मुंबई | 17 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज बीडमध्ये सभा होत आहे. राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांची सभा होत असल्याने या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आजपासून राज्यभरात तलाठी परीक्षेला होणार सुरुवात होणार आहे. 4 हजार 644 जागांसाठी ही भरती होत आहे. काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी दिल्ली लोकसभेच्या जागा स्वबळावर लढण्याचं विधान केलं आहे. त्यामुळे आपमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. तर इंडिया आघाडीतही लांबा यांच्या विधानाचे पडसाद उमटणार असल्याचं सांगितलं जात आहे. पुण्यात डोळ्यांची साथ सुरूच. आतापर्यंत 52 हजार रुग्ण आढळले आहेत. यासह राज्य देश आणि विदेशातील राजकीय घडामोडी जाणून घ्या.
कुर्ला नारायण नगर येथे इंडस्ट्रियल इस्टेटला आग लागल्याची घटना नुकताच घडली आहे. या आगीच्या घटनेनंतर दोन फायर इंजन घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या आग विझवण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
पुण्यामध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. जोशीची बायको पॉर्नस्टार सारखी दिसतेय, असा मेल सोसायटीतील 140 सदस्यांना आला आहे. कोंढवा भागात असणाऱ्या सोसायटीमध्ये एका महिलेला पॅार्नस्टार म्हणून संबोधन करत विनयभंग केलाय. महिलेच्या बदनामी संदर्भात सोसायटीमध्ये राहणाऱ्या सगळ्यांना ईमेल आले आहेत. याप्रकरणी एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात एक अत्यंत मोठी बातमी पुढे येतंय. पुढील आठवड्यात सुप्रीम कोर्टात राज्य सरकार क्यूरेटीव्ह पिटिशन दाखल करणार आहे. आज मुंबईत मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एस ईबीसीचं आरक्षण रद्द झाल्यानंतर ईडब्लुएसमधून नियुक्त्या मिळाल्या नाहीत. त्यासाठी राज्य सरकारने हायकोर्टात याचिका दाखल केलीये.
पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरातून डी. एस. कुलकर्णी यांच्या जप्त आलिशान गाड्यांचे लोगो गायब झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महागड्या गाड्यांचे लोगो गायब झाले आहेत. थेट मुद्देमाल विभागाच्या पोलीस ठाण्याच्या परिसरातूनच हे लोगो गायब झाल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कुलकर्णीना अटक केल्यानंतर त्यांच्या एकूण 16 आलिशान गाड्या आणि एक स्पोटर्स बाईक जप्त करण्यात आली होती.
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी शहरात 15 दिवसाच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. या पावसामुळे आता भात पिकाला नवसंजीवनी मिळणार आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा हा नक्कीच मिळाला आहे.
सध्या राज्यात सुडाचे राजकारण सुरु आहे. सत्तेसाठी काही करण्याचा नवा आदर्श निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. विचारांशी फारकत घेऊन सत्ता जवळ करण्याचे काम सुरु आहे. बीडमध्ये सर्वांनीच शरद पवार यांचे पोस्टर लावले. सर्वांनाच त्यांच्या आशिर्वादाची गरज असल्याचा टोला जयंत पाटील यांनी हाणला.
विचारासाठी, महाराष्ट्र धर्मासाठी संघर्ष करत राहणार. बलाढ्य शक्तीशी, भाजपविरोधात लढाई सुरु आहे. लोकांच्या विचारांचे सरकार महाराष्ट्रात आणायचे असल्याचे रोहीत पवार यांनी सांगितले.
मला खोट्या प्रकरणात अडकविण्यात आल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला. 14 महिने आपण तुरुंगात होतो. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडी, सीबीआयच्या वापर करण्यात येत आहे. हे सरकार देशाचा विनाश करेल, असा दावा त्यांनी केला.
आम्ही सत्तेत आहोत, महासत्तेसोबत आहोत. काही जण म्हटले आमच्याकडे मोदी आहेत, मी म्हटलं आमच्याकडे पवार साहेब आहेत.
