मुंबई | 6 ऑगस्ट 2023 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुण्यात आहेत. पुण्यात ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पुण्यात दाखल झाले असून आज ते अमित शाह यांची भेट घेणार आहेत. ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडचा आज मेळावा होत आहे. या मेळाव्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.8 एवढी नोंदवली गेली.
मुंबई | मी भाजपला सोडलं, हिंदुत्व नाही. मी काँग्रेससोबत गेलो, हिंदुत्व सोडलेलं नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
मुंबई | भाजपात राम राहिला नाही, आहेत ते सर्व आयाराम आहेत, अशा शब्दात उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. मुंबईतील रंगशारदा सभागृहात शिवसेना ठाकरे गट-संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत आहेत.
“आमच्या हृदयातला राम तुम्ही काढू शकत नाही. तुमचा आयारामांचा पक्ष झाला आहे. राम मंदिर बांधा, पण तुम्ही आयारामांचं मंदिर बांधलं आहे, त्याचं काय”, असा खोचक सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
आयारामांचं मंदिर बांधून कार्यकर्त्यांना त्यांची पूजा करावी लागतेय, यापेक्षा दुसरं दुर्देव काही असेल, असं मला वाटत नाही, असंही ठाकरे म्हणाले.
“काही लोकांना अफवा उठवायला खूप आवडतं. माध्यमांनी खात्री करुन बातम्या दिल्या पाहिजेत. जयंत पाटील यांची कुठलीही भेट अमित शाह यांच्याशी झालेली नाही. जे पतंगबाजी करतायेत, त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी स्तर ठेवावा. तसेच कन्फर्मेशन करुनच अशा बातम्या द्या”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आकीब नाचन याला 8 दिवसांची एनआयए कोठडी देण्यात आली आहे.आयसिस मॉड्युल प्रकरणी आकीब नाचन सध्या एनआयच्या अटकेत आहे.
वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज ट्वीटरवर माझे दरवाजे उघडे आहेत अशा आशयाची पोस्ट टाकली होती. त्यावरुन चर्चेला तोंड फुटले होते. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी आज फ्रेंडशिप डे म्हणून माझी ती पोस्ट होती, दरवाजे माझे सगळ्यांसाठीच उघडे आहेत, ज्यांना ज्यांना मैत्री करायची आहे त्यांच्यासाठी माझे दरवाजे उघडे आहेत. राजकीय मैत्री असू किंवा वैयक्तिक मात्र असो. भाजपने घरी चहा प्यायला आलं तर दरवाजे उघडे आहेत पण राजकीय नाही असाही टोला त्यांनी लगावला आहे.
केंद्रिय गृहमंत्री अमित शाह उद्या राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयक मांडणार आहेत. या विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर राज्यसभेत मंजूरी मिळणार का ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
रत्नागिरीतील संगमेश्वरमध्ये सामूहिक नांगरणी करण्यात आली. शेतात खिल्लारी जोड्यांच्या आधारे शेतात सामूहिक नांगरणी करण्यात आली. यामध्ये एकूण 50 जोड्यांनी सहभाग घेतला. शेतीच्या मशागतीची लगबग सध्या सुरु आहे.
औरंगाबाद : शहरात वाहन चालकाने पोलिसाला मारहाण केली. वाहन पार्क करण्याच्या वादातून ही घटना घडली. यावेळी जमाव जमला होता. शहरातील एम्स हॉस्पिटलसमोर पोलिसाला वाहन चालकाने मारहाण केली.
पुणे : आपण अजित पवार यांना गेल्या 25 वर्षापासून ओळखतो. दादा हा मैत्रीचा दिलदार माणूस आहे. पण सत्तेचाही पक्का आहे. त्यामुळे मैत्री आणि सत्ता त्यांना अबाधित राहो, असा सूचक इशारा विजय वडेट्टीवार यांनी भाजपला दिला. फ्रेंडशीप डेच्या निमित्ताने राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हे मोठं विधान केलं आहे.
