मुंबईः मी जिकडे जाईन तिकडे माझं मंत्रालय असतं. अरे गाडीतूनही माझं काम सुरु आहे, लोकं माझ्याकडे येतात मी सही करून कामं करतोय, असं वक्तव्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी टीकाकारांना शांत केलंय. शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली होती. हे सरकार अस्तित्वात आल्यानंतर अजून मंत्रिमंडळ विस्तार नाही. मंत्रालयाची कामं अडली आहेत, अशी टीका करण्यात आली होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईतील एका भाषणातून यावर सणसणीत उत्तर दिलं. औरंगाबादचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आज मुंबईत शक्तिप्रदर्शन केलं. शेकडो शिवसैनिकांसह (Shivsainik) ते मुंबईत दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा त्यांनी सत्कार केला. यावेळी शिवसैनिकांच्या मेळाव्याला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी मागील आठवड्यात कशा प्रकारे या सरकारने कामं केली, हे सविस्तर सांगितलं.
मुंबईत भाषणात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘ काही लोकं म्हणतात, मंत्रालय सुरु नाही. मी जिकडे जाईन तिकडे माझं मंत्रालय आहे. गाडीतूनही काम सुरु आहे. माझ्या हातात लोकं लेटर देतात. मी लगेच सही करतो. मेल फॉरवर्ड करतो. कारण आता मी मुख्यमंत्री आहे. माझा लिहिलेला शब्द महत्त्वाचं आहे. नंदनवनला गेलो, ठाण्याला दिघे साहेबांच्या आश्रमात गेलो, तिथेही माझं काम चालूच आहे. पण चर्चा करणाऱ्यांना करू द्यात. दररोज सकाळी सात वाजता पूरपरिस्थितीचा आढावा घेतोय. अधिकाऱ्यांशी चर्चा आहे. सगळ्या टीम अलर्ट आहेत, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडण्याविषयीच्या भूमिकेवर पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, ‘ मी घेतलेली भूमिका ही लोकांनी स्वीकारलेली आहे. माझ्यासोबत 8 मंत्री आहेत. सत्तेतील लोकं बाहेर पडली. एक दोन नाही 50 जण बाहेर पडले. अनेकांनी सांगितलं की आम्ही हे देतो, ते देतो, मी म्हटलं की आम्ही काही मिळवायला आलोच नाहीच. भाजपाविषयीही वाईट मत तयार केलं. आमदारांच्या खच्चीकरणासाठी आलो आहे, मुख्यमंत्रीपदासाठी आलेलो नाही. मी चार पाच वेळा सांगितलं की आमदारांची भूमिका समजून घ्या. पण ऐकलं नाही. शिवसेना, शिवसैनिकांना वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला. भाजपाबाबत गैरसमज होता, सीएमपदाच्या खुर्चीसाठी काहीही करतात, असे सांगू लागले. पंतप्रधान, गृहमंत्री, अध्यक्ष, देवेंद्रजी यांनी सीएमपदाची खुर्ची दिली. त्यांचे आभार मी मानले आहेत. मी एकटा मुख्यमंत्री नाही, तुम्ही 50 जण मुख्यमंत्री आहात. आता प्रत्येक शिवसैनिकाला वाटतंय की तो मुख्यमंत्री आहे. तो त्याची गाऱ्हाणी सांगतोय. तुमच्या हक्काचा माणूस सहाव्या मजल्यावर आहे. खच्चीकरण, अन्याय, खोट्या केसेस होऊ देणार नाही. लढवय्या आणि आंदोलन करणारा शिवसैनिक आहे, असं वक्तव्य एकनाथ सिंदे यांनी केलं.