जनक्रांती सेनेचे प्रमुख बबनराव गित्तेंचा राष्ट्रवादीत प्रवेश. शरद पवार यांच्या उपस्थितीत गित्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
मंत्री दिपक केसरकर, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील सोबत. तीन नेते प्रथमच एकत्र साईदर्शनाला. शासन आपल्या दारी कार्यक्रमानंतर तीनही नेते साई दर्शनासाठी साई दरबारी. मंदिर परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवाशंकर यांनी स्वागत केलं.
बीडमध्ये शरद पवार यांची जाहीर सभा आहे. जंगी स्वागत करत शरद पवार सभास्थळी दाखल झाले आहेत. आमदार संदीप क्षिरसागर आणि जेष्ठ नागरिकांच्या हस्ते शरद पवार यांचे पुष्पहार घालून स्वागत केले.
मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा आलो तेव्हा सांगितले होते, महाराष्ट्रामधील जनतेचे संकट दूर कर आणि सेवा करण्याचे बळ दे. शासन आपल्या दारी कार्यक्रम मेळावा किंवा राजकीय कार्यक्रम नाही. सरकारी काम सहा महिने थांब ही म्हण आम्हाला मोडून काढायचीय. जनतेला खेटे मारायला लागू नये यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पेटी म्हणजे कामगारांना साहित्य होतं, खोके नाही. काल कुणीतरी म्हटलं खोके वाल्यांकडे कंटेनर आहे. शासकीय योजना कशी असते हे देशाला महाराष्ट्राने दाखवून दिले.
“श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला देणारे साईबाबा यांच्या नगरीत हा कार्यक्रम होत आहे. कार्यक्रम झाल्यावर आम्ही सगळे साईबाबांच्या दर्शनाला जाणार आहोत. जिल्ह्यातील काही लोक अतिजागरूक असतात. अहमदनगर जिल्ह्यात आल्यावर मला आजोळी आल्यासारखं वाटतं. तुम्ही सर्वजण माझे आजोळकर आहात. आम्ही घेतलेले निर्णय सगळे राज्याच्या हितासाठी असून सगळ्यांना सोबत घेऊन काम करत आहोत,” असं अजित पवार म्हणाले.
शिवसेना नेते बदावराम पंडित यांच्या घरी शरद पवारांनी भेट दिली आहे. यावेळी दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. बदामराव पंडित राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. बदामराव पंडित यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास शिवसेनेला मोठा झटका बसणार आहे.
“हे सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरलं आहे. राज्यातील लोकांचा संयमाचा बांध फुटायला आला आहे,” अशा शब्दांत नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली.
शिर्डीत आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिर्डीच्या काकडी गावात हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “या देशात महापुरुषांचा आदर केलाच पाहिजे. त्याबद्दल कुणीही बेताल वक्तव्य करू नये, याची खबरदारी आमच्याकडून घेतली जात आहे.”
बारामती शहरातील अशोकनगर, देसाई इस्टेट, क्रिडा संकुल परिसरातील जवळपास नऊ ते दहा घरांवर दरोडा घातला गेला. या दरोड्यात मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेच्या तपासासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीवर सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषेदत प्रतिक्रिया दिली आहे. “राजकीय मतभेद आणि कुटुंब यात काही फरक आहे की नाही? पवार आणि दादांमधील लढाई ही राजकीय आहे. आमच्यात वैयक्तिक लढाई नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेतून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. शरद पवारांवर बोलल्याशिवाय विरोधकांचा दिवस जात नाही, असं त्या म्हणाल्या. त्याचसोबत स्वत:चा प्रचार करण्यासाठी शासन आपल्या दारी कार्यक्रम राबविला जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. या कार्यक्रमातून नेत्यांचं प्रमोशन सुरू, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पवारांची कुणी भेट घेतली म्हणून पवार त्यांच्या मागे जात नाहीत, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. शरद पवार यांची बीडमध्ये जाहीर सभा आहे. अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी आता तरी शक्यता नाही, असंही जयंत पाटील म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण यांची काँग्रेसमध्ये अवस्था दयनीय झाली आहे. इतरांच्या पक्षात कोण सुखी आहे हे जाणून घेण्यापेक्षा स्वत:च्या पक्षात काय पत राहिली आहे, यावर त्यांनी विचार करावा, अशा शब्दांत प्रसाद लाड यांनी टोला लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुल गांधी हे पर्याय होऊ शकत नाही, असे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले आहे. कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशावेळी ते बोलत होते.
