मुंबई, दि. 15 जानेवारी 2024 | मकर संक्रातीचा उत्सव आज देशभरात साजरा होत आहे. गुजरातमध्ये पंतग महोत्सव चांगला रंगला आहे. मुंबई, पुण्यासह राज्यात पतंग उडवण्याचा आनंद हजारो नागरिकांनी घेतला. मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे सर्वेक्षण सुरु होणार आहे. पुणे महानगरपालिका मराठा समाजातील नागरिकांचे सर्वेक्षण करणार आहे. अयोध्यामध्ये 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिरच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी पुण्यातील शंखनाद पथकाला निमंत्रण आले आहे. केशव शंखनाद पथकाचे 111 सदस्य सोहळ्यात सहभागी होणार आहे. राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे घेण्यात आलेल्या नेट परिक्षेचा निकाल लांबणीवर पडला आहे. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
पुणे | पुण्यात सराईत गुन्हेगारांची पुन्हा धिंड काढण्यात आली आहे. दुकानांची तोडफोड करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची पुणे पोलिसांनी धिंड काढली आहे. या गुंडांनी ज्या ठिकाणी गाड्या फोडत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला त्याच ठिकाणी धिंड काढत पुणे पोलिसांनी त्यांना धडा शिकवला आहे. आरोपींनी पुण्यातील हडपसर भागात दुकानांची तोडफोड केली होती. दोन्ही आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अभयसिंग सिकंदर सिंग जुनी आणि दीप दिलीप कसबे असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के सी आर यांची कन्या कविताला पुन्हा एकदा ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. कविता यांना उद्या ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी मार्च 2023 मध्ये ईडीकडून त्यांची चौकशी करण्यात आली होती. आम आदमी पक्षाचे नेते खासदार संजय सिंह आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याशी संबंधित कंपन्यांशी के कविता यांच्याकडून व्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. के कविता ईडी कार्यालयात हजर राहणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
धुक्यामुळे उड्डाण विलंब आणि रद्द करण्याबाबत DGCA ने विमान कंपन्यांना SOP जारी केले आहे. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन विमान कंपन्यांना रिअल टाइम माहिती उपलब्ध करून द्यावी, असे डीजीसीएने म्हटले आहे.
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या नागालँडमधून पत्रकार परिषद घेऊ शकतात. 14 जानेवारी रोजी मणिपूर येथून प्रवास सुरू झाला. ही यात्रा सध्या मणिपूरमध्ये सुरू आहे
इंडिगो फ्लाइट वाद प्रकरणी दिल्ली पोलिसांनी पायलटला कानाखाली मारणाऱ्या साहिल कटारियाला अटक केली आहे. कटारिया हा दिल्लीतील अमर कॉलनी येथील रहिवासी आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा झाली. पीएम मोदींनी ट्विट करून चांगली चर्चा झाल्याचे म्हटले आहे. धोरणात्मक भागीदारीतील विविध सकारात्मक घडामोडींवर चर्चा झाली. रशियाच्या BRICS चे अध्यक्षपदासह विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही आम्ही उपयुक्त विचारांची देवाणघेवाण केली.
उत्तर प्रदेश | अयोध्येतील राम मंदिर कार्यशाळेला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. राम मंदिर कार्यशाळेत राम मंदिराचे दगड घडवण्याचं काम सुरु आहे. राम मंदिरासह गेल्या ३० वर्षांची या दगडांची प्रतीक्षा पण संपणार आहे. राजस्थान मधील बन्सी पहारपुर या ठिकाणाहून १९८९ साली हे दगड आणण्यात आले आहेत. 22 जानेवारीच्या निमित्ताने या कार्यशाळेतील दगडांना पण आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
मुंबई | अयोध्येत 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा कण्यात येणार आहे. यासाठी राज्यासह देशात मोठ्या प्रमाणात लगबग आणि तयारी सुरु आहे. विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अशातच प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
मुंबई | काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी रविवारी 14 जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला. त्यानंतर मुंबई काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसने मोठी काटछाट केली आहे. आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मिलिंद देवरा यांच्यासह शिंदे गटात जाणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत..
