मुंबई, दि. 2 जानेवारी 2024 | केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्यातील तरतुदींमुळे राज्यभरातील ट्रक चालकांनी संप सुरु केला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी राज्यभरातील पेट्रोल पंपावर रांगा लागल्या आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्गवर रास्ता रोको आंदोलन केले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होऊ लागली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवडीची आज बैठक होणार आहे. या बैठकीतून पुरस्कारासाठी नावाची निवड होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंगळवारी दुपारी चार वाजता होणार आहे. राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
नवी दिल्ली | अदानी ग्रुप संदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे. हिंडनबर्ग रिपोर्टबाबत उद्या सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. सेबीचा तपास, अहवाल त्यानंतर आता सुप्रीम कोर्ट उद्या काय निर्णय देणार, याकडे उद्योग जगताचे लक्ष आहे. अदानी समूहावर आर्थिक अनियमित्तता केल्याचा ठपका आहे.
मुंबई | मी सकारात्मक आहे म्हणून सात महिने दिले, असं मनोज जरांगे पाटील आमदार बच्चू कडू यांना म्हणाले आहेत. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात व्हीडिओ कॉनफरन्सिंगद्वारे चर्चा झाली. या दरम्यान विविध मंत्र्यांनी जरांगेसह चर्चा केली. या दरम्यान बच्चू कडू यांनी जरांगेंना तुम्ही निगेटीव्ह राहु नका, असं म्हटलंय. यावर उत्तर देताना “मी सकारात्मक आहे म्हणून सात महिने दिले”, असं जरांगे पाटील म्हणाले.
अंतरवाली सराटी | कुणबी नोंदी तपासण्यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं नाही, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. तसेच कुणाच्या आदेशावरुन अधिकारी काम करत होते? असा सवाल जरांगे पाटील यांनी राज्य सरकारसोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करताना उपस्थित केलाय. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्ही कामचुकार अधिकाऱ्यांनी नाव द्या, आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो, अंस जरांगे पाटील यांना म्हटलं.
गडचिरोली | केंद्र सरकारने ड्रायव्हर विरोधी कायदा लागू केल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यात काँग्रेसकडून रस्त्यावर आंदोलन करण्यात आलं आहे. काँग्रेस यावेळेस केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी केली. “मोदी सरकारच्या निषेध असो, कायद्याचा निषेध असो” अशी नारेबाजी यावेळी पाहायला मिळाली.
सरफराज अहमद यांच्या राजीनाम्यानंतर झारखंडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी उद्या म्हणजेच 3 जानेवारी रोजी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे.
भाजप राम मंदिरासंदर्भात पुस्तिका प्रसिद्ध करणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. भाजप आणि आरएसएसच्या योगदानावर ही पुस्तिका असेल. 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे.
वर्षाच्या सुरुवातीला भूकंपाच्या धक्क्याने जपान हादरलं. भूकंपाची तीव्रता 7 रिश्टर स्केलपेक्षा जास्त होती. या दुर्घटनेत आतापर्यंत 48 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
ट्रक चालकांच्या संपामुळे उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. लखनऊमध्ये पेट्रोल भरण्यासाठी लोकांची लांबच लांब रांग पाहायला मिळत आहे. पेट्रोल पंपावर नवीन पुरवठा होत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.
जम्मू-काश्मीरबाबत आज महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्करप्रमुख, जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, देशाच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख तपन देगा, जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव आणि डीजीपी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
शिरपूर : जैतपूर येथे जि. प. शाळेच्या आवारात विकास काम सुरु असताना एक घटना घडली. सरपंच भोजेसिंग राजपूत हे कामाची पाहणी करत असताना त्यांची आणि रोजगारसेवक यांच्यात बाचाबाची झाली. या बाचाबाची दरम्यान रोजगारसेवकाने सरपंचावर तलवारीने हल्ला केला. पोटाला तलवार लावून त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली.