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदे गट आणि अजित पवार गटाला नेमक्या किती जागा असणार यावर ही चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. आगामी 5 ते 6 महिन्यात राज्य सरकारची कामगिरी उंचावण्याच्या सूचना अमित शाह यांनी या तिन्ही नेत्यांना दिल्या आहेत असेही या सूत्रांनी सांगितले.
लातूर : लातूरच्या जिल्हा न्यायालयात ई-फायलिंग प्रणालीचा शुभारंभ मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. लातूर जिल्हा वकील मंडळाच्या पुढाकाराने जिल्ह्यात पहिल्यांदाच ही प्रणाली सुरू करण्यात आली. या प्रणालीमुळे न्यायालयीन कामकाजात पारदर्शकता येऊन गती निर्माण होणार आहे. लातूर जिल्हा वकील मंडळींनी ही प्रणाली सुरु करण्याबाबत पुढाकार घेतला होता.
चंद्रपूर : खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात दंगली घडविण्याबाबत जे विधान केले ते गंभीर आहे. संजय राऊत यांच्याकडे जी काही जास्तीची माहिती आहे ते तपासण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या घरी गेलं पाहिजे. मी मुख्यमंत्री शिंदे यांना यासाठी स्वतंत्र पत्र देईल. राऊत हे राज्यसभा सदस्य असल्याने त्यांना अशी गंभीर माहिती लपवता येत नाही अन्यथा त्यांचे सदस्यत्व रद्द होतं, त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडची माहिती घेऊन चौकशी करावी तसेच अशा दंगली होऊ नये याची काळजी घ्यावी अशी प्रतिक्रिया मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलीय.
अमित भाई गुजरातचे आहेत, पण त्याचं महाराष्ट्रावर अधिकचं प्रेम आहे. कारण ते महाराष्ट्राचे जावई आहेत. प्रत्येक जावयाचे सासुरवाडीवर विशेष प्रेम असतं हे अमित भाईंच्या रूपाने ही पहायला मिळतं. महाराष्ट्र आणि गुजरात काही वर्षांपूर्वी एक होतं. दोन्ही राज्यात सहकारातून क्रांती झालेली आहे ते अमित शाह यांनी डेरिंग केलं म्हणूनच असे अजित पवार यांनी सांगितलं. पुणे येथे मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी अजित पवार बोलत होते.
मी अमित शाह यांना भेटल्याचे काही पुरावे आहे का? या पद्धतीच्या बातम्या पाहून माझी करमणूक होत आहे. परंतु या बातम्यामुळे कार्यकर्ते संभ्रात येतात. मी नेहमीच पक्ष वाढीसाठी प्रयत्न केला, असे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
संजय राऊत यांच्याकडे असलेली जास्तीची माहिती तपासण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या घरी गेलं पाहिजे, मी मुख्यमंत्र्यांना यासाठी स्वतंत्र पत्र देईल. ते राज्यसभा सदस्य असल्याने त्यांना अशी गंभीर माहिती लपवता येत नाही अन्यथा त्यांचं सदस्यत्व रद्द होतं. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या कडची माहिती घेऊन अशा दंगली होऊ नये याची काळजी घ्यावी. सुधीर मुनगंटीवार यांची संजय राऊतांवर यांच्या महाराष्ट्रात दंगली घडविण्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
मुंबईच्या वर्सोवा समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या दोन मच्छिमारांची बोट उलटल्याने समुद्रात बुडाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री 9 वाजता 3 मच्छिमार बोटीने समुद्रात मासेमारीसाठी गेले होते, तेव्हा अचानक त्यांची बोट उलटली आणि तिन्ही मच्छीमार समुद्रात बुडाले. तिघांपैकी एक मच्छीमार पोहत बाहेर आला असून, बोटीसह दोन जण अद्यापही बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्या दोन्ही मच्छिमारांचा शोध सुरू आहे. लाईफ गार्ड, बीएमसी आणि कोस्ट गार्डचे पथक सतत शोध मोहीम राबवत आहेत. अद्याप या दोन्ही मच्छिमारांचा काहीही पत्ता लागलेला नाही आहे. उस्मानी भंडारी आणि विनोद गोयल अशी बेपत्ता झालेल्या मच्छिमारांची नावे आहेत.
