मुंबई | दि. 28 फेब्रुवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 28 फेब्रुवारीला यवतमाळमध्ये बचत महिलांचा मोठा मेळावा आयोजित केला आहे. यावेळी विविध कामाचे लोकार्पण ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. राज्याचे विधिमंडळाचे अधिवेशन सुरुच आहे. अधिवेशनात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा विषय मंगळवारी चर्चेत राहिला. मुंबई विद्यापीठाचा पदवीदान समारंभ सोहळा होऊन झाले 20 दिवस झाले आहे. परंतु विद्यार्थी पदवी प्रमाणपत्र अजून मिळाले नाही. विदर्भात गारपिटमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
बेकायदेशीर खाण प्रकरणी सीबीआयने समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना समन्स पाठवले आहे. त्यांना २९ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
आम आदमी पक्षाचे देवळीचे आमदार प्रकाश जरवाल यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. डॉ. राजेंद्र भाटी यांच्या आत्महत्येप्रकरणी न्यायालयाने प्रकाश जारवाल यांना दोषी ठरवले आहे. 2020 मध्ये राजेंद्र भाटी यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पोलिसांनी सुसाईड नोटही जप्त केली होती.
सुप्रीम कोर्टात 1 मार्च रोजी ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी होणार आहे. अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
बुंदेलखंड एक्स्प्रेस वेवर बुधवारी मोठा अपघात झाला. येथे दुचाकी दुभाजकाला धडकल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. सर्वजण एकाच दुचाकीवरून जात होते. यातील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जणांचा ट्रॉमा सेंटरमध्ये मृत्यू झाला.
यवतमाळ | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळमध्ये दाखल झाले आहेत. मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर आहेत. यवतमाळमध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक योजनांचा शुभारंभ होणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अतिशय महत्त्वाचा समजला जात आहे.
मुंबई | ठाकरे गटाचे विधानपरिषद आमदार अनिल परब यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप पक्ष नाही तर गुंडांची टोळी झाली आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था कोलमडली आहे, अशा शब्दात अनिल परब यांनी भाजपवर टीका केली आहे.
पुणे | माजी खासदार निलेश राणे यांच्याबाबत ठाकरे गट आक्रमक झाला आहे. निलेश राणेंकडून मिळकत कर वसूल करण्यासाठी ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. राणेंच्या डेक्कन परिसरातील मिळकतीवर महापालिकेने कारवाई केल्यानंतर ठाकरे गटाचे आंदोलन केलं. यावेळेस ठाकरे गटाचे बँड बजाओ आंदोलन केलं.
माझ्यावर झालेल्या आरोपांची चौकशी झाली मात्र अहवाल अजून जाहीर का नाही? चांदिवाल आयोगाचा रिपोर्ट लवकर पटलावर ठेवा. माझा सगळा रिपोर्ट जनतेपुढे यावा अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे.
निलेश राणेंकडून मिळकत कर वसूल करण्यासाठी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. राणेंच्या डेक्कन परिसरातील मिळकतीवर महापालिकेने कारवाई केल्यानंतर ठाकरेही गटाचे आंदोलन केलं आहे. ठाकरे गटाने बँड बजाओ आंदोलन केलं आहे.
पुणे मेट्रोच्या कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते पोहचले. रूबी हाॅल ते रामवाडी मार्गिकेवरील मेट्रो सुरू का करीत नाही यासाठी महामेट्रो प्रशासनाला घेराव आंदोलन करण्यात आलं आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते मेट्रो कार्यालयात पोहोचले आहेत. काम का पूर्ण होत नाही? पुण्याला वेठीस का धरता? असा सवाल शिवसैनिकांनी मेट्रो अधिकाऱ्यांना विचारला.
