मुंबई | 15 ऑक्टोबर 2023 : शारदीय नवरात्री उत्सव आजपासून सुरू होत आहे. कोल्हापूरची अंबाबाई आणि पुण्यातील कार्ला गडावरील एकविरा देवींसह ठिकठिकाणी मंदिरात आज घटस्थापना होत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज मुंबईत सभा. पवार यांच्या कुणावर टीका करतात याकडे सर्वांचं लक्ष. संभाजीनगर येथे समृद्धी महामार्गावर खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 12 भाविक ठार झाले आहेत. जालना येथील अंतरवली सराटीत मराठा समाजाचं साखळी उपोषण सुरू आहे. यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.
मुंबई | जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे ही आमची मागणी आहे, असं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. मुंबईत शरद पवार गटाची जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेत जितेंद्र आव्हाड बोलत होते. तसेच महिला आरक्षणाबाबत पहिला पायंडा हा शरद पवार यांनी पाडला, असंही आव्हाड म्हणाले.
ठाणे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याशिवाय यांचा दिवस जात नाही. कावीळ झालेल्यांकडून दुसरी अपेक्षा नाही. काँग्रेसला डोक्यावर घेतलं तेव्हाच ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. हिंदुत्वाचे नकली मुखवटे जनता निकालात फाडेल”, “, अशा शब्दात शिंदेंनी ठाकरेंवर हल्ला चढवला. तसेच विरोधकांनी किती काही केलं तरी नरेंद्र मोदी हेच 2024 मध्ये पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून येतील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.
पुणे | पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. ससून रुग्णालय ड्रग्ज प्रकरणाबाबत मोठी बातमी आहे. ससून रुग्णालय ड्रग्ज प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखा युनिट – 2 कडे देण्यात आला आहे. आधी बंडगार्डन पोलिसांकडे या प्रकरणाची सर्व सूत्रं होती.
पुणे | दादांनी पोलिसांच्या जमिनीच्या लिलावाचा निर्णय घेतला होता, असा गंभीर आरोप मीरा बोरवणकर यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर आरोप केला आहे. ‘मॅडम कमिशनर’ पुस्तकातून मीरा बोरवणकरांकडून गंभीर आरोप केला आहे. पुस्तकात तत्कालीन मंत्री दादा असा उल्लेख करण्यात आला आहे.
दिल्ली परिसरात भूकंपाचे जोरदार धक्के बसले. एनसीआर, गाझियाबाद या परिसरात हे धक्के बसले. एकाच महिन्यात भूंकपाने हादरा दिला आहे. यामुळे नागरिक भयभीत झाले. नागरिकांनी घराच्या बाहेर धाव घेतली. अनेक जणांनी इमारतीखाली गर्दी केली होती. घर, कार्यालये सर्वत्रच भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.
सध्या देशात मुस्काटदाबी सुरु आहे. मीडियाचे हात बांधले जात आहेत. विरोधकांवर दबाव आहे. सध्या मास्क घालण्याची गरज नाही, तेच तोंडावर पट्टी लावत असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केंद्रावर केला. दुसऱ्याला मोठं होऊ द्यायचं नाही ही भाजपची वृत्ती असल्याचा आरोप त्यांनी केला. नेता निवडताना विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
संघाचं भारतीय स्वातंत्र्य युद्धात काय योगदान आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. संघाने फोडाफोडाची राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला. जवळ जायचे आणि फोडायचे उद्योग संघाने केल्याचा आरोप त्यांनी केला. आम्ही प्रवाहाच्या विरुद्ध पोहत आहोत, थांबावायची ताकद असेल तर थांबून दाखवा, असे आव्हान त्यांनी केले.
तुम्ही मला कुटुंबप्रमुख मानता, हे माझ्यासाठी महत्वाचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मला कुणीही माजी लाडके मुख्यमंत्री म्हणत नाही, असा चिमटा पण त्यांनी काढला. मी मुखवटा घालत नाही, मी आहे तसाच असल्याचे त्यांनी सांगितले. आमची लढाई विचारांशी आहे, व्यक्तीशी नसल्याचे ते म्हणाले
परळी : परळीतील वीज निर्मिती केंद्राबाहेर दादाहरी वडगाव ग्रामस्थांचे 9 ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. उपोषणाचा सातवा दिवस आहे. उपोषणास बसलेल्या दोघांची तब्येत खालावली आहे. परळी येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे. अवैधरित्या होणारी राखेची वाहतूक रोखली जावी, तसेच प्रदूषणापासून मुक्त करून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित केले जावे या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे.
पुणे : ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरण नेमेलेल्या समितीने चौकशीला सुरवात केली. ससून रुग्णालयातील या प्रकरणात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही तपासणी होणार आहे. ही चौकशी समिती पुढील आठवड्यात ससूनला भेट देणार आहे. येत १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश या समितीला देण्यात आले आहेत.