मनमाड : चालकांच्या काही मागण्या होत्या. केंद्र सरकारने जो नवीन कायदा केला त्यामध्ये त्यांना काही बाबी अन्यायकारक वाटल्या. त्यांच्याकडून लेखी निवेदन घेतले आहे. त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या सूचना आम्ही वरपर्यंत पोहचवू. आमच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरच इंधन पुरवठा सुरळीत होईल. नागरिकांनी panik होऊ नये काही तासात अडचणी दूर होतील अशी माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली.
नवी दिल्ली : ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे चेअरमन मलकित सिंग यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. गृहमंत्री, प्रधानमंत्री, मंत्री, राज्यपाल यांना लिहून आमच्या तक्रारी कळवल्या आहेत. सरकारने त्याची ताबडतोब दखल घ्यावी. सरकारने तातडीने कायदे रद्द करण्याची घोषणा केली. सरकारने कृषी कायद्यासारखे करू नये. जास्त वेळ वाया घालवू नका अन्यथा संप अधिक तीव्र करू असा इशाराही त्यांनी दिला.
जळगाव : केवळ ठेकेदारांना खुश ठेवण्यासाठी सरकार त्यांना सर्व सवलती देत असतील, तर याचा अर्थ काय? जनसामान्यांचे सफाई कामगारांचे प्रश्न जर तुम्ही सोडवत नसाल तर तुम्हाला सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही हे मायबाप सरकार नाही तरी पन्नास खोक्याचे सरकार आहे, पाच ठेकेदारांना हा महाराष्ट्र सरकारने विकायला काढला आहे. या शब्दात काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी जळगावात शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
ठाणे : पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. पेट्रोल आणि डिझेलअभावी ठाण्यातील तीन पेट्रोल पंप बंद करण्यात आले आहेत. सीएनजीसाठी पंपाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ट्रक चालक संपाचा फटका पेट्रोल पंपाला बसला आहे. पेट्रोल पंपाबाहेर दुचाकी वाहनांनी एकच गर्दी केली आहे.
वाशिम : जिल्ह्यातील जात पडताळणीची अनेक प्रकरणं प्रलंबित असल्यामुळे शालेय विद्यार्थी, आरक्षित कोट्यातून नोकरी घेणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख डॉ. सुधीर कवर यांनी समाजकल्याण विभाग कार्यालयात पाठपुरावा केला. त्यानंतर एक महिन्याच्या आत प्रलंबित असलेली सुमारे १ हजार प्रकरणे निकाली काढली आहेत. याचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.
मुंबई : निवडणुक लढून कर्तुत्व सिद्ध होत नसते. संघटना आणि कर्तुत्वाच्या कौशल्यावर मी इथपर्यंत पोहचली आहे. अशा प्रकारच्या टीका करून, खच्चीकरण करून त्यांना समाधान मिळत असेल तर त्यांना लखलाभ. साधारण शेतकरी कुटुंबातील महिला ते महिला आयोगाच्या अध्यक्ष पदापर्यंत असा माझा प्रवास आहे. घरात ना पती आमदार नाही ना वडील आमदार, खासदार नाही. ज्यांच्या घरात इतकी पदे आहेत म्हणून मी इथपर्यंत पोहचले नाही असा टोला अजित पवार गट महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसे यांना लगावला.
कोल्हापूर : उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्या भेटीनंतर हातकणंगलेमध्ये ठाकरे गटात अस्वस्थता पसरली आहे. हातकणंगले मतदारसंघातून तयारी करणाऱ्या मुरलीधर जाधव यांनी या भेटीवर नाराजी व्यक्त केली. राजू शेट्टी यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. लोकांना वापरून देऊन सोडून द्यायचं ही त्यांची वृत्ती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राजू शेट्टींना जवळ करू नये असेही जाधव म्हणाले.
