मुंबई | 27 सप्टेंबर 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी प्रसिद्ध गणपती ‘लालबागच्या राजा’च दर्शन घेतलं. यावेळी त्यांचे पुत्र पार्थ पवार सोबत होते. लालबाग परिसरात आजही भरपूर गर्दी उसळली आहे. उद्या अंनतचतुर्दशी आहे. त्याआधी बाप्पांच दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा काल रात्री पुण्यात दाखल झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत त्यांची एक तास बैठक चालली. शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी येथील माजी मुख्याध्यापक वारे गुरुजी दोन वर्षानंतर आरोप मुक्त झाले. त्यानंतर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी वारे गुरुजी यांची भेट घेतली
पुणे : पुण्येश्वर मंदिर शेजारील अतिक्रमण आम्ही काढायला लावणारच. जर अतिक्रमण काढलं नाही तर आम्ही तिथे बाबरी मशीद करू असा इशारा हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी दिलाय. आम्ही कुठल्याही गुन्ह्याला तयार आहोत. तुरुंगात जायला तयार आहोत. आमच्या जीवनाचे बरे वाईट झाले तरी आम्हाला फरक पडत नाही असेही ते म्हणालेत.
नवापूर : तालुक्यातील मोगराणी बर्डीपाडा धरणात आर्यन गोरख वळवी ( वय 14) आणि प्रीतम गोरख वळवी (वय 12) या दोन लहान सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे दोघे भाऊ शेतालगत असलेल्या धरणात गेले. मात्र, धरणातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले.
मुंबई : महायुतीचे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत आणि येणाऱ्या काळातही तेच मुख्यमंत्री राहतील. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा आकडा २०० प्लस असू दे असे साकडे घातले अशी माहिती अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांनी दिली.
उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील विसर्जन घाटात ८ फुटांच्या पुढे असलेल्या उंचीच्या मूर्तींच्या विसर्जनाला बंदी घालण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अजिज शेख यांनी घेतला आहे. ८ ते २० पेक्षाहून अधिक फुटांच्या मुर्त्यांचे विसर्जन कल्याण खाडीमध्ये होणार आहे. उल्हासनगर शहरात यावर्षी सात कृत्रिम तलाव बनवले आहेत. यामध्ये घरगुती गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे, अशी माहिती आयुक्त अजिज शेख यांनी दिली.
शासकीय कार्यालये 5 दिवस बंद राहणार आहेत. 28.9.2023 ला अनंत चतुर्दशी, 29 ईद-ए-मिलाद, 30 ला शनिवार, 1 ला रविवार आणि 2.10.2023 रोजी महात्मा गांधी जयंती असल्याने शासकीय कार्यालये हे सलग पाच दिवस बंद असणार आहेत.
पुणे जिल्हातील शासकीय कर्मचाऱ्यांना उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आलीये. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी हे आदेश काढले आहेत. उद्याच्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आलीये.
1 ऑक्टोबर रोजी वसई विरार महापालिकेच्या 9 प्रभागात एकाच वेळी एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान करूया ही मोहीम राबविल्या जाणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या सूचनेनुसार संपूर्ण पालिका हद्दीत ही मोहीम राबविल्या जाणार असून या मोहिमेत नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याचे सांगितले जातंय.
मुलुंडमध्ये मराठी माणसाला इमारतीमध्ये घर देत नसल्याने मनसे आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. मुलुंडमध्ये महाराष्ट्रीयन माणसाला इमारतीमध्ये घर देत नाही असे सांगून गुजराती माणसांनी घर भाड्याने देण्यास नकार दिल्याचे सांगितले जातंय.
