Maharashtra Breaking News in Marathi : बजरंग सोनवणे यांचा शरद पवार गटात प्रवेश

| Updated on: Mar 21, 2024 | 7:15 AM

Maharashtra Breaking News in Marathi : आज 20 मार्च 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News in Marathi : बजरंग सोनवणे यांचा शरद पवार गटात प्रवेश
Follow us on

मुंबई | 20 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आजपासून सुरु होत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील १०२ जागांसाठी आज अधिसूचना निघणार आहे. या ठिकाणी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. महाविकास आघडीची ईशान्य मुंबईमधील उमेदवारी जाहीर झाली नसली तरी शिवसेना ठाकरे गटाकडून संजय पाटील यांचे नाव चर्चेत असून दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्या राखी जाधव यांचे देखील नाव चर्चेत आहे. शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर जात आहे. जळगावच्या चाळीसगावात हिरापूर गावाजवळ रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झालं आहे. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 Mar 2024 08:45 PM (IST)

    पंतप्रधान मोदी गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील- रवी राणा

    पंतप्रधान मोदी गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे अमरावतीच्या जागी संदर्भात निर्णय घेतील, खासदार नवनीत राणा यांनी कोणत्या चिन्हावर आणि कोणत्या पक्षाकडून लढले पाहिजे? एनडीएचे घटक म्हणून लढले पाहिजे की भाजप चे उमेदवार म्हणून लढले पाहिजे हे वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, असं आमदाल रवी राणा यांनी म्हटलं आहे.

  • 20 Mar 2024 07:30 PM (IST)

    आजी-माजी खासदारांच्या दाताला मात्र दात दुखीचे ग्रहण

    शिरुर लोकसभा मतदारसंघात कोल्हेंविरोधात आढळरावपाटील मैदानात उतरणार असल्याचे जाहिर झालय खरंय पण शिरुरच्या रिंगणात उतरणारे आजी-माजी खासदारांच्या दाताला मात्र दात दुखीचे ग्रहण लागलंय.

    मागच्या आठ दिवसापुर्वी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या दातावर शस्त्रक्रिया झाली होती त्यातच आज कोल्हेंच्या दातावर शस्त्रक्रिया करण्यात आलीय त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही उमेदवारांच्या दाताच्या शस्त्रकिया करण्यात आल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी उमेदवारांच्या दाताला ग्रहण लागलय का अशी चर्चा सुरु झालीय

     


  • 20 Mar 2024 07:15 PM (IST)

    वेळ पडल्यावर शिवसेनेचा राजीनामा देईल- विजय शिवतारे

    वरिष्ठांचे काय ऐकायचं ही लढाई स्वाभिमानाची वेळ पडल्यावर शिवसेनेचा राजीनामा देईल पण निवडणूक लढवणारच. युतीधर्म पाळायचा म्हणजे कामाची गोष्ट करायची नाही का, असं शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.

  • 20 Mar 2024 06:42 PM (IST)

    अजित पवार गटाला दुसरा झटका, बजरंग सोनवणे शरद पवार गटात

    बीड | महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार गटाला मोठा झटका लागला आहे. बजरंग सोनवणे यांनी अजित पवार गटाला रामराम करत शरद पवार गटात पक्षप्रवेश केला आहे. सोनवणे यांनी शरद पवार यांच्या उपस्थित प्रवेश केला आहे. त्याआधी सोनवणे यांनी सदस्यत्वाच्या राजीनाम्याचं पत्र सुनील तटकरे यांना दिलं. दरम्यान काही  दिवसांपूर्वी निलेश लंके यांनी दादा गटातून काका गटात प्रवेश केला होता.

  • 20 Mar 2024 06:33 PM (IST)

    मविआतून अमरावती लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला देण्याची मागणी

    अमरावती | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या महत्वाच्या बैठकीला सुरवात झाली आहे. महाविकास आघाडीतून अमरावती लोकसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाला देण्याची मागणी करण्यात आली आहे.
    अमरावती जिल्ह्यातील संपर्कप्रमुख, जिल्हा प्रमुखांसह इतरही पदाधिकाऱ्यांची बैठक. अमरावती लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला मिळावा, यासाठी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची वाशिम येथे  भेट घेतली होती.