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसंवाद यात्रा राज्यभरात सुरू होणार आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले दोन्ही मतदारसंघात त्यांच्या सभा होतील. ट्रक चालकांच्या संपात सहभागी झालेल्या स्कूल बस चालकांना संपात सहभागी होऊ नये अशा सूचना दिल्या आहेत. असे स्कूल बस चालक संपात सहभागी झाल्यास त्यांच्यावर कारवाईबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेऊ असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
नवी दिल्ली : ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष अमृतलाल मदान यांनी पत्रकार परिषद घेतली. AIMTC सोबत आज संध्याकाळी 7 वाजता गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत बैठक होणार आहे. ‘आम्ही या संपाची दखल घेतली. आम्ही २७ तारखेला सर्वांना या कायद्यातील कमतरता लक्षात आणून दिल्या. गृहमंत्री, पंतप्रधान,, राज्यपाल यांना आमच्या तक्रारी कळवल्या अशी माहिती मलकित सिंग यांनी दिली.
मुंबईच्या मानखुर्द परिसरामध्ये तीन वाजता झोपडपट्टीत लागली आग. एल वन स्वरूपाची आग लागल्याची माहिती. आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट, आग विझवण्याचं काम सुरू. फायर ब्रिगेडच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती.
पुणे जिल्ह्यासह शहरात कुठल्याही प्रकारची पेट्रोल टंचाई नाही अशी माहिती पुणे डिझेल पेट्रोल असोसिएशनचे अध्यक्ष रुपरेल यांनी दिली आहे. संपाचा कुठलाही फटका पेट्रोल आणि डिझेल पुरवठ्यावर पुणे जिल्ह्यात होणार नाही. जिल्ह्यातील सर्व पंपांवर पुरेसा पेट्रोल साठा आहे. जिल्ह्यात सर्व ठिकाणी सुरळीत पेट्रोल पुरवठा सुरू आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. असं आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यातील रविवार पेठेतील एका ज्वेलरी दुकानातील तीन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. ही घटना ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री घडली. फरासखाना पोलीस ठाण्यात यासंबधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले असून ओळखीतल्या व्यक्तीनेच चोरी केल्याचा संशय पोलिसांना आहे.
मनमाड : इंधन प्रकल्पात संप पुकारलेल्या चालकांशी जिल्हाधिकारी यांच्यासोबत सकारात्मक चर्चेनंतर लगेचच सर्व डेपोंवर इंधन ट्रँकर भरण्यास सुरवात. लवकरच इंधन पुरवठा सुरळीत होणार. दोन दिवसानंतर इंधन पुरवठा सुरळीत होणार.
अयोध्येत भाविकांची गर्दी वाढली आहे. शरयू नदीच्या पात्रात बोटिंग व्यवसाय जोरात सरू झाला आहे. किनाऱ्याला भगव स्वरूप प्राप्त झालं आहे. शरयू नदीच्या किनाऱ्याला घाटाच काम सुरू आहे ते काम अंतिम टप्प्यात आहे.
३१ डिसेंबरच्या रात्री पुण्यात टोळक्यांनी हैदोस घातला आहे. दोन जणांना टोळक्याकडून मारहाण करण्यात आली आहे. कर्वेनगर भागातील हिंगणे होम कॉलनीतील घटना समोर आली आहे. राहुल कावळे आणि निखिल पाबळे यांना सात ते आठ जणांनी केली मारहाण केली आहे.
निखिल पाबळे हा रस्त्यावरुन जात असताना टोळक्यातील एकाने लगावली कानशिलात याचा जाब विचारण्यासाठी राहुल का आणि निखिल गेल्यानंतर दोघांनीही बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक शहरातील जवळपास ७० ते ८० टक्के पेट्रोल पंपावर शुकशुकाट आहे. स्टॉक संपल्याने ‘पेट्रोल शिल्लक नाही’ अशा प्रकारचे लावले बोर्ड लावण्यात आले आहेत. पेट्रोल पंपाच्या बाहेर नाशिककरांची गर्दी झाली आहे. पेट्रोल मिळत नसल्याने वाहन चालक व्यथित झाले आहेत. शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे
मुंबईतील मागाठाणे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी लोकांची गर्दी झाली आहे. मुंबईतील कांदिवली, दहिसर बोरिवली येथील मागाठाणे पेट्रोल पंपावर लोकांची गर्दी असते. पेट्रोल पंपावरून पेट्रोल संपल्याची बातमी समजताच नागरिकांची मोठी गर्दी झाली. ट्रकचालक संपावर असून काही दिवस पेट्रोल मिळणार नाही, अशी भावना नागरिकांमध्ये आहे.