रश्मी शुक्ला यांना मुदत वाढ मिळाली आहेत त्या यात एक्स्पर्ट आहेत. त्या कोणाच्या कार्यकर्त्या आहेत हे सगळ्यांना माहीत असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
जालना : मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सध्या स्थगित आहे. त्यामुळे अंतरवाली सराटी येथील मंडप काढण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला. मात्र, ग्रामस्थांनी मंडप काढण्यास नकार दिल्याने पोलीस प्रशासनाने काढता पाय घेतला आहे. मंडप काढतील यासाठी गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस प्रशासनाच्या दहशतीचे गावावर सावट पाहावयास मिळत आहे.
पुणे : आम्हाला मिळालेलं तुतारी चिन्ह हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. तुमच्याकडे इतका अनुभवी सेनापती आणि इतकं अनुभवी नेतृत्व आहे 14 निवडणुका त्यांनी लढवल्या आहेत या सगळ्या अनुभवाचा 100% फायदा होईल. महायुतीची ताकद मोठी आहे. 200 आमदार, 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री एवढी मोठी ताकद असताना जर उमेदवार दुसऱ्या पक्षाकडून आयात करावा लागत असेल तर गेली पाच वर्षात मी केलेल्या कामाची ही पोचपावती आहे असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला.
मुंबई : मुंबईतील सुरक्षासुद्धा महत्वाची आहे. बांगलादेशी राहत आहेत. त्यांना अधिकारी सुविधा पुरवत आहेत. 26/11 सारखे प्रकार घडले आहेत. या बांग्लादेशींना कोण घेऊन येत आहेत. सरकारने चौकशी केली पाहिजे. सरकारच्या जमिनीवर अतिक्रमण केली जात आहे. मुंबईतील हिंदू समाजाचा टक्का कमी करण्याचा प्रकार सुरु आहे असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला.
अहमदनगर : शरद पवारांचे नातू राजेंद्र पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी निशाणा साधला आहे. मी आधीच राजकारणात आलो असतो तर तेव्हाच फुट पडली असती असं वक्तव्य राजेंद्र पवार यांनी केलं. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजेंद्र पवारांनी काय वक्तव्य केलं हे माहित नाही. मात्र, तो रोहित पवारांना सूचक इशारा असला पाहिजे की फार धावपळ करू नको. जशी अजित पवारांची फसगत झाली तशी तुझी होऊ शकते असा टोला राजेंद्र पवार यांना लगावला आहे.
मुंबई : काहींना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवा असं सांगितलं जातंय. त्यातले काही जण निवडणूक लढवायला तयार पण होतायेत. भाजपने 23 जागांवर निरीक्षक नेमले आहेत. उरलेल्या जागांमध्ये अजित पवार गट आणि शिंदे गट यांना समाधान मानावे लागेल. भाजप आमदार खाजगीत सांगतायत की कामाला लागा असे सांगितलं आहे. त्यामुळे आता तर स्पष्टच झालं आहे की 23 निरीक्षक कशासाठी नेमले आहेत, अशी टीका ठकारे गटाचे नेते सचिन अहिर यांनी केली.
बारामती : माझी लढाई ही विचारांची आहे. समोरचा उमेदवार कोण आहे मला माहित नाही. सत्तेचे विकेंद्रीकरण झालं पाहिजे. दिल्लीतील कामे मी बघायचे आणि स्थानिक कामे दादा, इतर आमदार बघायचे. आमदारांच्या मध्ये मध्ये करत नव्हते. मी त्यांचा सन्मान करायचे. आज आपल्यासोबत आमदार नाहीत म्हणून लोकांना भेटत आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये म्हटले.
