मुंबई, दि. 10 जानेवारी 2024 | आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल आज येणार आहे. यामुळे शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटातील आमदारांचे भवितव्य या निकालावर ठरणार आहे. कोणत्या गटाच्या बाजूने निकाल येणार? याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकालापूर्वी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आहे. सकाळी दहा वाजता ही बैठक होणार आहे. माजी मंत्री सुनील केदार यांना जामीन मिळाला आहे. हवामान विभागाने आज राज्यातील काही भागात यलो अलर्ट दिला आहे. त्यानुसार ठाणे शहरात पाऊस सुरु झाला आहे. राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
सुप्रीम कोर्टाने हे सरकार घटनाबाह्य म्हटले नाही. त्यावेळी मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला. त्यामुळे त्यांनी अधिक विचार करून बोलावे. कुठलाही वाकडा तिकडा निर्णय घेता येणार नाही हे या निकालाने सिद्ध झाले.
अखेर सत्याचा विजय आहे. घराणेशाही आणि एकाधिकार शाही यांचा पराभव झाला आहे. मनमानी पद्धतीने निर्णय घेता येणार नाही हे सांगणारा हा निर्णय आहे. शिवसेना खरी कुणाची यालाही मान्यता दिली. या नंतर अशा प्रकारची मनमानी करता येणार नाही हे सिद्ध झाले आहे. 13 जणांना अपात्र करण्याची याचिका फेटाळली हे मात्र कळले नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुंबई : अध्यक्ष यांनी दिलेल्या निकालानंतर काही जण म्हणत आहेत की ठाकरे यांची हुकुमशाही संपली. ठीक आहे. मग तुमची गुलामशाही सुरु झाली त्याचे काय? दिल्लीच्या महाशक्तीकडे त्यांची गुलामगिरी सुरु झाली अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा आदर म्हणून हे प्रकरण त्यांच्याकडे दिले होते. त्यांनी काही निकाल दिला असला तरी ते जनतेच्या मनात टिकणार नाही. माझा पक्ष उबाठा नाही. माझे नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे आणि मी त्यांच्याविरोधात उभा ठाकलेला आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई : २०१८ साली ते निवडून आले मग कोणत्या चिन्हावर, पक्षाकडून निवडून आले होते. त्यावेळी कोणती घटना होती? चौकटीत बसणारे नव्हते त्याकडे लक्ष दिले. वेळकाढूपणा केला. आम्ही न्यायालयात जाणार आहोत. निवडणुकीआधी याचा निकाल लागायला हवा.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश दिले होते. त्यानुसार काय निर्णय घ्यायला हवे होते. पण, आमच्यामागे महाशक्ती आहे आमचे कुणीच वाकडे करणार नाही असे त्यांना वाटत आहे. निवडणूक आयोगाचा चुकीचा निर्णय त्यांनी योग्य ठरवला. निर्लज्जपणाचा कळस गाठला, अवमान याचिका दाखल करता येते का? ते तपासून पाहू.
निकाल देण्याआधी अध्यक्ष यांचे वर्तन पाहिले तर काय होणार याची कल्पना आली होती. त्या निकालाचा राष्ट्रवादीवर परिणाम होणार नाही असे पवार यांनी स्पष्ट केले.
या निकालाला सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन्स बाजूला ठेवून कसा निर्णय झाला याचे हे उत्तम उदाहरण आहे. या विरोधात उद्धव ठाकरे यांना कोर्टात जाता येईल. महाराष्ट्राच्या जनतेला काही प्रश्न आहेत. जनतेला बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हेच मान्य आहे. त्यांच्यानंतर शिवसेना कुणाची तर उद्धव ठाकरे यांची हे ही जनतेला माहित आहे असे शरद पवार म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हे जनतेला माहित आहे. यामुळे कोर्टात ठाकरे यांची केस अधिक भक्कम होईल, असे शरद पवार यांनी सांगितले.
व्हीप बजावणे तर त्यावर निर्णय घेता येतो. शिंदे गटावर कारवाई म्हणून मागणी होती. व्हीप देणाऱ्याला व्हीप बजावण्याचा अधिकार नाही असे अध्यक्ष म्हणाले. पक्षाचा व्हीप पाळला नाही म्हणून अपात्र ठरवावे अशी मागणी होती ती ही मागणी मान्य केली नाही. सुप्रीम कोर्टाचा गाईडलाईन्स बाजूला ही पूर्णपणे बाजूला केल्याची भूमिका घेतली आहे, असे शरद पवार म्हणाले.