मुंबई : राष्ट्रसेवादलाचे समाजवादी विचारांचे नेते आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. देशातील तानाशाही हटविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. उद्धव ठाकरे यांना आम्ही महाराष्ट्राचे नेतृत्व दिले आहे. हा ठराव आम्ही केला आहे. कष्टकरी समाजासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. यात जराही किंतु परंतु नाही असे आमदार कपिल पाटील म्हणाले.
मुंबई : समाजवादि जनता परिवार बैठकीसाठी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आले आहेत. 21 जनसंघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित आहेत. विधान परिषदेतील शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे.
यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर पुणे वाहिनीवर दिनांक 16 ऑक्टोबर रोजी कि.मी. 40/100 ते कि.मी 40/900 आडोशी येथे हायवे ट्रॉफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ करणार आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक दु. 12 ते दु. 1 या वेळेत पूर्णत: बंद राहणार आहे.
नाशिक येवल्यातील अंगणगाव येथे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावलेल्या मंत्री भुजबळांच्या बॅनरला अज्ञाताकडून काळे फासण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
भुजबळांची वक्तव्य समाजात फुट पाडणारी आणि आग लावणारी आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देणार होते मग अजून का दिले नाही असा प्रश्नही त्यांनी विचारला. आरक्षणाच्या मुद्यावरून फक्त राजकारण सुरू असल्याचा आरोप राउतांनी केला आहे.
समृद्धी महामार्गावरील अपघातावर अजित पवार यांनी ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे. मृत व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली आहे. संमृद्धी महामार्गावरील अपघाताची बातमी एकून अत्यंत दुःख झालं भिषण अपघातात मृत पावलेल्या नागरिकांना माझी श्रद्धांजली. असे ट्विट अजित पवार यांनी केले आहे.
समृद्धी महामार्ग घाईने बनवून शिंदे आणि फडणवीसांनी श्रेय घेतलं असा आरोप ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केला आहे. सरकारवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राऊत यांनी केली, यावर कोस्टल रोडवर अपघात झाला तर उद्धव ठाकरेंना दोषी धरायचं का असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.
समृद्धी महामार्गावर अपघातात जीव गमावलेल्यांना सरकारकडून आर्थिक मदत जाहिर करण्यात आली आहे. आज झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 ते 22 जण जखमी झालेले आहेत. यामध्ये मृतांच्या कुटूंबीयांना 5 लाखांची मदत सरकारकडून करण्यात येणार आहे.
नाव न घेतो मिरा बोरवणकर यांनी अजित पवारांवर गंभिर आरोप केले आहे. 2010 मधील प्रकरणाचा पुस्तकात उल्लेख करण्यात आलेला आहे. येरवाडा पोलिसांच्या जमिन लिलावाचा निर्णय दादांनी घेतला होता. असा आरोप त्यांनी पूस्तकाच्या माध्यमातून केला आहे.
आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. मुंबईच्या मुंबा देवी मंदिरात घटस्थापना करण्यात आली आहे. आज पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळतेय. दरवर्षी लाखो भाविक नवरात्रीच्या काळात मुंबा देवीचे दर्शन घेतात.
बेस्टकडून मुंबईत नवरात्रोत्सवानिमीत्त्य जादा बसेस सोडण्यात आलेल्या आहेत. तब्बल 26 बसेस जास्त सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे नवरात्रीत मुंबईला येणाऱ्याची गैरसोय काही प्रमाणात कमी होईल.
आजपासून शारदीय नवरात्रीला सुरूवात झालेली आहे. कोल्हापूरात करविर निवासी अंबादेवीच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे. आज घटस्थापनेनंतर तोफेची सलामी देण्यात येणार आहे. मंदिर परिसरात आकर्षक रोशनाई करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात कोळी समाज आक्रमक जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्यांची प्रकृती बिघडल्याने हे आंदोलन करण्यात आल्याचं म्हटलं आहे
राजमल लखीचंद ज्वेलर्स संबंधित ७० ठिकाणी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. जळगाव, मुंबई, ठाणे आणि सिल्लोडमधील मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आलीये. कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती समजत आहे.
पश्चिम द्रुतगती मार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून अग्निशामक दल आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्मिशामक दलाचे प्रयत्न सुरू आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत. विद्या प्रतिष्ठानमध्ये अजितदादांच्या जनता दरबाराला सुरुवात झालीये. जनता दरबारात नागरीकांची मोठी गर्दी बघायला मिळतंय.
