मुंबई | 30 नोव्हेंबर 2023 : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा आज शेवटचा टप्पा होत आहे. तेलंगणामधील ११९ जागांवर मतदान सुरु झाले आहे. पाच राज्यांचे निकाल ३ डिसेंबर रोजी येणार आहे. पाचही राज्यात कोण सरकार बनवणार? जनतेचा कल दाखवणारा एक्झीट पोल गुरुवारी संध्याकाळी सहा वाजेनंतर येणार आहे. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचं दीक्षांत संचलन आज होत आहे. त्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दाखल झाल्या. एनडीए कॅडेडटने चित्तथराक प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात आरोपी हरीश पंत, अरविंद लोहारे, इब्राहिम शेख यांचे बँक डिटेल्स पोलिसांना मिळाले आहे. शिवसेना कोणाची यावर आजही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. राजकीय, प्रत्येक जिल्ह्यातील बातम्यांसह मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आमचा हा ब्लॉग दिवसभर फॉलो करा…
धुळे | धुळे शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. गेल्या अर्धा तासापासून शहरात सह परिसरात पाऊस सुरु आहे.
वाराणसी न्यायालयाने एएसआयला ज्ञानवापी सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल सादर करण्यासाठी आणखी 10 दिवसांची मुदत दिली आहे. हिंदू पक्षाचे वकील मदन मोहन यादव यांनी ही माहिती दिली आहे.
उत्तरकाशी बोगद्यातून सुटका करण्यात आलेल्या 41 कामगारांबाबत एम्स ऋषिकेश रुग्णालय प्रशासनाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. नरेंद्र कुमार यांनी सांगितले की, भरती झालेले सर्व कामगार 7 वेगवेगळ्या राज्यांतील आहेत. यामध्ये यूपी, बिहार आणि झारखंडमधील लोक जास्त आहेत. सर्वांची वैद्यकीय तपासणी झाली आहे. झारखंड आणि ओडिशातील कामगारांना आज सुट्टी देण्यात येणार आहे. तर उर्वरित भागांसाठी राज्यांच्या नोडल अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे.
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. एन बिरेन सिंह यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. मणिपूरच्या भल्यासाठी सहकार्याने काम करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेबद्दल आणि शांतता चर्चेद्वारे UNLF ला मुख्य प्रवाहात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत जोशीमठसाठी 1658.17 कोटी रुपयांच्या रिकव्हरी आणि पुनर्रचना (R&R) योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.
कोल्हापूर | राज्यात काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला. या अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. त्यात आता कोल्हापुरात वरुणराजाने सलग दुसऱ्या दिवशी हजेरी लावली आहे. कोल्हापूर शहरात गेल्या 30 मिनिटांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. अचानक आलेल्या पावसामुळे कोल्हापूरकरांची एकच त्रेधातिरपीट पाहायला मिळाली.
मुंबई | दत्ता दळवी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा अर्धा तास तहकुब करण्यात आली आहे. सरकारी वकिलांनी युक्तिवाद करण्यासाठी वेळ मागितला आहे. दरम्यान दत्ता दळवी यांच्या वकिलांनी केला जोरदार युक्तिवाद केला आहे. दळवी हे जबाबदार नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक आहेत. दोन पक्षात असलेल्या अंतर्गत वादातून केलं गेलेलं वक्तव्य आहे. दळवी हे कायमस्वरूपी मुंबईचे रहिवासी आहेत. न्यायालयाने अटी शर्थीवरवर जामीन द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पोलिसांना सर्व प्रकारे सहकार्य करू आणि बंधनं पाळू, अशीही ग्वाही दिली आहे.
गोंदिया विमानतळावरून इंडिगो कंपनीचे विमान रोज धावणार आहे. उद्या 1 डिसेंबरपासून विमान सेवेला सुरुवात होणार आहे. प्रवासी वाहतूक सेवेची पूर्ण तयारी झाली आहे. मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील नागरिकांना सुद्धा फायदा होणार आहे.
