मुंबई | 18 सप्टेंबर 2023 : आजपासून संसदेचं विशेष अधिवेशन सुरू होत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात एकूण 8 विधेयके मांडण्यात येणार आहेत. सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेला संबोधित करणार आहेत. तर शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे शिवसेना कुणाची? याचं चित्र स्पष्ट होणार आहे. उद्या गणपतीचं आगमन होणार आहे. त्यासाठी आज राज्यभरात भाविकांची लगबग सुरू राहणार आहे. खरेदीसाठी मार्केटही आज फुलून जाणार आहे. नागपुरात ओबीसी कुणबी महासंघाचा आज विशाल मोर्चा. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करण्यासाठी मोर्चा काढला जात आहे. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.
नाशिक | ऐन सणासुदीच्या तोंडावर लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील 17 बाजार समित्यामध्ये कांद्याचे लिलाव पुन्हा बेमुदत बंद राहणार आहेत. कांदा व्यापाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बुधवार 20 सप्टेंबरपासून कांदा लिलाव बेमुदत बंदचा निर्णय जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने घेतलाय. नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने विविध मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कुठलाही तोडगा न निघाल्याने कांदा लिलाव बेमुदत बंद राहणार. कांदा लिलाव बंद दरम्यान अंदाजे 30 ते 40 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे.
धुळे | भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी भाजप सत्तेत आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते दिले नाही. देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला मूर्ख बनवण्याचं काम केलं, अशी टीका भाजपचे माजी आमदार लोकसंग्राम संघटनेचे प्रमुख अनिल गोटे यांनी केली आहे. फडणवीस यांनी पुढील पन्नास वर्ष धनगरांना आरक्षण मिळविण्यासाठी अशी व्यवस्था केली असा टोलाही त्यांनी लगावला.
सर्व गणेश मंडळांना पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. गणेश भक्तांनी गणेश उत्सवाचा आनंद घ्यावा आणि सतर्क रहावे. सुरक्षेसाठी मुंबईकरांना चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही, असे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी म्हटले आहे.
एसटी बस चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना नुकताच समोर आलीये. एसटी बस चालकाला प्रवाश्यांनी मारहाण केलीये. निलंगा तालुक्यातल्या राठोडा गाव ही घटना घडलीये. चालकाच्या बाजूने बसमध्ये चढू देत नसल्याने वाद झाल. या मारहाणीत चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी लातुरला हलवले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टिका केलीये. सुनील तटकरे म्हणाले की, विकृत मनोवृत्तीचा हा माणूस आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून मी भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांकडे मागणी करत आहे. भाजपाने याच्यावर कारवाई करावी. आम्ही याचा कडक शब्दांत निषेध करतो. आम्ही या विकृत माणसाला विचारुन सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू झालीये. महिला आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता दाट शक्यता आहे.
नुकताच डॉ. सदानंद मोरे यांनी साहित्य महामंडळाचा राजीनामा दिलाय. मंडळाच्या कामात नोकरशाहीचा हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढत असल्याचा मोरे यांनी आरोप केला. याविरोधात मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे.
अजित पवार यांच्यावर टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्यावर अमोल मिटकरी यांनी पलटवार केला आहे. मंगळसूत्र चोर हीच पडळकर यांची ओळख आहे, असं पडळकर म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना आवरावं, अन्यथा आम्हीही जशाच तसं उत्तर देऊ, असं मिटकरी म्हणाले.
गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात अजित पवार गट आक्रमक झाला आहे. मावळमध्ये अजित पवार गटाने पडळकरांच्या फोटोला जोडोमारो आंदोलन केलं. तसेच पडळकर यांना पुण्यात फिरू देणार नाही, असा इशाराही दिला आहे. पुण्याच्या बालगंधर्व चौकात हे आंदोलन करण्यात आलं.
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि पोलिसांनी दहशतवादाविरोधात मोठी कारवाई सुरु केली आहे. दहशतवाद्यांच्या तीन मदतनीसांना अटक केली आहे. किश्तवाडाच्या डोडामध्ये दहशतवाद्यांना त्यांनी मदत केली होती. डोडामध्ये दहशतवादी कारवाया तीव्र करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तौसिफ उल नबी, जाहुल उल हसन आणि रियाझ अहमद अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी दादर मार्केटमध्येे मोठी गर्दी झाली आहे. गणपतीनिमित्त खरेदीसाठी मोठ्या संख्येने भाविक दादर मार्केटमध्ये दाखल झाले आहेत. सजावटीसाठी हार, फुलं तसेच प्रसादासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्या आरोपांचं काय झालं? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. मोदी यांनी भ्रष्टाचाराबद्दल केलेल्या दाव्यांची चौकशी करा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. भ्रष्टाचाराच्या चौकशीला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं सुप्रिया सुळे लोकसभेत म्हणाल्या.
