मुंबई | 31 ऑगस्ट 2023 : मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये आजपासून दोन दिवस इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत इंडिया आघाडीचा लोकसभा निवडणुकीचा अजेंडा ठरणार आहे. तसेच या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. देशभरातील 28 पक्षाचे नेते आणि आजीमाजी मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिर्डी येथे येणार आहेत. शिर्डीत ते साईबाबांचे दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा येथे आज रात्री 8.30 वाजता महायुतीची संयुक्त बैठक पार पडणार आहे. यावेळी स्नेहभोजनही होणार आहे. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घेऊ या.
Cm Eknath Shinde On Govinda Pathak | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गोविंदांसाठी खूशखबर
मुंबई | दहीहंडी गोविंदा या खेळास साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. या खेळातील गोविंदांना अन्य खेळाडूंना लागू असलेल्या नियमानुसार शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी प्रो गोविंदा लीग 2023 या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी याबाबत ही गोड बातमी दिली. राज्य सरकारच्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
दहीहंडी #गोविंदा या खेळास साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. या खेळातील गोविंदांना अन्य खेळाडूंना लागू असलेल्या नियमानुसार शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी प्रो गोविंदा लीग २०२३ या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.#progovinda pic.twitter.com/d9XfsYa0Lf
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 31, 2023
पुणे | पुणेकरांनी मेट्रोला भरभरुन प्रतिसाद दिला आहे. 1 ते 31 ऑगस्ट दरम्यान 20 लाखापेक्षा अधिक जणांनी मेट्रोने प्रवास केला आहे. पुणे मेट्रोला 1 ते 31 ऑगस्ट या महिनाभरात 3 कोटी 7 लाख 66 हजार उत्पन्न मिळाले. सरासरी एका दिवसात 65 हजार पेक्षा जास्त अधिक प्रवाशांनी केला मेट्रो सेवेचा लाभ घेतला. तसेच 15 ऑगस्टला सर्वात जास्त 1 लाख 69 हजार जणांनी मेट्रोने प्रवास केला. तर मेट्रो स्थानकांचा विचार करता पिंपरी ते सिव्हिल कोर्ट या मार्गावर सर्वात जास्त 2 लाख प्रवाशांची नोंद झाली आहे.
आमदार राजू पाटील म्हणाले की, निवडणुकांचे वारे चालू झाले आहे. म्हणून हे या सर्वांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे सुरू आहेत. एकमेकांच्या कुरघोड्या काढण्यातच एकमेकांवर आरोप करण्यात हे व्यस्त आहेत. लोकांच्या काय गरज , प्रश्न यावर कोणी काही बोलत नाही.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला सफारी बुकिंगसाठी न्यायालयाने नुकताच परवानगी दिली आहे. ताडोबा व्यवस्थापनासह रिसॉर्ट मालक, टूर ऑपरेटर, जिप्सी चालक, गाईड आणि स्थानिक व्यावसायिकांना मोठा दिलासा यामुळे मिळाला आहे. आगामी काळात दिवाळी, नाताळ आणि नवीन वर्षाच्या बुकिंगचा मार्ग झाला मोकळा झाला आहे.
राहुल गांधींचा आजचा पक्षाचा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय. उद्या राहुल गांधी काँग्रेसच्या टिळक भवनात जाणार आहेत. उद्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्यासोबत बैठक होईल.
पनवेल येथे एक धक्कादायक घटना घडलीये. पनवेल पोलिसांच्या गाडीने एकाला दिली धडक दिली आहे. या धडकेत एक इसम गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांच्या गाडीचा वेग जास्त असल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.
पुण्यातील पुण्येश्वर मंदिराचा वाद पुन्हा चिघळण्याची दाट शक्यता आहे. सकल हिंदू समाज आणि पुण्येश्वर पुननिर्माण समिती आंदोलन करणार आहे. 4 सप्टेंबर रोजी सकल हिंदू समाजाचा महापालिकेवर धडक मोर्चा आहे.
अदानी यांच्या संस्थेत सेबीचे प्रमुख काम करतात. त्याच सेबी प्रमुखांनी अदानींना क्लीन चीट दिली होती. काहीतरी चुकीचं घडतंय. गौतमी अदानी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध आहेत- राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त त्या व्यक्तीला का सुरक्षित करत आहेत. अदानी देशातील कोणतीही गोष्ट खरेदी करू शकतात. मग ते धारावी असो की मुंबई विमानतळ? अदानींच्या गुंतवणुकीतील पैसा कोणाचा? अदाणींचा की आणखी कोणाचा? असा सवालही राहुल गांधी यांनी केला.