कोकणात उद्योग आले पाहिजेत त्याची सुरुवात झालेली आहे. कोकणासाठी जेवढं काही करता येईल तेवढे करणार, कोकणातल्या मुलांना रोजगारासाठी इतरत्र जाऊ लागता कामा नये म्हणून आपण छोटे छोटे प्रकल्प आणल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.
नारायण राणे यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली. आघाडीने पुण्यात आंदोलन केलं. ज्या ठिकाणी नारायण राणे दिसतील त्या ठिकाणी काळ फासण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या पुणे शहर कार्यकारी अध्यक्षांनी दिला. राणे यांची कार फोडण्याचा इशारा पण त्यांनी दिला. वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी पण केली.
हे सरकार गतिमान आहे. सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आहे. मुख्यमंत्री सर्वसामान्यांसारखा असला तर कामं पटकन होऊन जातात. मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यांच्या हस्ते आज रत्नागिरी शासकीय मेडिकल कॉलेजचा शुभारंभ झाला आहे. रत्नागिरी मेडिकल कॉलेज हे दिलेला शब्द पूर्ण करणे आणि तो वेळ पूर्ण करणे याचे उदाहरण असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री विदाऊट अपाईटर्मेंट भेटू शकतो तर इतर अधिकारी सुद्धा जनतेला भेटलं पाहिजे. औषध खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री सहायता योजनेमधून फक्त अडीच कोटी खर्च झाले होते आता आपण 160 कोटी रुपये मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यात आज तोहीद शेख या रिक्षा चालकाने इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या केली. फायनान्स कंपनीच्या तगाद्यामुळे आत्महत्या केल्याचा आरोप रिक्षा संघटनेने केला आहे. हफ्ते वेळेवर न भरल्याने शेख याने सावकाराकडून उसनवारी केली होता. आर्थिक परिस्थितीला कंटाळून त्याने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडिओ पण शेअर केला.
सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे ज्वारी, सोयाबीन, तुरीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंचनाम्याचे दिले आदेश दिले आहेत. 24 तास लोटले तरी शासकीय कर्मचारी अध्यापही बांधावर उपस्थित नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांचे पंचनामेचे आदेश केवळ कागदावरच आहेत का असा प्रश्न आता विचारला जात आहे. पिकांचे मोठे नुकसान होऊनही अद्याप तलाठी, सर्कल अधिकारी बांधावर आलेच नाहीत. लवकरात लवकर पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सरसकट दुष्काळ जाहीर करण्यात यावा, शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी देण्यात येऊन सातबारा कोरा करावा, कापसाला बारा हजार रुपयापर्यंत भाव द्यावा, पिक विम्याची रक्कम त्वरित मिळावी यासह विविध मागण्यांसाठी जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा आयोजीत करण्यात आला आहे. या मोर्चासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उपस्थिती आहे.
हिंगोलीचे 10 शेतकरी मातोश्रीवर पोहोचले. हे सर्व शेतकरी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. सध्याच्या परिस्थितीची कैफियत मांडणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर थेट मंत्रालयात जाऊन आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार आहे. सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर या अरबी समुद्रात उडी घेण्याचा शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे.
बीड : मनोज जरांगे पाटील पुढच्या आठवड्यात तीन दिवसांच्या लातूर जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत. जळकोट,उदगीर,निलंगा आणि औसा इथं त्यांच्या आरक्षण सभांचे आयोजन करण्यात आले आहे. 9, 10 आणि 11 डिसेंबर रोजी त्यांचा दौरा असणार आहे. लातूरसह जिल्ह्यातल्या ज्या भागात अगोदर सभा झाल्या आहेत तो भाग वगळून मनोज जरांगे यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई : 70 वर्षाच्या माजी महापौर दत्ता दळवी यांना आतमध्ये टाकले आहे. सरकारचा दबाव आणि सरकारची चीटिंग त्यामुळे त्यांना काल जामीन होऊ शकला नाही, असा आरोप आमदार सुनील राऊत यांनी केला. आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे आणि होणारा पुढचा मुख्यमंत्री शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा असेल. आम्ही लढणारे शिवसैनिक आहोत, असेही ते म्हणाले.
