मुंबई | 10 सप्टेंबर 2023 : जी-20 परिषदेचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. यावेळी अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जळगावात जाहीर सभा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं अनावरण करणार. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज कोल्हापुरात सभा. सभेच्या निमित्ताने अजित पवार शक्तीप्रदर्शन करणार. मुंबईत आज रेल्वेचा मेगाब्लॉक आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसींचा विरोध. ओबीसींचं आजपासून आंदोलन. यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.
ठाणे : बाळकुम परिसरात लिफ्ट कोसळून सहा कामगारांचा मृत्यू झाला. ४० मजली इमारतीच्या छतावर वॉटर प्रुफिंगचं काम सुरू होतं. लिफ्टचा दोर तुटल्याने लिफ्ट घरी परतणाऱ्या कामगारांच्या अंगावर कोसळली. बचाव पथकाने लिफ्टमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले.
भंडारा : भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या वतीनं विदर्भस्तरीय दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. दहीहंडी फोडताना तिथं उभारण्यात आलेला लाकडी टावर अचानक गोविंदांच्या अंगावर कोसळला. या घटनेत 10 ते 12 गोविंदा जखमी झालेत. जखमी नागरिकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुंबई | मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने मोठी कामगिरी केली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने 14 महिन्यांमध्ये 13 हजारांपेक्षा अधिक गरजू रुग्णांना आर्थित मदत केली आहे. या 13 हजारांपेक्षा अधिक रुग्णांना तब्बल 113 कोटी 12 लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय सहायता निधी मिळविण्याची प्रक्रिया आता ऑनलाईन झाली आहे. त्यासाठी मोबाईल एपद्वारे अर्ज करता येणार आहे. https://play.google.com/store/apps/details?id=com.etech.cmrelief या ॲपवर अर्ज करुन मदत मिळवता येणार आहे.
कोल्हापूर | विधानसभा आणि लोकसभेला ही महिलांना आरक्षण मिळावं अशी आमची मागणी आहे. ही मागणी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोगी यांच्याकडे करणार आहोत”, असं अजित पवार यांनी कोल्हापुरातील जाहीर सभेत म्हटलं.
कोल्हापूर | अजित पवार यांनी कोल्हापुरातील जाहीर सभेतून मराठा आरक्षणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाला पाहिजे. उद्या सह्याद्री अतिथीगृहावर सर्व पक्षाच्या प्रमुखांची बैठक बोलावली आहे.” अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
कोल्हापूर | वैयक्तिक स्वार्थासाठी नसून जनतेच्या सेवेसाठी महायुतीत गेल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. “स्वतःचा सार्थ साधण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष महायुती मध्ये गेला नाही. काम करणाऱ्या माणसाला हातावर हात ठेवून घरी बसता येत नाही. संधी मिळाल्यावर लोकांची काम केली पाहिजेत.”, असं अजित पवार म्हणाले.
कोल्हापूर | अजित पवारनी अशी भूमिका का घेतली असा प्रश्न अनेकांना पडला. काहीजण म्हणाले दबाव होता. होय, आमच्यावर दबाव होता लोकांची काम करायचा”, असं म्हणत अजित पवार यांनी टीकाकारांना उत्तर दिलंय. तसेच आम्ही दाबवाला भीक घालणारे लोक नाहीत. आम्हीपण मराठ्याची औलाद आहे.”, असंही अजित पवार यांनी सांगितलं.
कोल्हापूर | “कोल्हापूरमध्ये होत असलेली ही सभा माझ्यासाठी महत्वाची आहे. राष्ट्रवादीची विचारसरणी शाहू महाराजांच्या विचारातून आली आहे”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवार यांनी कोल्हापुरातील उत्तरदायित्व सभेत हे विधान केलं आहे.