हा निर्णय उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या सहकार्यांना या निकालाची कल्पना होती तसाच हा निकाल लागला आहे. ठाकरे यांना आता सुप्रीम र्कोटात जावे लागेल. विधीमंडळ पक्ष आणि संघटना यात विधीमंडळ पक्ष याला महत्व देण्यात आले आहे. पक्ष संघटना महत्वाची आहे.
नवी दिल्ली : कोणताच आमदार अपात्र नाही असा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. हा निकाल देताना त्यांनी भरत गोगावले यांचा व्हीप मान्य करावा लागेल असे म्हटले आहे. याचा अर्थ जर उद्धव ठाकरे यांचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत आले नाही तर त्याच्यावर अपात्रतेची तलवार येऊ शकते असे सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितले.
मुंबई : गुजरात लोबीने बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपविण्याचे काम केल. काही केले तरी आम्ही लढायला तयार आहोत. सर्वोच्च न्यायालयात आम्ही जाऊ, खोटारडे आहेत हे सिद्ध करू. कोण एकनाथ शिंदे, कोण भरत गोगावले, कोण विधान सभा अध्यक्ष हे पक्ष कुणाचा ठरविणार. बेकायदेशीर अध्यक्ष यांनी बेकायदेशीर निर्णय दिला आहे.
मुंबई : नवा इतिहास निराम करण्याची संधी मिळाली होती. पण, त्यांनी ती संधी गमावली. त्यांनीही महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली. ही फिक्सिंग आहे हे आम्ही सकाळीच सांगितले आहे. विधानसभा अध्यक्ष यांना काय अधिकार आहे. ज्याची स्थापना ६५ वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी केली. ती दुसऱ्या चोरांच्या हात देण्याच्या अधिकार तुम्हाला कुणी दिला. तुमची अवस्था इटलीच्या मुसोलीनिसारखी होईल.
मुंबई | उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिंदे गटाच्या 16 आमदारांनंतर आता ठाकरे गटाचेही 14 आमदार पात्र ठरले आहेत. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकमेकांना अपात्र करण्याच्या याचिका या फेटाळल्या आहेत.
मुंबई | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे 16 आमदार पात्र असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचंही स्पष्ट केलंय. या निर्णयानंतर शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयाबाहेर एकच जल्लोष करण्यात आला. आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांना पेढे भरवत जल्लोष केला.
मुंबई | उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का लागला आहे. शिंदे गटाचे 16 आमदार हे पात्र ठरले आहेत. तसेच खरी शिवसेा ही शिंदेंचीच असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं आहे. आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल जाहीर केल्यानंतर राज्यात आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे. धुळ्यात राहुल नार्वेकर यांचा लोकशाहीचा खुनी अशी बॅनरबाजी करण्यात आला आहे.
मुंबई | राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. शिंदेंचे 16 आमदार पात्र ठरले आहेत. 16 आमदारांना अपात्र करण्याची याचिका फेटाळण्यात आली आहे. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदें यांचीच असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
मुंबई | विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचं आपल्या निकालात स्पष्ट केलं आहे. निवडणूक आयोगाचा निकाल महत्त्वाचा ठरवण्यात आला आहे. पक्षप्रमुख एकटेच निकाल ठरवू शकत नाही. असं झालं तर पक्षातील कोणीही पक्षप्रमुखाविरोधात बोलू शकणार नाही. पक्षप्रमुख नाही तर राष्ट्रीय कार्यकारिणीचा निकाल अंतिम असेल. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची हे घटनेवरूनच ठरणार आहे. पक्षप्रमुखाला सर्व अधिकार देणं हे लोकशाहीला घातक आहे.
2018 साली घटनेत जी दुरूस्ती झाली ती चुकीची असल्याचं सांगण्यात आलं. 2018 साली पक्षांतर्गत निवडणुका झालेल्याच नाहीत. ठाकरे गटाने केलेली घटना दुरूस्ती घटनाबाह्य असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच निवडणूक आयोगाने 2023 साली दिलेली घटना ग्राह्य धरली गेली. इतकंच काय तर ठाकरे गटाचं कुणीही उलटतपासणीला आलं नाही. त्यामुळे त्यांच प्रतिज्ञापत्र अमान्य करण्यात आलं आहे. 2018 साली पक्षांतर्गत निवडणुका झालेल्या नाहीत.शिवसेनेच्या 1999 सालच्या पदांची रचना मान्य करणार आहे.