कोल्हापूर- कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना प्रशासनाविरोधात आमदार सतेज पाटील पुन्हा मैदानात उतरले आहेत. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर राजारामच्या ऊस उत्पादकांनी मोर्चा काढला आहे. विरोधी गटाच्या सभासदांच्या ऊस तोडी आणि लावणी नोंद करून घेतली जात नसल्याची तक्रार आहे. ऊस तोडीवरून सतेज पाटील आणि महाडिक यांच्यामध्ये नवा सामना सुरू झाला आहे.
पुणे- राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने मोठी कारवाई केली आहे. एक कोटीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग, पुणे या पथकाने काल गोवा राज्यात विक्रीकरिता असलेल्या मद्यावर धडक कारवाई केली.
नवी दिल्ली – काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मुख्य निवडणुक आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. इंडिया आघाडीच्या सदस्यांकडून भेटीची पुन्हा वेळ मागितली आहे. यापूर्वी तीन वेळा भेटींची तारीख मागितली होती. त्या तारखेसह पत्रात उल्लेख आहे. 9 ऑगस्ट, 23 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर आणि 20 डिसेंबरला लिहीलेल्या पत्राचा उल्लेख केला आहे. आता इंडिया आघाडीच्या 3-4 सदस्यांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे. EVM आणि VVPAT बाबत आपली मतं मांडण्यासाठी ही वेळ मागण्यात आली आहे.
नवी दिल्ली- देशातील जीएसटी संकलनात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एप्रिल ते डिसेंबर 2023 दरम्यान जीएसटी संकलन 12 टक्क्यांनी वाढले आहे. 14.97 लाख कोटी रुपये GST संकलन झाले आहे. डिसेंबर 23 मध्ये जीएसटी संकलन वार्षिक आधारावर 10 टक्क्यांनी वाढून 1.65 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. डिसेंबरमध्ये सलग दहाव्या महिन्यात जीएसटी संकलनात वाढ झाली आहे. 2023 मधील 10 महिन्यांसाठी जीएसटी संकलनाच्या आकड्यानं 1.5 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.
उत्तर प्रदेश- उत्तर प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सर्व स्कूल बसेसमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व शाळांच्या स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक असणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
आज दुपारी दोन वाजता राम मंदिराच्या उद्घाटनासंदर्भात भाजपची बैठक होत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल. भाजप मंदिराच्या उद्घाटनाच्या प्रचारासंदर्भात रणनीती ठरविण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी आज संवाद साधणार आहे. मराठा आरक्षणावर आज चार मॅरेथॉन बैठक होणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली. मुख्यमंत्री ऑनलाईन संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणासंदर्भात आज पूर्ण दिवस बैठका होत आहे. दुपारी 2 वाजता व्हिसीद्वारे मुख्यमंत्री जरांगे यांच्यात संवाद होणार आहे.
अहमदनगरमधील शिर्डी येथे जिओचे पेट्रोल पंप सुरू असल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. इंधन भरण्यासाठी जिओ च्या पंपावर वाहनधारकांची गर्दी उसळली आहे. जिओ पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. मोठी भटकंती केल्यानंतर जिओ पंपावर इंधन मिळत असल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
केवळ कर्जच नाही तर आता काही नोकऱ्यांसाठी सिबिल स्कोअर महत्वाचा ठरत आहेत. आता तुम्हाला हे वाचून आश्चर्याचा धक्का बसला असेल. पण रोजगार मिळविण्यासाठी पण सिबिल स्कोअर महत्वाचा ठरला आहे. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची क्रेडिट हिस्ट्रीची तपासणी करण्यात आली आहे. बँकांनी गेल्या वर्षभरात याविषयीची एक अधिसूचना काढली आहे. नोकरीसाठी हा एक आवश्यक निकष लावण्यात आला आहे.
