मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते कालवा समितीची बैठक घेणार आहेत. आज 14व्या दिवशीही हमास आणि इस्रायल दरम्यानचं युद्ध सुरूच आहे. अखेर भारतासमोर कॅनडाची शरणागती. भारताने अल्टिमेटम दिल्यानंतर कॅनडाने त्यांच्या 41 राजदूतांना मायदेशी बोलावलं. पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा. 100 एकर मैदानावर ही सभा होणार आहे. यासह राज्य , देश आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्या.
धुळे | मंत्री दादा भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे यांनी धुळ्यातील एकवीरा देवी मातेचे दर्शन घेतलं. अविष्कार भुसे यांनी सपत्नीक एकवीरा देवीचे दर्शन घेतलं. गेल्या काही दिवसांपासून अविष्कार भुसे यांच्या धुळ्यातील गाठीभेटी वाढल्या आहेत. अविष्कार भुसे यांच्या वाढदिवसानिमित्त काही दिवसांपूर्वी भावी खासदार म्हणून धुळ्यात बॅनर लागले होते. गणेश उत्सवात विविध मंडळांना अविष्कार भुसे यांनी विसर्जन मिरवणुकीत भेट दिली होती. धुळे लोकसभा निवडणुकीत अविष्कार भुसे उमेदवार असणार, अशा चर्चांना उधाण आलंय.
हिंगोली | दोन पाच वर्षीय चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. एक जण पाण्यात पडल्याने दुसरा वाचवाययाल गेला. पण तोही पाण्यात पडला आणि दोघांचाही मृत्यू झाला. स्वराज आणि शिवराज असं मृत चिमुकल्यांचे नावे आहेत. कळमनुरी तालुक्यातील शेवाळा शिवारात ही घटना घडली.
मुंबई | राज्य सरकारने चौफेर टीका झाल्यानंतर अखेर कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द केला. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. सरकारच्या या निर्णयाचा आमदार सत्यजीत तांबे यांनी स्वागत करत प्रतिक्रिया दिली आहे.
कंत्राटीकरणाबाबतचा जीआर मागे घेण्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. कंत्राटीकरण पूर्णपणे बंद करण्यासाठी घेतलेले एक पाऊल आहे. सरकारी नोकरी ही जबाबदार नोकरी म्हणून ओळखली जाते. सरकारी नोकरीमध्ये अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. म्हणूनच अवघड परीक्षा घेऊन त्यांची भरती केली जाते. कंत्राटीकरणामुळे भरतीची प्रक्रिया सोपी होत होती. तसेच नकोत्या व्यक्तींना प्रवेश मिळण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे राज्यभरातून कंत्राटीकरणाला विरोध होत होता. परंतु आता राज्य सरकारला एक पाऊल मागे घेऊन शासन निर्णय रद्द करावा लागला आणि हजारो तरुणांना अखेर न्याय मिळाला” असं सत्यजीत तांबे यांनी म्हटलं.
बारामती | आपण छत्रपतींचे मावळे, गाफील रहायचं नाही. 22 तारखेला महाराष्ट्रातल्या बांधवांना आंदोलनाची पुढील दिशा सांगणार. जे आंदोलन होईल ते शांततेच होणार. आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवणार. सगळे पक्ष, गट तट बाजूला ठेवा आणि मराठा समाजाला आरक्षणाच दान टाकून द्या”, असं आवाहन जरांगे पाटील यांनी समाज बांधवांना केलंय. तसेच आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही. आणखी सावध व्हा. एकजूटीने लढा. मी माझ्या समाजाशी प्रामाणिक. आरक्षण मिळाल्याशिवाय एकाही मराठ्याने मागे हटायचं नाही”, असंही जरांगे पाटील यांनी नमूद केलं.
बारामती | आजवर ७५ वर्षात जेवढे पक्ष झाले. त्या नेत्यांना मोठं करण्याचं काम बापजाद्यांनी, मराठ्यांनी केलं. आता आमच्या मुलाबाळांना मोठं करण्याची वेळ आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
बारामती | “मरेपर्यंत मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही. मराठा समाजासाठी एक इंचही नियत ढळू दिली नाही”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
बारामती | कायदा सोडून बोलणार नाही. मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार. मी कुणाला घाबरत नाही, माझ्याकडे मराठ्यांची ताकद आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी ठामपणे म्हटलंय.