नवी दिल्ली : चार डिसेंबरपासून संसदेचे अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशन दरम्यान राज्यसभेसाठी नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. एकाच वेळी दोन सदस्यांना जागेवरून उठून प्रश्न विचारता येणार नाही. तसेच, जय हिंद. वंदे मातरम या शब्दांवर बंदी घालण्यात आली आहे.
निफाड तालुक्यातील थेटाळे येथे मराठा समाज आक्रमक झाल्याचे बघायला मिळतंय. भुजबळ संपर्क कार्यालयाचे सचिव बी आर लोंढे यांची गाडी अडवली. गाडीला मराठा आंदोलकांनी घातला होता घेराव. मराठा समाजाच्या जोरदार निदर्शनामुळे छगन भुजबळांनी सोडला दौरा अर्धवट
गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, रक्षा खडसे हे मलकापूरमध्ये दाखल झाले आहेत. मलकापूरमध्ये जनसंवाद यात्रेला सुरूवात झाली आहे.
केंद्र सरकारच्या योजनांची नागरिकांना माहिती व्हावी, नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा यासाठी १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे महाराष्ट्रात आयोजन करण्यात आले आहे असे पियूष गोयल यांनी म्हटले.
आम्ही इथे जनतेच्या उपक्रमासाठी जमलेलो आहेत. भुजबळांच्या प्रश्नावर उत्तर द्यायला मी कटीबद्ध नाही. उपक्रम आहे अनेक उपक्रम आहेत भाजपने सगळी तयारी चालू केली असं समजायचं.
प्रकाश आंबेडकर यांनी दंगली होतील असं म्हटलं असेल तर त्यांची पोलिसांनी चौकशी करुन माहीती घ्यावी की त्यांना माहीती कुठून मिळाली असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे. नेत्यांनी अशी विधाने करून दंगली होतील अशी विधाने करु नयेत असेही ते म्हणाले.
अवकाळी वारा, पाऊस आणि गारपिटीने नुकसान शेतांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे असे पत्र भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. गहू, हरभरा सह जिल्ह्यात फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नाशिक लासलगावात मंत्री छगन भुजबळ यांच्या गाड्यांचा ताफा ग्रामस्थांनी अडविला आहे. रस्त्याचे आणि पाण्याची काम होत नसल्याने ग्रामस्थांनी भुजबळांना निवेदन दिले आहे.
माजी महापौर दळवी यांच्या गाडीवर दगड फेक करणारी माणसे ही खासदार संजय राऊत यांचीच असावीत असा आपला संशय असल्याचे भाजपा नेते नितेश राणे यांनी म्हटले आहे.
छगन भुजबळांविरोधात मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. आज भुजबळ यांचा ताफा येवल्याकडे रवाना झालेला असताना वाटेत मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोमुत्र शिंपडून त्यांचा निषेध केला.
छगन भुजबळ यांचा येवला येथे पाहणी दौरा आहे. मात्र या दौऱ्याला मराठा आंदोलकांनी तिव्र विरोध केला आहे. सोमठानदेश गावातील लोकं रस्त्यावर उतरले आहेत. भुजबळ गो बॅक अशा घोषणाही देण्यात येत आहेत.
अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत एक सुचक वक्तव्य केले आहे. आधी लोकसभा निवडणूक आणि नंतर तुमच्या मनात जी निवडणूक आहे ती निवडणूक असे अजित पवार म्हणाले आहेत. कर्जतमध्ये कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीनंतर अजित पवारांनी हे वक्तव्य केले आहे.