  • 20 Mar 2024 06:21 PM (IST)

    विजय शिवतारेंनी बोलवली पदाधिकाऱ्यांची बैठक

    पुणे | विजय शिवतारे उद्या गुरुवारी 21 मार्च रोजी आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. विजय शिवतारेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. बारामती लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात शिवतारे आपला निर्णय जाहीर करणार आहेत. पुरंदरच्या कार्यालयात उद्या 10:30 वाजता बैठक बोलावली आहे. विजय शिवतारेंनी 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळे आता शिवतारे काय निर्णय घेतात याकडे बारामतीकरांची नजर असणार आहे.

  • 20 Mar 2024 05:52 PM (IST)

    चीनमध्ये बस बोगद्याच्या भिंतीला धडकली, 14 जण ठार

    उत्तर चीनमधील एक्स्प्रेस वेवर बोगद्याच्या भिंतीला बस धडकल्याने 14 जणांचा मृत्यू झाला. शांक्सी प्रांतातील लिनफेन शहरातील होहोट-बेहाई द्रुतगती मार्गावर 51 प्रवाशांना घेऊन जाणारी बस बोगद्याच्या भिंतीला धडकल्याने हा अपघात झाला.

  • 20 Mar 2024 05:35 PM (IST)

    हाजीपूरमधून मी एनडीएचा उमेदवार असेल: चिराग पासवान

    हाजीपूर लोकसभा मतदारसंघातून मी एनडीएचा उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं चिराग पासवान यांनी म्हटलं आहे.

  • 20 Mar 2024 05:25 PM (IST)

    NDA बिहारमधील सर्व 40 जागा जिंकेल: उपेंद्र कुशवाह

    लोकसभा निवडणुकीवर आरएलजेडी प्रमुख उपेंद्र कुशवाह म्हणाले की, कोणतीही नाराजी नाही, चर्चा सुरू आहे. 40 पैकी 40 जागा जिंकण्याचे आमचे ध्येय असून बिहारच्या जनतेवरही आमचा विश्वास आहे. नितीशजींच्या विरोधात कोणतीही तक्रार नव्हती, ते चुकीच्या ठिकाणी गेले होते तेव्हा आम्ही म्हणत होतो की नितीशजी परत यावे. लोकसभा निवडणुकीचे निकाल मोदीजींच्या बाजूने लागतील हे भारत आघाडीला माहीत आहे.

  • 20 Mar 2024 05:09 PM (IST)

    खासदार दानिश अली यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

    लोकसभा निवडणुकीपूर्वी नेत्यांची एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याची प्रक्रिया सुरू असते. खासदार दानिश अली यांनी आज काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. यावेळी ते काँग्रेसच्या तिकीटावर अमरोहा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. याआधी त्यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती.

  • 20 Mar 2024 04:54 PM (IST)

    हिमालयात निवडणूक लढायला सांगितली तरी मी लढणार – बजरंग सोनवणे

    बीड : सत्ता असूनही आमच्या कार्यकर्त्याना काही उपयोग होत नव्हता म्हणून आम्ही शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. अजित पवार माझे दैवत आहे. मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही. पण, शरद पवारांनी मला हिमालयात निवडणूक लढायला सांगितली तरी मी लढणार आहे. पंकजा मुंडे यांनी विधानसभा मतदारसंघात काही काम केली नाहीत म्हणून त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे माझ्यापुढे काही आव्हान नसणार आहे. ज्योती मेटे यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल मला माहिती नाही. त्या जरी उमेदवार असल्या तरी आम्ही त्यांचे काम करू असे बजरंग सोनवणे यांनी स्पष्ट केले.

  • 20 Mar 2024 04:46 PM (IST)

    कराळे गुरुजींनी घेतली राजकीय मैदानात एन्ट्री

    वर्धा : वर्ध्यात स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसमध्ये ग्रामीण शैलीत शिकवण्यासाठी प्रसिद्ध असलेले नितेश कराळे गुरुजी यांनी राजकीय मैदानात एन्ट्री घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून अर्ज मागविले असताना कराळे यांनी निवडणूक लढण्याची इच्छा दर्शविली. पण, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार असल्याने कराळे गुरूजींनी शरद पवार यांची भेट घेत आपली उमेदवारी कशी सक्षम आहे ही बाब स्पष्ट केली.