देश एका बाजूला आहे अन महाराष्ट्र एका बाजूला. कारण देशातील सहकारी संस्थांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राचा वाटा हा 42 टक्के आहे. महाराष्ट्राचं हेच योगदान दाखवण्यासाठी मी इथं सर्वांना घेऊन आल्याचं शाहा म्हणाले.
9 वर्षांमध्ये मोदींनी लोकांच्या सर्व गरजा पूर्ण केल्या. 60 वर्षापासून लोकांची जी स्वप्न होतीत ती मोदींनी पूर्ण केली आहेत. सहकारमधील 42 टक्के सोसायच्या महाराष्ट्रामधील असल्याचं अमित शाह म्हणाले.
मी पहिल्यांदाचा अजित पवारांसोबत एका मंचावर आहे. मोठ्या कालावधीनंतर अजित दादा तुम्ही आता योग्य जागेवर, तुम्ही आधीच या जागेवर यायला हवं होतं. CRCS चा कार्यक्रम आजपासून पूर्णपणे डिजीटल असणार असल्याचं अमित शाह म्हणाले.
अजित पवार म्हणाले आजपर्यंत केंद्रात सहकार विभाग सुरू करण्याची हिंमत अमित शाहांनी दाखवली. बरोबर ना अजित दादा, हे बोलण्याचं अन मान्य करण्याचं ही धाडस लागतं. हे कार्य पाहूनच अजित दादांनी आमच्या सोबत येण्याचा निर्णय घेतल्याचंही शिंदे म्हणाले.
शाहांचं सहकार क्षेत्रात मोठं योगदान आहे. नवं पोर्टल सहकार क्षेत्रातील नवा आयाम, सहकार क्षेत्रात कार्यकारी निर्णय घेतला आहे. शाहांनी एखादी गोष्ट ठरवली की ते करतातच. मोदी आणि शाहांमुळे देशात मोठे बदल होत आहेत. कारखान्यांचा 10 हजार कोटींचा कर माफ करण्याचा शाहांनी निर्णय घेतला असून त्यांचं नेतृत्त्व सहकार विभागासाठी वरदान असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
अजित दादा म्हणाले ते महाराष्ट्राचे जावई आहेत. हे खरंय पण त्यांचा जन्म मुंबईतला आहे. त्यांची कर्मभूमी गुजरात आणि दिल्ली असली तरी त्यांची जन्मभूमी ही महाराष्ट्र आहे. शिवाय काहीकाळ त्यांनी महाराष्ट्रात काम ही केलंय. त्यामुळं अमित भाईंना महाराष्ट्राची जाण आहे. म्हणूनच ते महाराष्ट्राचा विचार अधिक करत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
सरकार विभागाच्या ‘डिजिटल पोर्टल’ च्या शुभारंग सोहळ्याला सुरूवात झाली आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाहांसह,केंद्रीय सहकार राज्यमंत्री एल.वर्मा, महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्रचे सहकार मंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित आहेत.
अमृत भारत रेल्वे स्थानकाच्या कार्यक्रम प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधीत करत आहेत. भारतात होत असलेला विकास पाहता संपूर्ण देशाचे लक्ष भारताकडे असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. याचे श्रेय देताना ते म्हणाले, देशातील नागरिकांनी तीस वर्षानंतर संपूर्ण बहूमताने सरकार स्थापित केले त्यामुळे सरकारने फटाफट निर्णय घेतले. भातीय रेल्वे हे विकासाचे प्रतिक बनले असल्याचे पंतप्रधान म्हणाले. गेल्या काही वर्षात रेल्वेने केलेल्या विकासाची आकडेवारी थक्क करणारी तर आहेच शिवाय हैराण करणारीसुद्धा असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत मध्यप्रदेशच्या 34 रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तर महाराष्ट्रात 44 रेल्वे स्थानकांसाठी एक हजार पाचशे कोटी रूपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. यासाठी पंतप्रधानांनी रेल्वे मंत्रालयाचे आभार व्यक्त केले.