बारामती | मराठा आरक्षणाची लढाई ही अंतिम टप्प्यात आहे. मराठा समाजाचा लढा शांततेत सुरु ठेवायचा आहे, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी समाजबांधवाना केलं आहे. बारामतीत जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांनी उपस्थिती लावली आहे.
मनोज जरांगे पाटील यांची आज बारामतीमध्ये सभा आहे. बारामतीच्या तीन हत्ती चौकात सभेचे आयोजन करण्यात आलंय. मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी मराठा समाज बांधवांची मोठी गर्दी केल्याचे दिसतंय.
–
हिंगोली जिल्ह्यात 50 पेक्षा जास्त गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावात येण्यास बंदी घातलीये. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गाव खेड्यात एंट्री नाही. जिल्ह्यात 50 पेक्षाही जास्त गावच्या वेशीवर राजकीय पुढाऱ्यांना गावात एंट्री नसल्याचे लागले बॅनर लावण्यात आलंय.
येत्या काळात संत्रा बाबत सरकारने निर्णय घ्यावा नाही तर मग आम्ही आंदोलन करू. संत्राच्या आयात शुल्काच्या मुद्यावरून आमदार बच्चू कडू आक्रमक झाल्याचे बघायला मिळतंय.
आपले आंदोलन आता कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही. पैसे कमावण्यासाठी हे आंदोलन नाही, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
राजस्थानमध्ये काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी म्हणाल्या की ज्या नेत्यांना खरोखर लोकांचे कल्याण हवे आहे ते फक्त स्वतःच्या सन्मानाकडे आणि अभिमानाकडे बघत नाहीत. 20,000 कोटी रुपयांची नवी संसद बांधून, 27,000 कोटी रुपयांचे कॉन्फरन्स हॉल बांधून, 16,000 कोटी रुपयांचे विमान स्वत:साठी विकत घेऊन, भाजपचे नेते आपला अहंकार वाढवण्यासाठी आणि आपल्या उद्योगपती मित्रांसाठी काम करत आहेत.
पंजाब सरकार राज्यपालांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. पंजाब सरकारने बोलावलेले विधानसभेचे अधिवेशन बेकायदेशीर ठरवून विधेयके मंजूर न केल्याबद्दल ३० ऑक्टोबरला पंजाब सरकार सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल करणार आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी विधानसभेत ही घोषणा केली.
जालन्यात मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार अतुल सावे यांच्या उपस्थित हा कार्यक्रम होता. यावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आरक्षण मिळेपर्यंत कार्यक्रम होऊ देणार नाही, असं आंदोलक सांगत होते.
आपचे खासदार संजय सिंह यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली आहे. अबकारी प्रकरणात ईडीने केलेल्या अटकेला संजय सिंह यांनी आव्हान दिले होते. न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या कोर्टाने गुरुवारी संजय सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता.
आमदार अपात्रतेबाबत पुढील सुनावणी 26 ऑक्टोबरला होणार आहे. 25 ऑक्टोबरपर्यंत सर्व कागदपत्रं सादर करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिलेत. सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली कागदपत्रं माझ्यासमोर सादर करावीत, असे खडे बोल विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाला सुनावले आहेत.
मिझोरम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 40 प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे प्रमुख जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एचएम अमित शहा आणि इतर प्रचार करणार आहेत.
भाजपा ने 40 प्रचारकों की सूची जारी की जो मिजोरम विधानसभा चुनाव के लिए पार्टी उम्मीदवारों के लिए प्रचार करेंगे।
पीएम नरेंद्र मोदी, बीजेपी प्रमुख जेपी नड्डा, रक्षा मंत्री राजनाथ सिंह, एचएम अमित शाह और अन्य लोग प्रचार करेंगे। pic.twitter.com/H0WzI7S4eT
— ANI_HindiNews (@AHindinews) October 20, 2023
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करून आरक्षण द्यावं अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. 50 टक्क्यांच्या आतलं आरक्षण द्या, अशी मागणी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 24 ऑक्टोबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी घेतली. सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला यावेळी कागदपत्रे सादर करण्यासाठी 25 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली. विधानसभा अध्यक्षांनी यावेळी वेगवेगळ्या कारणांनुसार काही याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्याचं ठरवलं आहे. एकूण 6 कारणांसाठी याचिका एकत्र घेण्याचा निर्णय झालाय. 34 याचिका एकत्र करण्याचा मोठा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला.
