मुंबई | दि. 4 मार्च 2024 : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पाचा आजपासून तिसरा टप्पा वाहतुकीसाठी सुरु होणार आहे. समृद्धी महामार्गाचा भरवीर ते इगतपुरी दरम्यानचा या तिसरा टप्प्पाचे लोकार्पण दादा भुसे करणार आहेत. यामुळे आता इगतपुरी इंटरचेंजचा वापर करून ठाणे, मुंबई परिसरातून शिर्डीचा प्रवास वेगवान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. अमित शाह यांच्या जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरात सभा होणार आहेत. पुणे रेल्वे विभागाकडून रेकॉर्डब्रेक दंड वसुली करण्यात आली आहे. पुणे रेल्वेची फुकट्या प्रवाशांकडून दररोज सहा लाख रुपये दंडाची वसुली होत आहे. मनोज जरांगे पाटील यांची संघर्ष यात्रा रात्री उशिरा सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत पोहचली आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
सांगली | मिरज रोड येथील वालचंद कॉलेज समोर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. चारचाकी वाहनाने रस्त्यात अचानक पेट घेतल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. तर सुदैवाने कोणतेही जीवितहानी झाली नाही.
नवी दिल्ली | स्टेट बँक ऑफ इंडियाने सुप्रीम कोर्टात अर्ज केला आहे. निवडणूक रोख्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यासाठी वेळ वाढवून देण्याची विनंती या अर्जात करण्यात आली आहे. या अर्जात ३० जून २०२४ पर्यंत वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा निकाल देताना ६ मार्चपर्यंत सगळी माहिती आयोगात सादर करण्याचे निर्देश SBI ला दिले होते
मुंबई | लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. तर भाजप दुसरी यादी 8 मार्चला जाहीर करणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मंगळवारी 5 मार्च रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे शाह यांच्या दौऱ्यात लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपाचा तिढा सुटणार का, याकडे सर्वांच लक्ष असणार आहे.
माढा | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा द्वेशी आहेत. फडणवीसांच्या मनात मराठ्यांविषयी द्वेष ठासून भरलाय. फडणवीस मराठ्याचं वाटोळंच करणार, असं जरांगे पाटील म्हणाले. तसेच फडणवीसांना मराठ्यांनी गुलाल उधळलेला पाहायचं असेल तर मराठ्यांना दिलेले सगेसोयरेचा अध्यादेश काढुन ओबीसीतुन मराठ्यांना आरक्षण द्यावे, असंही जरांगे पाटील म्हणाले.
शिवरात्रीला ताजमहालमधील पूजेबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेद्वारे मुख्य स्मारकात दुग्ध अभिषेक करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. याचिका दाखल करणाऱ्यांनी दावा केला आहे की, मुख्य स्मारकाच्या खाली तळघरात शिवलिंग बांधले आहे. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या वक्तव्यावर भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी म्हणाले, ‘काल लालू प्रसाद यादव यांनी अत्यंत खालच्या दर्जाचे शब्द वापरले आहेत, जे अत्यंत दुःखद आणि वेदनादायक आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबाविषयी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी संपूर्ण देश हे त्यांचे कुटुंब आहे.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक 8 मार्च रोजी होणार आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास भाजप मुख्यालयात ही बैठक सुरू होईल. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच समितीचे इतर सदस्य उपस्थित राहणार आहेत.
जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात लष्कराच्या एका हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. हेलिकॉप्टर मोकळ्या मैदानात उतरवण्यात आले आहे. तांत्रिक बिघाडानंतर हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आता नवीन डाव आणला आहे, मुंबई चलो बोर्ड काढत आहेत. देवेंद्र फडणवीस हे आत्याची भूमिका पार पाडत आहेत, आणि ते आत्या होऊन पोलिसांचे कान फुकत आहे. मला कोणाचेही सरकार असो मला कोणाशी देणे घेणे नाही, माझा आरक्षणाशी संबंध आहे. फडवणीस आणि आमच्या मध्ये काही दुष्मनी नाही मुख्यमंत्री म्हणतात मी करेट कार्यक्रम करतो- मनोज जरांगे पाटील
आमदार पाटणी यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे , समृद्धी महामार्गाच्या निर्माण कार्य वेळी ते नेहमी जमीन अधिग्रहण करण्यासाठी माझ्यासोबत असत. माझी त्यांना विनम्र श्रद्धांजली- एकनाथ शिंदे
20 आजी माजी नगरसेवक धनंजय मुंडे यांच्या गळाला लागले आहेत. उद्या मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहेत. नगरसेवक अमर नाईकवाडे, भैया मोरे, फारुक पटेल, यांच्यासह वीस जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.