अमृत भारत रेल्वे स्थानक अंतर्गत देशाच्या विकासाता नवा अध्याय लिहीला जात आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यामध्ये साडे चार हजार कोटी रूपयांचा निधी वापरून पंचावन्न रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे. राजस्थान मधिल पंचावन्न रेल्वे स्टेशन अमृत भारत रेल्वे स्टेशन बनणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
अमृत रेल्वे स्टेशनच्या कार्यक्रमाला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधीत करित आहेत. तब्बल 25 हजार रूपये खर्च करून देशातल्या 508 रेल्वे स्थानकाचे रूपडे पालटणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्राच्या 44 स्थानकांचा समावेश असणार आहे. तसेच भारतातले तब्बल 1300 रेल्वे स्टेशन हे अमृत भारत रेल्वे स्टेशन होणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
देशाच्या रेल्वे स्थानकाचे रूपडं पालटणारे अमृत रेल्वे स्थानकाच्या कार्यक्रमाला सुरूवात झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आभासी पद्धतीने या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत 508 रेल्वे स्थानकाचे पुनर्विकास करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक लहान लहान रेल्वे स्थानकांचा समावेश असणार आहे.
पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या लेनवर वाहतूक संथ गतीने सुरु आहे. रविवारमुळे वाहनांची संख्या वाढल्याने पुण्याकडे येणाऱ्या लेनवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सर्व बैठका रद्द झाल्या आहेत. सहकार विभागाचा कार्यक्रम झाल्यानंतर अमित शाह सरळ दिल्लीला जाणार आहे.
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचे फोन करणाऱ्या व्यक्तीला जुहू पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला रविवारी सकाळी धमकीचा फोन आला होता. मुंबईत ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट होणार असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले होते. अशोक मुखिया असे आरोपीचे नाव असून तो बिहारचा रहिवासी आहे.
मणिपूर, हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट आहे. या कटात सहभागी असणाऱ्या प्रवृत्तींना सरकारचे पाठबळ असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्यासंदर्भातील दिलेल्या निकालास ७२ तास उलटले आहे. त्यानंतरही त्यांना खासदारकी दिली नाही. कोर्टाचा निकाल मानायला केंद्र सरकार तयार नाही, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
मुंबई लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवणार असल्याचा धमकीची फोन आला आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला धमकीचा फोन आल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
बारवी धरण ओव्हरफ्लो झाल्याने ठाणे जिल्ह्याची जलचिंता मिटली आहे. मंत्री उदय सामंत आणि किसन कथोरे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात येणार आहे.
गोंदिया येथून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अपघात झालेल्या गाडीतून अवैधरीत्या दारू जप्त करण्यात आली आहे. तब्बल ४४ हजार रुपयाची दारू जप्त करण्यात आली आहे. मध्यप्रदेश मधून छत्तीसगड कडे जाताना अपघात झाला आहे. अपघातात चालक सवार गंभीर रित्या जखमी झाला आहे. चालकाविरोधात आमगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.