ललित पाटील आणि ड्रग्स प्रकरणात उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट राजकारण करत आहे. ललित पाटील यांच्याकडून हप्ता बंद झाला का, असा सवाल भाजपच्या देवयानी फरांदे यांनी विचारला आहे. ड्रग्ज प्रकरणात ठाकरे गटाने बेछुट आरोप करु नयेत. यापूर्वी ठाकरे गटाने मोर्चा का काढला नाही. याविषयी चौकशी का झाली नाही, असा सवाल फरांदे यांनी विचारला. संजय राऊत यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी त्यांनी केली.
कंत्राटी भरतीवरुन वातावरण तापले आहे. 2023 च्या जीआरमध्ये कंत्राटी भरतीची व्याप्ती वाढविण्यात आली. आता राज्य सरकार सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचे काम करत असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. राज्य सरकारने कंत्राटी भरतीचे खापर मविआ सरकारवर फोडल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
ड्रग्स घोटाळ्याप्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांनी न्यायालयात मोठा खुलासा केला आहे. त्यानुसार, आरोपी ललित पाटील हा ससूनमध्ये असताना अनेकदा प्रज्ञा कांबळेला भेटल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रज्ञा कांबळे बऱ्याचदा ललितला भेटायला रुग्णालयात येत असल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.
बोरीवली पोलिसांनी 17 बांग्लादेशी नागरिकांना अटक केली आहे. हे सर्व बांग्लादेशी मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरात बेकायदेशीरपणे राहत होते. त्यांना न्यायालयात हजर केले असून 25 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
ज्यात मराठ्यांचं हित नाही तो जीआर आम्हाला मान्य नाही असं जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगीतलं. सरकारने दिलेल्या जीआरमध्ये वंशावळ हा शब्द टाकण्यात आला होता तो जीआर मराठ्यांच्या हिताचा नव्हता असं जरांगे पाटील म्हणाले.
इतर लोकांना रात्रीतून आरक्षण दिलं मात्र मराठा समाजाला आरक्षण द्यायचं म्हंटलं की पुरावे, समित्या, अभ्यास लागतो असा घणाघात जरांगे पाटील यांनी केला.
मराठा समाजाने आरक्षणासाठी फार मोठा लढा दिला आहे. अनेकांचे यासाठी बलिदान गेले आहे. मराठा समाजाला पुढे येण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. लेकरांच्या वाट्याला आता आरक्षण नको असं जरांगे पाटील म्हणाले.
मला जर माझ्या समाजाशी गद्दारी करायची असती तर ती मी करू शकलो असतो मात्र ज्या समाजाला मी माझे मायबाप मानले त्यांच्याशी मी गद्दारी करू शकत नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मंत्री भेटायला आल्यानंतर त्यांनी मला कोपऱ्यात चला असं म्हंटलं होतं मात्र मी त्यांना जे बोलायचं आहे ते व्यासपीठालरच बोला असं ठणकावून सांगीतलं असं जरांगे पाटील म्हणाले.
मराठ्यांनो उद्यापासून कामाला लागा असा आदेश जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना दिला आहे. प्रत्येक मराठ्यांच्या घरी जाऊन आरक्षण कशासाठी पाहिजे आहे ते प्रत्त्येकाला समजावून सांगायचे आहे. याशिवाय कोणीही आत्महत्त्या करायची नाही आणि कुठलाही उद्रेक करायचा नाही असा आदेश मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
राजगुरू नगरमध्ये जरांगे पाटील यांची भव्य सभा आयोजीत केली आहे. या सभेला मोठी गर्दी झालेली आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारने मराठ्यांवर अन्याय केला आहे असे जरांगे पाटील म्हणाले. मराठ्यांच्या नादाला लागू नका असा इशाराही जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
आरक्षण देण्यासाठी सरकारला वेळही दिला आणि पर्यायही सुचवले असे मनोज जरांगे म्हणाले. 2004 च्या जीआरनुसार मराठा आरक्षण द्या असा पर्याय सुचवला होता असे जरांगे पाटील म्हणाले. राजगुरूनगरमध्ये जरांगे पाटलांची भव्य सभा आयोजीत केली आहे.
