मुंबई, दि.19 जानेवारी 2024 | अयोध्येत प्रायश्चित्त पूजनाने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास मंगळवारी सुरुवात झाली. त्यानंतर बुधवारी रामलल्लाची मूर्ती गर्भगृहात विराजमान करण्यात आली. ही पूजा चार तास चालली. आज सकाळी औषधाधिवास, केसराधिवास, घृताधिवास होणार आहे तर संध्याकाळी धान्याधिवास होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर येत आहे. यावेळी पंधरा हजार घरकुलांचे त्यांच्या उपस्थितीत वाटप होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूर दौऱ्यावर जात आहेत. शीव रेल्वे उड्डाणपूल उद्यापासून पुनर्बाधणीसाठी बंद करण्यात येणार आहे. आदित्य ठाकरे यांची रविवारी पुण्यातील पिंपरीत सभा होणार आहे. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
छत्रपती संभाजीनगर येथे ब्रेकफेल झालेल्या ट्रकने अनेक गाड्यांना धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. तर अनेक जण दगावल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी मार्च २०२४ च्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हॉलतिकीट द्यायला सुरुवात होणार आहे. २२ तारखेपासून ऑनलाइन पद्धतीने हॉलतिकीट मिळणार आहे. विद्यार्थ्यांना www.mahahscboard.in या संकेतस्थळावर हॉलतिकीट मिळणार आहे.
ठाणे | अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या ऐतिहासिक आणि आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी, तमाम राम भक्तांसह आनंद व्यक्त करण्यासाठी ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे श्री राम भक्तांना ५१ हजार किलो साखर प्रसाद म्हणून वाटप करणार आहेत. मतदारसंघात दोन ठिकाणी महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून त्याठिकाणी प्रत्येक भक्ताला १ किलो साखर प्रसाद म्हणून देऊन आनंद जल्लोष केला जाणार आहे. फटाके फोडून, ढोल ताशे वाजवून, पेढे वाटून आनंद साजरा करू. ठाणे शहरामध्येही श्री राममय वातावरण तयार झाले असून २२ जानेवारीला दिवाळी साजरी करणार आहेत.
आसाम दिल्लीतून चालणार नाही, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ती आसाममधून चालवली जाईल. आसामचे मुख्यमंत्री हे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत. ते भाजपच्या इतर मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचार करायला शिकवू शकतात.
एटीएसने गँगस्टर आणि त्याच्या दोन साथीदारांना अयोध्येत अटक केली आहे. हे लोक 22 जानेवारीला एखादी मोठी घटना घडवून आणण्यासाठी रेकी करत होते. अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांपैकी एकाचे कॅनडामध्ये राहणारा खलिस्तान गँगस्टर सुखविंदर गिल याच्याशीही संबंध आहेत.
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी हवाई दलाचे हेलिकॉप्टर मंदिरावर पुष्पवृष्टी करतील. अयोध्येत प्राणप्रतिष्ठा करण्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये खेलो इंडिया युवा खेळांचे उद्घाटन केले. पंतप्रधान म्हणाले, भारतीय खेळांसाठी 2024 ची सुरुवात करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. माझे तरुण मित्र नवीन भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी येथे जमले आहेत. तुमची ऊर्जा आणि उत्साह आपल्या देशाला क्रीडा जगतात नवीन उंचीवर घेऊन जाईल.
सोलापूर | राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी कटीबद्ध आहे. आम्ही त्यासाठी सकारात्मक निर्णय घेणार असून, संयम ठेवा आणि मुख्यमंत्र्यांना संधी द्या, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात म्हणाले. “मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार पूर्णपणे कमिटेड आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही फेब्रुवारीमध्ये याबाबतचा सकारात्मक निर्णय घेऊ. सर्वांनी संयम ठेवला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना ही संधी दिली पाहिजे”, असं फडणवीस म्हणाले.