  • 20 Mar 2024 04:30 PM (IST)

    आमची गुंडगिरी दिल्लीपर्यंत गेलीय, संजय राऊत यांचा टोला

    मुंबई : ज्यांना आमदारकी, खासदारकी मिळवल्या, त्यांनी विकासाची बोंब केली. शिवसेनेच्या नावावर प्रॉपर्टी वाढविली. त्यांनी गद्दारी केली, गटारात वाहून गेली. पोलिसांची मदत घेतात, खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देतात. तुम्ही गुंड तर आम्ही महागुंड आहोत. आमची ही गुंडगिरी दिल्लीपर्यंत गेलीय. याच गुंडगिरीने तुम्हाला आमदार, खासदार केले. प्रॉपर्टी वाढवण्यासाठी आम्ही कधी गुंडगिरी केली नाही, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला.

  • 20 Mar 2024 04:14 PM (IST)

    घड्याळ चिन्ह वापरुनच निवडणुकीला सामोरे जाणार – सुनील तटकरे

    मुंबई : जितेंद्र आव्हाड बाष्कळपणे बोलत आहेत. त्यांची पिटिशन आम्हाला घड्याळ मिळु नये यासाठी होती. घड्याळ चिन्ह रद्द करावे यासाठी अट्टहास होता. पण, कोर्टाने त्यांना चपराक दिली आहे. सुप्रीम कोर्टाने आम्हाला जाहिरात देण्यास सांगितले कारण आमचा पराभव होऊ शकतो असा युक्तिवाद आम्ही केला आहे. आम्हाला मिळालेले चिन्ह थांबावे असे वाटते. आम्ही जाहिरात देणार आहोत. घड्याळ हे चिन्ह वापरुन निवडणुकीला सामोरे जाणार आहोत असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षस सुनील तटकरे यांनी सांगितले.

  • 20 Mar 2024 04:00 PM (IST)

    भूषण गगराणी यांना बीएमसीचे आयुक्त पदी

    भूषण गगराणी यांना बीएमसीचे आयुक्त म्हणून, सौरभ राव यांना ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून, कैलास शिंदे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  • 20 Mar 2024 03:50 PM (IST)

    बजरंग सोनवणे शरद पवार गटात

    आज माझ्या कुलदैवतासमोर माझी राजकीय भूमिका स्पष्ट करत आहे. अजित पवारांसोबत 27 वर्ष तर धनंजय मुंडे यांच्यासोबत मी 15 ते 16 वर्ष काम केलं आहे. मी आज अजित पवार गटाचा राजीनामा दिला असून शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बजरंग सोनवणे यांनी जाहीर केले. लोकसभा लढवण्यासंदर्भात अद्याप निर्णय घेतला नाही. मात्र शरद पवार सांगतील तो आदेश मी पाळणार, असे ते म्हणाले.

  • 20 Mar 2024 03:40 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांचा मिरज दौरा

    सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा मिरज दौरा निश्चित झाला आहे. या मिरज दौऱ्याचे निमित्त जरी शिवसेनेचा जनसंवाद मेळावा असला तरी सांगली लोकसभेच्या प्रचाराचा अप्रत्यक्ष शुभारंभ या निमित्ताने होणार असल्याची चर्चा आहे. यासाठी मिरज पंढरपूर रोडवरील कोळेकर मठाच्या जागेवर मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे.

  • 20 Mar 2024 03:30 PM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अकोल्याच्या दौऱ्यावर

    अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार रवी राणांनी पांढरा दुपट्टा गळ्यात टाकून केले स्वागत केले. फडणवीस हे अकोल्याच्या दौऱ्यावर आहेत.

  • 20 Mar 2024 03:20 PM (IST)

    माढा लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील कुटुंबिय अ‍ॅक्शन मोडवर

    माढा लोकसभा मतदार संघात भाजपाचे तिकीट न मिळाल्याने राजकीय अस्वस्थ झालेले मोहिते पाटील कुटुंबिय अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांची भेट घेऊन राजकीय चर्चा केली.