खरी शिवसेना कोणाची आणि व्हीप कोण हा प्रश्न माझ्यासमोर आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांनी खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला आहे. दोन्ही गटांनी वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत. निवडणूक आयोगाने घटनेची एक प्रत दिली आहे. पण त्यावर तारीख नाही.विधीमंडळातील बहुमत हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुरुवातील सुप्रीम कोर्टाचे आभार मानले. तसेच दोन्ही गटाच्या वकिलांनी सहकार्य केल्याने त्यांना धन्यवाद मानले. निकालाची प्रत प्रत्येकाला देण्यात येणार आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून निकालाचं वाचन सुरु झालं आहे. त्यामुळे निकाल कोणाच्या बाजूने लागतो याची उत्सुकता लागली आहे. कोण अपात्र आणि कोण पात्र ठरणार? याकडे लक्ष लागून आहे.
घरात बसून शेळ्या हाकणारा मी मुख्यमंत्री नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आमच्या पाठिशी आहे. गहाण टाकलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला- एकनाथ शिंदे
शिवसेना धनुष्यबाण आपल्यासोबतच आहे. जर निर्णय घेतला नसता तर शिवसेनेचं अस्तित्त्व राहिलं नसतं. गहाण टाकलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला- एकनाथ शिंदे
निकाल तयार पण गेली 15 मिनिटं नार्वेकर यांची चेम्बरमध्ये खलबंत सुरू, अजुनही निकालाचं वाचन सुरू नाही.
अपात्र निकालावरचं निकालपत्र तयार असून आता वाचन कधी सुरू करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. नार्वेकर अद्याप अँटी चेम्बरमध्येच आहेत. आजच्या निकालात ठळक मुद्दे वाचले जाणार, निकालाची 4.30 वेळ पण अद्याप वाचन सुरू झालेलं नाही.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर चेंबरमध्येच, सोबत दोन अधिकारी तर सचिव नार्वेकरांच्या दालनात दाखल झाले आहेत.
सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही गटाचे आमदार आणि वकील दाखल झाले आहेत. आता फक्त निकालाची प्रतीक्षा आहे. निकालपत्रावर शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरू असून थोड्याच वेळात निकालाचं वाचन होणार आहे.
लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे बहुमत आमच्याकडे आहे. अधिकृत पक्ष सुद्धा आमच्याकडे आहे धनुष्यबाण आमच्याकडे आहे- एकनाथ शिंदे
लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. मेरिटनुसार निर्णय व्हायला हवा, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. शिंदे यवतमाळ दौऱ्यावर आहेत.
ठाकरे यांचे आमदार अपात्र होतील म्हणून खोटे आरोप करत आहेत. नार्वेकरांना कायदेशीर अधिकार पण त्यांच्यावरच दबाव आणला. आम्ही गट किंवा पक्ष स्थापन केला नसून आम्हीच शिवसेना असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेच्या अपात्र आमदारांवरील निकालाचे वाचन थोड्याच वेळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेऊन आता बाहेर पडल्या आहेत.
सत्तेत असणाऱ्या लोकांना सत्तेच्या बाहेर काढायचं नाही असं ठरलं आहे. आजच्या निकालाची स्क्रिप्ट वरून पाठवण्यात आली आहे. वरून जे लिहून पाठवलं आहे तेच अध्यक्षांना वाचायचे आहे. सर्वोच्च न्यायालयात अध्यक्षांनी दिलेला निकाल मात्र टिकणार नाही, आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जाण्याची संधी असल्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
घटनेचे उल्लंघन समोरच्या लोकांनी केला आहे, त्यांचे सगळे आमदार अपात्र व्हायला पाहिजे. अध्यक्षांनी घटनेला धरून निकाल देणे अपेक्षित आहे. कायद्यानुसार आमदार निश्चितपणे अपात्र होतील. जनतेच्या मनातला निकाल कोणता हा अध्यक्षांना माहिती आहे अशी भूमिका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते सूनील प्रभू यांनी मांडली आहे.
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात निकालाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी सुरु आहेत. ठाकरे गटाची आज सगळ्या वकिलांची झाली झूम कॉल मीटिंग झाली. निकालासंदर्भात झालं विचारमंथन झाले. वकील अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल होते उपस्थित होते.