अदानींमार्फत 1 बिलिअन डॉलरची गुंतवणुक परदेशात केली आहे. सीबीआय आणि ईडी हे अदानी यांच्या व्यवहाराची चौकशी का करत नाही? या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार की नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणाची चौकशी जेपीसीमार्फत करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केलीये.
तीन वृत्तपत्रांनी अदानींच्या गुंतवणुकीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. देशातील काही उद्योगपतींच्या कुटुंबियांशी काहींचे संबंध आहे. त्यातून पैशांची मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. हे अदानी यांचे पैसे आहेत की दुसरे कुणाचे आहेत? असा सवाल राहुल गांधी यांनी केला.
मोदींना हटवण्यासाठी विरोधकांचा हा डाव आहे. राजकारणील आपली दुकानं वाचवण्यासाठी एकत्र आले असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरेच गॅसवर असल्याची टीका रामदास आठवले यांनी केली. उद्धव ठाकरे यांना जनता मतपेटीतून उत्तर देईल, असा टोला त्यांनी लगावला. जनतेला दिलासा देण्याचे काम सरकारचे असल्याचे त्यांनी सांगितले.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोघेही स्वतंत्रपणे हॉटेल ग्रँड हयातकडे रवाना झाले आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी हे दोन्ही नेते रवाना झाले आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी अनेक नेते मुंबईत डेरेदाखल झाले आहेत. ही बैठक दोन दिवस असेल.
आगे से मत खेलो, आपके हात जल जायेंगे, असा शब्दात इंडिया आघाडीच्या बैठकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. तर दुसरीकडे भाजपने राहुल गांधी यांच्याविरोधात आंदोलन केले आहे. मुंबईत इंडिया आघाडीची आजपासून दोन दिवसीय बैठक सुरु होत आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी अनेक नेते मुंबईत डेरेदाखल झाले आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी 28 पक्षांनी हजेरी लावली आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी हे सुद्धा बैठकीसाठी दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात हॉटेल ग्रँड हयातमध्ये पत्रकार परिषद होणार आहे.
इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीचा आजपासून श्रीगणेशा झाला. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर या दरम्यान ही बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीत आघाडीचा समन्वयक कोण असेल, यावर चर्चा होऊ शकते. तसेच इतर धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.
संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. हे सत्र 18 ते 22 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. अमृत कालच्या दरम्यान संसदेच्या विशेष अधिवेशनात अर्थपूर्ण चर्चा अपेक्षित आहे.
येत्या 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे. हे अधिवेशन पाच दिवसांचे असणार आहे. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच मुंबई विमानतळावरील गेट क्रमांक आठ मध्ये आगमन झाले आहे. यावेळेस कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. इंडिया आघाडीच्या बैठकीकरता मुंबईत अखिलेश यादव दाखल झाले आहेत.
गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या वार्षिक अहवालावर प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांच्यासोबतच दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटल यांचे फोटो प्रसिध्द झाले आहेत. येत्या 15 सप्टेंबरला गोकुळ दूध संघाची 61 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे.
इंडिया संजोजक पदासाठी ऐनवेळी शरद पवारांचे नाव समोर येण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या पदासाठी सध्या खडगे यांचं नावं आघाडीवर आहे. आज संध्याकाळी मुंबईच्या ग्रँड ह्यात हॉटेलमध्ये इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे.
शरद पवार गट हरियाणा आणि राजस्थानमध्ये निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. आज इंडिया अलायन्सच्या बैठकीत या बाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. राजस्थान आणि हरियाणाच्या मित्र पक्षांसोबतही याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
आज संध्याकाळी मुंबईच्या ग्रँड ह्यात हॉटेलमध्ये इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. त्यापूर्वी राहूल गांधी यांची याच हॉटेलमध्ये पत्रकार परिषद होणार आहे. राष्ट्रीय मुद्यांवर संजय राऊत आपली भुमिका मांडणार आहेत. संजय राऊत आणि काँग्रेस नेत्यांकडून हॉटेलची पाहाणी करण्यात येत आहे.
इंडिया आघाडीची बैठक आज आणि उद्या मुंबईत पार पडणार आहे. या बैठकीला आज संध्याकाळी सुरूवात होईल. देशभरातले प्रमुख नेते या बैठकीसाठी मुंबईत दाखल झालेले आहेत. मुंबईत मोदी विरोधकांची एकजूट झालेली आहे. संपूर्ण देशाचं लक्ष या बैठकीकडे लागलेलं आहे. या बैठकीत इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण होणार आहे. तसेच आज सव्वा चार वाजता राहूल गांधी यांची ग्रँड ह्यात हॉटेलमध्ये पत्रकार परिषद होणार आहे.