मिशन 45 असे आदेश दिले त्यात शिंदे गट आणि सर्व पक्ष धरून आदेश दिले आहेत. फक्त भाजप नव्हे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून 45 असे आदेश आहेत. जरांगे यांनी 14 तारखेला सभा ठरवली आहे हा त्यांचा प्रश्न आम्ही भाष्य करणे योग्य नाही. अब्दुल सत्तार यांच्या पीएची मारहाण योग्य नाही योग्य ती कारवाई केली पाहिजे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 आणि 3 ऑक्टोबरला तेलंगणाला भेट देऊ शकतात. पंतप्रधान सरकारी कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील आणि राज्यातील एका जाहीर सभेलाही संबोधित करतील. पंतप्रधान मोदी 2 आणि 5 ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेशात जाऊन सार्वजनिक सभा घेणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जे.पी. नड्डा राजस्थान दौऱ्यावर आहेत. जयपूर विमानतळावर त्यांचं भाजपा नेत्यांनी स्वागत केलं.
#WATCH राजस्थान: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह और भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा जयपुर पहुंचे। pic.twitter.com/PQMJSc8vb8
— ANI_HindiNews (@AHindinews) September 27, 2023
दिल्लीतील जंगपुरा येथील दागिन्यांच्या शोरूममधील 25 कोटी रुपयांच्या चोरीचे प्रकरणाचा अद्याप छडा लागलेला नाही. तोच सामयपूर बदली भागातील आणखी एका ज्वेलरी दुकानात चोरट्यांनी दरोडा टाकला. बुधवारी दुपारी तीन मुलांनी दुकानात घुसून बंदुकीच्या धाकावर दुकानातून लाखोंचे सोने लुटल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
भारतीय जनता पक्षाने बुधवारी विधानसभेत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली आहे. 25 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेल्या स्वतःच्या निवेदनात विरोधी पक्षांना जनविरोधी संबोधले होते. याबाबत मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी भाजपची मागणी आहे.
विंचूर (नाशिक) | नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आलीय. उद्यापासून उपबाजार विंचूर येथे कांदा लिलाव सुरु होणार आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर येथे उपबाजार आवार आहे. मुंबई येथील बैठकीनंतर काही निष्पन्न होणार नसल्याची बाब लक्ष आल्याने कांदा लिलावाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आलीय. संपूर्ण बाब लक्षात आणून दिल्याने कांदा लिलावासाठी व्यापाऱ्यांनी होकार दिला. 29 सप्टेंबर रोजी दिल्लीतील बैठकीत फक्त एकाच विषयावर निर्णय होणार आहे. नाफेडच्या सब एजन्सीने कांदा केंद्रावर खरेदी करायचा की बाजार समित्यांमध्ये यावरच निर्णय होणार, असं लासलगाव बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ थोरे यांनी सांगितलं.
मुंबई | गणपतीचे दर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या मंडळात दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातर्फे स्वागत करण्यात आलंय. प्रवीण दरेकर यांच्या गणपती मंडळात बाप्पाच्या दर्शनासाठी देवेंद्र फडणवीस दरवर्षी येतात.
पुणे | पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि आमदार सत्यजीत तांबे यांचे एकत्रित बॅनर लागले आहेत. दोघांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाचे एकत्रित बॅनर लावण्यात आले आहेत. पुण्यातील हडपसर भागात हे बॅनर लावण्यात आल्यानंतर जोरदार चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे बॅनरवर शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांचा देखील फोटो आहे.
कल्याण | कल्याण-डोंबिवली परिसरात मुसळधार पाऊस पडतोय. विजेच्या कडकडाटसह सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरातील अनेक भागांमध्ये रस्त्यावर साचले पाणी साचले आहे. तर कल्याण शिवाजी चौक परिसरातही पाणी साचले आहे. तर मोहन सृष्टी परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय.
अनेक जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्यापासून पुणे शहरासह जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणातील जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूरसह कोकणातील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात पण पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
लालबागच्या राजाच्या मंडपात सुरक्षा रक्षक आणि भाविकांमध्ये वाद ओढावला. महिला भाविक आणि सुरक्षा रक्षकामध्ये वाद झाला. त्यामुळे काहीवेळ गोंधळ उडाला. लालबागच्या राजाच्या दर्शनाला मोठ्या संख्येने भाविक येतात. ही गर्दी नियंत्रणात आणताना असे वाद होतात. यापूर्वी पण या वादावरुन भाविकांनी नाराजी व्यक्त केली होती.