केंद्र सरकारने केलेल्या कायद्याविषयी थोडा समज गैर समज असल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. संपकऱ्यांनी अनेक ठिकाणी संप मागे घेतला आहे. स्थिती अशीच राहिली तर गंभीर आहे.बातम्यांमुळे लोक पॅनिक होत आहेत. अनेक पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. संध्याकाळ पर्यंत परिस्थिती निवळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली
बुलडाणा जिल्ह्यातील एसटीला संपाचा फटका बसू शकतो. वाहन चालकांचा संप सुरू आहे. 3 जानेवारीपर्यंत एसटीकडे डिझेलचा साठा आहे. जिल्ह्यात एसटी महामंडळाकडे एकूण 7 डेपो मध्ये सात डिझेल पंप आहेत. जिल्ह्यात दररोज 30 हजार लिटर डिझेल लागते. एसटीच्या दररोज 400 फेऱ्या होतात. विभागीय नियंत्रक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 3 तारखे नंतर संप असाच सुरु राहिला, तर एसटी थांबू शकते.
महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन मतभेद नाहीत, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. एक-दोन जागांवरुन वाद होईल असे वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खासदार राऊत यांनी यावेळी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उपरोधीक टीका केली. पंतप्रधान दक्षिण ध्रुवावरुन सुद्धा प्रचार करतील, असा टोला त्यांनी लगावला.
राज्याला इंधन पुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मनमाड शहरात ही वाहन चालकांचे आंदोलन सुरु आहे. वाहन चालकांचे इंधन प्रकल्पाबाहेर आंदोलन सुरू आहे. इंधन व गॅस प्रकल्पातून वाहतूक करणाऱ्या १५०० वाहनांची चाके थांबली आहे. संपात ट्रँकर चालक सहभागी झाले आहेत. अपघात कायद्याला चालकांचा विरोध आहे. वाहनचालकांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे.
गेल्या वर्षभरात ग्राहकांची चांदी झाली तर त्यांना सोन्यासारखा परतावा मिळाला आहे. सोने-चांदीने ग्राहकांना धक्का दिला असला तरी गुंतवणूकदारांना मात्र जोरदार फायदा झाला आहे. गुंतवणूकदारांना सोने प्रति 10 ग्रॅम 8779 रुपयांनी तर चांदी किलोमागे 7200 रुपयांनी वर्षभरात महागली.
वाहतूकदार संपामुळे मार्केटयार्ड मधील आवक कमी झाली आहे. पुणे मार्केटयार्डमध्ये गाड्याची आवक कमी झाली आहे. 10 ते 20 टक्के गाड्या कमी झाल्या आहेत. वाहतूकदार संपाचा परिणाम मार्केटयार्डातील मालावर झाला आहे. आज 900 गाड्याची आवक झाली आहे. दररोज साधारण 1100 ते 1200 गाड्याची आवक होते.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे. ट्रक चालकांच्या संपाचा दुसऱ्या दिवशी महामार्गावर कायदा सुव्यस्था निर्माण होऊ नये यासाठी पोलीस अलर्ट मोडवर आहे. काल अचानक ट्रकचालक महामार्गावर आल्याने हिंसक वळण लागलं होतं. पेट्रोल, डिझेल, व अत्यावश्यक सेवेतील वाहनाना आंदोलकांनी अडवून, जाळपोळ करू नये यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत. सध्या मुंबई अहमदाबाद महामार्गावरील दोन्ही लेनवरील वाहतूक सुरळीत सुरू आहे
ट्रक चालकांच्या संपाचा अमरावती जिल्ह्यातील एसटी बस सेवेवर कुठलाही परिणाम होणार नाही. पाच दिवस पुरेल एवढा अमरावती जिल्ह्यातील एसटी डेपोमध्ये डिझेलचा साठा आहे. एसटी महामंडळाच्या अमरावती जिल्ह्यातील सर्व आगारातील पंपावर वर 80% डिझेलचा साठा उपलब्ध आहे. एसटीच्या प्रवाशांनी घाबरून जाऊ नये एसटीची सेवा सुरू राहणार असल्याची एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्याच्या पूर्वी वर्ल्ड इकॉनोमिक पुरमच्या कार्यक्रमासाठी दावोसला जाणार आहेत. स्वित्झर्लंड इथल्या दावोसला मुख्यमंत्री यांची विशेष हजेरी असणार आहे. 15 ते 18 जानेवारीपासून मुख्यमंत्री हे ४ दिवस दावोसच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून बरेचशे उद्योग हे आज पाचच्या राज्यामध्ये जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. हजारो कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मानस आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत सुद्धा जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे विरोधी पक्षाची नजर असणार आहे.