छत्रपती संभाजी नगरमध्ये महावितरण विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन करण्यात येत आहे. लोडशेडिंगमुळे मनसेचं हे आंदोलन सुरू आहे. शिट्ट्या वाजवत कार्यकर्ते आंदोलन करत आहेत.
इंडिया आघाडीची आज आणि उद्या मुंबईत बैठक होणार आहे. बैठकीसाठी राहूल गांधी आणि सोनिया गांधी मुंबईकडे रवाना झाले आहेत. मेहबुबा मुफ्ती, स्टॅलिन सिताराम येचुरीसुद्ध बैठकीसाठी दाखल झाले आहेत. याशिवाय ममता बॅनर्जी लालूप्रसाद यादव हे देखील मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक पार पडणार आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे भारतात होणाऱ्या G-20 परिषदेला अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. रॉयटर वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. पंतप्रधान ली कियांग बैठकीसाठी येण्याची शक्यता आहे. येत्या 9 आणि 10 सप्टेंबर रोजी राजधानी नवी दिल्लीत ही बैठक होत आहे. या बैठकीसाठी अनेक देशांचे प्रमुख येत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी देखील बैठकीला येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे
संभाजी भिडे यांच्या पुण्यातील बैठकीला काही संघटनांचा विरोध आहे. वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड, भीम आर्मी आणि समता परिषदेचा या बैठकीला विरोध आहे. सर्व विरोधी संघटना आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहेत. तर येत्या रविवारी संभाजी भिडे यांची उरुळी देवाची येथे मार्गदर्शन बैठक होणार आहे.
पुणे विद्यापीठात कुलगुरू यांची नियुक्ती रद्द करा, या मागणीसाठी युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. त्यासोबतच कॅरी ऑनचा निर्णय लागू करावा या दोन मुख्य मागण्यांसाठी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक आहेत. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाला घेराव घातला आहे.
मुंबईत होणाऱ्या I.N.D.I.A. च्या बैठकीला तमीळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. या बैठकीसाठी थोड्याच वेळात ते ग्रँड हयात हॉटेलमध्ये पोहोचतील.
काल महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक हिंदूंना अस्वस्थ करणारी घटना मातोश्रीवर घडली. ज्या पश्चिम बंगाल मध्ये हिंदूंवर अन्याय होतात, त्याच राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरेंना राखी बांधली. उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाची व्याख्या काय ? हे त्यांनी सांगावं ज्या हिंदूंचा जीव गेला त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम त्यांनी केलं आहे, असं आमदार नितेश राणे म्हणालेत.
मुंबईच्या ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये बॉम्बशोधक आणि श्वानपथक दाखल झालं आहे. आज महत्त्वाची घडामोड असल्याने पोलिसांकडून हाॅटेल परिसर तपासायला सुरूवात झाली आहे. ग्रॅंड हयातच्या आतला आणि बाहेरचा सगळा परिसर तपासला जात आहे.
ज्यांनी सावरकरांचा अपमान केला त्यांच्या मांडीला मांडी लावून ठाकरे बसणार का, असा सवाल विचारत नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडले.
हिंमत असेल तर राहुल गांधी यांना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर न्यावे, असेही ते म्हणाले.
राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून पायघड्या घातल्या जात आहेत, अशा शब्दांत गजानन कीर्तिकर यांनी निशाणा साधला आहे.
राहुल गांधी हे दिशाहीन, नेतृत्वहीन असे व्यक्तिमत्व असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीचा टीझर जारी करण्यात आला आहे. इंडिया आघाडीची आज व उद्या मुंबईत बैठक होणार असून या बैठकीस २८ पक्षांची हजेरी आहे.
दु्ष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे हे तीव्र आंदोलन करण्यात येत आहे.
दुष्काळ जाहीर करावा, कांद्यावरचं निर्यात शुल्क रद्द करावं, अनुदान देण्यात यावं, पीक विमा देण्यात यावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
एकमेकांसोबत जे मतभेद आहेत, ते चर्चेच्या माध्यमातून संपतील, असं संजय राऊत म्हणाले. राहुल गांधी हे देशाचं निर्विवाद नेतृत्व असल्याचही त्यांनी नमूद केलं.
इंडिया आघाडीचा पराभव करणं कुणाच्या बापालाही शक्य नसल्याचे ते म्हणाले.
देशासमोर लवकरच ॲक्शन प्लान घेऊन येणार. भाजप आमच्या बैठकीने घाबरली आहे, असं संजय राऊत म्हणाले.
इंडिया आघाडीच्या बैठकीचा काही परिणाम होणार नाही. आघाडीचा हा बॉम्ब फुसका आहे अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
कितीही विरोधक एकत्र आले तर काहीच फरक पडणार नाही, अशा शब्दांत त्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवर टीकास्त्र सोडले आहे.