पंकजा मुंडे यांचा साखर कारखाना अडचणीत आहे. आर्थिक अडचणींना घेरले आहे. इतर कारखान्यांना सूट आणि आपल्याच कारखान्यावर कारवाई करण्यात येत असल्याचा सूर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आळवला होता. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वच साखर कारखाने अडचणीत असल्याचे सांगितले. तसेच पंकजा मुंडे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
बुलढाण्यातील परडा गावात सहकार विद्या मंदिर शाळेच्या बसमध्ये शॉर्ट सर्किटने आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. बसमध्ये 20 ते 25 शाळकरी विद्यार्थी होते.
मनोज जरांगे आता राज्यभर संवाद यात्रा सुरु करणार आहेत. राज्यभर फिरुन मराठी समाजाला शांततेचे आवाहन करणार असे त्यांनी म्हटले आहे.
पिंपरी चिंचवड शहरावर पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरांची नजर राहणार आहे. कॅमेऱ्याद्वारे गुन्हेगारांचा शोध घेणे आणि वाहतूकींचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणं पोलिसांना सोपं जाणार आहे.
पोलिस तक्रार घेत नसल्याचं कारण देत महिलेनं शोले स्टाईल आनंदोलन केल्याचं समोर आलं आहे. नाशिकच्या चांदवडमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून या महिलेनं आंदोलन केलं आहे. आपल्या मुलीच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून योग्य चौकशी होत नसल्याचं महिलेचं म्हणणं आहे.
अनंत चतुर्दशीनिमित्त पोलिसांची रजा रद्द करण्याचा निर्णय विभागाकडून घेण्यात आला आहे. गणेश विसर्जनाच्या वेळी जास्तीत जास्त सूरक्षा पूरवली जावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
गोविंद पानसरे हत्त्या प्रकरणात एटीएसला 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. याचीका कर्त्यांचे वकील गैरहजर राहिल्याने सुनावणी पूढे ढकलण्यात आलेली आहे.
समीर भुजबळ यांना अजित पवार गटाचं मुंबई अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. नलावडे हे देखील या पदासाठी इच्छुक असल्याचे समजते, मात्र त्यांना पक्षातील लोकांचा अंतर्गत विरोध असल्याची चर्चा आहे.
कोल्हापूरात शेतकरी सहकारी संघाच्या सभासदांनी मोर्चा काढला आहे. शेतकरी संघाची इमारत प्रशासनाने ताब्यात घेतल्याने सभासदांकडून मोर्चा काढण्यात येत आहे. जिल्हाधीकाऱ्यांनी हूकुमशाही पद्धतीने हा ताबा घेतला असा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.
जयपूर- भाजपच्या कोअर ग्रुप बैठकीला अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह दोघेही उपस्थित राहणार आहेत. बैठकीत निवडणुकीची तयारी, सुरु असलेला प्रचार, पक्षातील अंतर्गत रणनिती आणि उमेदवारांच्या नावाबाबत चर्चा होईल. आजच्या बैठकीनंतर लवकरच दिल्लीत केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होऊन राजस्थान निवडणुकीबाबत पहिली यादी जाहिर होणार आहे.
नवी दिल्ली- व्हीप नाकारल्याचा ठपका ठेवत खासदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. शिंदे गटाच्या खासदारांकडून ठाकरे गटाच्या खासदारांना नोटीस बजावली आहे. खासदार विनायक राऊत, राजन विचारे, संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांनी व्हीप नाकारल्याचा ठपका ठेवत शिंदे गटाच्या खासदारांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. विशेष अधिवेशन काळामध्ये ठाकरे गटाच्या खासदारांनी व्हीप नाकारल्याचा ठपका आहे.