कोणाला उत्तर देण्यासाठी ही सभा घेतली नाही. कार्यकर्त्यांमधील सभ्रम संपवण्यासाठी ही सभा आहे. जे बोलले ते करणारा, कार्यकर्त्याच्या जीवाला जीव देणारा अजित पवार आहे. अजित दादांचं कोल्हापूरवर विशेष प्रेम आहे. नेहमीच त्यांनी कोल्हापूरच्या विकासाला, वेगवेगळ्या योजनासाठी निधी दिलाय, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
शरद पवार साहेब यांची सभा झाली आणि आम्हाला लोक विचारू लागले, उत्तर देण्यासाठी तुमची सभा होणार का? आम्ही सांगितलं की आमची सभा उत्तर देण्यासाठी नाही तर उत्तरदायित्व सभा होणार. अजितदादा तुम्ही महाराष्ट्रात लोकप्रिय होता आता तुम्ही लोकनेते देखील आहात, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.
पुण्यातील कोंढव्यात शिवसेना ठाकरे गटाची जाहीर सभा आहे. सभेला आमदार भास्कर जाधव, सुषमा अंधारे, रघूनाथ कुचिक यांची उपस्थिती आहे. माजी आमदार महादेव बाबर यांच्याकडून होऊ द्या चर्चा सभेचं आयोजन करण्यात आलंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब श्रावणी सोमवारनिमित्त भीमाशंकर येथे अभिषेक आणि दर्शनासाठी येणार आहेत. भीमाशंकर जवळील हॉटेल ब्लू मॉर्मन आणि मंचर जवळील लांडेवाडी या दोन ठिकाणी हेलिपॅड बनविण्याचे काम सुरू. सकाळी 11 वाजता मंदिरात सहकुटुंब अभिषेक करणार.
पंकजा मुंडे यांची शिवशक्ती यात्रा हिंगोली शहरात नुकताच दाखल झालीये. नांदेड नाका परिसरात आमदार संतोष बांगर व तानाजी मुटकुळे यांच्याकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G-20 शिखर परिषदेत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांची भेट घेतली. पीएम मोदींनी ट्विट केले की, “आम्ही भारत-कॅनडा संबंधांवर विविध क्षेत्रात चर्चा केली.”
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांनी चंदीगडमध्ये सांगितले की, पूर्वी सुविधा मिळत नव्हत्या. माझ्या काळातही सोयीसुविधा नव्हत्या, पण मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आम्ही प्रगती केली. आता सरकार आणि अॅथलेटिक्स असोसिएशन खेळाडूंना सुविधा पुरवत आहे. त्यामुळेच आपला प्रतिभावान नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्समध्ये पदक जिंकले आहे. आम्ही 400 मीटर रिलेच्या अंतिम फेरीत पोहोचलो. लांब उडीतही आम्ही चांगली कामगिरी केली.
श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती ट्रस्ट आग्रा येथील ताजमहाल संदर्भात याचिका दाखल करणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष अधिवक्ता महेंद्र प्रताप यांनी ही माहिती दिली आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही जामा मशिदीबाबत न्यायालयात खटला सुरू आहे.
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने G20 च्या यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, जी 20 च्या यशाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार.
Congratulations to Hon. PM @narendramodi ji for the success of India’s G20 Presidency and for fostering unity between nations for a better future for the people of the world.
It has brought in a sense of honour and pride into the hearts of every Indian. Sir, under your… https://t.co/x6q4IkNHBN— Shah Rukh Khan (@iamsrk) September 10, 2023
आरक्षण ही संधी समजून विरोधक पोळ्या लाटत असल्याचा निशाणा भाजप नेते प्रविण दरेकर यांनी साधला. उद्धव ठाकरे आणि चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी वटहुकूम का काढला नाही, असा सवाल पण त्यांनी विचारला.
भारत माता की जय म्हणायला चांगलं वाटतं, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. इंडिया माती की जय म्हणायला कसं वाटतं, असा सवाल करत, त्यांनी यामुळेच देशाचे नाव भारत करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणासंबंधी मराठी क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. मराठा आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी होत आहे. अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांची बाजू ऐकून घेतली.