मिलिंद देवरा यांच्या व्यतिरिक्त एकूण 23 पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या 23 जणांनी पक्षविरोधी कारवाया केल्या.त्यामुळे त्यांचं निलंबन केलं गेलं.
सोलापूर : गुणरत्न सदावर्ते हे कोणाचे माणूस आहेत हे आता स्पष्ट झाले. सदावर्ते यांनी एसटी बंद पुकारला होता. त्याप्रमाणेच आम्ही आमच्या मागण्यांसाठी बंद पुकारलाय. अंगणवाडी कर्मचाऱ्यांविरोधात जनहित याचिका दाखल करण्याऐवजी सदावर्ते यांनी सरकार विरोधात याचिका दाखल करायला हवी होती. सदावर्ते आपण दाखल केलेली याचिका चुकीची आहे अशी टीका अंगणवाडी सेविका कर्मचारी संघाचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी केली.
अयोध्या : नवीन मुर्तीची नगर प्रदक्षिणा होणार नाही. कारण मूर्तीचे वजन खूप मोठं आहे. उत्सव मूर्तीला नगर प्रदक्षिणा घातली जाईल. २२ तारखेला चार वेदाचे मंत्र असतील, पौराणिक मंत्र असेल. सूर्य आणि चंद्र असेपर्यंत तुमची कृपदृष्टी राहू द्या अशी याचना देवाकडे केली जाईल. तसेच, नवीन मुर्तीला अधिवास घातला जाईल अशी माहिती अरुण दीक्षित यांनी दिली.
अयोध्या : राम मंदिरात ठेवण्यात येणाऱ्या मूर्तीचे वजन जास्त आहे. त्यामुळे नगर प्रदक्षिणा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यासारखीच छोटी उत्सव मूर्तीची नगर प्रदक्षिणा होणार आहे. उद्या यजमान यांचे शरयू स्नान होईल. यजमान ९ कलश घेवून ते मंदिराकडे जातील. उद्या जलयात्रा होणार आहे अशी माहिती राम मंदिराचे काशीचे वैदिक अरुण दीक्षित यांनी दिली.
धाराशिव : देशात एक टक्का असणाऱ्या उद्योगपतींचे अकरा लाख कोटी कर्ज माफ केले जाते. मात्र, ६५ टक्के शेतकऱ्यांची असणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी का केली जात नाही असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारला केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अडीच टक्क्याने वाढल्या आहेत याला सरकारी धोरण कारणीभूत आहे. सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा करावा अशी मागणीही राजू शेट्टी यांनी धाराशिव येथे आयोजित ट्रॅक्टर मोर्चामध्ये केली.
पुणे : ललित पाटील ड्रग्स तस्कर प्रकरणी ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. पुणे पोलिसांनी संजीव ठाकूर यांची दोन वेळा चौकशी केली आहे. ड्रग्स तस्कर ललित पाटील यांचा ससून रुग्णालयात मुक्काम वाढवण्यासाठी संजीव ठाकूर यांनी मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
निपाणी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या कर्नाटक सीमा भागात जाणार आहेत. निपाणीमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत रावसाहेब पाटील आणि उत्तम पाटील यांचा सत्कार सन्मान आणि कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याच्या निमित्ताने उत्तम पाटील गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट निपाणीमध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहेत. चिक्कोडी मतदार संघातून उत्तम पाटील यांना मैदानात उतरवले जाण्याची शक्यता आहे.
डोंबिवली : डोंबिवलीमधील भर चौकात स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र, गॅसमुळे मशीनला आग लागली आणि एटीएममधील 21.11 लाख रुपये जळून खाक झाले. याप्रकरणी डोंबिवली विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अयोध्या : राजस्थानमधील कारागिरीने राम मंदिर सोहळ्यासाठी चांदीचे भोग ताट बनविले आहे. तसेच, चांदीच्या कलशावरही त्यांनी नक्षी रेखाटली आहे. १५ श्लोक असलेलं हे पूजेचं ताट आणि कलश अयोध्येत दाखल झाले आहेत. २२ तारखेला पुजेसाठी हे चांदीच ताट वापरलं जाणार आहे. राजीव बाबुवाल यांनी हे चांदीचे पूजा ताट राम मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द केलं.
कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू झालेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार सुभाष भोईर यांचे नाव सुरुवातीला चर्चेत होते. मात्र, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सुषमा अंधारे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
पुण्यात मकर संक्रांतीचा उत्साह दिसून येत आहे. पुण्यातील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर सजलं आहे. दत्त मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मकर संक्रांतीच्या निम्मिताने पंतग, गूळ, गुळाची पोळी, तिळगुळ आणि गोड पदार्थांची सजावट करण्यात आली आहे. यासह दत्त मूर्तीला हलवाच्या दागिन्यांची आरास करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावोस दौरा. आज रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसला जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सचिवांची महत्वाची बैठक घेत असल्याची सूत्राची माहिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी बैठक घेत असल्याची माहिती.
उत्तरेतील खराब हवामानाचा विमान सेवेला मोठा फटका बसला आहे. दिल्लीतील हवामानामुळे पुण्यातील 11 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. दिल्ली विमानतळावरील दाट धुक्यामुळे रविवारी पुण्याहून दिल्लीकडे जाणारी राजकोट, प्रयागराज आणि अहमदाबादसह 11 उड्डाणे रद्द करण्यात आली. उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांना मात्र मोठा फटका बसला आहे.
राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण मला मिळाले असून मी 22 जानेवारीला अयोध्येला राम मंदिर उद्घाटन सोहळ्यास जाणार आहे. – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची माहिती.
तर नव्या 11 आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने घेतलं ताब्यात. शरद मोहोळ हत्या प्रकरणात एकूण 24 जणांवर पुणे पोलिसांची कारवाई सुरू
पुणे-लोणावळा दरम्यान आजपासून दोन लोकल फेऱ्या वाढवल्या. दुपारच्या वेळेत सुटणार नव्या लोकल. कोरोना काळात करण्यात आल्या होत्या या रेल्वे गाड्या रद्द
जळगावात मेळाव्याला आलेल्या तीन मंत्री सर्व आमदार खासदारानी आंदोलनस्थळी भेट न दिल्याने आदिवासी कोळी समाज बांधव आक्रमक. जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळण्यासह विविध मागण्यांसाठी 12 दिवसांपासून सुरू आहे आमरण अन्नत्याग उपोषण
घटनाबाह्य मुख्यमंत्री पुन्हा दावोसला जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 50 लोक दावोसला जात आहेत. दावोसच्या एका दौऱ्यावर 34 कोटींचा खर्च करण्यात येतोय, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
अलिबाग- “रायगड जिल्ह्यात मराठी उद्योजक उभे करा. तुम्ही सावध नसाल तर तुमच्या हातातून सर्व निघून जाईल. तुमची हक्काची जमीन एकदा गेली की परत येणार नाही. महाराष्ट्रात जे जे उत्तम आहे ते लुटण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुम्ही स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेऊ नका,” असं राज ठाकरे म्हणाला.
अलिबाग- “गेल्या अनेक वर्षांत या महाराष्ट्रात नाशिक, पुणे आणि मुंबईची तर वाट लागली आहे. तुम्हाला माहिती आहे का तुमच्या पायाखालची जमीन निघून चालली आहे. बाकी राज्यात त्यांचे त्यांचे नेते त्यांच्या माणसाचे विचार करत असतात. पण आपल्या इथे असं नाहीये. मला कळलं की इथे काही गावंच संपली आहेत. मला कल्पना आहे की सर्वांना पैशांची गरज आहे. तुमची जमीन आहे ती तुम्हाला विकायची की नाही विकायची हा तुमचा प्रश्न आहे. पण त्याचा योग्य मोबदला तुम्हाला मिळतोय का? मधला दलाल मराठी आहे असं समजून आपण जमीन विकतो,” असं राज ठाकरे म्हणाले.
अलिबाग- “आपण अजून किती भोळचट आहोत याचा एक नमुना मला दिसत आहे. मी त्यादिवशी एका शिबिराला आलो होतो, तेव्हा काय म्हटलं होतं. मला रायगड जिल्ह्यातल्या फक्त पत्रकारांशी संवाद साधायचा होता. परंतु याला जमीन परिषद वगैरे नाव दिलं. ही काही जाहीर सभा नाही. मला फक्त गप्पा मारायच्या आहेत. आजही पत्रकारांवर एवढा विश्वास आहे लोकांचा. त्यामुळे तुमच्यावर एक मोठी जबाबदारी आहे,” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी फटकारलं.