सुप्रीम कोर्टाच्या कुठल्याही आदेशाची प्रत आली नाही. निकाल देण्यासाठी दिरंगाई होणार नाही. घाईत चुकीचा निर्णय घेणार नाही, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.
मुंबई शिधा वाटप कार्यालयात शिवसेना गटाचे आंदोलन सुरु झाले आहे. राज्य सरकारने दिलेल्या वचनानूसार गपणतीसाठी आनंदाचा शिधा मिळाला नसल्याने शिवसेना गटाने आंदोलन सुरु करीत घोषणाबाजी केली आहे. राज्य सरकारने केवळ जाहिरातीवर खर्च केल्याच्या आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी जाहीरातीच्या रिकाम्या पिशव्या कार्यकर्त्यांनी दाखवित आंदोलन केले.
नागपुरात ओबीसी – कुणबी महासंघाच्या मोर्च्याला सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये अशी या मोर्चाची मागणी आहे. ओबीसी समाजासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक घ्यावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना कोणाची यावर आज सुनावणी 18 आणि 19 व्या क्रमांकावर आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. सध्या बोर्डावरील 11 व्या क्रमांकाची सुनावणी सुरु आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे यावर सुनावणी होणार असून साऱ्या महाराष्ट्राचे याकडे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, संसदेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी असंख्य लोकांनी योगदान दिले. लोकशाहीच्या या घरावर दहशतवादी हल्लाही झाला. हा हल्ला संसदेवर नसून आमच्या आत्म्यावरील हल्ला होता. दहशतवाद्यांशी लढताना ज्यांनी सभागृह वाचवण्यासाठी छातीवर गोळ्या झाडल्या त्यांनाही मी सलाम करतो.
पंतप्रधान मोदींनी संसदीय इतिहासातील योगदानाबद्दल जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री यांच्यापासून ते अटलबिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंत सर्वांचा उल्लेख केला. सरदार पटेलांपासून ते लालकृष्ण अडवाणींपर्यंतचा उल्लेखही झाला.
जुन्या संसद भवनात संसदेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देश आमचा इतका सन्मान करेल याची मी कल्पनाही केली नव्हती. गरीबाचा मुलगाही खासदार होतो, हीच भारताच्या लोकशाहीची ताकद आहे. आज जग भारतामध्ये आपला मित्र शोधत आहे. सबका साथ, सबका विकास यांनी आम्हाला जोडून ठेवले आहे.
जुन्या संसदेतून बाहेर पडणं हे माझ्यासाठी अत्यंत भावनिक आहे. जुन्या संसद भवनात संघर्ष आणि उत्साहाचं वातावरण होतं. गरिब कुटुंबातील मुलगा इथपर्यंत पोहोचला लोकशाहीचा विजय आहे.
संसदेच्या विशेष अधिवेशनाचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, सर्वत्र भारताची चर्चा होत आहे. चांद्रयान-३ च्या यशाने संपूर्ण देश भारावून गेला आहे. यामध्ये भारताच्या क्षमतेचे एक नवीन रूप विज्ञानाशी जोडले गेले आहे. हे आपल्या शास्त्रज्ञांच्या क्षमतेशी संबंधित आहे.
आपण ऐतिहासिक संसदभवनातून निरोप घेत आहे. आज जुन्या भवनात शेवटचा दिवस आहे. नव संसद उभारण्यासाठी लोकांनी अधिक मेहनत घेतली.
आजपासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होत असून ते ५ दिवस चालणार आहे. मात्र अधिवेशन सुरू होताच तांत्रिक चूक दाखवत विरोधकांचा गदारोळ सुरू झाला .
महाराष्ट्रातील ISIS मॉड्युल संबंधित प्रकरणात मोठी माहिती उघड झाली आहे. दहशतवाद्यांकडे सापडलेली रसायनं ही स्फोटक बनवण्यासाठीच होती, फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक महिती समोर आली आहे.
NIA कडे फॉरेन्सिक अहवाल सादर करण्यात आला. इम्रान खान आणि युनूस साकी यांच्या पुण्यातील घरात ही रसायनं सापडली होती.
सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. आम्ही लाखो कागदपत्रांची पूर्तता केली आहे. सरळ दिसणारं प्रकरण आहे, तरीही विलंब कशासाठी ? असा सवाल अनिल देसाई यांनी उपस्थित केला आहे.
PM Modi Live : सर्व जुन्या गोष्टी सोडून आपण नवीन संसदेत प्रवेश करूया, असे पंतप्रधान म्हणाले. विशेष अधिवेशनात ऐतिहासिक निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आजपासून संसदेचं अधिवेशन सुरू होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत आहेत.
विशेष अधिवेशनाचा कालावधी छोटा असला तरी ही मोठी घटना आहे.