शरद पवारांवर जेव्हा जहरी टिका होते तेव्हा मन खिन्न होतं, शरद पवार दगड आहे का तो माणूस आहे, ऐवढं घडवून माझा काय दोष असाही विचार करत असतील ना? हे पाहून माझ्या मनावर, डोक्यावर परिणाम होतो… स्वास्थ खराब होतं..असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री सुखविंदर सुक्कु आजच राजीनामा देण्याची शक्यता. राजीनामा देण्याबाबत सुकू यांनी काँग्रेस हायकमांडची साधला संपर्क. भूपेंद्र सिंह हुड्डा आणि डिके शिवकुमार थोड्याच वेळात शिमल्यात दाखल होणार
कोर कमिटीमध्ये काय निर्णय होतो याकडे लक्ष. आपल्या विविध मागण्यासाठी सुरगाणा ते नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत काढण्यात आला आहे लाँग मार्च. गेल्या दोन दिवसापासून आंदोलकांनी घातला आहे जिल्हाधिकारी कार्यालय ला घेराव
सर्वच लोकसभेच्या जागेवर भाजपचा डोळा असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे.
राज्यात लोकसभेसाठी भाजपच्या 23 जागा पक्क्या असल्याची घोषणा निरिक्षकांनी केली आहे. विविध आमदार आणि पदाधिकाऱ्यांची निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. भाजपकडून बारामतीच्या जागेसाठी मात्र निरिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
महाविकास आघाडीच्या भीतीमुळे मोदींचे महाराष्ट्रभर दौरे होत आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. नरेंद्र मोदींना ठाकरे आणि पवारांची भीती वाटत असल्याचंही ते म्हणाले. मोदी पोहरादेवीला येतात, त्यांना पोहरादेवी प्रसन्न होणार नाही असंही राऊत म्हणाले.
भाजपकडून निवडणूकीची जय्यत तयारी सूरू आहे. पुण्यात आज भाजपचं बुथप्रमुख कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. या संमेलनात कार्यकर्त्यांना कानमंत्रही देण्यात येणार आहे.
मुंबईतील आझाद मैदानात जुनी पेन्शन संघटनेचं ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. शासकिय निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. हजारो कर्मचारी या आंदोलनात सहभागी आहेत.
पंतप्रधान मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर आहेत. वर्धा-कळंब रेल्वे मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज लोकार्पण होणार आहे. तर, वर्धा-यवतमाळ-नांदेड मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचंसुद्धा आज लोकार्पण होणार आहे.
नाशिक येथे शेतकरी आंदोलनकर्ते आक्रमक… सीबीएस चौकात अचानक रास्ता रोको सुरू… गाडया अडवून घोषणाबाजी सुरू… शांततेत सुरू असणाऱ्या आंदोलनाला आक्रमक वळण
नवीन तुतारी चिन्ह पोहोचवण्यासाठी शरद पवारांच्या सूचना … बारामती मतदारसंघातील प्रत्येक गावात २ तारखेला कार्यक्रम घ्या पक्षाच्या सूचना… तुतारी हे चिन्ह लोकांना माहित व्हावं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी २ तारखेला कार्यक्रम घ्या… मंगळवारी शरद पवारांनी ६ तास बारामतीची घेतली बैठक… २ तारखेला बारामती लोकसभा मतदारसंघात प्रत्येक गावात होणार चिन्ह अनावरण सोहळा !
कल्याण लोकसभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील उपनेत्या सुषमा अंधारे यांची पत्रकार परिषद… दुपारी बारा वाजता सुषमा अंधारे घेणार पत्रकार परिषद… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला व त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यानंतर सुषमा अंधारे यांचा दौरा
पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदेचं आंदोलन. शासनाच्या शिष्यवृत्ती धोरणाच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीला मुकावं लागत असल्याचा ABVP चा आरोप.
आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातील सर्व अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात विजय मिळविणार याची सर्वांनाच खात्री आहे. त्या अनुषंगाने गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत मावळ लोकसभा मतदारसंघ कोअर कमिटीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपने कंबर कसली असून मावळ आणि रायगड लोकसभा भाजपला मिळावा यासाठी गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रयत्न करावेत असा सूर कार्यकर्त्याचा होता.