अजित पवार गटाचा कर्जतमध्ये मेळावा ओयोजित करण्यात आलेला आहे. यावेळी सुनिल तटकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. काही पक्ष सत्तेत आणि विरोधात, त्यात आपणही आहोत असं ते म्हणाले. या मेळाव्याला अजित पवार गटाचे अनेक पदाधीकारी हजर आहेत.
अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीवर सुनिल तटकरे यांनी भाष्य केले आहे. अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याआधी सगळ्यांना विचारणा केली होती. यासोबतच भाजपसोबत जाण्यासाठी सर्व आमदारांनी सह्या केल्या होत्या असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते मात्र या आंदोलनामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. मुंबईतील सैफी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आज छगन भुजबळ यांची येवला येथे सभा आहे. या सभेला आणि त्यांच्या दौऱ्याला मराठा संघटनांनी विरोध केला आहे. छगन भुजबळ यांच्या विरोधात घोषणा दिल्या जात आहेत. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी छगन भुजबळ येवल्याला येत आहेत.
येवल्याच्या सोमठाणदेश गावात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. छगन भुजबळ यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी मराठा आंदोलक एकवटले आहेत. ‘भुजबळ गो बॅक’ अशी जोरदार घोषणाबाजीही केली जात आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांची वक्तव्यं अतिशय बालिशपणाची आहेत, अशी टीका सुनील तटकरे यांनी केली.
दुधाला भाव मिळावा यासाठी नगर – पाथर्डी रोडवरील मेहकरी येथे शेतकऱ्यांतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. गाईला दुग्धाभिषेक घालून आणि दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. दुधाला भाव न मिळाल्यास या गाईला मंत्रालयात घेऊन जाणार असल्याचा शेतकऱ्यांनी इशारा दिला .
दत्ता दळवी यांचे पुत्र योगेश दळवी हे संजय राऊतांच्या भेटीसाठी आले आहेत. दळवी यांना अटक आणि त्यांच्या वाहनांची तोडफोड झाल्यानंतर योगेश दळवी यांनी राऊत यांची भेट घेतली.
गाडी फोडणारे मर्द असते, तर तिथे थांबले असते . राज्यातील सरकार नामर्द, अशी टीका राऊतांनी केली.
राज्यातले सुलतान दुसऱ्या राज्यातील प्रचारात दंग . शेतकऱ्यांवर संकट असताना मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त आहेत. सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली.
छत्रपती संभाजीनगर शहरात 5 ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहेत. शहरातील वेगवेगळ्या व्यावसायिकांवर हे छापे टाकले आहेत. कर चुकवल्याप्रकर्णी छापेमारी झाल्याची माहिती समोर येत आहे. काही व्यावसायिकांच्या घरी आणि कार्यालयावर छापेमारी करण्यात आली आहे.
अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे मराठवाड्यातील 60 हजार हेक्टरांवरील पिकांचं नुकसान झालं आहे. अवकाळी पावसामुळे तब्बल 60 हजार हेक्टरवरील रब्बी पिकांचं नुकसान झालं आहे. उद्धव ठाकरे गटाकडून नुकसानग्रस्त भागात एकरी 50 हजार रुपये मदतीची मागणी करण्यात आली आहे. मराठवाड्यात पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.
मराठा समाजाच्या विरोधामुळे छगन भुजबळ यांनी येवला दौऱ्याचा मार्ग बदलला. येवल्यातील विंचूर चौफुलीजवळ निदर्शने सुरू असल्याने त्यांनी आपला मार्ग बदलला. सकल मराठा समाजाच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांना विरोध केला जात आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या ताफ्यासमोर काळे झेंडे दाखवले जाणार आहेत. भुजबळ आज येवला आणि निफाड तालुक्यातील अवकाळीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील 7 साखर कारखान्यांना साखर सहसंचालकांनी नोटीस बजावली आहे. ऊस गळपाची माहिती न दिल्याने जिल्ह्यातील सात कारखान्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. वारंवार सूचना देऊनही माहिती न दिल्याने अखेर नोटीस बजावण्यात आली. याबाबत आज साखर सहसंचालक पांडुरंग साठे यांच्याकडे सुनावणी होणार आहे. लोकमंगल माऊली, लोकमंगल बीबीदारफळ, लोकमंगल भंडारकवठे, मातोश्री लक्ष्मी, इंद्रेश्वर, सांगोला आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे या कारखान्यांना नोटीस देण्यात आली आहे.