सोनिया गांधी, राहुल गांधी यांना कोण ओळखतं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच मोदींचा भारत म्हणून आज जगामध्ये ओळख निर्माण झाली आहे, असंही महाजन म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची बीडमध्ये जाहीर सभा होणार असून थोड्याच वेळात ते तेथे पोहोचतील. बीडच्या दिशेने जाताना जागोजागी शरद पवार यांचे कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.
माझ्या महाराष्ट्रात पाकिस्तानचे नारे लागत असतील, तर देवेंद्र फडणवीस तुमचं गृहखातं झोपलं आहे का, अभिजीत बिचुकले यांचा खडा सवाल. पुण्यात पाकिस्तानच्या घोषणा खपवून घेणार नाही , असा इशाराही त्यांनी दिला आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे २० ऑगस्टपासून मतदारसंघाचा दौरा करणार आहेत.
मोदीजींचे नेतृत्व जे स्वीकारतील त्यांना पुढे घेऊन जाऊ, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कळवा येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी काँग्रेसचे मूक आंदोलन सुरू असून आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर कळवा रुग्णालयात उपस्थित राहून चौकशी करत आहेत.
बिग बॉस फेम म्हणून महाराष्ट्रात नेहमी चर्चेत राहणारे अभिजीत बिचुकले यांनी पुणे शहरातील पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा प्रकरणात मोठे वक्तव्य केले आहे. मला लेखी पत्र द्या मी त्या आरोपींना शोधून फासावर लटकवतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.
राज्यात इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत महाराष्ट्र काँग्रेसकडून राहुल गांधी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी मिळाल्यामुळे हा सत्कार होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेमधली फुटीनंतर सुप्रिया सुळे पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर गुरुवारी येत आहे. त्या पक्षाच्या संपर्क कार्यालयात येणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांसोबत भेटीगाठी घेणार आहेत.
आगामी काळात शरद पवार यांच्या मंचर, महाड आणि कोल्हापूरला सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिली. नुकतीच शरद पवार, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, फौजिया खान यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील मांजरखेडजवळ समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघे जागीच ठार झाले. ट्रक थेट सिमेंटच्या कठड्याला आदळल्याने हा अपघात झाला. यामध्ये चालक मोहमद फैजान मोहम्मद अली (वय ३७) अन् क्लिनर मोहम्मद मुमताज मोहम्मद शेख (रा. बिहार) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तात्पुरत्या स्वरूपात नवीन कार्यालयाची उभारणी करण्यात आली आहे. नाशिक शहरातील मुंबई नाकापरिसरात मूळ कार्यालयाच्या शेजारी शरद पवार गटासाठी नवीन कार्यालयाची उभारणी केली आहे. काही दिवसांपूर्वी मूळ कार्यालयाचा ताबा घेण्यासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट तयारीला लागला आहे. आजपासून बैठकांना सुरुवात होते. अहमदनगर नाशिक दिंडोरी या मतदारसंघांची आज बैठक होणार आहे. मातोश्रीवर ही बैठक पार पडेल.
कोरोना काळातील कालबाह्य औषधसाठा खरेदीप्रकरणी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कारवाई केली आहे. आरोग्य खात्यातील दोन आरोग्य संचालकांना तडकाफडकी पदमुक्त केलं आहे.