मुंबई | येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. हा सोहळा सर्वांना पाहाता यावा यासाठी 22 जानेवारीाल सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी हिवाळी अधिवेशनात राम मंदिर सोहळा निमित्त सुट्टी जाहीर करावी अशी मागणी केली होती
प्रताप सरनाईक यांच्या मागणीला यश आलं आहे.
डोंबिवलीत ६२ हजार ५०० पुस्तकांच्या माध्यमातून आयोध्येमधील राम मंदिर प्रतिकृती साकारण्यात आली. कलाकृती पाहण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर थोड्याच वेळात भेट देणार आहेत. प्रतिकृती पूर्णपणे बनून तयार झाली असून आकर्षक विद्युत रोषणाई देखल श्रीकांत शिंदे फाउंडेशन, कल्याण डोंबिवली महापालिका आणि डोंबिवली एक सांस्कृतिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
समृद्धी महामार्गावर 6 महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात पीडित कुटुंबीयांना 25 लाख रुपयाची मागणी करण्यासाठी नागपुरात संविधान चौकात राम नामाचा जप करत लक्ष वेधण्यात आले.सहा महिन्यापूर्वी झालेल्या अपघातात मृतकाच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून पाच लाख आणि केंद्र सरकारकडून दोन लाख रुपये मदत मिळाली मात्र कुटुंबीयांकडून 25 लाखाच्या मदतीची मागणी केली जात आहे.
तसेच ट्रॅव्हल्स चालक मालकावर कारवाई करून परवाना रद्द करण्याची मागणी करण्यात आली..
रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना बारामती एग्रो कारखाना प्रकरणात ईडीने त्यांना समन्स बजावले आहे. यापूर्वी बारामती एग्रोवर छापा टाकण्यात आला होता. रोहित पवार यांनी याप्रकरणात विरोधकांना लक्ष्य करण्यात आले येत असल्याचा आरोप केला होता. बुधवारी पवार यांना ईडीने चौकशीसाठी बोलवले आहे.
मुंबईच्या चारकोप परिसरात राहणारा राष्ट्रवादीचा पदाधिकारी गुरुजी उर्फ ऋषि पांडे याला महिलेच्या फसवणूक प्रकरणी बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलेल्या ऋषी पांडे याने गुरुजी बनून सोबत ओळख आहे तुम्हाला मदत करतो असे सांगून अनेकांकडून लाखो रुपये उकळल्याप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आरोपीच्या मागावर असलेल्या पोलिसांना गुंगारा देत आरोपी ऋषी पांडे हा मथुरा, गुजरात सोमनाथ उज्जैन अशा विविध मंदिरात जाऊन देवदर्शन करून अयोध्येला जाण्याच्या तयारीत असतानाच बोरिवली पोलिसांनी आरोपीला गुजरात येथून अटक केली आहे आरोपी सध्या बोरिवली पोलिसांच्या ताब्यात असून त्याने कुणाकुणाची फसवणूक केली यासंदर्भात अधिक तपास करत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या मनोरंजन मैदानात पालिकेने कब्रस्थान बनविण्याचा विरोधात नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.या उद्यानात पालिकेने दहा हजार पेक्षा जास्त झाडे लावलेली असताना त्याची कत्तल करुन हे इथे एकमेव असलेले मैदान तोडू नये अशी मागणी नागरिक करीत आहेत.घाटकोपर च्या वाधवा कॉम्प्लेक्स च्या बाजूला पालिकेचे मनोरंजन उद्यान आहे.त्याच्या बाजूला आधीच एक कब्रस्थान आहे.इथे जागा कमी पडत असल्याचे सांगत पालिकेकडे याचे विस्तारीकरण करण्याची मागणी करत झाडांना अलिंगण देत आंदोलन केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अक्कलकोट मध्ये दाखल झाले आहेत. ते अक्कलकोट मधील स्वामी समर्थ मंदिरात जाणार आहेत. त्यानंतर अक्कलकोटचे ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.