अमरावती शहरातील सराफा बाजार मधील सोन्या-चांदीच्या शोरूमला आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे शोरूमच्या वरच्या मजल्यावर आग लागली असून लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मुंंबईमध्ये धमकीच्या फोनचं सत्र अद्याप सुरूच असून बोरिवलीमध्ये २० ते २५ दहशतवादी बॉम्ब बनवत असल्याचा निनावी फोन पोलिसांना आला. मात्र पोलिसांच्या तपासणीत काहीच आढळून आं नाही.
हा फोन करणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दारूच्या नशेत फोन केल्याचे पोलिस तपासात समोर आलं.
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून मनसे आक्रमक झाली असून त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. जर तुम्ही सिंगल लेन रस्ताही नीट सुरू करू शकत नसाल तर तुम्हाला मंत्रीपदावर रहायचा अधिकार नाही. जनाची नव्हे मनाची तरी ठेवा आणि राजीनामा द्या, संपूर्ण कोकणवासियांची माफी मागा, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली.
ठाकरे गटातर्फे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे महत्वपूर्ण अर्ज केला आहे. आमदार अपात्रतेबाबत आतापर्यंत काय कारवाई केली ? असा प्रश्न विचारला आहे.
कोणत्या गटाचे केव्हा, किती अर्ज करण्यात आले, अशी विचारणाही करण्यात आली आहे.
मातोश्री बंगल्याचे नुतनीकरण करणारे बिल्डर सीबीआयच्या रडारवर आले आहेत. बांधकाम व्यावसायिक किशोर अवर्सेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विविध बँकांची ३ हजार ८३७ कोटींच्या फसवणुकीप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजपासून २२ सप्टेंबरपर्यंत विशेष अधिवेशन सत्र सुरु होणार आहे. दोन्ही सभागृहांच्या खासदारांचं फोटोसेशन देखील होणार आहे. संसद परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
नर्मदा नदीच्या पूरस्थितीचा रेल्वेला फटका बसला आहे. भरूच येथे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे रेल्वे पट्ट्यांवर पाणी आल्याने रेल्वे प्रवाशांना फटका बसला आहे. पश्चिम रेल्वेची गुजरात राज्यातील अहमदाबादकडे जाणाऱ्या रेल्वे नंदुरबार आणि इतर स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत. पुराचे पाणी पातळी कमी झाल्यानंतर रेल्वे गाड्या पुढे मार्गस्थ होतील अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
पुण्याच्या नारायणगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. टोमॅटोचे दर कमी झाल्यामुळे शेकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. टोमॅटो रस्त्यावर फेकून शतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पिंपरी चिंचवड मधील रोड शो नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट देखील सक्रिय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सोमवारी शहरात दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही दुचाकी रॅली होणार आहे.
मुंबई, गोवा राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघात डोंबिवलीमधील 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. विनोद तारले असे या प्रवाशाचे नाव आहे. या अपघातात त्यांची पत्नी वैष्णवी आणि 15 वर्षांचा मुलगा अथर्व गंभीर जखमी झाला आहे.
कोल्हापुरात गोकुळनंतर आता राजाराम सहकारी साखर कारखान्याचा वार्षिक सभेवरून महाडिक आणि पाटील गटात वादाची चिन्ह आहे. येत्या 29 सप्टेंबरला राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा होत आहे. अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी सभा घेण्यास सतेज पाटील गटाचा विरोध आहे.
नाशिक जिल्ह्यात अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्ग सर्वाधिक धोकादायक झाला आहे. गेल्या आठ महिन्यात शहरातील या महामार्गावर तब्बल ६७ अपघात झाले आहे. त्यात३६ जणांनी जीव गमावला आहे.
नंदुरबारजवळ असलेल्या सरदार सरोवर प्रकल्पाची पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ओबीसी कुणबी महासंघाचा आज नागपुरात भव्य मोर्चा निघणार आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून ओबीसींकडून मोठं शक्तीप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मोर्चाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे कोर्ट निवडणूक आयोगाचा निर्णय जैसे थे ठेवणार की निर्णय पलटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत हा व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. नवीन संसदेत काल झालेल्या ध्वजारोहणाच्या निमंत्रण पत्रिकेवरून ड्रामा झाला. डीएमके खासदार त्रिची शिवा यांनी बैठकीतच निमंत्रण पत्रिका फाडली.
हिंदी भाषेतून निमंत्रण पत्रिका असल्याने डीएमकेने नाराजी व्यक्त केली. सरकार हिंदी भाषा थोपवत असल्याचा आरोप डीएमकेने केला. इंग्रजी भाषेमधून निमंत्रण पत्रिका का दिली नाही? असा सवाल खासदार शिवा यांनी केली.
संसदेचं विशेष अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. सकाळी 10.30 वाजता मोदी संबोधित करणार असून त्यांच्या भाषणाकडे देशाचं लक्ष लागलं आहे. पाच दिवस चालणाऱ्या अधिवेशनात 8 विधेयकं मांडण्यात येणार आहेत.