I.N.D.I.A आघाडीच्या तिसऱ्या बैठकीबाबत आज विरोधी पक्षनेत्यांची बैठक संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. ६.३० वाजल्यानंतर इंडिया (INDIA) आघाडी लोगोचं अनावरण करण्यात येईल. इंडिया आघाडीचे समन्वयक आणि समितीबाबात या बैठकीत चर्चा होणार आहे. आघाडीचे केंद्रीय कार्यालय दिल्लीत बांधले जाणार आहे.
भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना टर्मिनेटरशी केली आहे. टर्मिनेटरचे पोस्टर जारी करून नरेंद्र मोदी यांनी ही उपमा दिली आहे. 2024 मध्ये पुन्हा मोदीच पंतप्रधान होणार आहे. टर्मिनेटर कायम जिंकत असतो आणि 2024 ला ही मोदीच परत येतील, असा संदेश देत भाजपकडून पोस्टर जारी केले गेले आहे.
महिलांचे दागिने हिसकावणाऱ्या पाच चोरट्यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींवर यापूर्वी पुण्यासह जळगाव, अकोला, अमरावती शहरात सोनसाखळी चोरीचे ३० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
मिरा भाईंदर महापालिकेच्या मिरा रोड येथील भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयातील शवागार अखेर बंदच राहणार आहे.गेल्या सहा वर्षांपासून हे शवागार बंदच आहे. या शवागारातील शीतपेट्या दुरुस्त करणे शक्य नसल्याचा अहवाल महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे. यापूर्वी ही सुनावणी वर्षभरापूर्वी झाली होती. आता ही सुनावणी १ सप्टेंबर रोजी होणार होती. परंतु न्यायालयाच्या कामकाजात यासंदर्भातील निर्णय झाला नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर गेल्या आहेत. एक सप्टेंबरला होणारी सुनावणी आता 22 सप्टेंबरला होणार आहे. सुप्रीम कोर्टात 22 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निर्णय पुन्हा लांबणीवर गेला आहे.
सचिन तेंडुलकरच्या ऑनलाइन गेमच्या जाहीरातीवरुन माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. सचिन तेंडुलकरच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर बच्चू कडूंसह त्यांचे कार्यकर्ते आंदोलनासाठी पोहोचले आहेत. सचिन तेंडुलकरने ऑनलाइन गेमची जाहीरात करु नये, असं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे. आंदोलनासाठी आलेल्या बच्चू कडू यांना पोलिसांनी रोखलं आहे.
INDIA आघाडीच्या संयोजकपदासाठी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव पुढे येऊ शकतं, अशी सूत्रांची माहिती आहे. सध्या काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचं नाव आघाडीवर आहे. आज आणि उद्या काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीची मुंबईत महत्त्वाची बैठक होत आहे.
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचं निलंबन मागे घेण्यात आलय. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी 10 ऑगस्टला निलंबन केलं होतं. लोकसभेच्या विशेषाधिकार समिती समोर सुनावणीवेळी चौधरी यांनी माफी मागितली.
पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होत आहे. या निमित्ताने नक्षलवाद्यांचा मेगाप्लॉन उघड झाला आहे. नक्षलवाद्यांचं 27 पानांचं परिपत्रक समोर आलं आहे. या परिपत्रकातून काही राज्यांना धोका असल्याचं उघड झालं आहे. तसेच राज्यातील 5 शहरांनाही धोका असल्याचं उघड झालं आहे. या पार्श्वभूमीवर 55 नक्षलवादी संघटनांवर पोलीस नजर ठेवून आहेत.
नीती आयोगाच्या हस्तक्षेपावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक होणार आहे. नीती आयोगाच्या निषेधार्थ आज मुंबईच्या हुतात्मा चौकात राष्ट्रवादीचं आंदोलन होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आणि राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.
तूर डाळ महागली आहे. दोन महिन्यांपूर्वी अवघ्या 100 रुपये किलो मिळणारी तूर डाळ आता 170 रुपये किलो मिळत आहे. त्यामुळे गृहिणीचं बजेट कोलमडणार आहे. आधीच महागाईने हाहा:कार माजवलेला असतानाच आता तूर डाळीलाही महागाईची फोडणी बसल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
इंडिया आघाडीची महाबैठक आजपासून सुरू होत आहे. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलात ही बैठक पार पडणार आहे. आज आणि उद्या होणाऱ्या या बैठकीला 28 पक्षाचे नेते आणि काही राज्यांचे मुख्यमंत्री आज मुंबईत दाखल झाले आहेत. या बैठकीत इंडिया आघाडीचा लोगो आणि संयोजक ठरणार आहे. तसेच या बैठकीत निवडणुकीची रणनीतीही ठरणार आहे.