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत रेकॉर्ड ब्रेक दारूची विक्री. 41 लाख बॉटल रिचवल्या राजधानी दिल्लीकरांनी. यंदाच्या डिसेंबर महिन्यात 5 कोटी बॉटल विक्री. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात 4 कोटी बॉटल विक्री झाली होती. कालच्या 30 आणि 31 डिसेंबर या दोन दिवसात तब्बल 41 लाख बॉटल्सची विक्री.
ट्रक चालकाच्या संपाचा कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये परिणाम नाही. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला, कांदासह इतर आवक मार्केटमध्ये सुरळीत. उद्या या संपात कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात येणाऱ्या जिल्ह्यातील ट्रक चालक सहभागी झाले तर परिणाम होण्याची शक्यता
ट्रक चालकांच्या संपाचा अमरावतीच्या भाजीपाला बाजार पेठेवरही मोठा परिणाम. दररोज होणाऱ्या भाजीपाला मालाच्या तुलनेत आज भाजीपाल्याची आवक 30 टक्यांनी घटली. बाहेर जिल्ह्यातील भाजीपाला बाजारपेठेत ट्रक आले नसल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढ. दररोज अमरावती बाजारपेठेत 35 ते 40 ट्रक मधून भाजीपाला आणला जातो. आज मात्र आठ ते दहा ट्रक आल्याची व्यापाऱ्यांची माहिती. टमाटर, कॅरेटच्या दरामध्ये आज 150 रुपयांनी वाढ.
ट्रक चालकांच्या संपाचा नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटवर अजून तरी परिणाम झालेला नाही. धान्य मार्केटमध्ये, भाजीपाला मार्केटमध्ये, पुरवठा सुरळीत आहे. त्यामुळे सध्या तरी एपीएमसी मार्केटला ट्रक चालकांच्या संपाचा फटका बसलेला नाही.
धारशिवमध्ये सकाळपासून पेट्रोल डिझेल पंपावर वाहन धारकांच्या रांगा लागल्या आहेत. अनेक जण गाडीत बाटलीत तसेच कॅनमध्ये पेट्रोल भरून साठवले जात आहे. जिल्ह्यात आज दुपारपर्यंत पुरेल इतकाच इंधन साठा शिल्लक आहे.
पर्यटन नगरीत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आल्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 362 वाहन चालकांवर लोणावळा शहर पोलिसांनी 30 आणि 31 डिसेंबर रोजी दंडात्मक कारवाई करत तीन लाख 61 हजार 300 रूपये दंड वसूल केला आहे.
केंद्र सरकारच्या जाचक अपघात कायद्याविरोधात नाशिकच्या मालेगावमध्ये उमटले. रात्री उशिरा चालकांनी मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गवर रास्ता रोको करीत टेहरे येथे टायर जाळून शासनाचा निषेध केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती
पुणे शहर, पिंपरी चिंचवड,ग्रामीण भागातील पेट्रोल-डिझेल पंपवर तुरळक गर्दी आहे. काल पुणे जिल्हा पेट्रोल-डिझेल असोसिएशने जिल्ह्यातील कुठलाही पंप बंद राहणार नसल्याचे सांगण्यात आले होते. राज्यव्यापी संपामध्ये पुणे पेट्रोल डिझेल असोसिएशन सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले होते.