पुणे : मराठी पाट्यांसाठी पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडवर आहे. पुणे महानगरपालिकेकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. मराठी पाट्या न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. दुकानांवर मराठीतून पाट्या लावा, असं परिपत्रक पुणे महानगरपालिकेने शहरभरात व्यापाऱ्यांसाठी दिले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत पुणे महानगरपालिका उद्यापासून तपासणी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्याचे आदेश पुणे महानगरपालिकेने सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.
छगन भुजबळ आज येवला दौऱ्यावर आहेत. येवल्यातील नुकसानग्रस्त भागाची ते पाहणी करणार आहेत. मात्र भुजबळांच्या दौऱ्याला मराठा समाजाकडून विरोध करण्यात आला आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयाकडून सलाईनच्या बाटल्यांची अखेर खरेदी करण्यात आली आहे. रुग्णालय प्रशासनाकडून 38 हजार सलाईन बाटल्यांची खरेदी केलीय. तीन महिने पुरेल इतक्या सलाईन बाटल्यांचा साठा ससून रुग्णालयाकडून करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसापासून ससून रुग्णालयात सलाईनचा तुटवडा होता. मात्र आता स्थानिक बाजारातूनच ससून रुग्णालय प्रशासनाकडून सलाईन बाटल्यांची खरेदी केली आहे.
कोल्हापुरात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. दोघांनाही पत्र लिहून त्यांनी मागणी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचीही विनंती केली आहे.
अमरावती जिल्ह्यातील 26 हजार अपात्र शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा लाभ घेतला आहे. प्रशासनाने नोटीस बजावल्यानंतर 2 हजार शेतकऱ्यांनी रक्कम परत केली. अपात्र शेतकऱ्यांनी घेतलेला लाभ परत न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. सर्वाधिक अपात्र शेतकरी नांदगाव खंडेश्वर तालुक्यात आङेत.
हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समन्स पाठवला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर लोकसभा अध्यक्षांकडे खासदारकीचा राजीनामा दिला. तेव्हापासून हेमंत पाटील यांनी संसदेच्या कुठल्याही कामकाजात उपस्थित नाहीत. त्यामुळे 4 डिसेंबर रोजी संसदेत हजर राहण्याचं समन्स राष्ट्रपतींनी पाठवला आहे.
डोंबिवलीत हाय प्रोफाइल सोसायटीत एम.डी ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना मानपाडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ५८ ग्रॅम ड्रग्स २ लाख २३ हजार रोकड जप्त करण्यात आली.
म्हाडा पुणे मंडळाच्या ५८६३ घरांसाठी ५ डिसेंबरला सोडत काढण्यात येणार आहे. या घरांसाठी ५९ हजारांहून अधिक जणांना अर्ज केले आहे. सोडतीच्या मुळ वेळापत्रकानुसार २४ नोव्हेंबरला सोडत काढण्यात येणार होती. मात्र काही प्रशासकीय कारणाने ही सोडत पुढे ढकलण्यात आली होती.
पीएमपी स्वमालकीच्या १०० सीएनजी बस घेत आहे. शिवाय ३०० नवीन बस या भाडेतत्वावर घेत आहे. या आठवड्यात निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यात ३०० ‘सीएनजी’ व १०० इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे.
पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमी अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचं दीक्षांत संचलन झाला. प्रबोधिनीतील खडतर प्रशिक्षणानंतर एनडीएची 145 वी तुकडी प्रत्यक्ष देशसेवेसाठी भारतीय संरक्षण दलात दाखल होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु दीक्षांत या सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या होत्या.