  • 20 Mar 2024 03:10 PM (IST)

    बजरंग सोनवणे घेणार बैठक

    बजरंग सोनवणे शरद पवार गटात पक्ष प्रवेशाआधी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यासाठी त्यांनी जेजुरीत पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

  • 20 Mar 2024 03:00 PM (IST)

    राष्ट्रवादीचा दावा योग्य

    मुख्यमंत्र्यांनी सांगितले लोकसभेसाठी कामाला लागा, गेल्या दीड वर्षापासून मी प्रचाराला सुरुवात केली आहे. शिरूरच्या जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला तो रास्त असून त्यांचे चार आमदार मतदारसंघात आहेत. शिवसेनेचा एकही आमदार शिरूर लोकसभा मतदारसंघात नसून राष्ट्रवादीने केलेला दावा योग्य आहे, असे शिवाजी आढळराव पाटील म्हणाले.

  • 20 Mar 2024 02:50 PM (IST)

    ड्रग्स तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई

    ड्रग्स तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. छापेमारी करत अनेक ड्रग्स तस्करी करणाऱ्या आरोपींना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय. एकूण 16 नायजेरियन आरोपींना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनी आज पहाटे छापेमारी करत ड्रग्स प्रकरणी एकूण 16 जणांना अटक केली. 13 नायजेरियन पुरुषांसह 3 महिलांना देखील पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

  • 20 Mar 2024 02:29 PM (IST)

    संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

    संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. बुलढाणा आणि हिंगोली या दोन जागांची केली मागणी. बुलढाणा आणि हिंगोली लोकसभेची जागा लढवण्याची संभाजी ब्रिगेडची तयारी.

  • 20 Mar 2024 01:54 PM (IST)

    पण मी कोणाकडेही उमेदवारी मागणार नाही, मी स्वबळावर लढणार – राजू शेट्टी

    पण मी कोणाकडेही महाविकास आघाडी किंवा महायुतीकडे उमेदवारी मागणार नाही मी स्वबळावर लढणार अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे.

     

  • 20 Mar 2024 01:41 PM (IST)

    माझी गाडी अडवणारा अजून कोणी नाही – विजय शिवतारे

    दादागिरीची भाषा करू नये विजय शिवतारे यांना सगळे रस्ते माहिती आहेत. विजय शिवतारे यांची गाडी अडवणारा अजून कोणी नाही. गृहमंत्र्यांनी याकडे लक्ष घालावे, अशा धमकींना मी घाबरत नाही, दादागिरी सहन केली जाणार नाही माझा नाद कोणी करू नये असे माजी आमदार विजय शिवतारे यांनी म्हटले आहे.

  • 20 Mar 2024 01:34 PM (IST)

    नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दोन नवीन पाहुणे येणार

    नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पुन्हा दोन वाघीण सोडण्यात येणार असल्याचे वन विभागाने म्हटले आहे. पुढच्या महिन्यात या दोन वाघीण सोडण्यात येणार आहेत.

  • 20 Mar 2024 01:29 PM (IST)

    अजित पवार गटाचा राजीनामा देऊन आज मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार – बजरंग सोनवणे

    अजित पवार गटाचा राजीनामा देऊन आज मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार, लोकसभा लढविण्याचे निश्चित नाही, शरद पवार देतील तो आदेश पाळू असे बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे.

  • 20 Mar 2024 01:22 PM (IST)

    उद्धव साहेबांनी सांगितलं तर मी 100% उत्तर मुंबईत लोकसभा जिंकेल – विनोद घोसाळकर

    पियुष गोयल अतिशय श्रीमंत आहेत, बुद्धिमान आहेत. पण ते चुकून इथे आले आहेत, त्यांचा रस्ता चुकलेला आहे.आपल्याला जर उद्धव साहेबांनी उत्तर मुंबईतून संधी दिली तर आपण शंभर टक्के जिंकू असे शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांनी म्हटले आहे.

     

  • 20 Mar 2024 12:50 PM (IST)

    कोकण रेल्वेवरील एका रेल्वेगाडीच्या डब्यात वाढ

    मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेने होळीनिमित्त नियमित रेल्वेगाड्यांसह विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली आहे. अतिरिक्त गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने कोकण रेल्वेने नागरकोइल-गांधीधाम एक्स्प्रेसला एक शयनयान जोडण्याची घोषणा केली आहे.

  • 20 Mar 2024 12:40 PM (IST)

    जयंत पाटील आणि शरद पवार यांच्यात चर्चा सुरू

    पुणे- मोदी बागेतील कार्यालयात फक्त जयंत पाटील आणि शरद पवार यांच्यात चर्चा सुरू आहे. जागांच्या उमेदवारीवरून ही चर्चा सुरु आहे. जयंत पाटील आणि शरद पवार यांच्यात गेल्या अर्ध्या तासापासून चर्चा सुरु आहे.