कर्जत एमआयडीसी सदर्भात आज मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत होणार बैठक. राम शिंदे आणि सगळ्या विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. आजच्या बैठकीत ठिकाण निश्चित होण्याची शक्यता. याच एमआयडीसी वरून रोहित पवारांनी आंदोलन केलं होतं. रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात जुंपली होती तर राम शिंदे म्हणतील तिथेच एमआयडीसी होणार अस अजित पवार म्हणाले होते.
अमित शाहांचं वक्तव्य हास्यास्पद आहे. भाजपनेच घराणेशाही पोसली आहे. जय शाहने विराट कोहलीपेक्षा जास्त सिक्सर मारले की सचिन तेंडुलकर पेक्षा जास्त सेंच्युरी केल्या. त्यांना बीसीसीआयचं अध्यक्ष कोणत्या आधारे बनवलं ? अमित शाह नसते तर जय शाह बीसीसीआयमध्ये दिसले असते का ? असा खडा सवाल संजय राऊत यांनी विचारला
मविआची आज दुपारी ४ वाजता बैठक होणार आहे. आज आमची जागावाटपावर अंतिम बैठक होईल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनता दल सेक्युलर महायुतीसोबत जाणार. जनता दल सेक्युलरचे प्रदेशाध्यक्ष शेवाळे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहीलं पत्र. या पत्रात महायुतीसोबत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेच्या पोटनिवडणुकीची सर्व तयारी सुरु आहे. पोटनिवडणुकीसाठी सोलापूर येथून 700 मतदान यंत्रे आणून त्याची तांत्रिक तपासणी करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितलं.
पुणे पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्लीतून 140 किलो मफेड्रोन ड्रग्सची लंडनमध्ये तस्करी झाली आहे. दिल्लीतून अटक केलेल्या तीन आरोपींनी पुणे पोलिसांसमोर कबुली दिली. ड्रग्स प्रकरणचे धागेदोरे थेट विदेशापर्यंत पोहोचले आहेत. लंडनमध्ये अनेक वेळा ड्रग्स पाठवल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. विमानाने कार्गो द्वारे लंडनला 140 किलो ड्रग्स पाठवण्यात आलं आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावात तीव्र पाणटंचाई जाणवत आहे. तालुक्यात पाणी नसल्यामुळे पाणी विकत घेण्याची ग्रामस्थांवर नामुष्की ओढावली आहे. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई पाहायला मिळतेय. बंकलगी गावात पाण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रोश पाहायला मिळतोय. पिण्याचे पाणी पंचवीस रुपये प्रति घागर तर वापरण्याचे पाणी सत्तर रुपयांना 200 लिटर विकत घेण्याची नामुष्की आली आहे. बहुतांश बोर आणि विहिरी आटल्याने तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती आहे. पूर्वी पंधरा दिवसाला एकदा पाणी यायचे मात्र आता तेही येत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
चंद्रपूर शहर महापालिका ॲक्शन मोडवर पथकांचे गठन केले आहे. ३३ कोटींची मनपाची थकबाकी, कर भरा नाही तर जप्ती होणार आहे. चंद्रपूर महापालिका नागरिकांकडून विविध करांच्या रुपाने करांची वसुली करतात. या माध्यमातून विकासकामे केली जातात. मात्र अनेक वेळा नागरिक कर थकवित असल्याने कर वसूल करण्यासाठी महापालिकेला मोठी कसरत करावी लागते. आता मात्र महापालिकेने थकबाकीदारांकडे आपला मोर्चा वळविला असून विविध पथकांचे गठन केले आहे.
भाईंदर आझाद नगर परिसरातील पहाटे पाचच्या सुमारास भंगाराच्या गोदामाला शॉर्टसर्किटमुळे मोठी आग लागली. यात भंगाराच्या गोदामसह पन्नासहून अधिक झोपड्या जळून खाक. अग्निशमन दलाच्या 15 ते 20 गाड्या घटनास्थळी दाखल. आगीवर नियंत्रण मिळाव्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश.