रोल्स रॉयसने भारतीय बाजारात पहिली इलेक्ट्रिक कूप Rolls Royce Spectre उतरवली आहे. या कारची एक्स शोरुम किंमत 7.5 कोटी रुपये आहे. आलिशान ईव्ही सेगमेंटमध्ये सर्वात खास कार, रोल्स रॉयस स्पेक्टरची चर्चा रंगली आहे.
नगर जिल्हा राजकीय आणि सामाजिक दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे. माझं बालपण या जिल्हात गेले त्यामुळे जिल्हातील सर्व परिस्थिती मला माहित आहे. सहकार चळवळीत या जिल्हाच मोठं योगदान, श्रीगोंदा येथील नागवाडे कारखान्यात शिवाजी बापूंच मोठं योगदान आहे. नगर जिल्हातील अनेक दिग्गज नेते सहकारी साखर कारखान्यानी राज्याला दिले. असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
शिंदे साहेबांचा शब्द कधी खाली पडू दिला नाही आणि हे शिंदे साहेबांना पण माहीत आहे. बच्चू कडू आणि मंगेश चिवटे यांनी फक्त प्रामाणिक प्रयत्न केले, ते बिचारे धावपळ करतात, त्यांचा काही दोष नाही, असे मनोज जरांगे पाटी यांनी म्हटले आहे.
देशात व बाहेर मोदी गॅरंटी चालते. लोकांनी त्यांना बेकार केले आहे ते सत्तेसाठी माश्यासारखे तडफडत आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
स्वाभिमानीचां आत्मक्लेश परिवर्तन मोर्चा धडकला एसडीओ कार्यालयावर. हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती. माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आत्मक्लेश मोर्चा. आत्मक्लेश परिवर्तन पद यात्रेचे रूपांतर मोर्चात
सर्व मराठा समाज मुंबईकडे निघतोय. 26 जानेवारीला मराठा समाज प्रचंड संख्येने मुंबईच्या गल्ली गल्लीत रस्त्या रस्त्यावर दिसणार आहे. सात महिन्यापासून हे चाल ढकल करत आहेत. जवळ आंदोलन आलं की काहीतरी निमित्त करायचं खोटं बोलायचं, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना 20 जानेवारीचे ‘चलो मुंबई आंदोलन’ टाळण्याचे आवाहन केले आहे. सरकार तुम्हाला मदत करतंय त्यामुळे आंदोलन टाळा असे ते म्हणाले आहेत.
बिल्कीस बानो प्रकरणात शिक्षा माफ करण्याचा निर्णय रद्द केल्याच्या विरोधात दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. 21 जानेवारीपर्यंत सर्व आरोपींना सरेंडर करण्याचे आदेश कोर्टाने दिला आहे.
जगातीस सर्वात मोठा ‘दशरथ दीपक’ आज संध्याकाळी प्रज्वलित होणार आहे. त्यासाठी 21 हजार लिटर तेल जनकपुर येथून आणले आहे. 22 तारखेच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर या दीपकाचे आजपासून प्रज्वलन होणार आहे. राम जन्मभूमी मंदिरामध्ये पूजेसह विविध विधी सुरु झाले आहेत.
डहाणू वाढवण बंदराला स्थानिक भूमीपुत्रासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही तीव्र विरोध केला आहे. आज पालघरच्या क्रीडा संकुलाच्या मैदानावर झालेल्या जनसुनावणीत बाहेरच्या नागरिकांना बोलावून वाढवण बंदर लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप उबाठाचे आमदार सुनील शिंदे यांनी केला आहे.
“कृषी प्रदर्शन आयोजित करणं ही काही सोपी गोष्ट नाही. हे प्रदर्शन पुढच्या काळात महाराष्ट्रासाठी औत्सुक्याचा विषय ठरेल. कमी पाण्यात कसं पीक घ्यायचं हे संगोल्यानं राज्याला दाखवून दिलं. कृषी मंत्री म्हणून गणपतराव देशमुख यांनी चांगलं काम केलंय. सगळा महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला. त्यांच्याच स्मरणार्थ हे कृषी प्रदर्शन होतंय याचा आनंद आहे,” असं शरद पवार म्हणाले.