ठाणे : सध्या कायद्याचे राज्य चाललंय का? न्यायदान वेळेवर झाले पाहिजे. आमचाही खटला आहे सुप्रीम कोर्टात. आता पुन्हा तारीख पडलीय. कायदा न्याय देत नसेल तर काय करायला पाहिजे असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
अकोला : एका लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मोठा पैसा मोजावा लागतो. तर जवळपास 10 करोड इतका खर्च लागतो आणि आज तो आमच्याकडे नाही आहे. त्यामुळे आम्ही लोकसभा निवडणुकीत उतरणार नाही असे समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी म्हटले आहे.
मुंबई : मंत्रालयात काही फेक कागदपत्रे आढळून आली त्याची चौकशी सुरु आहे. या संदर्भातले डिटेल्स लवकरच देऊ. मात्र काही लोक बनावट गोष्टी करत आहेत हे आमच्या लक्षात आले होते. म्हणून यापूर्वीही दोन ते तीन ठिकाणी कारवाई झाली होती अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
शिरूर : आम्हाला उमेदवार मिळाला नाही की मग आम्ही कलाकाराला उमेदवारी देतो. अमोल कोल्हेना त्याप्रमाणे उमेदवारी दिली ती आमची चूक झाली. हे सांगताना अनेक कलाकारांचे त्यांनी दाखले दिले. पण, असं बोलणाऱ्या अजित दादांना हे लक्षात घ्यावे की त्यापैकी एकाही कलाकाराला संसदरत्न पुरस्कार मिळालेला नाही. मात्र, मी लोकसभेत मतदारसंघातील प्रश्न प्रभावीपणे मांडले, त्यामुळं पहिल्या टर्ममध्ये मला तीनवेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला.
पुणे : पुण्यात शाळेच्या व्हॅन चालकावर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न केला गेलाय. वाघोली भागात ही घटना घडली. कोयत्याने हल्ल्याच्या प्रयत्नात व्हॅनच्या काचा फुटल्या. व्हॅनमध्ये विद्यार्थी असतानाच हा प्रकार घडला आहे. पूर्वीच्या वादातून चालकावर हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
सोलापूर : प्रत्येक मराठा बांधवाने आपल्या घरावर, गाडीवर लिहायचे की मतं मागायला येऊ नका. कोणा नेत्यांनी आपल्या भिंतीला पॅम्प्लेट लावले की आपण त्याच्यावर केस ठोकायची. मनोज जरांगे पाटील यांचं समाजाला आवाहन
सोलापूर : पळून जाणारी औलाद नाही. तू मला जेलमध्ये टाक, अहवाल बनव किंवा काहीही कर. तू मला जेलला टाकले किंवा नाही टाकले तरी तुझा कार्यक्रम झालाच. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटत नसतो हे देवेंद्र फडणवीस तुम्हाला चॅलेंज आहे. गोडीने मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करा नाहीतर. मनोज जरांगे पाटील यांचं आव्हान
पुणे – पुण्यातील वाघोली भागातील घटना. स्कूल व्हॅन चालकावर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्नात व्हॅनच्या काचा फुटल्या, व्हॅनमध्ये विद्यार्थी असताना हा प्रकार घडला. पूर्वीच्या वादातून चालकावर हा हल्ला झाल्याची माहिती. पोलिसांकडून अधिक तपास सुरू.
सोलापूर : एसआयटी माझ्यावर करण्याऐवजी तुझ्याभोवती फिरणाऱ्या भ्रष्टाचारी सुगंधी अगरबत्या फिरत आहेत त्यांच्यावर लाव. मनोज जरांगे पाटील यांची टीका
सोलापूर : मनोज जरांगे पाटलांची सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर टीका. मी येवल्याचा कसा टांगा पलटी केला तसा आता नागपूरचा नंबर. माझ्यासाठी केवळ मराठा हा पक्ष आहे. येवला, नागपूर, बारामती असो किंवा ठाणे असू द्या यांचा टांगा पलटी करतो.