  • 20 Mar 2024 12:30 PM (IST)

    राज ठाकरे उत्तम कलाकार, त्यांच्या संवेदना अन् खंत यांविषयी मला अधिक माहिती- संजय राऊत

    “राज ठाकरेंबाबत मला माहित नाही. ते उत्तम कलाकार आहेत. त्यांच्या मनातील संवेदना आणि खंत यांविषयी मला अधिक माहिती आहे. मोदी आणि शहा यांचं व्यंगचित्र त्यांनी काढलं होतं, ते मला आवडलं होतं. त्यात भावना होती. राज ठाकरे यांनी पुलवामा इथल्या घटनेवर भाष्य केलं. त्यात त्यांनी पुलवामा हत्याकांडच्या आधी राष्ट्रीय सल्लागार आणि पाकिस्तान सल्लागार यांच्यात गुप्त बैठक झाली आणि नंतर हल्ला झाला का, असा प्रश्न उपस्थितीत केला होता,” असं राऊत म्हणाले.

  • 20 Mar 2024 12:20 PM (IST)

    कोल्हापूर जागा शिवसेनेचीच, शाहू महाराजांनी इच्छा व्यक्त केल्याने ती सोडली- संजय राऊत

    छत्रपती संभाजीनगर- “ठाकरे राज्यात दौरा करत आहे, उद्या कोल्हापूरला जाणार आहेत. तिथे ते शाहू महाराज यांना भेटणार आहेत. ही सदिच्छा भेट आहे. कोल्हापूर जागा शिवसेनेची जागा आहे. 30 वर्षांपासून आम्ही लढतोय. मात्र शाहू महाराजांनी इच्छा व्यक्त केल्याने आम्ही जागा सोडली आहे. त्यानंतर आम्ही सांगली येथे जाणार आहोत. तिथे वसंत दादांना भेटणार आहो,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

  • 20 Mar 2024 12:10 PM (IST)

    विजय शिवतारे संग्राम थोपटे यांच्या निवासस्थानी दाखल

    भोर- विजय शिवतारे संग्राम थोपटे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची भेट घेण्यासाठी विजय शिवतारे त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. याआधी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनीदेखील अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. अजूनही विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघ लढवण्यावर ठाम आहेत. आज भोर तालुक्यात विजय शिवतारे अनेक राजकीय भेटी घेणार आहेत.

  • 20 Mar 2024 11:45 AM (IST)

    Live Update | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची महत्वाची बैठक सुरू

    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची महत्वाची बैठक सुरू… बैठकीला जयंत पाटील उपस्थित… शशिकांत शिंदे , बाळासाहेब पाटील पण उपस्थित…

  • 20 Mar 2024 11:35 AM (IST)

    Live Update | बारामती लोकसभेसाठी भाजपकडून रणनीती…

    उपमुख्यमंत्री हर्षवर्धन पाटलांसोबत बारामती लोकसभेसंदर्भात चर्चा… अजित पवार गटाला पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चेची शक्यता…

  • 20 Mar 2024 11:25 AM (IST)

    Live Update | नवनीत राणा यांचा पराभाव आम्हालाच करायचा आहे… ठाकरे गटाची भूमिका

    येत्या शनिवारी अमरावतीमध्ये ठाकरे गटाच्या अमरावती जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्ता मेळावा… अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमधून ठाकरे गटाला उमेदवारी देण्याची मागणी… आज चार वाजता जिल्ह्यातील महत्वाच्या पदाधिकऱ्यांची बैठक… बैठकीचा तपशील उध्दव ठाकरे यांना दिला जाणार… नवनीत राणा यांचा पराभाव आम्हालाच करायचा आहे… ठाकरे गटाची भूमिका…

  • 20 Mar 2024 11:10 AM (IST)

    Live Update | अजित पवार – दिलीप मोहिते यांच्यात झाली बैठक

    अजित पवार – दिलीप मोहिते यांच्यात बैठक झाली आहे. महायुतीच्या उमेदवारीसाठी काम करण्याच्या अजित पवार यांच्या सुचना… तुमच्यावर कोणतीही अडचण येणार नाही ही जबाबदारी मी घेतो… अजित पवार यांचं वक्तव्य

  • 20 Mar 2024 10:56 AM (IST)

    बजरंग सोनवणे यांनी दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा

    बजरंग सोनवणे यांनी सुनील तटकरे यांना पत्र लिहून दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा. “मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष च्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा सादर करीत आहे” असा मजकूर या पत्रावर लिहला आहे.  या राजीनाम्याची प्रत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देखील सुपूर्द करण्यात आली.