खासदार हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटाच्या संपर्कात. ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा जाहीर सभेत गौप्यस्फोट. गेल्या अनेक दिवसांपासून हेमंत गोडसे मिलिंद नार्वेकरांना भेटत आहेत. गोडसेंकडून नार्वेकरांमार्फत ठाकरे गटात एंट्रीचा प्रयत्न. बडगुजर यांच्या गौप्यस्फोटाने खळबळ.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्ते आणि उपनेत्या सुषमा अंधारे या आज कल्याण दौऱ्यावर आहेत. सकाळी 11 वाजता कल्याण पश्चिमेतील के एम अग्रवाल महाविद्यालयात विद्यार्थींशी त्या संवाद साधणार आहेत. नंतर कल्याण बार कौन्सिल भेट सायंकाळी दुधनाका संपर्क कार्यालय उद्घाटन नंतर लोकग्राम गुडशेड येथे माथाडी कामगार यांच्याशी संवाद आहेत. तर सायंकाळी ७-३०-छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ त्या जाहीर सभा घेणार आहेत.
पिंपरी- चिंचवड पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. सहा जणांच्या टोळक्याने प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय सुरू करायचा म्हणून पुण्यातून मशीन घेतली. व्यवसाय तेजीत चालत नसल्याने चीन मधून ऑनलाइन बनावट नोटा छापण्यासाठी कागद मागवला आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली. 70 हजारांच्या नोटाही त्यांनी छापल्या, त्या विकत असताना देहूरोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि अवघ्या टोळीचा पर्दाफाश झाला.
पश्चिम विदर्भाला अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा. अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यात नुकसान. पश्चिम विदर्भात 44 हजार 579 हेक्टरवर शेती पिकांच नुकसान. एकूण 823 गावात शेती पिकांच नुकसान. सर्वाधिक नुकसान बुलढाणा जिल्ह्यात 21 हजार 768 हेक्टरवर. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाची नुकसानीची प्राथमिक आकडेवारी जाहीर. हातातोंडाशी आलेल्या हरभरा पिकांच सर्वाधिक नुकसान. हरभरा, गहू, कापूस, भाजीपाला व संत्रा पिकांचं नुकसान.
भारतीय जनता पार्टी कडून वर्तमानपत्रात जाहिराती देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी काय काय केलं याचा पाढा वाचला जात आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राजेंद्र साबळे यांनी छत्रपती संभाजीनगर बीड आणि जालना या तीन जिल्ह्यात जाहिराती देऊन देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला काय दिले याची माहिती दिली आहे.
पुणे मेट्रो विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी बुधवार पेठ स्थानक नावाचा बोर्ड तोडून त्याठिकाणी कसबा पेठ स्थानक असा बोर्ड लावला आहे. शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरे आणि शिवसैनिकांनी हा बोर्ड लावलाय.
अवकाळी पाऊस आणि गारपीटनंतर झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले. त्यानंतर विदर्भात पंचनामे सुरु झाले आहेत. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपिर तालुक्यात झालेल्या नुकसानीची तहसीलदार शीतल बंडगर ह्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 28 फेब्रुवारीला यवतमाळमध्ये बचत महिलांचा मोठा मेळावा आयोजित केला आहे. यावेळी विविध कामाचे लोकार्पण ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते जण संघाचे अध्यक्ष पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मारकाचे लोकार्पण सायंकाळी 4.30 होणार आहे. हे स्मारक यवतमाळ शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर नागपूर-तुळजापूर मार्गवर 300 मीटर अंतरावर दोन एकर परिसरात उभारण्यात आला आहे. 41 फूट उंचीचा हा पुतळा असून पंडीत दीनदयाल उपाध्याय यांचा जीवनप्रवास फोटोच्या माध्यमातून उलगडण्यात आला आहे.