मराठा आरक्षणाच्या लढ्यात समाविष्ट असलेले कावळे यांनी काल मुंबईत आत्महत्त्या केली. यावर मनोज जरांगे यांनी कावळेंच्या आरक्षणाला सरकारच जबाबदार असल्याचे ते म्हणाले. हे बलिदान वाया जाऊ देणार नाही असेही ते म्हणाले
मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का? कुणबी प्रमाणपत्र मागितल्यास हरकत काय आहे? कुणबी प्रमाणपत्र का देता येत नाही ते आम्हाला सांगा, असा सवाल जरांगे पाटील यांनी केला.
“मी माझ्या समाजाच्या शब्दापुढे कधीही जात नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. आरक्षण घेतल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. लेकरांच्या वाट्याला आता कष्ट नको,” असं जरांगे पाटील म्हणाले.
“आत्महत्या झालेल्यांना फक्त सरकार जबाबदार आहे. दुसरं कुणीही नाही. कारण सरकारने वेळेत आम्हाला आरक्षण दिलं असतं तर या आत्महत्या झाल्या नसत्या”, असं जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांची पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये सभा आहे. या सभेसाठी मराठा बांधवांनी मोठी गर्दी केली आहे. 100 एकरवर ही सभा पार पडत आहे. “मराठ्यांचं नशिब खूप बळकट आहे. आपल्यावर कुणाचाही अत्याचार नाही, सरकार सोडून. मराठ्यांच्या नादी लागू नका”, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
ललित पाटील प्रकरणी रेहान अन्सारी या आरोपीला पुणे पोलिसांनी मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतलं आहे. त्याला पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. रेहान अन्सारी हा मूळचा मुंबईचा असून तो ललित पाटीलच्या टोळीसाठी मेफेड्रॉन विक्रीचे काम करायचा. साकिनाका पोलिसांनी त्याला अटक केली होती. आता पुणे पोलिसांनादेखील त्याची चौकशी करायची असल्याने त्याला पुणे पोलिसांकडे सोपविण्यात आलं आहे. तर ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांची पोलीस कोठडी संपत असल्याने दोघांना आज पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या दोघांची पोलीस कोठडी पुणे पोलिसांकडून वाढवून मागण्यासाठी आज न्यायालयाला विनंती करण्यात येणार आहे.
पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावर भरधाव वेगात गाडी चालवणं भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला चांगलंच महागात पडलं आहे. एकाच दिवशी दोन वेळेस नियमांचा भंग करत भरधाव वेगात कार चालवली आहे. पुण्यात भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामना असल्याने रोहित शर्मा मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत होता. तेव्हा भरधाव वेगात असलेली कार सीसीटीव्हीत कैद झाली आणि त्याला त्यासाठी चार हजार रुपयांचा दंड भरावा लागला.
“इथल्या आमदारांना आणि पालकमंत्र्यांना काय हफ्ता जात होता, हे पोलीस रेकॉर्डवर आलं आहे. काल शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढलं की विद्यार्थ्यांनी मोर्चाला जाऊ नका. शिक्षण अधिकाऱ्यांना हफ्ते मिळत आहेत, म्हणून परवानगी दिली नाही. हा मोर्चा म्हणजे लोकांचा उद्रेक आहे. गुजरातमध्ये सापडलेले ड्रग्स महाराष्ट्रात पाठवले जात आहेत,” असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्राचं गृहखातं काय करतंय? ललित पाटील हा ससून हॉस्पिटलमध्ये नऊ महिने कसा दाखल होता? त्याला असा कोणता गंभीर आजार झाला होता? याचं उत्तर गृहमंत्र्यांना द्यावं लागेल. रुग्णालयात दाखल असताना तो मैत्रिणींना भेटतो, हॉटेलमध्ये जातो, हे सर्व घडताना गृहखातं काय करत होतं, असा सवाल अनिल देशमुखांनी केला आहे.
