाजार समितीच्या आवारात आवक वाढल्याने कांदा दरात घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात लाल कांद्याचे प्रतिकिलोचे दर 25 ते 30 रुपयांदरम्यान आहेत. घाऊक बाजारात दहा किलो कांद्याचे दर 150 ते 250 रुपयांदरम्यान आहेत.
धनगर आरक्षणासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या समितीने बिहारमध्ये जाऊन माहिती घेतली आहे. या आठवड्यात तेलंगणा आणि मध्य प्रदेशात समिती जाणार आहे. या तीन राज्यांचा अभ्यास करुन अहवाल सादर होणार आहे. समितीने बिहारमध्ये जाऊन अभ्यास केल्याची माहिती समोर येत आहे.
बारा ज्योतिर्लिंग पैकी पुण्यातील भीमाशंकर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. सलग सुट्ट्या आल्याने भीमाशंकरला दर्शनासाठी भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सहली आल्याने तसचे राज्यातील भाविकांनीही दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. मात्र प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे भाविकांना पाच ते सात किलोमीटर पायी प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाकडून कोणत्याही सोई सुविधा नसल्याने भाविक भक्तांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतोय.
सलग तिसर्या दिवशी मुंबईतील हवेच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. मुंबईत आज हवेचा गुणवत्ता निर्देशांत 150 वर पोहोचला. वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली असून, त्याचा आरोग्यावर परिणाम दिसू लागला आहे. खोकला ताप आणि त्वचेचे आजार डोकं वर काढत आहेत. बीकेसीत एक्युआय 180 वर आहे, मालाड 192 , बांद्रा 174 वर आहे.
नागपुरात आज वंचित बहुजन आघाडीची स्त्रीमुक्ती परिषद होणार आहे.. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर या सभेला संबोधित करणार आहेत. नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवर होणाऱ्या या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून या ठिकाणी महिलांसह वंचितच्या कार्यकर्त्यांची मोठी हजेरी लागणार आहे
अहमदनगरमधील माळीवाडा बस स्टँड समोरील हॉटेल पंचरत्नला आग लागली . सकाळी ८ च्या सुमारासा अचानक लागलेल्या आगीमुळे हॉटेलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान. अहमदनगर महापालिकेचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले असून त्यांना आग विझवण्यात यश मिळाले. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
कापूस वेचणीला मजूरच मिळत नसल्याने लाखमोलाचा कापूस मातीमोल झाला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
वातावरणातील बदलामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होत असतानाच कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील लाखमोलाचा कापूस मातीमोल होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे.
अवकाळी वादळी पावसाने कपसाचे मोठे नुकसान झाले. त्यातही सावरत उभ्या असलेल्या पिकाची कापूस वेचणी सुरू केली. मात्र, मजूर मिळत नसल्याने शेतकरी अधिकच चिंतेत सापडला आहे. पैसे देऊन सुद्धा मजूर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे आज अमरावती दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे आज अमरावती मधील मित्राच्या मुलीच्या लग्न समारंभाला उपस्थित राहतील.
राज ठाकरे यांच्या अमरावती दौऱ्यामुळे अमरावती जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील हालचाली थेट ॲपवर येणार, त्यामुळे पंचनामा करणे सोपे होणार. अवैध वाळू उपसा, वाहतुकीवर महाखनिज ॲपचे लक्ष राहणार . वाळू चोरीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. दरम्यान, मागील वर्षीपासून तलाठ्यासह महसुली अधिकाऱ्यांना महाखनिज ॲप वापरण्याचे निर्देश शासनाने दिले होते.
मात्र, आता वाळू चोरी रोखण्यासाठी प्रत्येक तलाठ्याला महाखनिज ॲप वापरणे बंधकारक करण्यात आले आहे. तस्करांच्या वाहनांचा ऑनलाइन पंचनामा तलाठ्यांना करावा लागणार आहे.
पुण्यासाठी महत्त्वाची बातमी. पुण्यात आतापर्यंत आढळले JN 1 चे तीन रूग्ण. जिनोम सिक्वेन्सिंगमधून माहिती आली समोर. एक रुग्ण हा अमेरिकेहून आला होता. हे सगळे रुग्ण आता बरे झाले आहेत. राज्यात JN 1 चे 10 रुग्ण आतापर्यत आढळले आहेत. पुणे शहरात 2 तर ग्रामीण भागात एका रुग्णाची नोंद. आता सगळे रुग्ण बरे झाले आहेत
भायखळा आग्रीपाडा इथल्या उर्दू लर्निंग सेंटरच्या जागेसाठी भाजपा आणि शिवसेनेच्या स्थानिक आमदार यामिनी जाधव आमने सामने. यामिनी जाधव यांनी मागणी केली की, त्या ठिकाणी ऊर्दू लर्निंग सेंटर व्हावं तर मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांनी मागणी केलेली आहे की त्या ठिकाणी आयटीआयची इमारत तयार व्हावी. ऊर्दू लर्निंग सेंटरचं 40 टक्के काम पूर्ण झाल्याची यामिनी जाधव यांची विधान सभेत माहीती
सुधाकर बडगुजरांसोबत 19 जणांची आज पुन्हा चौकशी. गुन्हे शाखेकडून बडगुजर यांना बोलावणे.बडगुजर आज वकिलांसह देणार पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे. भाजप पदाधिकाऱ्याच्या सहभागाबाबत बडगुजर काय उत्तर देणार? याकडे लक्ष. काही गोपनीय साक्षीदारांचा देखील पोलीस घेणार जबाब
पुणे जिल्ह्यात 16 शाळेत एकही विद्यार्थी नाही. शून्य पटाच्या शाळा होणार बंद. यू डायसवरुन शाळांची नाव हटवण्याच्या सूचना. शिक्षण उपसचालकांनी दिल्या सूचना. पुणे जिल्ह्यातील शाळांचा यात समावेश आहे.
राज्यात नववर्षात पाणीटंचाईचे संकट गंभीर होणार आहे. छोटी-मोठी धरणे मिळून राज्यात केवळ ६३ टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असून जवळपास ७८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
ठाण्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ठाण्यात jn 1 च्या नवीन व्हेरीएनचे पाच रुग्ण सापडले आहे. या पाच रुग्णात 1 महिला 4 पुरुष आहे. नवीन रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
पुणे शहरात फुग्याच्या सिलेंडरचा स्फोट झाला. त्यात चार वर्षाचा चिमुकला ठार झाला तर दोन महिला जखमी झाल्या. बिशप कॉटन स्कूल मैदानासमोर ही घटना घडली. सिझन शेख असे मृत बालकाचे नाव आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे आणि पिंपरी चिंचवर दौऱ्यावर आहेत. आज विविध कार्यक्रमांना अजित पवार हजेरी लावणार आहे. अजित पवार यांनी पुण्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार आज पिंपरीतील विविध ठिकाणी कार्यक्रमांना हजेरी लावणार आहे.