आज खरं वाटतंय चार वाजता सूनवाई आहे.अध्यक्ष महोदयांनी भेटीगाठी घेतली आहे. त्या पदाची शोभा कमी करून टाकली आहे. त्या पदाला एक वेगळीच गरिमा आहे आणि वेगळीच उंची आहे. ते सांभाळण्याचं काम अध्यक्षांनी करायला हवं होतं.अध्यक्ष महोदय उठून कोणाच्या घरी जातात हे कधीही बघितलं नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
सत्ता आणण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत आहात, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
पंढरपुरात ठाकरे गटाच्या युवासेनेकडून विठ्ठल मंदिराबाहेर महाआरती करण्यात आली. विधानसभा अध्यक्षांकडुन राज्यातील जनतेला सत्य निर्णयाची अपेक्षा आहे.
हिट अँड रन कायदा विरोधात सोलापूर जिल्ह्यात दोन ठिकाणी वाहन चालकांकडून रास्ता रोको. आंदोलनादरम्यान एका वाहन चालकाने वाहन न थांबवल्याने त्याला चपलांचा हार घालत केला निषेध
मुंबईत असलेल्या शिवसेनेच्या सर्व आमदारांना बाळासाहेब भवनात बोलावलं. दुपारी 3 वाजता सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश. सायंकाळी 4 वाजता पात्र-अपात्र सुनावणीवर होणार अंतिम निर्णय. बाळासाहेब भवन येथे एकत्र जमून सर्व आमदार विधानभवनात जाणार. बाळासाहेब भवनात निकालानंतर काय करायचं यावर चर्चा होणार.
विधानभवनात सेंट्रल हॉलमध्ये अध्यक्ष करणार निकालाच वाचन. ठाकरे गटाकडून 1 वकील असणार उपस्थित. सनी जैन विधानभवनात ठाकरे गटाकडून उपस्थित असणार. काही वेळापूर्वी मेल वकिलांना करण्यात आला आहे
विधानसभा अध्यक्षांकडून दोन्ही गटाच्या वकिलांना मेल पाठवण्यात आला आहे. निकालासाठी उपस्थित राहण्याचा आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत.
मॅच फिक्सिंग असतं तर अध्यक्ष रात्री भेटायला आले असते. नार्वेकर आणि माझी बैठक अधिकृत होती, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
आत्मपरीक्षण करा मग आमच्यावर टीका करा असा सल्लाही शिंदे यांनी ठाकरे गटाला दिला.
आम्ही लपूनछपून बैठका करत नाही. अधिकृत पक्ष म्हणून आम्हाला मान्यता आहे. बहुमत आमच्याकडे आम्हीच शिवसेना आहोत. आम्ही घटनाबाह्य नाही, ठाकरे गटच घटनाबाह्य, असे प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या आरोपांवर दिलं.
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह आम्हालाच दिलं. बहुमत आमच्याकडे, आम्हीच शिवसेना, असा पुनरुच्चार एकनाथ शिंदे यांनी केला.
सत्य हे सत्य असतं, नियम हे नियमच असतात. निकाल हे नियम आणि कायद्यानुसारच येतात, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
शिंदे गटाच्या मुंबईतील सर्व आमदारांना बाळासाहेब भवनात एकत्र बोलावण्यात आलं आहे. दुपारी ३ वाजता एकत्र येण्याची सूचना सर्व आमदारांना देण्यात आली आहे. तेथून सर्व आमदार विधानभवनात जातील.
निकाल मिळेपर्यंत थांबायचं असतं, निकाल आला की आम्हीही भाष्य करू ना, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली.