नवी दिल्ली- अयोध्येतील राम मंदिराचं निर्माणकार्य प्रगतीपथावर आहे. त्यातच आता रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जानेवारी महिन्यात होणार आहे. त्याची तारीखदेखील निश्चित झालेली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. राम मंदिराच्या तीन मजल्यांचं काम सुरु आहे. तळमजल्याचं काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होईल. राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास महाराज यांनी सांगितलं की, 15 ते 24 जानेवारी या कालावधीमध्ये धार्मिक विधी होतील. आम्ही पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवलेलं असून त्याचं उत्तरही मिळालं आहे. त्यानुसार 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत येतील आणि त्याच दिवशी प्राणप्रतिष्ठा होईल.
नवी दिल्ली – सुप्रीम कोर्टात राज्याच्या विधिमंडळाकडून आजच वेळापत्रक सादर केलं जाण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षांना दोन आठवड्यांत सुनावणीची रूपरेषा सादर करायला सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. काल अध्यक्षांनी वेळापत्रक ठरवल्यानंतर आजच ते कोर्टात सादर होणार आहे. येत्या 3 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
परभणीला मुसळधार पावसाचा बसला असून पूर्णा ते झिरो फाटा मार्गावरील पुलावरही पुराचं पाणी आलं आहे. आत्तापर्यंत १३ गावांचा संपर्क तुटला आहे.
अनंत चतुर्दशी निमित्त घरगुती गणपती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई सज्ज झाली आहे. गिरगाव चौपाटी आणि दादर चौपाटी, जुहू चौपाटी वर मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस प्रशासनाकडून व्यवस्था उभारण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांकडून चोख सुरक्षा व्यवस्था असून तब्बल 10 हजार पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच समुद्रकिनाऱ्यावर तटरक्षक दल, क्विक रिस्पॉन्सिंग टीमही उपस्थित असेल.
2024 मध्ये शिवसेनेचा एकही खासदार आणि आमदार नसेल, असं भाकीत संजय राऊत यांनी केलं आहे. व्हीप नाकारल्याने शिवसेनेकडून ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं.
छत्रपती संभाजीनगर येथे स्थानिकांचं आंदोलन सुरू आहे. महापालिकेतर्फे चांगले रस्ते मिळत नसल्याने स्थानिक आक्रमक झाले असून काही नागरिकांनी चिखलात लोळून आंदोलन सुरू आहे.
चांगले रस्ते नाहीत, ड्रेनेज सिस्टीम नाही, पाणी साचतं यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
कांदा प्रश्नी मुंबईतील दोन्ही बैठकीत तोडगा न निघाल्याने कांदा व्यापाऱ्यांचा सलग आठव्या दिवशी संप सुरूच आहे. लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सतरा बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद ठेवण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे थेट दिल्लीत आंदोलन करण्यात येणार आहे.
मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उडी मारणारे रणजीत आव्हाड या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकल्पग्रस्त म्हणून शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी त्यांनी केली होती.
भाजपामध्ये वादाची ठिणगी पडत आहे, येत्या काळात भाजपामध्ये मोठा स्फोट होईल. खासदारांच्या तिकीटांवरून नाना पटोले यांनी हे वक्तव्य केले.
जातीनिहाय जनगणना करावी , अशी मागणी देखील पटोले यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.
नाशिकच्या उत्तमनगर परिसरात धक्कादायक घटना. मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना स्फोट झाला आहे. या स्फोटात घराच्या काचा फुटल्या आहेत. या घटनेत तीन जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची देखील माहिती मिळत आहे.
लोकसभेसाठी भाजपकडून नव्या चेहऱ्यांची चाचपणी सुरु झाली आहे. सुमार कामगिरी असलेल्या भाजप खासदारांची तिकीट कापण्याची शक्यता. काही खासदारांसाठी वरिष्ठांकडून धोक्याची घंटा.