पुण्यात पहाटेच्या सुमारास दोन ठिकाणी आगीच्या घटना लागली आहे. पुण्यातील वानवडी आणि तुळशीबाग परिसरात पहाटेच्या सुमारास आग लागली. तर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
83 वर्षांचा माणूस युद्ध करायला निघाला आहे, युद्ध करायला वय नाही, जिद्द लागते. शरद पवार यांनी निवृत्त व्हावं हा शब्द शरद पवार यांच्या शब्दकोशात नाही, या शतकातला सर्वात मोठा जोक आहे. शरद पवार यांना ऑफर देणे, कोणी भेटायला आले तर नाकारता येत नाही, काळ जसा जात जाईल तसं ते समोर येईल असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
आज मिशन चांद्रयान-3 साठी महत्त्वाचा दिवस आहे. चंद्राच्या कक्षेत चांद्रयान 3 चं विभाजन होईल. नेमक काय घडणार, जाणून घ्या वाचा सविस्तर…
चंद्रपूर जिल्ह्यातील अजयपूरजवळ अपघात झाला. आमदार किशोर जोरगेवारांच्या समयसूचकतेने चौघांचे प्राण वाचले. नातू, आजी-आजोबांसाठी कार्यकर्ते देवदूत ठरले. दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने आजी-आजोबा दोन नातवांसह नाल्यात बेशुद्धावस्थेत पडून होते. दरम्यान, मार्खडा देव येथून येणाऱ्या आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यकर्त्यांना हे भीषण दृश्य दिसताच अपघातग्रस्तांना बाहेर काढत वाहनातून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
म्हाडाच्या सुमारे 10 हजार घरांची ऑक्टोबरमध्ये सोडत काढण्यात येणार आहे. यात पुण्यातील पाच हजार, कोकण मंडळाच्या अंदाजे साडेचार हजार आणि औरंगाबाद मंडळाच्या अंदाजे 600 घरांचा समावेश आहे. तिन्ही मंडळांतील घरांच्या सोडतीसाठी ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4082 घरांच्या सोडतीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज शिर्डीत येणार आहेत. शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी हे तिन्ही नेते शिर्डीत येत आहेत. शिर्डी विमानतळाजवळील काकडी गावात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 11.13 वाजता तिन्ही नेते कार्यक्रम स्थळी पोहोचतील. यापूर्वी तीनदा शिर्डीतील कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.
आजपासून श्रावण महिना सुरू होत आहे. त्यानिमित्ताने त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुले राहणार आहे. तर श्रावण सोमवारी पहाटे 4 वाजल्यापासून मंदिर सुरू राहणार आहे. त्र्यंबकेश्वरच्या गावकऱ्यांना उत्तर महाद्वारातून प्रवेश देण्यात येणार आहे. तर भाविकांच्या सोयीसाठीही मंदिर व्यवस्थापनाने नियोजन केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनी भ्रष्टाचार रोखण्याचं आवाहन केलं आहे. त्यावरून काँग्रेसने खोचक ट्विट केलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या फोटोसह भाजपच्या 11 भ्रष्टाचारी नेत्यांची फोटो छापली आहेत. त्यात नारायण राणे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणइ अजित पवार यांचाही फोटो आहे.
आजपासून राज्यभरात तलाठी परीक्षेला होणार सुरुवात होणार आहे. एकूण 4 हजार 644 जागांसाठी ही भरती होत आहे. 14 सप्टेंबर पर्यंत ही भरती सुरू राहणार आहे. टाटा कन्सलटन्सी (टीसीएस ) कंपनी उमेदवारांची परीक्षा घएणार आहे. तलाठी होण्यासाठी उमेदवारांमध्ये प्रचंड स्पर्धा पाहायला मिळत आहे. अवघ्या चार हजार पदांसाठी साडे दहा लाख अर्ज आले आहेत. सर्वाधिक म्हणजे सव्वा लाख अर्ज पुण्यातून तर सर्वात कमी अर्ज वाशिम जिल्ह्यातून आले आहेत.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज माने कॉम्प्लेक्स परिसरात सभा होणार आहे. दुपारी 12 वाजता सभेला सुरुवात होईल. या सभेत 40 ते 45 हजार कार्यकर्ते बसतील अशी व्यवस्था मंडपात करण्यात आली आहे. सभेत शरद पवार काय बोलतात? कुणावर निशाना साधतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.