डोंबिवली मानपाडा परिसरातील लाईव्ह ऑर्केस्ट्रा बारमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. मानपाडा परिसरातील सेवन स्टार बार मधील ही घटना आहे. रात्री दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली. खुर्चीला धक्का लागल्याने गोळीबार झाला असून गोळी लागल्याने एक जण जखमी झाला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे- निवडणूक आयोगाच्या गोडाऊनमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धुळे शहरातील केंद्रीय विद्यालयाजवळ असलेल्या इलेक्शन कमिशनच्या गोडाऊनमध्ये चार मशीनची तोडफोड करण्यात आली आहे. गोडाऊनचे गज कापून मशीनची तोडफोड करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकसभा निवडणूक संचालन समितीची बैठक केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. दादर भाजप कार्यालयामध्ये भाजपाचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, आमदार आशिष शेलार, खासदार पूनम महाजन, आमदार तमिल सेलवण ,आमदार प्रवीण दरेकर, सुनील राणे, राजहंस सिंग, प्रसाद लाड, पराग अळवणी उपस्थित झाले आहेत. या बैठकी नंतर आमदार आशिष शेलार हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
पुणे- पुणे जिल्हा नियोजन समितीची ऑनलाइन बैठक घेण्यात आली. पालकमंत्री अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. अजितदादा पालकमंत्री झाल्यावर आज पहिल्यांदा ही बैठक पार पडली. निधीच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
आजच्या निकालाबाबत मला शून्य उत्सुकता आहे. निकालाबाबत वेळ काढूपणा करण्यात आलेला आहे. या निकालापेक्षा आम्ही येणाऱ्या निवडणुकांसाठी काम करत आहोत. उशिरा निकाल देणेसुद्धा अन्यायकारकच आहे, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.
राहुल नार्वेकर यांना शिंदेंच्या आमदारांना अपात्र करावं लागेल, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. जर या आमदारांना अपात्र केलं नाही तर पुन्हा सुप्रीम कोर्टात जावं लागेल, किंवा मग पुढे काय करायचं ते जनता ठरवेल असे ते म्हणाले. पक्षांतर बंदी कायद्यात बदल करण्याची गरज आहे. हा कायदा पक्षांतर बंदी संदर्भात अपयशी ठरला आहे. हा कायदा सोपा केला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
आज पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय वडगाव येथील परीक्षा केंद्रावर सारथी, बार्टी, महाज्योती संशोधन संस्थांसाठी घेण्यात येत असलेल्या पात्रता (CET) परीक्षेत झेरॉक्स प्रश्नपत्रिका देण्यात आल्या तर प्रश्न पत्रिकेतील सी आणि डी प्रश्न पत्रिकेला सील नसल्याचे निदर्शनास आल्याने विद्यार्थ्यांनी सार्वत्रिकरित्या बहिष्कार टाकत निषेध नोंदवला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेट विभागाचा गलथान कारभार यामुळे पुन्हा चव्हाट्यावर आला.
पक्षांतर कायदा बदलायला हवा आणि याचे राजकीय परिणाम वाईट आहेत. १६ आमदार जर अपात्र झाले आणि त्यांचे पद गेले तर राजकीय भूकंप होईल अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. घटनात्मक तरतूद काय आहे हे पाहायला हवे. अतिशय महत्त्वाचा राजकीय निर्णय असेल घटनात्मक पाहिलं तर पक्षांतर बंदी कायदा १९८५ मध्ये आला. या कायद्याचे उद्दिष्ट पूर्ण झालेलं नाही. या कायद्याला बदलाया हवे, अशी मागणी त्यांनी केली.
आजच्या निकालात सर्वांना न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. निर्णयात कुठल्याही त्रुटी राहणार नाहीत. कायद्याची प्रक्रिये आधारेच हा निकाल देण्यात येईल. हा निकाल देशातील बेंचमार्क ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आज विधानसभा अध्यक्ष आमदार आपत्रतेबद्दल निकाल देणार आहे. निकाल नियमानुसार येईल आणि निकाल विरोधात येऊ नाही तर आमच्या बाजूने आला तरी स्वागत केले जाईल, असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. धनुष्यबाण, पक्ष नाव आमच्याकडे आहेनार्वेकर यांच्यावर शंका व्यक्त करू नये, आणि चुकीचे आहे. निकाल कोणाकडूनही लागो ही लढाई कोर्टाकडेच जाणार आहे. या मध्ये कोर्ट अंतिम निकाल देईल.
राज्यात गेल्या दीड वर्षांपासून घटनाबाह्य, बेकायदेशीर सरकार आहे. त्यांचे निर्णय सुद्धा घटनाबाह्य असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीसाठी यापूर्वी अनेकदा टाळाटाळ करण्यात आली. कोर्टाने आदेश दिल्यानंतरही त्यांनी रंग दाखविल्याची टीका त्यांनी केली. ते मॅच फिक्सिंगसाठी गेल्याची घणाघाती टीका ही त्यांनी केली.