नवी दिल्ली- राम मंदिरबाबत निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना उद्घाटनाचे निमंत्रण देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण देण्यात आले आहे. रंजन गोगोई, एस ए बोबडे, डी वाय चंद्रचूड , अशोक भूषण आणि अब्दुल नजीर यांना राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण देण्यात आले आहे.
पुण्यात पुन्हा एकदा अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. मुलाला मानसिक आजारातून बरं करण्यासाठी जादूटोणा करण्यात आल्याची घटना पुण्यातील चंदन नगर परिसरात घडली आहे. अघोरी पूजा करत 35 लाख रुपयांची भोंदूबाबाकडून फसवणूक करण्यात आली. घरातील अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि मुलाची आजारातून मुक्तता करण्यासाठी विश्वास संपादन ही अघोरी पूजा करण्यात आली होती. आणखी 50 लाख रुपये द्या, नाहीतर तुमच्या मुलाचा आणि पतीचा मृत्यू होईल. तुमच्या घराचा नायनाट होईल, असं बोलून फिर्यादीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘‘विकासपुरुष’ ही मोदी साहेबांची प्रतिमा आहे आणि याच प्रतिमेला बघून अनेक जण भाजपवासी झाले असल्याचे सांगतात. आज राज्यात कापसाला भाव नाही, निर्यातीच्या धोरणामुळे कांदा, सोयाबीन, द्राक्ष, तूर उत्पादक शेतकरी हताश आहे. पेपरफुटी, रखडलेली भरती प्रक्रिया, बेरोजगारी यामुळे युवा वर्ग निराशेच्या गर्तेत आहे. अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य कमर्चारी, कंत्राटी कर्मचारी यासारखे अनेक घटक आज आंदोलने करत आहेत. मराठा-धनगर-मुस्लीम-लिंगायत आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे, परंतु या सर्व प्रश्नाकडे राज्यसरकारच्या धुरिणांचे लक्ष जात नाही,’ असं ट्विट रोहित पवार यांनी केलंय.
“आदरणीय मोदीजी आज राज्यात आहेत. राज्यातले मोदी साहेबांचे वाढते दौरे बघता मागील काळात आलेले सर्व्हे भाजपने चांगलेच गांभीर्याने घेतलेले दिसतात आणि त्यासाठीच पक्ष-कुटुंब फोडणे, तपास यंत्रणा यांसारखे साम, दाम, दंड, भेद हे सर्व मार्ग अवलंबून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे”, रोहित पवार यांनी ट्विटरद्वारे टोला लगावला आहे.
संतांच्या मार्गदर्शनानुसार मी विशेष व्रत करतोय… माझ्या विशेष व्रताची सुरुवात नाशिक येथून झाली… सोलापुरातील कामगारांना घर मिळतंय मला आनंद झालाय… घरं मिळालेल्या लाभार्थ्यांनी घरात रामज्योत लावावी… 22 जानेवारीला घरांमध्ये रामज्योत लावा…असं आवाहन देखील मोदी यांनी केलं आहे…
डोंबिवली काटाई गावाजवळ जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया… मध्यरात्री २ वाजता फुटली जलवाहिनी…. जलवाहिनी फुटल्याने परिसरात पाणीच पाणी… जलवाहिनी फुटल्याने हवेत 30 फूट उंच पाण्याचे फवारे… एमआयडीसीकडून काम चालू…
मोदींच्या हातात यश आहे… मी पंतप्रधान मोदींचे मनापासून आभार मानतो… दावोसमध्ये अनेक देशांचे प्रमुख भेटले, सगळे मोदींचं नाव घेत होते… असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…
बुलढाण्यात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आत्मक्लेश मोर्चा असून तो जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चासाठी माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मामागील 15 दिवसांपासून स्वाभिमानीची आत्मक्लेश परिवर्तन पदयात्रा सुरू आहे .