  • 20 Mar 2024 10:33 AM (IST)

    7 जागांवर पाठिंबा, मग इतर जागांवर पाडणार का ? संजय राऊत

    प्रकाश आंबेडकर कोडी टाकत असतात. काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा, मग इतर जागांवर पाडणार का ? वंचितच्या भूमिकेवरून संजय राऊत यांनी विचारला खडा सवाल.

  • 20 Mar 2024 10:20 AM (IST)

    पुण्यात छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या

    पुण्यात छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या,  कात्रज परिसरातील धक्कादायक प्रकार आहे

    पुण्यातील प्रसिद्ध कॉलेजच्या हॉस्टेल मध्येच विद्यार्थिनींना स्वतःला पेटवून घेतलं. उपचारादरम्यान विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

    होस्टेलच्या कॅन्टीन मधील कर्मचाऱ्यांच्या छेडछाडीला कंटाळून 19 वर्षीय तरुणीने संपवले जीवन. याप्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 20 Mar 2024 10:08 AM (IST)

    अजित पवार आणि दिलीप मोहिते पाटील यांच्यात अर्धा तास बैठक

    अजित पवार आणि दिलीप मोहिते पाटील यांच्यात, शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत अर्धा तास बैठक झाली. अजित पवार यांनी कार्यकर्त्यांसोबतही चर्चा केली. दिलीप वळसे पाटील देखील या बैठकीस उपस्थित होते.

  • 20 Mar 2024 09:57 AM (IST)

    पुण्यात भाजपला मोठा झटका

    गिरीश बापट यांचे जवळचे सहकारी राहीलेले सुनील माने यांचा शरद पवार गटात पक्ष प्रवेश करणार आहेत. आज मोडीबाग या निवासस्थानी प्रवेश होणार  आहे. शिवाजीनगर मतदारसंघात निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. शरद पवारांनी पुण्यात भाजपला झटका दिलाय.

  • 20 Mar 2024 09:45 AM (IST)

    हेमंत गोडसे यांनी घेतली बावनकुळेंची भेट

    खा. हेमंत गोडसे यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली आहे. उमेदवारीतील अडथळे दूर करण्यासाठी खा. गोडसे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला पोहोचले होते. भाजपच्या उमेदवारासाठी पक्ष संघटने कडून आग्रह होत असल्याने भेट घेतली. भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आलं आहे. भाजपकडून उमेदवारीला विरोध किंवा अडचण होऊ नये, यासाठी गोडसेंची मोर्चे बांधणी सुरु आहे.

  • 20 Mar 2024 09:30 AM (IST)

    आचारसंहिता लागू होताच नाशिक पोलीस कामाला

    आचारसंहिता लागू होताच नाशिक पोलीस कामाला लागले आहेत.  कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस ठाणे निहाय नियोजन करत आहेत. संवेदनशिल मतदार केंद्रांसह जादा बंदोबस्त सज्जतेचा आढावा घेतला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष कक्ष स्थापन केलं आहे. सभा, दौरे, सामाजिक राजकीय घडामोडींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष राहणार आहे.

  • 20 Mar 2024 09:15 AM (IST)

    नवनीत राणा यांच्या भाजप प्रवेशाची प्रतीक्षा अजूनही कायम

    खासदार नवनीत राणा युवा स्वाभिमान कडून निवडणूक लढवणार की भाजपाकडून याकडे लक्ष आहे. जात प्रमाणपत्राच्या निकालानंतर खासदार नवनीत राणांचा भाजप प्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर खासदार नवनीत राणा भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.  येत्या काही दिवसात खासदार नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर सुप्रीम कोर्टात निकाल लागणार आहे.

