“आधीच्या सरकारने मेट्रो 3, अटल सेतू, कारशेड, समृद्धी हायवे प्रकल्प बंद केला होता. आपल्या मनातलं सरकार स्थापन झाल्यावर हे सगळे स्पीड ब्रेकर आम्ही काढले. स्टे हटवला. सगळी कामं सुरु केली. म्हणून आपल्याला एवढच सांगेन मविआ सरकारच अडीच वर्षाच काम, आपल्या सरकारच दोन वर्षाच काम. होऊन जाऊ द्या जनतेच्या दरबारात दूध का दूध पानी का पानी” असं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिलं. ते नवी मुंबईत सिडकोच्या कार्यक्रमात बोलत होते. “मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत तिथेही हे सावत्र भाऊ योजना बंद पाडण्यासाठी कोर्टात गेले. कोर्टाने त्यांच्या मुस्कटात लावून दिली. मुंबई हायकोर्टात गेले होते. आता नागपूरच्या कोर्टात गेलेत. सुनील केदारचा काँग्रेस मविआचा माणूस. मुंबईत कोर्टात गेलेला माणूस उबाठाचा होता” असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला.
“हे सगळे लोक तुमच्यासाठी तयार केलेल्या योजना बंद पाडण्याच्या चक्करमध्ये आहेत. पैसा खात्यात येऊ लागले, तेव्हा बोलले लवकर काढा, नाहीतर सरकार काढून घेईल. अरे, हे देणारं सरकार आहे, घेणारं नाही. ही लेना बँक नाही, देना बँक आहे” असं मुख्यमंत्री म्हणाले. “ज्या सावत्र भावांनी खोडा घातला, ते तुमच्याकडे आल्यावर जोडा दाखवा. त्याला विचारा, का रे बाब आमच्या मुलाबाळांच्या तोंडातला घास हिरावून घेत होतास” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
‘भ्रष्टाचाराचा एक डाग नाही’
“लाडक्या बहिण योजनेद्वारे 1500 रुपये, शेतकऱ्यांना मोफत वीज बिल, युवक प्रशिक्षण योजनेद्वारे तरुण-तरूणींना 6 ते 8 हजार रुपये. मोफत उच्च शिक्षण. बघतो, करतो, पाहतो, कमिटी वैगेरे नाही, डायरेक्ट डिबिटी. आज डिबिटीच्या माध्यमातून पैसे देतोय. हे सर्वसामान्यांच सरकार आहे. मागच्या 10 वर्षातील मोदी सरकारने केलेलं काम आणि 50-60 वर्षातील काँग्रेसच्या राजवटीतील कामाची तुलना करा. मोदी सरकारने केलेल्या कामात भ्रष्टाचाराचा एक डाग नाही. तुम्ही कोविड सेंटर, खिचडी, डेडबॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले. तुम्हाला भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार काय?” असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केला.
‘लाडक्या बहिणीने सरकारची ताकद वाढवली, तर…’
“कोणीही माय का लाला आला, तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. उलट लाडक्या बहिणीने सरकारची ताकद वाढवली, तर 1500 चे 2000. पुढे अडीच हजार करु. द्यायची वेळ येईल, तेव्हा हात आखडता घेणार नाही. हे पैसे जनतेचे आहेत. पूर्वीच हफ्ते घेणारं सरकार होतं. हे बहिणींच्या खात्यात हफ्ते भरणारं सरकार आहे” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.