मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीनंतर आता आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे. देवेंद्र फडणवीस 3.0 सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधीचा कार्यक्रम आज नागपुरातील राज भवनात पार पडला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली. नव्या सरकारमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपकडून नव्या मंत्रिमंडळात तब्बल 10 नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. भाजपकडून कोणकोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येत आहे आणि त्यांची आतापर्यंतची काय-काय कारकीर्द राहिलेली आहे, याची सविस्तर माहिती आम्ही आपल्याला देत आहोत.
भाजप आमदार नितेश राणे हे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते गेल्या तीन विधानसभा निवडणुकींमध्ये आमदार म्हणून निवडून आले आहेत. नितेश राणे हे भाजपचे आक्रमक तरुण नेते आहेत. नितेश राणे हे भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे चिरंजीव आहेत. तसेच नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे हे देखील या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर कुडाळ मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे एकाच कुटुंबात दोन आमदार आणि एक खासदार असं चित्र आहे. नितेश राणे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय टोकाची टीका केली. त्यांनी विरोधकांवर अतिशय आक्रमकपणे निशाणा साधला. ते राज्यभरात फिरले. त्यांच्या विविध सामाजिक कामे, मतदारसंघातील कामे आणि विरोधकांवर तुटून पडण्याची भाषाशैली यामुळे पक्षाने खूश होत त्यांना मंत्रिपदाची संधी दिली आहे.
मेघना बोर्डीकर या परभणीच्या जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्या दोन वेळा या मतदारसंघातून जिंकून आल्या आहेत. बोर्डीकर यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर हे या मतदारसंघातून 5 वेळा आमदार म्हणून जिंकून आले आहेत. बोर्डीकर हे आधी काँग्रेसमध्ये होते. पण नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांच्या कन्या मेघना बोर्डीकर यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आमदारकी जिंकली. यावेळी त्यांची दुसरी टर्म आहे. त्यांच्या कार्यावर खूश होत पक्षाने त्यांना मंत्रिपदाची संधी दिली आहे.
माधुरी मिसाळ या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. मिसाळ या 2009 पासून या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. त्या सलग 4 वेळा पर्वती मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यांच्या कामांमुळे भाजप पक्षाने त्यांना यावेळी राज्य मंत्रिपदाची संधी दिली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक हे महायुती सरकारमध्ये पहिल्यांदा मंत्री होत आहेत. गणेश नाईक हे भाजपचे नवी मुंबईतील ताकदवान नेते आहेत. ते 2004 पासून आमदार म्हणून सलग पाचव्यांदा निवडून आले आहेत. गेणेश नाईक यांचं नवी मुंबईत असलेलं राजकीय वर्चस्व पाहता पक्षाने त्यांना यावेळी मंत्रिपदाची संधी दिली आहे. गणेश नाईक यांचा आधी शिवसेना, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आता भाजप असा त्यांचा प्रवास राहिला आहे. त्यांचा 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश झाला होता.
जयकुमार गोरे हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. गोरे हे सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघातून चारवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
शिवेंद्रराजे भोसले हे 2019 मध्ये सातारा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते आता पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. शिवेंद्रराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्यांची साताऱ्यात मोठी ताकद आहे. त्यांना यावेळी भाजप पक्षाने मंत्रिपदाची संधी दिली आहे.
पंकज भोयरे हे सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते वर्धा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांच्यावर पक्षाने आता राज्य मंत्रिपदाची मोठी संधी दिली आहे.
अशोक उईके हे राळेगाव मतदारसंघाचे आमदार आहेत. ते 2014, 2019 आणि 2024 च्या निवडणुकांमध्ये सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे पक्षाने त्यांना मंत्रिपदाची संधी दिली आहे.
आकाश फुंडकर हे बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आकाश फुंडकर हे भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश फुंडकर यांचे चिरंजीव आहेत. ते खामगांव मतदारसंघातून सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. भाजप पक्षाने आकाश फुंडकर यांनी केलेल्या विकासकामांचं रिपोर्ट कार्ड पाहून मंत्रिपदाची संधी दिली आहे.
संजय सावकारे हे भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर आमदार म्हणून जिंकून आले होते. त्या काळात ते राज्यमंत्री होते. यानंतर त्यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते प्रत्येक विधानसभा निवडणुकीत जिंकून येत आहेत. त्यांनी केलेली विकासकामे पाहता पक्षाने यावेळी त्यांना थेट मंत्रिपदाची संधी दिली आहे. सावकारे हे आज पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री बनले आहेत.