नवी दिल्ली | 24 ऑगस्ट 2023 : ठाण्यातील कळवा रुग्णालयातील 24 मृत्यूनंतर प्रशासनाला जाग. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची 37 पदे भरणार. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाची आज बैठक. लोकसभा निवडणुकीची आढावा बैठक घेणार. मून मिशन यशस्वी झाल्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव. मुंबईसह ठाण्यात पावसाला सुरुवात. दमदार हजेरीने चाकरमानी सुखावला. यासह राज्य, देश आणि विदेशातील घडामोडी जाणून घ्या.
संजय राऊत यांना यानात बसवून चंद्रावर पाठवायला हवे होते, असा टोला आमदार शहाजीबापू पाटील यांनी हाणला. राऊत यांना पाठवलं असतं तर किरकिर गेली असती, अशी टीका ही त्यांनी केली.
पुण्यातील कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठक सुरु आहे. पण या बैठकीत गेल्या दोन तासांपासून काहीच मार्ग निघाला नाही. त्यामुळे वादावादी झाली. पणनमंत्री अब्दुल सत्तार आणि कांदा उत्पादकांमध्ये या प्रश्नावरुन खडाजंगी झाली.
शरद पवार पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांनी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांच्याशी हितगुज साधले. पक्षातील दुफळीनंतर शरद पवार सक्रिय झाले आहेत. त्यांनी राज्य पिंजून काढायला सुरुवात केली आहे.
गेल्या दोन तासांपासून मुंबई – आग्रा महामार्ग ठप्प झाला आहे. चांदवडमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कांदा प्रश्नी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून शेतकऱ्यांनी मुंबई – आग्रा महामार्ग जाम केला आहे. नाफेडचे अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. सकाळपासून लासलगाव, पिंपळगाव, चांदवडमध्ये कांदा खरेदी बंद आहे.
पुण्यात भल्या पहाटे मोठा अपघात झाला आहे. पुणे – सोलापूर रस्त्यावर असलेल्या हडपसर उड्डाण पुलाजवळ हा अपघात झाला. मगरपट्ट्याहून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या ट्रक ड्रायव्हरला डुलकी लागण्याने हा भीषण अपघात झाला. ट्रकचा स्टिअरिंग तुटल्याने चालकाने दुभाजकाला धडक दिली. यात ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे ब्रिजचा काही भाग देखील कोसळला आहे.
सोशल मीडियावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. चांद्रयान 3 मोहिमेच्या यशाबद्दल शुभेच्छा देताना ममता बॅनर्जी यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते राकेश रोशन यांचं नाव चुकून भारतीय अंतराळवीर म्हणून घेतलं. यानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत, वाचा सविस्तर..
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑगस्ट रोजी बेंगळुरुला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. पंतप्रधान मोदी इस्रो कार्यालयाला भेट देणार असल्याचं कळतंय. ‘चांद्रयान 3’च्या यशस्वी मोहिमेनंतर मोदी इस्रोला भेट देणार आहेत. उद्या रात्री ते परदेशातून भारतात परतणार आहेत.
चांदवडमध्ये शेतकरी आक्रमक झाले असून चांदवड चौफुलीवर शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन केलं आहे. यामुळे मुंबई-आग्रा महामार्ग ठप्प झाला आहे. महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. नाफेडचे अधिकारी बाजार समितीत उपस्थित नसल्याने हे आंदोलन सुरू आहे.
मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं दीर्घ आराजाने निधन झालं आहे. त्या 81 वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्यांना अल्जायमर होता, वाचा सविस्तर..
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी इस्त्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांना पत्र लिहून चांद्रयान मोहिमेबद्दल अभिनंदन केलं आहे.
CPP Chairperson Smt. Sonia Gandhi Ji extends her heartfelt congratulations to the dedicated team at ISRO.
Here is her letter to the Chairman of ISRO, Shri S. Somanath. pic.twitter.com/olCRnO1EqY
— Congress (@INCIndia) August 24, 2023
घरात बसून पक्ष चालवणारे कुणाला संपवू शकत नाहीत , अशा शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 2024 पर्यंत ठाकरेंसोबत स्टेजवर 4 ते 5 लोकंच दिसतील असेही त्यांनी म्हटले.
हिमाचल प्रदेशातील कूल्लू येथील अनीमध्ये भूस्खल झाले आहे. यामध्ये अनेक मोठ्या इमारती कोसळल्याची माहिती समोर आली असून अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिकांकडून मदत आणि बचावकार्याला सुरूवात झाली आहे.
चांदवड बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. पिंपळगाव पाठोपाठ आता चांदवड बाजार समितीमध्ये देखील शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव बंद पाडला आहे.
नाफेडचे अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका.
रेल्वेकडून गणेशोत्सव काळात 94 अनारक्षित गाड्या चालवल्या जाणार आहेत. जवळपास दीड लाख चाकरमानी यंदा कोकणात पोहोचणार आहेत. आतापर्यंत तब्बल 1 लाख 4 हजार चाकरमान्यांना रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळाल्याची माहिती आहे. अनारक्षित 94 गाडय़ांच्या माध्यमातून दीड लाख प्रवासी कोकणात पोहोचणार आहेत. मुंबई ठाण्यातील चाकरमान्यांनी ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत आपल्या कुटुंबकबिल्यासह कोकणात जाण्यासाठी तयारीला सुरवात केली आहे.
महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. साखरेवर निर्यात बंदी घालण्याची शक्यता आहे. गहू आणि तांदळानंतर देशात साखरेच्या निर्यातीवर बंदी घालणार का? अशी चर्चा सध्या सुरु आहे. आगामी काळात केंद्र सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे. नव्या हंगामात साखर कारखान्यांकडून होणाऱ्या साखरेच्या उत्पादनावर निर्यात बंदीची शक्यता आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यापासून देशभरात ऊस गाळपाचा नवा हंगाम सुरू होणार त्याआधी हा निर्णय होण्याची शक्यता आहे.
नाशिकच्या लासलगावमध्ये कांदा लिलाव सुरू झाला आहे. 400 वाहनातून कांदा विक्रीसाठी लासलगाव बाजार समितीत दाखल झाला आहे. कांद्याला जास्तीत जास्त 2500 शे रुपये, कमीत कमी 600 रुपये तर सरासरी 2100 रुपये मिळाला बाजार भाव मिळाला. बाजारभावात अपेक्षित वाढ न झाल्याने शेतकऱ्यांचा नाराजीचा सूर आहे.
मोहोळ तालुक्यातील क्रीडा संकुलासाठी पैलवानांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयासमोर पैलवानांनी मारले जोर बैठकांचा व्यायाम अनोखं आंदोलन करत केलं आहे. मोहोळ तालुक्यासाठी क्रीडा संकुल 23 वर्षापूर्वी मंजूर झाले मात्र अद्याप कोणत्याही कामाची सुरुवात नाही. क्रीडा संकुल नसल्याने तालुक्यातील खेळाडूंची मोठी अडचण होत आहे राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे क्रीडा संकुल रखडल्याचा आरोप करण्यात येत आहे.
रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा एकदा कामाला गती आली आहे. गणपतीपूर्वी मुंबई गोवा महामार्गाची एक लेन पूर्ण करण्यासाठी कामाला जोरदार सुरुवात झाली आहे. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पाहणी दौऱ्यानंतर कामाला वेग आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची उद्या कोल्हापुरात सभा होत आहे. कोल्हापूरच्या दसरा चौकात सायंकाळी पाच वाजता होणार सभा होणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच कोल्हापुरात सभा घेणार आहेत.
अमरावती जिल्ह्यातील तबल 20 हजार नवद्योजकांनी बँकेला 94 कोटी रुपयांचा चुना लावला आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे जिल्ह्यातील अनेक बँका अर्थिक अडचणीत आल्या आहेत. ज्यांनी कर्ज घेतले आहे त्या उद्योजकांनी कर्जाची परतफेड न केल्यामुळे नवीन उद्योग करू पाहणाऱ्या तरुणांना कर्ज मिळण्यासाठी अडचणी येत आहेत.
चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर प्रग्यान रोव्हर विक्रम लँडरमधून बाहेर आला आहे. प्रग्यान रोव्हरने चंद्रावरील संशोधनाच आपलं काम सुरु केलं आहे. बुधवारी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी इस्रोच्या नियोजनाप्रमाणे विक्रम लँडरने चांद्रभूमीला स्पर्श केला. हा तमाम देशवासियांसाठी अभिमानाचा क्षण होतं. यशस्वी सॉफ्ट लँडिंगनंतर काही तासांनी प्रग्यान रोव्हर विक्रम लँडरमधून बाहेर आला.
नाशिक जिल्ह्यात कांद्याचा लिलाव पुन्हा सुरु होणार आहे. कांदा व्यापारी आणि शेतकरी संघटनांनी संप मागे घेतला आहे. यामुळे तब्बल 3 दिवसांनी बाजार पूर्ववत होणार आहे. आता नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समितींमध्ये कांदा लिलाव आजापासून सुरू होत आहे. यासाठी केंद्रीय मंत्री भरती पवार यांनी मध्यस्थी केली.
दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केला आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षापासून बोर्डाच्या परीक्षेत मोठे बदल होणार आहेत. त्यादृष्टीने अभ्यासक्रमाची आखणी तयार केली जात असून 2024 च्या सत्रात नवीन पाठ्यपुस्तकेही येणार आहेत.
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची आखणी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा बोर्डाची परीक्षा देता येईल. या दोन्ही परीक्षेतील सर्वोत्तम गुण निवडण्याची संधी देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध असणार आहे.
मुंबईतील चेंबूर, गोवंडी, मानखुर्द आणि देवनारमध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून ते शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाईपलाईन दुरुस्तीच्या कारणास्तव हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
नवी मुंबईतील तुलसी भवन या इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी आहेत. काल रात्री 10 वाजता ही दुर्घटना घडली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नजर आता विदर्भावर वळली आहे. ते आज मातोश्री निवासस्थानी विदर्भातील लोकसभा मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेणार आहे. खासकरून शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाची इत्थंभूत माहिती घेतली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.