योध्येत थंडीचा कडाका वाढला… अयोध्येतलं सकाळच तापमान ६ सेल्सिअसवर पोहोचलेलं होत… थंडीच्या कडाक्यात पोलीस बंदोबस्तावर आहेत… थंडीपासून बचाव करण्यासाठी आता गॅस हीटर चौकाचौकात बसवले जाता आहेत…… २२ तारखेच्या सोहळ्याची तयारी केली जात आहे… रामभक्तांसाठी उभारले जाणार गॅस हीटर
अयोध्येत एकनाथ शिंदे यांचे लागले बॅनर… हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण… अयोध्येत प्रमुख मार्गांवर झळकले बॅनर… बॅनरवर बाळासाहेब ठाकरे ,धर्मवीर आनंद दिघे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ,जे पी नड्डा, अमित शहा यांचा फोटो… पंतप्रधान नरेंद्र मोदी रामाला वंदन करतानाचा फोटो…
26 जानेवारीला आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कवर जाणार, मराठ्यांचं आमरण सुरू होणार, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
२० जानेवारीला अंतरवाली सराटीतून सकाळी ९ वाजता मुंबईच्या दिशेने निघणार . १९ तारखेला अधिवेशन बोलवा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. २० तारखेआधी सगेसोयरेबाबत कायदा पारित करा, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर मोठं कांड होणार, असा फोन महाराष्ट्र पोलीसांना अज्ञात व्यक्तीने केला. फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबई-गुजरात ट्रेनने प्रवास करणार्या ४ ते ५ मुस्लिम व्यक्तींचे संभाषण ऐकून नियंत्रण कक्षाला माहिती दिली. हे मुस्लिम तरुण उर्दूतून हे संभाषण करत होते असेही सांगण्यात आले.
धार्मिक तेढ निर्माण करून निवडणुका जिंकायचं षडयंत्र आहे असा आरोप संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केला.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पूर्ण उपमुख्यमंत्रीपदही नाही. त्याच्या उपमुख्यमंत्री पदताही वाटेकरी आहे. फडणवीसांनी आम्हाला राम मंदिराबद्दल शिकवू नये, असे टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अलिबागमध्ये असून ते आप्पासाहेब धर्माधिकारीच्या भेटीसाठी उपस्थित आहेत.
अलिबागमध्ये आज मनसेची जमीन परिषद आयोजित करण्यात आली आहे.
शरद मोहोळ हत्या प्रकरणाताील मुख्य आरोपी रामदास मारणेला अटक करण्यात आली आहे. पनवेल मधील फार्महाऊमधून त्याला पोलिसांनी अटक केली.
नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर धक्कादायक घटना घडली आहे. इंडिगो कंपनीच्या विमानामध्ये एका प्रवाशाने पायलटच्या थोबाडीत मारल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. विमानाचे उड्डाण वेळेवर न झाल्याने प्रवासी संतापले
मकर संक्रांती निमित्त नाशिकच्या रामकुंड परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करत असताना,गोदावरी स्नानाचे महत्व आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक गोदघाटावर दाखल झाले आहेत. भाविकांकडून गोदास्नान आणि धार्मिक विधी सुरू करण्यात आले आहेत. गोदाकाठी मोठा पोलीस बंदोबस्त आहे.
अयोध्येत मोठ्या संख्येने साधू दाखल झाले आहेत. अयोध्येतल्या वीणा चौकात साधूंकडून साफ सफाई करण्याचं काम सुरु आहे. किन्नर आखाड्याचे महंत ही यामध्ये सहभागी झालेत. संपूर्ण अयोध्या नगरी साफ करणार असल्याचं साधूंचं म्हणणं आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातल्या नारंडा येथे दीडशे वर्ष जुन्या शंकरपटात शेकडो बैलजोडीधारक सहभागी झाले आहेत. तीन राज्यातून आणि आसपासच्या दहा जिल्ह्यातून शंकरपट प्रेमी नारंड्याला पोहोचतात. नारंडा येथील ग्रामस्थांनी पिढ्यानपिढ्या जोपासली आहे. संक्रांतीच्या दिवशीची शंकरपटाची परंपरा आहे. शेकडो बैल जोडीधारकांनी आपले कौशल्य पणाला लावत शंकरपटात सहभाग घेतला आहे दिवाळीनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शंकरपट भरवले जात आहेत.
सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रे नगर येथील गृह प्रकल्प कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 जानेवारी रोजी पंधरा हजार घरांच्या चाव्यांचं वाटप होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेबरोबर सोलापुरातून रॅली काढण्याची मागणी केली आहे. सोलापूर शहरात पंतप्रधान मोदी यांचा रोड शो व्हावा यासाठी भाजप पदाधिकारी आग्रही आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रे नगर येथील मॉडेल घराची पाहणी केली. पालकमंत्र्यांच्या हस्ते रेनगर येथील जलशुद्धीकरण प्रकल्पातील पाण्याचे जलपूजन करण्यात आले.
लालबाग काळाचौकी जवळील गिरनार टाॅवरच्या मागील साईबाबा झोपडपट्टीत आग लागली आहे. सिलेंडरचे आठ ब्लास्ट झाल्याची माहीती आहे. या आगीमुळे परिसरात दहशत , सर्वत्र पळापळ सुरू आहे. फायर ब्रिगेडच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
मकर संक्रांतीमुळे पुण्यात भाज्यांचे भाव कडाडले. भोगी आणि संक्रांतीसाठी लागणाऱ्या भाज्यांना मागणीत वाढ झालीय. किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झालीय. किरकोळ बाजारात पावशेर भाजीचे दर ३० ते ४० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. वाल पापडी, पापडी, मटार, वांगी, पावटा, गाजर, कांदापात, वांगी आदि भाज्यांना मागणी वाढते आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज इगतपुरी तालुक्यातील कावनई येथील आदिवासी बांधवांशी साधणार संवाद. जन मन कार्यक्रम अंतर्गत साधणार संवाद. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दुपारी 12 वाजता साधणार संवाद. केंद्र शासनाच्या विविध योजनांचा पूर्तता याचा घेणार आढावा.
निफाडचा पारा घसरला. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात 6.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. अचानक थंडीत वाढ झाल्याने निफाडकरांना भरली हूडहुडी. थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी पेटल्या ठिकठिकाणी शेकोट्या.
मनोज जरांगे पाटील आणि बच्चू कडू यांच्यामध्ये सोयरे शब्द आणि मराठा समाजाला सरसकट आरक्षणामध्ये कसा घेता येईल आणि त्याला काय पर्याय असू शकतात यावर चर्चा सुरू आहे.
राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे घेण्यात आलेल्या नेट परिक्षेचा निकाल लांबणीवर. निकाल 17 जानेवारी रोजी जाहीर केला जाणार आहे. एनटीएतर्फे देशभरातील 292 शहरांमध्ये 6 ते 19 डिसेंबर या कालावधीत नेट परीक्षा घेण्यात आली, यामध्ये 9 लाख 45 हजार 918 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल 10 जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे एनटीएने घोषित केले होते.
जळगावातील धरणगाव तालुक्यातील भोणे या गावाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सरपंच भालचंद्र पाटील यांनी गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जळगाव येथे झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
कल्याण रेल्वे स्थानकातील सरकते जिने बंद झाले आहे. यामुळे सकाळी कामावर जाणारे आणि संध्याकाळी कामावरून घरी जाण्याऱ्या चाकरमानी सहरेल्वे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे. वारंवार जिना बंद पडत असल्याने प्रवाशी वर्गात संतापाचे वातावरण आहे.
मुंबई बंगळुरू महामार्गावर नऱ्हेजवळ अपघात झाला. रस्त्यावरून जाणार ट्रक श्री स्वामी नारायण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारात शिराला. या अपघातात एक जण जखमी झाला. तसेच दुचाकी आणि दोन चारचाकी वाहनाचे नुकसान झाले.
सरकारी नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवणुकीचा प्रकार पुण्यात घडला. पुणे महापालिका, रेल्वे व सरकारी बँकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने साडे आठ लाख रुपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी दांपत्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.