भाजप नेत्या पंकजा मुंडे या अडचणीत आल्या आहेत. त्यांच्या ताब्यातील वैद्यनाथ साखर कारखान्याचा लिलाव होणार आहे. 203 कोटींच्या कर्ज वसुलीसाठी युनियन बँकेकडून प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या 25 जानेवारी रोजी कारखान्याचा लिलाव असल्याचा उल्लेख यासंबंधीच्या नोटीसमध्ये करण्यात आला आहे.
आजच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. विजय आमचाच होणार… पराभव होणार हे ठाकरे यांनी मान्य केलं आहे.. आमदार अपात्रतेवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया…
मंत्री दीपक केसरकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. भेटीत माजी क्रिकेटपटू रमाकांत आचरेकर यांचा पुतळा उभारण्याबाबत चर्चा झाली. सोबतच आमदार अपात्रता निकालावर केसरकर यांनी प्रतिक्रिय दिली. ‘आमची बाजू सत्याची, आम्ही आमची बाजू मांडली..’ असं केसरकर म्हणाले…
आदित्य ठाकरे यांच्यासोबत कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडी आणि इतर घटक पक्षांची बैठक… आदित्य ठाकरे यांच्यासोबत आयोजित केलेल्या बैठकीला काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह विविध पक्षातील नेते उपस्थित… आदित्य ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्याचा आज दुसरा
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षेच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. ही परीक्षा ७ जुलै रोजी होणार आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार हा बदल करण्यात आला आहे. यासंदर्भात अधिकृत अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. यापूर्वी नीट-पीजी ही परीक्षा ३ मार्च रोजी घेतली जाणार होती. परीक्षेबाबतची अधिक माहिती nbe.edu.in, natboard.edu.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात दर्शनाला येण्याची शक्यता आहे. १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी काळाराम मंदिरात दर्शन आणि आरती करण्याची शक्यता आहे. अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याआधी मोदी श्री काळारामाच्या चरणी नतमस्तक होणार?केंद्रीय पथक आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून काळाराम मंदिरात पाहणी करण्याची शक्यता आहे. २२ जानेवारीला उद्धव ठाकरे देखील श्री काळारामाचं दर्शन आणि आरती करण्यासाठी मंदिरात येणार आहेत.
राज्यात काही जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. तर काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. आज राज्यातील अनेक भागात हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज सकाळी नाशिक शहर परिसरात पावसाने हजेरी लावली. सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या लोकांची तारांबळ उडाली.
पुण्यातून सुटणाऱ्या १६ एक्स्प्रेस गाड्या १० फेब्रुवारीपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. आग्रा विभागातील पलवन-मथुरा जंक्शन येथील यार्ड रिमॉडलिंगच्या कामासाठी या गाड्या बंद आहेत. पुणे जम्मू तावी झेलम एक्स्प्रेस, पुणे हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस, वास्को द गामा निजामुद्दीन एक्स्प्रेस, यशवंतपूर हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस या गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
अयोध्येतील रामजन्मभूमीवर साकारत असलेल्या राममंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर संस्कृती प्रतिष्ठानकडून पुण्यात कार्यक्रम होणार आहे. १८ ते २० जानेवारी या कालावधीत डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतून ‘अपने अपने राम’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर तीन दिवस सायंकाळी सहा वाजता पुणेकरांना या रामकथेचा आस्वाद घेता येणार आहे.
बीसीए, बीएमएस, बीबीए या पारंपरिक महाविद्यालयांमध्ये चालविल्या जाणाऱ्या आणि नुकताच व्यावसायिक म्हणून दर्जा मिळालेल्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना लवकरच ‘सामाईक प्रवेश परीक्षा’ (सीईटी) द्यावी लागणार आहे. ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’ने (यूजीसी) केलेल्या सूचनेनुसार उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून या संदर्भात राज्याच्या सीईटी सेलकडे विचारणा करण्यात येणार आहे.
अकोला जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. या ढगाळ वातावरणामुळे गारठा कमी झाला होता. परंतु आज सकाळी पावसाच्या तुरळक सरी बरसल्याने वातावरणात गारवा वाढला आहे. या पावसामुळे शेतातील रब्बी पिकाचे नुकसान होणार आहे.
ठाण्यात बुधवारी सकाळी रिमझिम पावसाने पावसाने लावली. अचानकपणे आलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. हवामान विभागाने आज राज्यातील काही भागांत यलो अलर्ट दिला आहे.