“तीर्थ क्षेत्र आणि सावरकरांची भूमी आता ड्रग्स माफियांची भूमी झाली आहे. मुख्यमंत्री तिथे कंत्राटी भरतीवर पत्रकार परिषद घेत आहेत. विषय नशेच्या बाजाराचा आहे. अनेक विद्यार्थ्यांनी या विळख्यात आत्महत्या केली. मात्र गृहमंत्री यावर राजकारण करत आहेत. जो पकडला याचे पुरावे जगाला माहिती आहे. छोट्या भाभीची चौकशी, मोठ्या भाभीचे काय,” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
ललित पाटील शिवसेनेत असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाशिकचा शहर प्रमुख होता. ललित पाटील याला डिसेंबर २०२० मध्ये अटक झाली होती. त्यावेळी त्याची चौकशी का झाली नाही?, या प्रकरणाला तत्कालीन मुख्यमंत्री जबादार की गृहमंत्री जबाबदार असा सवाल करत या प्रकरणात आणखी मोठ्या गोष्टी समोर आणणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
राज्यातील युवकांमध्ये रोष करण्याचा जो काही प्रयत्न सुरू होता त्यांचा बुरखा आम्ही फाडला असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या काळातही कंत्राटी शिक्षक भरतीला मान्यता देण्यात आली. हे संपूर्ण पाप काँग्रेस राष्ट्रवादी आणि उबाठा सरकारचं आहे. कंत्राटी शिक्षक भरतीवर बोलताना यांना लाजा कशा वाटत नाहीत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कंत्राटी भरतीच्या संदर्भात पहिला निर्णय 2003 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात झाला आहे. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना 2010 साली पहिला जीआर काढला त्यानंतर आणखी एक जीआर ६ हजार पदांच्या भरतीचा काढण्यात आला. यामध्ये शिक्षक भरतीचा जीआर काढण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
इंडियन ऑइल कंपनीच्या नागापूर प्रकल्पात मोठ्या प्रमाणात इंधन गळती झाली आहे. प्लांटच्या आतील पाईप लाईनमधून इंधन गळती झाली आहे. इंधन गळतीमुळे प्रकल्पातून राज्यातील विविध भागात सुमारे 400 टँकरच्या माध्यमातून केला जाणारा इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. पाईप लाईन दुरुस्तीसाठी तीन दिवस लागणार आहे. इंधन गळती मुळे परिसरातील विहिरीतील पाणी दूषित होण्याची शक्यता नागापूरचे सरपंच राजेंद्र पवार यांनी वर्तवली आहे.
ड्रग्स प्रकरणातील महाविद्यालयातील ससून रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाई होणार… असं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. ज्यांनी ललित पाटील याला रुग्णालयातून पळून जाण्यासाठी मदत केली आहे, त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार. मराठा आरक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे, जरांगे पाटील यांनी जो इशारा दिला आहे त्याच्यावर सध्या सरकारचे काम सुरू आहे…. असं देखील हसन मुश्रीफ म्हणाले.
फडणवीस बॉम्ब फुटेल म्हणतात पण तसं होत नाही.. असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे. ‘फडणवीस बॉम्ब फुटेल म्हणतात तेव्हा काही नियोजितही असेल. भाजप नेहमी मोठं घर फोडतं..’ असं देखील रोहित पवार म्हणाले.
थोड्याच वेळात ठाकरे गटाच्या मोर्चाला सुरुवात होणार आहे. ड्रग्स प्रकरणानंतर नाशिकमध्ये ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे. ठाकरे गटाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संजय राऊत देखील मोर्चात सहभागी होणार आहेत.
आमचा संयम सुटू देऊन नका. आमच्या कुटुंबातील एक सदस्य गेला. कावळेंच्या मृत्यूसाठी सरकार जबाबदार, असा आरोपी मनोज जरांगे पाटील यांनी केला. जुन्नरमधून ते बोलत होते.
मनसे पुणे लोकसभा निवडणूक लढवणारच, पक्षाने मला संधी दिली तर मी नक्की लोकसभा निवडणूक लढवणार असे साईनाथ बाबर म्हणाले.
पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी देखील इच्छा आहे, साहेबांनी लढ म्हणल्यावर मी नक्की लढणार असं त्यांनी सांगितलं.
मनोज जरांगे पाटील यांची आज पुण्याच्या राजगुरूनगरमध्ये सभा होणार आहे. सभेपूर्वी मनोज जरांगे हे शिवनेरी किल्ल्यावर उपस्थित. १०० एकरवर आजची सभा पार पडणार .
पुण्यातील सर्किट हाऊसवर अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक सुरू झाली आहे. रोहित पवार यांनी बैठकीत कुकडीच्या पाण्याचा मुद्दा मांडला.
ड्रग्स तस्करी प्रकरणी आज नाशिकमध्ये ठाकरे गटातर्फे मोर्चा काढण्यात येणार. संजय राऊत या मोर्च्यामध्ये सहभागी होणार आहेत.