अमृत भारत स्टेशन अंतर्गत औरंगाबाद रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक निधी हा औरंगाबाद रेल्वे स्थानकाला देण्यात आला आहे. तब्बल 359 कोटी रुपयांचा निधी औरंगाबाद साठी देण्यात आला आहे. औरंगाबाद हे आंतराष्ट्रीय पर्यटन स्थळ आहे, वेरूळ आणि अजिंठा लेण्यांमुळे औरंगाबाद शहरात परदेशी पर्यटक सातत्याने येत असतात. त्यामुळे औरंगाबाद रेल्वे स्थानक आंतराष्ट्रीय दर्जाचे बनवण्यात येणार आहे, लिफ्ट, स्टेअर लिफ्ट, प्लॅटफॉर्म, पार्किंग, वेटिंग रूम, हॉलटिंग साठी व्यवस्था आंतराष्ट्रीय दर्जाच्या असणार आहेत.
देवेंद्र फडणवीस थोड्या वेळात शासकीय विश्रामगृहातून जे डब्लू मेरीयट हॉटेलकडे रवाना होणार आहेत. देवेंद्र फडणवीस मुक्कामी असलेल्या शासकीय विश्रामगृहातील गाड्यांची डॉग स्कॉडकडून तपासणी करण्यात आली आहे. लिओ श्वानानं देवेंद्र फडणवीसांच्या गाड्यांची तपासणी केली आहे.
अमित शहा यांच्या हस्ते सहकार विभागाच्या डिजिटल पोर्टलच उद्घाटन होणार आहे. त्यासाठी सहकार क्षेत्रातील अनेक लोकं प्राध्यापक रामकृष्ण मोरे सभागृहाच्या बाहेर जमायला सुरुवात झाली आहे. विविध सहकारी बँक, संस्था, पतसंस्था आशा विभागातून अनेक नागरिक या कार्यक्रमासाठी दाखल झाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. अमित शहा ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत, त्या हॉटेल परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. डॉग स्कॉड पथक, बॉम्ब शोधक पथक हॉटेल परिसरात दाखल आहे. त्याचबरोबर संपूर्ण हॉटेलची तपासणी वारंवार करण्यात येत आहे.
चंद्रपूर : वरोरा शहरात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला पैशाचे आमीष दाखवून दोन दलालांनी देह व्यापार करण्यास पाडले भाग होते. दलालांमध्ये १ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. पोलिसांनी दोन्ही दलालांसह ९ ग्राहकांना अटक केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या नेतृत्वात एक एसआयटी स्थापन केली आहे.
पुण्यात दहशतवाद्यांनी वापरलेली गाडी एटीएसने ताब्यात घेतली आहे. ताब्यात घेतलेली गाडी पाहणी करण्यासाठी वापरली होती. त्याचबरोबर एक चारचाकी सुध्दा सापडली आहे. त्या गाडीत २ पिस्टल आणि ५ जिवंत काडतुसे आढळून आली होती. १८ जुलै रोजी मोहम्मद इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली.
राज्यात डोळ्यांची साथ आली आहे. त्यामुळे रोज नेत्र संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. 3 ऑगस्टपर्यंत राज्यात 1 लाख 87 हजार रुग्ण आढळून आले आहेत. एकट्या बुलढाण्यातच नेत्र संसर्गाचे 30 हजार 695 रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर जळगाव, अमरावती आणि पुण्यातही नेत्र संसर्गाचे रुग्ण अधिक असल्याचं सांगितलं जात आहे.
एनआयकडून मुंबईसह भिवंडीमध्ये छापेमारी करण्यात आली आहे. आयसीस मॉ़डेल प्रकरणी सहावी अटक करण्यात आली आहे. बोरिवलीतून आकीब नाचण याला अटक करण्यात आली आहे.
नवी मुंबईत डोळ्यांची साथ आली आहे. आतापर्यंत 30 ते 35 रुग्ण महापालिका रुग्णालयात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डोळ्यांची साथ आल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे.
वाशी आणि सानपाडा दरम्यान रेल्वे रुळाला रात्री उशिरा तडे गेले. त्यामुळे हार्बरची सेवा विस्कळीत झाली होती. मात्र, रेल्वे कर्माचाऱ्यांनी रात्री उशिराच काम सुरू करून रेल्वे सेवा पूर्ववत केली.