सोलापूर : लहान मुलांचे नाव पाचव्या दिवशी आत्त्या ठेवते. गृहमंत्री हे आत्याच्या भूमिकेत आहेत. गृहमंत्री पोलिसाच्या कानात सांगते कर गुन्हे दाखल. आत्याच्या आतड्या फुगल्यात मराठा द्वेषाने अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४० जागांवर महाविकास आघाडीची बोलणी अंतिम झाली आहेत. केवळ चार जागांचा तिढा कायम असून येत्या आठवड्यात तोही सुटेल असे कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील सध्या राज्यातील अनेक शहरांना भेट देत आहेत. मोहोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. थोड्याच वेळात ते सभेला संबोधित करणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाशिम आणि जळगाव जिल्ह्याचा दौरा असून जळगाव विमानतळावरून ते हेलिकॉप्टरने वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी रवाना झाले.
अयोध्येतील राममंदिर दर्शनासाठी एसटी महामंडळाची सांगली विटा येथील पहिली बस रवाना झाली आहे. या बसमध्ये सुमारे 44 रामभक्त आहेत. एकूण सुमारे 4 हजार किमीचा प्रवास ही बस करणार आहे.
सहा वर्षे अधिकाऱ्यांनी काम रखडल्याचा शेतकऱ्याचा आरोप. संतप्त शेतकऱ्याने प्रशासनाला धरले धारेवर. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक वाद
आम्ही सध्या कुठल्याही महाविकास आघाडी किंवा महायुतीत समाविष्ट नाही. काल शरद पवार यांनी माढाची जागा आम्हाला देतो अस म्हटलं होते. मात्र आमचं माढा आणि परभणी ह्या दोन जागा आम्ही हट्टास आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या बैठक आम्हाला बोलावन आलं नाही.
अमित शहा यांची उद्या सभा होणार आहे, अमित भाई आजच शहरात येणार आहेत. या सभेला किमान दीड ते दोन लाख उपस्थित राहतील, आमची तयारी पूर्ण झाली आहे. इम्तियाज जलील आता निवडून येऊ शकत नाही, त्यामुळे तो मुंबईला निघाला आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे भागवत कराड यांनी म्हटले आहे.
गोरेगाव वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर नेस्को सेंटरजवळ दुचाकीला आग लागली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला अचानक आग लागल्याने गोंधळ उडाला. ही आग विझवण्यात यश आलं असून आगीचं कारण शॉर्ट सर्किट असल्याचं सांगण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालं नाही.
नागपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नागपूर विमानतळावर आगमन झालं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोदींचं स्वागत केलं. भाजपच्या 30 कार्यकर्त्यांची नागपूर विमानतळवर पंतप्रधानांसोबत भेट आणि चर्चा झाली. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर विमानतळावरून तेलंगणाकडे रवाना होणार आहे.
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पातील इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं 90 टक्के काम पूर्ण झालं आहे. एमएसआरडीएनं उर्वरित काम वेगात पूर्ण करत जुलै अखेरीस हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचं नियोजन आखलं आहे. जुलैमध्ये हा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यास मुंबई ते नागपूर असा थेट प्रवास समृद्धीने आठ तासांत करता येणार आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा झंझावात सक्रिय असल्याचा परिणाम मुंबईसह राज्याच्या किनारपट्टीवर झाला आहे. त्यामुळे बाष्पयुक्त थंड वारे वाहत असून दिवसभर आकाश अंशत: ढगाळ राहिल्यामुळे कमाल तापमानात घट झाली. पुढील दोन दिवस गारवा कायम राहण्याचा अंदाज आहे.
वाशिम- “माझ्या उमेदवारीचा संभ्रम नव्हता. काही लोकांनी संभ्रम निर्माण केला आणि त्याला पक्ष महत्त्व देत नाही. खासदार म्हणून राज्यातील केंद्राचे प्रश्न मी सोडविले आहेत. हे माझं शक्ती प्रदर्शन नाही. तर अनेक दिवसांपासून हा कार्यक्रम ठरला होता,” असं भावना गवळी म्हणाल्या.