पुण्याची ग्रामदैवता तांबडी जोगेश्वरी देवीची घटस्थापना झालीये. विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पार पडली पुण्याच्या ग्राम देवीची घटस्थापना. देवीची आरती करत नीलम गोऱ्हे यांनी केली विधीवत पूजा
तुळजाभवानी देवीच्या मंदिरात व्हीआयपी दर्शनाचा मोठा गोंधळ झालाय. भाविक 2 तासापासून प्रतिक्षा रांगेत आहेत. भाविकांना पास मिळत नसल्याने लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे भाविकांनी गोंधळ घालत संताप व्यक्त केलाय. 500 रुपये शुल्क दर्शन पैसे देऊनही पास मिळत नसल्याचा आरोप
सांगलीत स्पीड ब्रेकरवरून दुचाकीवरून पडल्याने एकाचा मृत्यू झालाय. अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आलाय. बिरनाळे कॉलेज समोरील असलेल्या स्पीड ब्रेकरवर रात्री 11 वाजता हा अपघात घडला आगे.
पुण्यातील आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. राज्यातील कोळी, आग्री, सिकेपी अशा विविध समाजाची कार्ला गडावरील एकविरा देवी ही कुलस्वामिनी आहे. त्यामुळेच पहाटेपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक कार्ला गडावर दाखल होत आहेत.
कोल्हापूर कर्वे निवासी अंबाबाई मंदिरामध्ये आज घटस्थापनेची स्थापना करण्यात आली. आता नऊ वेगवेगळी नऊ रुपये देवीची पाहायला मिळणार आहेत. घटस्थापना झाल्यानंतर तोफेच सलामी देवीला देण्यात आली.
चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेल्या देवी महाकालीच्या अश्विन नवरात्र उत्सवाला आज घटस्थापनेने उत्साहात प्रारंभ झाला आहे. नवरात्राच्या पहिल्याच दिवशी चांदागडच्या आईचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येत भाविक मंदिरात पहाटे पासून दाखल झाले आहेत.
आजपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे. यामुळे साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी गड येथे भाविकांची गर्दी होत आहे. संस्थानचे अध्यक्ष नाशिक सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्या हस्ते दागिने आणि पादुका पूजन करण्यात आले. सप्तशृंगी देवीच्या मूर्तीला आभूषणे आणि वस्त्र परिधान करण्यात आले.
नवरात्र उत्सवादरम्यान रात्री उशिरापर्यंत नागरीक प्रवास करतात. यामुळे अंधेरी पश्चिम आणि गुंदवली दरम्यान मेट्रोची वेळ वाढवली आहे. आता शेवटची मेट्रो १०:३० ऐवजी १२.२० वाजता धावणार आहे. एमएमआरडीएचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिले आहेत.
पुण्यात सैन्य दलात नौकरी देण्याच्या बहाण्याने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर येत आहे. सैन्य दलाची नोकरी लावतो म्हणून 42 मुलांना पावने दोन कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत कोंढवा पोलिसांनी आरोपी पाडुरंग शेळकेला सांगली येथून ठोकल्या बेड्या आहेत. आरोपीने मुलांना बनावट प्रवेशपत्रीका वाटून त्यांची वैद्यकीय चाचणी देखील केल्याचे समोर आले आहे.
सिडको परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशत पाहायला मिळत आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या लोकांना भटक्या कुत्र्यांकडून चावा… महापालिकेचे पथकच येत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मनपाच्या पथकाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. सिडको परिसरातील नागरिकांचा थेट आंदोलनाचा इशारा
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज मुंबईत सभा होणार आहे. दुपारी 3 वाजता मुंबईच्या बॅलार्ड पियर येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात ही सभा होत आहे. यावेळी शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संभाजीनगरातील वैजापूरजवळील आगर सायगाव येथे रात्री 12.30च्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर खासगी बस जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात 12 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 22 भाविक जखमी झाले आहे. हे सर्व भाविक बुलढाण्याहून सैलानी बाबाचे दर्शन घेऊन येत असताना हा अपघात झाला.
आजपासून शारदीय नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. त्यानिमित्ताने पुण्यातील कार्ला गडावर आई एकविरा देवीच्या मंदिरात थोड्याच वेळात घटस्थापना होणार आहे. त्याआधी आज कार्ला गडावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. देशी विदेशी रंगीबेरंगी फुलांनी एकविरा देवीचं मंदिर फुलून निघालं आहे. आकर्षक विद्युत रोषणाई देखील ट्रस्टकडून करण्यात आली आहे. आई एकविरेच्या दर्शनासाठी अनेक भाविक आई एकविरेच्या गडावर दाखल झाले आहेत.
शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात घटस्थापना करण्यात आली आहे. यावेळी पूजा अर्चा करण्यात आली. मंदिरात पहाटेच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सर्वांनी भक्तीभावे देवीची पूजा केली.