आमची दोस्ती तुम्ही पाहिली, आता आमच्या मशालीची आग पाहा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला. जालियनवालाप्रमाणेच जालनावाला घडवल्याचा आरोप त्यांनी केला. दिल्लीला सरबराई करायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेळ आहे. पण त्यांना जालना येथे मनोज जरांगे पाटील यांना भेटायला जायला वेळ मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
जालना : अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला सरसगट आरक्षण मिळावे, याकरिता मनोज जरांगे पाटलांचे आमरण उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 13 वा दिवस आहे. आज मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी रांगा लागल्या आहेत.
अहमदनगर : कोपर्डी हत्याकांडातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याने येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. कोपर्डीत १३ जुलै २०१६ रोजी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली होती.
जेव्हा कॉंग्रेसचे सरकार होते तेव्हा हिंदू खतरेमें अशा घोषणा देत होते. आता यांचे नऊ वर्षे सरकार आहे तरी यांना कश्मीरमधील हिंदू पंडीतांना परत आणता आले नाही. आता तर यांना यांचे सरकार नऊ वर्षे असताना हिंदू आक्रोश मोर्चा काढावा लागतोय हे दुर्देव असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
मराठा आंदोलनात मनोज जरांगे आंदोलनाला बसले आहेत त्यांना भेटायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. परंतू मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जायला वेळ आहे. असा अमानुष अत्याचार जालियनवाला येथे झाला होता आता नवा जालनावाला घडविला आहे अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
जळगावात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर तिखट भाषेत टीका केली आहे. आम्ही आमची कॉंग्रेस होऊ देणार नाहीच, पण भाजपा कमळाबाईची पालखी देखील वाहणार नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे आज जळगाव दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हत्से छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आहे. उद्धव ठाकरे यांच्या जाहिर सभेला सुरूवात झालेली आहे. कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
जळगावात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. उद्धव ठाकरे आज जळगाव दौऱ्यावर आहेत. ठाकरेंसह राऊत आणि दानवेही हजर आहेत. उद्धव ठाकरे यांची आज जळगावमध्ये जाहिर सभा देखील आहे. या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
नागपूरात डेंग्यूच्या रूग्नांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. पूर्व विदर्भात सर्वाधीक रूग्न हे नागपूरात आहेत. त्यानंतर गडचीरोली दूसऱ्या क्रमांकावर आहे.
गणेशोत्सवापूर्वी राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे. याशिवाय गणेशोत्सवापूर्वी पालकमंत्री पदाचेही वाटप केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुनील तटकरे हे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
राज्यभरात पावसाचा जोर वाढला आहे. त्या अनुशंगाने मुंबईला हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. मुंबईसह उपनगरातही पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
इंडिया म्हणायला लागल्यावर काही लोकांना खाज सुटायला लागली आहे. पुतळ्याची उंची गाठली, कामाची उंची कधी गाठणार असा टोला ठाकरेंनी लगावला.
उद्धव ठाकरे आज जळगांव जिल्हा दौऱ्यावर आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होत आहे.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण होणारं आहे. आज त्यांची जळगावात जाहीर सभा होणार आहे.
अजितदादांच्या स्वागतासाठी पुण्यात कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे. आज बाईक रॅलीचं सुध्दा उद्घाटन करण्यात आलं आहे.
कोपर्डी प्रकरणातील आरोपीचं शवविच्छेदन कऱण्यासाठी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी पुणे मध्यवर्ती कारागृहात दाखल झाले आहेत.
जळगाव येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी होणार आहे. त्यावरुन नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्याच्या मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला प्रोटोकोल कळत नाही. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी कधी शेतकऱ्यांना बघितले पण नाही आणि हल्ली शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहे.
जळगाव येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. परंतु त्यासाठी राज्य शासनाने राजशिष्टाचाराचे पत्र मनपाला दिले आहे. याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे. ज्याला कोणाला समोर यायचं असेल त्यांनी या आम्ही पुतळ्याचं अनावरण करूच, असे त्यांनी म्हटले आहे.
पुणे शहरात मनसेच्या गणपती तुमचा किमतही तुमचीच या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते उपक्रमास शुभारंभ झाला. पुण्यातील मनसे नेते प्रल्हाद गवळी यांच्यातर्फे दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येतो.
कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीने कारागृहात जीवन संपवले. जितेंद्र शिंदे असे आरोपीचे नाव आहे. शिंदे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
कराडमध्ये अजित पवार यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली जात आहे. कराडमध्ये संपूर्ण शहरात स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहे. अजित पवार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी कराडमध्ये जाणार आहे.
पुण्यात मनसेच्या गणपती तुमचा किमतही तुमचीच या उपक्रमाचा शुभारंभ येत आहे. राज ठाकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पुण्यातील मनसे नेते प्रल्हाद गवळी यांच्यातर्फे पुण्यात दरवर्षी हा कार्यक्रम राबवण्यात येतो. नागरिकांना आवडलेली गणपतीची मूर्ती ही त्यांना त्यांनी ठरवलेल्या किमती नुसार विकण्यात येते. याच उपक्रमाचं यंदाचा शुभारंभ राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.
G-20 परिषदेचा आज दुसरा दिवस आहे. या दुसऱ्या दिवशी G-20 परिषदेसाठी आलेल्या या नेत्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीला अभिवादन केलं आहे. ही दृश्य सध्या चर्चेत आहेत.
आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पार्टीकडून आज विदर्भातील सर्वात मोठ्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अभिनेता संजय दत्त, शिल्पा शेट्टी, अमिशा पटेल हजेरी लावणार आहेत. यावर्षीची युवा स्वाभिमानची दहीहंडी चांद्रयान 3 आणि विदर्भातील शेतकऱ्यांना समर्पित करण्यात आली आहे. दहीहंडी वर साकारली इसरोची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. यावर्षी 5 ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आज मायदेशी परतणार आहेत. थोड्याच वेळात बायडन राजघाटावर महात्मा गांधीजींच्या समाधीचे दर्शन घेतील. दर्शन घेतल्यानंतर बायडल नवी दिल्ली विमानतळाकडे रवाना होणार आहेत. G-20 च्या आजच्या तिसऱ्या सत्रात बायडन सहभागी होणार नाहीत.
उद्धव ठाकरे आज जळगावमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. राज्य सरकारकडून जळगावमध्ये ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जळगाव महापालिका आयुक्तांना महाराष्ट्र शासनाचं पत्र आलं आहे म्हणून ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय अशी चर्चा रंगत आहे.
मनोज जरांगेंच्या मागण्यांवर उद्या मुंबईत सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची उद्या मुंबईत बैठक बोलावण्यात आली आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे.
7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला सिनेमा पाहण्यासाठी चाहते चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. सिनेमाने फक्त दोन दिवसांत १०० कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे. आता ‘जवान’ सिनेमाच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे देखील समोर येत आहेत…. वाचा सविस्तर
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी अजितदादा गटाने केली आहे. पुण्यातील अजितदादा गटाने ही मागणी केली आहे. त्यासाठी अजितदादा गट सह्यांची मोहीम राबवणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज कोल्हापुरात उत्तरदायित्व सभा होणार आहे. कोल्हापूरच्या तपोवन मैदानावर ही सभा होणार आहे. सभेसाठी एक लाख लोक उपस्थित राहणार संयोजकांचा दावा आहे. सभेच्या निमित्ताने अजित पवार गट आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निषेधार्थ आजपासून ओबीसी समाजाचं नागपुरासह राज्यभर आंदोलन सुरू होणार आहे. या आंदोलनाला राष्ट्रीय ओभीसी महासंघाने पाठिंबा दिला आहे. तर उद्या चंद्रपुरात राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे अध्यक्ष रविंद्र टोंगे उपोषणाला बसणार आहेत.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी जळगाव येथे सभा होणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील हे सुद्धा असणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज जळगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक सपत्नीक दिल्लीच्या अक्षरधाम मंदिरात पोहोचले आहेत. यावेळी ते अक्षरधाम मंदिरात जलाभिषेक आणि पूजा करणार आहेत. यावेळी मंदिराबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.