सांगोला – गणेश रत्न राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांचही कार्यक्रम स्थळी आगमन झालं.
आसनगाव-आटगाव दरम्यान मालगाडीच्या इंजीनमध्ये बिघाड झाल्याने कसाऱ्याकडे जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. तब्बल दीड तासानंतर इंजिनमध्ये झालेला बिघाड दुरूस्त झाला. मात्र या बिघाडामुळे लोकल रद्द झाल्याने स्टेशनवर गर्दी पाहता कसारावरुन जाणाऱ्या मेलला आसनगाव पर्यत सर्व स्थानकावर थांबवण्याच्या रेल्वे प्रशासनाने सूचना दिल्या.
सोलापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी कलबुर्गी विमानतळवरून सोलापूरकडे रवाना झाले असून 5 ते 10 मिनिटात कार्यक्रमस्थळी पोहोचतील. पंतप्रधान मोदींच्या हस्ते 15 हजार घरांचे लोकार्पण करण्यात येणार आहे
दावोसची गुंतवणूक नंतर आणा, आधी राज्यातून जो रोजगार गुजरातला गेला, तो आणा, अशा शब्दांत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सुनावलं.
शिंदे, फडणवीसांच्या पाठिशी मतदार नाहीत, म्हणून मोदींचे राज्यात दौरे सुरू आहेत. राजकीय फायदा जिथे आहे, तिथेच मोदी जातात, असे टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडले.
नरेंद्र मोदींनी राहुल गांधींच्या यात्रेचा धसका घेतला, असेही ते म्हणाले.
विविध विकास कामांच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात सोलापूरमध्ये दाखल होणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घराचे वाटप करण्यात येणार आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान आवास योजनेतील 90 हजार घरांचं लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच विशेष हेलिकॉप्टरने सोलापूरात दाखल झाले आहेत. या कार्यक्रामासाठी मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित आहेत.
पंतप्रधान मोदी यांचा आज सोलापूर दौरा आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज विविध कामांचे लोकार्पण करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेष हेलिकॉप्टरने सोलापूरात दाखल झाले आहेत. पंतप्रधान मोदींच्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री शिंदे जाणार आहेत.
आज पंतप्रधान मोदी यांचा सोलापूर दौरा आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात सोलापूरमध्ये दाखल होणार आहेत.
राज्यात विविध ठिकाणी कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जाती आढळून आल्या आहे. राज्यात ५४ लाख नोंदी आढळल्या आहेत. राज्य सरकारने या नोंदींची गंभीर दखल घेतली असून या नोंदींनंतर संबंधित पात्र व्यक्तींना आजपासून कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र त्वरित उपलब्ध करून दिले जाणार आहे.
पुणे जिल्ह्यातील पाणीटंचाईचा रब्बी पिकांना फटका बसणार आहे. रब्बी हंगामातील पिकांना फेब्रुवारी महिन्यात पुरेसा पाणी मिळणार नाही. जिल्ह्यातील अनेक धरणांमध्ये अपुरा पाणीसाठा आहे.
अमेरिकेमध्ये मराठी चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी सॅन होजे (कॅलिफोर्निया) येथे राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते अभिजित घोलप यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनची (नाफा) स्थापन करण्यात आली असून त्याच्या माध्यमातून लवकरच मराठी चित्रपटांच्या निर्मितीला प्रारंभ करण्यात येणार आहे.
आयसीएसई, सीबीएसई, आयजी आणि इतर मंडळांच्या मुंबईतील २६१ शाळांनी वैयक्तिक मान्यता न घेताच शिक्षकांची नियुक्ती केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीची आयोगाने गंभीर दखल घेतली असून, मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.