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. मुंबई हायकोर्टाकडून एटीएसला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांचे वकील गैरहजर राहिल्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत तिकीट जाहीर झाल्यानंतर भाजप महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विधासभा निवडणुकीसाठी मी मनाने तयार नव्हतो पण पक्षाचा आदेश मानावा लागेल. मोठ्या चेहऱ्यांना निवडणुकीत उतरवणे ही भाजपची रणनीती आहे. विधासभा तर जिंकूच पण लोकसभेला देखील सर्व जागा जिंकू, विजयवर्गीय यांनी असा विश्वास व्यक्त केला…
शरद पवारांची सभा आंबेगावात नाही, तर जुन्नरमध्ये १ ऑक्टोबरला होणार आहे. बिरसा ब्रिगेडच्या वतीने आदिवासी समाजासाठी पवारांची सभा होणार आहे. त्यामुळे दिलीप वळसे पाटलांच्या आंबेगाव मतदारसंघात सभा घेणं शरद पवारांनी तूर्तास टाळलं आहे. शरद पवार शिरूर विधानसभा मतदारसंघातही सभा घेणार आहेत. या सभेच्या तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आलेत. जुन्नरच्या सभेत आमदार अतुल बेनके यांच्यावर शरद पवार काय भाष्य करणार याकडे लक्ष आहे.
महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाच्या अध्यक्षपदी डाॅ. दिलीप जपांढरपट्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी अध्यक्ष किशाेर राजे निंबाळकर यांचा कार्यकाळ 19 सप्टेंबरला संपुष्टात आला. त्यानंतर रिक्त जागेवर राज्यपालांनी डाॅ. पांढरपट्टे यांची नियुक्ती करीत अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार साेपवण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागातर्फे याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयाेगावर पूर्णवेळ अध्यक्षांची नियुक्ती हाेईपर्यंत डाॅ. पांढरपट्टे अतिरिक्त कार्यभार पाहणार आहेत.
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या ढोल पथकांवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. मिरवणुकीत ढोल ताशा पथकांवर पोलिसांनी मर्यादा घातली आहे. एका पथकात केवळ 50 ढोल आणि 15 ताशांना परवानगी देण्यात आली आहे. पुण्यातील गणेश मंडळांना बेलबाग चौक, सेवासदन चौक आणि टिळक चौकात वादनासाठी प्रत्येकी 10 मिनिटांची वेळ देण्यात आली आहे. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत आश्वासन दिल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे.
अजित पवार हे लवकरात लवकर मुख्यमंत्री व्हावेत यासाठी लालबागच्या राजाच्या चरणी नवस. अजित पवार यांचे चाहते रंजीत नरूटे यांनी केला नवस. बाप्पाच्या चरणी चिठ्ठी लिहून ठेवली. “हे लालबाग राजा आमचे अजीत दादा लवकरात लवकर मुख्यमंत्री होऊ देत” असा चिठ्ठीत आशय लिहिला.
पुण्यातील विसर्जन मार्गाची माहिती देण्यासाठी “पीएमसी केअर ॲप”. नागरिकांना जवळचे विसर्जन घाट, मूर्ती संकलन, दान केंद्र, गणेश मंडळ पार्किंगची जागा, बंद रस्ते पर्यायी मार्गानंविषयी माहिती यावर मिळू शकणार. गणेशोत्सवा विषयी ब्लॉग्स तसेच इतर लेख देखील या ॲपवर उपलब्ध. “पीएमसी केअर ॲप” हे प्ले स्टोर वर उपलब्ध.
28 तारखेला अनंत चतुर्दशी व 29 रोजी ईद ए मिलाद असल्याने गणपती विसर्जन व ईद ए मिलाद मिरवणुकीमुळे वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. 28 ते 29 तारखेपर्यंत मिरवणुक संपेपर्यंत जड अवजड वाहनांना मुंबई शहर, ठाणे शहर व नवी मुंबई परिसरात माल वाहतुक करण्यास, शहरातील मार्गावरून मार्गस्थ होण्यास प्रवेश करण्यास आणि वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मुंबईतील प्रसिद्ध गणपती ‘लालबागच्या राजा’च दर्शन घेतलं. यावेळी त्यांचे पुत्र पार्थ पवार त्यांच्यासोबत होते.