पिंपरी चिंचवड, मुंबई ,सातारा ,सोलापूर या शहरातून पुण्यात येणाऱ्या जड वाहनांना उद्यापासून बंदी असणार आहे. शहरात जड वाहनांना पुर्णपणे बंदी असणार आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतलाय. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या पोलीस प्रशासनाने सूचना दिल्यात. पुण्यातून बाहेर पडण्यासाठी शहरात करता जड वाहनांना प्रवेश येणार नाही. पुणे नगर ,पुणे सोलापूर, पिंपरी चिंचवड पुणे शहर या मुख्य मार्गांवर जड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
गृहमंत्री अमित शाह यांची उद्या छत्रपती संभाजीनगर शहरात सभा होणार आहे. सभेसाठी तब्बल 2 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. तर सभा परिसरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे. सभेची जय्यत तयारी सध्या सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज तेलंगणाच्या दौऱ्यावर आहे ते आज नागपूर विमानतळवर येऊन इथून ते तेलंगणा ला जाणार आहे. काही भाजप कार्यकर्ते विमानतळावर पंतप्रधान याना भेटणार आहेत.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा जोरदार शक्ती प्रदर्शन करत हजरो कार्यकर्त्यांसह नागपुरला जाणार आहेत. नवनीत राणा आज नागपूर येथे होणाऱ्या भाजपच्या नमो युवा संमेलनात उपस्थित राहणार आहेत. हजारो समर्थकासह नवनीत राणा नागपूर येथे भाजपच्या कार्यक्रमात हजेरी लावण्याची शक्यता आहे. नवनीत राणा या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे
निफाड तालुक्याचा पारा घसरला. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 8.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी पुन्हा शेकोट्या पेटल्या.
जरांगे पाटील यांचे सोलापूर बार्शीमध्ये जोरदार स्वागत. वैराग येथे सभा घेण्यासाठी जात असताना मराठा बांधवाकडून सौंदरे फाट्यावर स्वागत करण्यात येत आहे. जेसीबी वरून फुलांची पुष्पवृष्टी करत आणि क्रेनच्या साहाय्याने पुष्पहार घालून करण्यात येत आहे स्वागत.
पिंपरी चिंचवड, मुंबई ,सातारा ,सोलापूर या शहरातून पुण्यात येणाऱ्या जड वाहनांना उद्यापासून बंदी. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांचा निर्णय. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या पोलीस प्रशासनाच्या सूचना. पुण्यातून बाहेर पडण्यासाठी जड वाहनांना शहरात प्रवेश करता येणार नाही. पुणे नगर, पुणे सोलापूर, पिंपरी चिंचवड पुणे शहर या मुख्य मार्गांवर जड वाहनांना पूर्णपणे बंदी.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज महायुतीची महत्त्वाची बैठक. मंत्री चंद्रकांत पाटील घेणार महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. बारामती, शिरूर, मावळ आणि पुणे या 4 लोकसभा मतदार संघासाठी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यात होणार बैठक. महायुतीतले सर्व घटक पक्ष राहणार बैठकीला हजर. सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत चंद्रकांत पाटील करणार चर्चा. चारही लोकसभा मतदारसंघांचा चंद्रकांत पाटील आढावा घेत अहवाल देणार वरिष्ठांना. आज दुपारी बारा वाजल्यापासून पुण्यातील भाजप मुख्य कार्यालयात बैठकीचे आयोजन
शिरुरचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवारांच्या होमपिचवर अजित पवार यांची टोफ धडाडणार आहे. शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील सभास्थळावर जय्यत तयारी करण्यात आली आहे.
जे पी नड्डांच्या उपस्थितीत नागपुरात आज भाजपचं ‘नमो युवा राष्ट्रीय महा संमेलन’ होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपचं ‘मिशन युवा मतदार’ सुरु झाले आहे. महाराष्ट्रातून आज भाजपच्या ‘नमो युवा राष्ट्रीय महा संमेलना’त एक लाख तरुण येणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांची संघर्ष यात्रा रात्री उशिरासोलापूर जिल्ह्यातील बार्शीत पोहचली आहे. बार्शीकरांनी मनोज जरांगे पाटील यांचं मध्य रात्री जंगी स्वागत केले. आज दिवसभर जरांगे पाटील सोलापूर दौऱ्याच्या दौऱ्यावर असणार आहे.
पीएमपीएमएलच्या रातराणी बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सहा महिन्यांत या रातराणी बससेवेचा जवळपास 27 लाख प्रवाशांनी लाभ घेतला आहे. PMPL कडून शहरातील 5 मार्गावर रातराणी बसची सुविधा करण्यात आली आहे.