मुंबई : राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरु केले आहे. त्याचे पडसाद आज विधानसभेत उमटले. विधानभवनात विरोधकांनीही कांदा प्रश्न उचलून धरला. विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर कापसाची टोपी, कांद्याच्या माळा घालून आंदोलन केले. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर सरकारला कांद्यासारखे सोलून काढू असा इशारा विरोधकांनी दिला. विधानसभेतही विरोधकांनी या प्रश्नावरून सरकारला जाब विचारला. कांदा, कापूस, सोयाबीन, हरभरा, द्राक्ष उत्पादकांच्या प्रश्नासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात आक्रमक झाले. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकारने तातडीने सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा करावी अशी मागणी त्यांनी केली.
राज्यातला कांदा, कापूस, सोयाबीन, हरभरा, द्राक्ष उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. त्यांचा माल कवडीमोल दराने विकला जात आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याला केवळ दोन रुपयांचा चेक दिल्याची बाब उघडकीस आली. राज्यसरकारने यावर तातडीने हस्तक्षेप करुन नाफेडसारख्या संस्थांना शेतमाल खरेदी करण्याच्या सूचना द्याव्यात तसेच केंद्र सरकारशी समन्वय साधून हे प्रश्न मार्गी लावा अशी मागणी अजित पवार यांनी केली.
महाराष्ट्र हे भारतातील मोठ्या प्रमाणावर कांदे पिकवणारे राज्य आहे. कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा ३३ टक्के वाटा असून कांदाची प्रत चांगली असल्याने निर्यातीमध्ये सुध्दा महाराष्ट्र अग्रेसर आहे. सध्या कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी फक्त ५०० ते ६०० रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरलेले आहे. कांद्याच्या दराबाबत शासनाविरोधात राज्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलने केली जात आहेत याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले
अजित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारने आपली भूमिक जाहीर करण्याची मागणी करत गदारोळ घालण्यास सुरवात केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाली आहे असे सांगितले. हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारे आहे. आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषापेक्षा जास्त मदतही केली आहे असे सांगण्यास सुरवात केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हे उत्तर सुरू असतानाच उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांच्याकडे पाहून टिप्पणी केली. काही प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य यांच्याकडे पाहून, ए बस खाली, तुला शेतीमधलं काय कळतंय असं म्हणत टोला लगावला. त्यांच्या या टोल्याने शिवसेना आमदारांमध्ये हास्याची एकच खसखस पिकली. आदित्य ठाकरे यांना लागवलेला हा टोला ऐकूनही उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना शांत बसण्यावाचून गत्यंतर नव्हते.