  • 20 Mar 2024 08:51 AM (IST)

    Maharashtra News | पुणे पोलिसांची शहरात आज सकाळपासून छापेमारी

    नायजेरियन गॅंगच्या घरांवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची सकाळपासून छापेमारी. नायजेरियन ड्रग्स पेडलर आणि ड्रग्स पुरवणाऱ्या टोळींवर गुन्हे शाखेची कारवाई. नायजेरियन गँगच्या अनेक घरांवर छापेमारी सुरू. पुणे शहरातील कोंढवा, हडपसर ,कात्रज आणि वानवडी परिसरात पुणे पोलिसांच्या पुणे शाखेची छापेमारी. गुन्हे शाखेच्या 10 पथकांकडून आज सकाळपासून छापेमारीला सुरुवात.

  • 20 Mar 2024 08:43 AM (IST)

    Maharashtra News | सिटी लिंक बस सेवेचा संप

    बस सेवा तात्काळ चालू करा, अन्यथा ठेका रद्द करणार. गेल्या सहा दिवसांपासून सिटी लिंक बस सेवेचा संप. मनपा आयुक्तांनी दिली बसच्या ठेकेदाराला तंबी. थकीत वेतन न मिळाल्याने वाहकांचा संप. सिटी लिंक बस वर अवलंबून असलेल्या प्रवाशांचे विद्यार्थ्यांचे हाल.

  • 20 Mar 2024 08:23 AM (IST)

    Maharashtra News | प्रशांत हिरे यांना उमेदवारी देण्याची मागणी

    धुळे लोकसभेसाठी माजी मंत्री प्रशांत हिरे यांना उमेदवारी देण्याची मागणी. प्रशांत हिरे यांच्या कार्यकर्त्यांनी केली रोहित पवार यांच्याकडे मागणी. मालेगावातून स्थानिक उमेदवार मिळावा अशी मागणी. रोहित पवार मालेगावात दौऱ्यावेळी असताना केली मागणी. प्रशांत हिरे हे माजी परिवाहन मंत्री असून उबाठाचे उपनेते अद्वय हिरे यांचे ते वडील आहेत. मालेगाव, बागलाणसह धुळे जिल्ह्यात देखील जनसंपर्क मोठ्या प्रमाणावर आहे.

  • 20 Mar 2024 08:14 AM (IST)

    Maharashtra News | आज अमरावतीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अमरावतीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची 4 वाजता महत्वाची बैठक. महाविकास आघाडीतून अमरावती लोकसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाला देण्याची मागणी. अमरावती जिल्ह्यातील संपर्कप्रमुख, जिल्हा प्रमुखांसह इतरही पदाधिकाऱ्यांची बैठक. अमरावती लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला सुटावा यासाठी काही दिवसांपूर्वी वाशिम येथे घेतली होती उध्दव ठाकरे यांची भेट.

  • 20 Mar 2024 07:56 AM (IST)

    Marathi News | नाशिकमध्ये १० लाखांचा मद्यसाठा जप्त

    नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील कुकुडणे परिसरातून दादरा नगर हवेली व दमण दिव येथून महाराष्ट्र राज्यात विक्री प्रतिबंधित विदेशी मद्य साठ्यासह तीन दुचाकी असा एकूण १० लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या निमित्ताने गस्तीवर असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई, कळवण पथकाने ही कारवाई केली.

  • 20 Mar 2024 07:43 AM (IST)

    Marathi News | होळीनिमित्त रेल्वेकडून उत्तर भारतासाठी विशेष गाड्या

    होळीनिमित्त रेल्वेकडून उत्तर भारतासाठी पुण्यातून सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरु करण्यात येणार आहे. पुण्यातून दानापूर, गोरखपूर, मुझफ्फरपूर आणि संबळपूरसाठी या गाड्या सोडण्यात येणार आहे. पुणे- गोरखपूर सुपरफास्ट विशेष २२ मार्चला पुण्याहून सायंकाळी ४.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजता गोरखपूरला पोहोचेल.

  • 20 Mar 2024 07:30 AM (IST)

    Marathi News | पंकजा मुंडे उद्या पुणे दौऱ्यावर

    भाजप नेत्या पंकजा मुंडे उद्या पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची पुण्यातील घरी त्या जाणार आहेत. त्यांनाही बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे.

  • 20 Mar 2024 07:17 AM (IST)

    Marathi News | आज होणार अधिसूचना प्रसिद्ध

    लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान प्रक्रिया आजपासून सुरु होणार आहे. निवडणूक आयोगाकडून आज अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर लागलीच उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. पहिल्या टप्प्यातील १०२ जागांसाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.