पुण्यात आज मनसेची पदाधिकारी कार्यशाळा आणि मेळावा होणार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कार्यशाळा होणार आहे. मेळाव्याला राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहे.
नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून आज मोर्चा काढण्यात येणार आहे. ड्रग्ज आणि अवैध धंद्यांविरोधात हा मोर्चा आहे. हा मोर्चा राजकीय नसून सामाजिक आहे. इकडच्या आमदार, खासदारांना किती हप्ता मिळतो, हे पोलीस सूत्रांनी सांगितले असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. एका आमदारास १६ लाखांचा हप्ता येत असल्याचा दावा त्यांनी केला.
ड्रग्स रॅकेट हा एक, दोन जणांचे काम नाही. यामागे खूप मोठे रॅकेट आहे. या प्रकरणात मंत्र्यांची नावे समोर येत आहेत. विधानसभेपर्यंत हे धागेदोरे पोहचत आहे, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. सर्वांनी शांततेत आंदोलन करा. कोणत्याही तरुणाने टोकाचा निर्णय घेऊन आपले जीवन संपवू नये, असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. शिवसेनेरी गाड्यावरुन त्यांनी हे आवाहन केले.
अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील अमरावती दौऱ्यावर जात आहे. यावेळी जिल्हाधिकारी परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. सुरक्षेचे कारण देत चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यामुळे दुकाने बंद करण्यास सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर दाखल झाल्या आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत कालवा समितीची बैठक आज होणार आहे.
राज ठाकरे यांच्या आदेशानुसार वाशी टोल नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या टोलनाक्यावरील वाहनांची मोजणी मनसे प्रवक्ते गजानन काळे यांच्या नवी मुंबई येथील सिवूड मनसेच्या कार्यालय येथून आज पासून सुरू करण्यात आलेली आहे.
मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांची गाडी अडवण्यात आली. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्याशी मुंबई पोलिसांनी बाचाबाची केल्याची माहीती. संजय शिरसाट यांनी आपण आमदार असल्याचं सांगूनही पोलिसांकडून सापत्न वागणूक. शेवटी सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) दादा भुसे यांनी मध्यस्थी केल्यावर या वादावर पडदा पडला.
पुण्यात दंगल घडवून आणण्यासाठी नीलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकर यांची चिथावणी. माजी पुणे पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांचा आणखी एक खळबळजनक दावा. पुण्यात लाल महलातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविल्यावर शहराच्या काही भागांमध्ये हिंसाचार घडवून आणण्यासाठी चिथावणी दिली होती. दूरध्वनीवरील संभाषणातून ही बाब पुढे आली होती,असा दावा बोरवणकरांनी त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात केला आहे,
ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. ललित पाटीलच्या चालकाला पोलिसांनी केली अटक. ललितचा नाशिकरोडचा कारचालक मित्र सचिन वाघ पोलिसांच्या अटकेत. बंगळुरूत सचिन वाघ ललित सोबत असल्याचा पोलिसांना संशय
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी अजित पवारांच्या उपस्थितीत कालवा समितीची बैठक होणार आहे. सकाळी 9.30 वाजता सर्किट हाऊसला ही बैठक होत आहे. बैठकीसाठी अजित पवार सर्किट हाऊसला दाखल झाले आहेत.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी भाजपकडून 40 नेत्यांची स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. या स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शाह, नितीन गडकरी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. भाजपा 40 नेत्यांच्या 40 ठिकाणी निवडणूक सभा घेणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांची याज पुणे जिल्ह्यातील राजगुरू नगरमध्ये सभा होणार आहे. 100 एकर जागेवर ही सभा होत आहे. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील जरांगे पाटील यांची ही पहिलीच सभा होमार आहे. शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेऊन जरांगे पाटील सभेच्या ठिकाणी जाणार आहेत. या सभेत जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भारत आणि कॅनडामधील संबंधात कटुता आली आहे. भारताने कॅनडाच्या पंतप्रधानांना त्यांचे राजदूत भारतातून परत बोलवण्याचे आदेश दिले. त्यासाठी अल्टिमेटमही दिला. भारताच्या या अल्टिमेटमनंतर कॅनडाने दिल्लीतून त्यांचे 41 राजदूत परत आपल्या मायदेशी बोलावले आहेत.