मुंबई : आज पंतप्रधान मोदी (Pm Modi) यांच्यासोबत सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांची (Cm Uddhav Thackeray) बैठक पार पडली. त्यात कोरोनासंदर्भात (Corona Update) पुन्हा काही सूचना देण्यात आल्या आहेत. कारण पुन्हा कोरोना रुग्णवाढीने डोकं वर काढलं आहे. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. तसेच मास्क आणि तर परिस्थितीवरही सविस्तर भाष्य केले आहे. राज्यात कोरोना रुग्ण वाढल्यास चाचण्या वाढवल्या जाणार आहेत. तसेच सध्या राज्यात कोरोनास्थिती गंभीर नाही, असे राजेश टोपे म्हणाले आहेत. तर टेस्टिंग करु, जिनोमिक सिक्वेन्सिंग करु, ट्रॅक टेस्ट करु, व्हॅक्सिनेशन वाढवू, आपल्या देशात ओमिक्रॉनचेच व्हेरिएंट आहेत, त्यामुळे अजून तरी चिंतेचं कारण नाही, असेही आरोग्यमंत्री टोपे म्हणाले आहेत. त्यामुळे तुर्तास जरी काळजी करण्याचे कारण नसले तरी राज्य शासन आणि केंद्र सरकार संभाव्य धोका लक्षात घेऊन पुन्हा अलर्ट मोडवर आले आहे.
यावेळी राजेश टोपे यांनी राज्यातील लसीकरणाची स्थिती आणि आगामी काळातील प्लॅनही सांगितला आहे. लसीकरणात आपण केंद्राच्या सरासरी एवढे आहोत. जिथे कमी आहोत ते लसीकरण वाढवणार आहोत. पुन्हा राज्यासमोर हे एक मोठं काम आहे. 6 ते 12 पर्यंतच्या वयोगटासाठी लसीकरण सुरू करणार आहोत, अशी माहितीही यावेळी टोपे यांनी दिली आहे. आजच पंतप्रधानांनी याबाबत सूचना केल्या आहेत, 12 ते 15 वयोगट आणि 15 ते 17 वयोगटातही लसीकरण कमी झालं आहे, ते वाढवण्यावर भर देणार आहोत. तसेच प्रीकॉशन डोसमध्येही मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाईल, अशा सूचनाही राजेश टोपे यांनी दिल्या आहेत.
आता सुरूवातील ज्येष्ठ नागरिक आणि आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच फ्रंटलाईन वर्करच्या बुस्टर डोसवर भर देण्यात येणार आहे. सर्व फ्रंटलाईन वर्कर आणि हेल्थ वर्कर प्लस, ज्येष्ठ नागरिकांना तिसरा डोस सुरू आहे, असेही टोपे म्हणाले, तसेच मास्क सक्ती पुन्हा होणार का असाही प्रश्न सर्वांसमोर आहे. याबाबतही आरोग्यमंत्र्यांनी संकेत दिले आहेत. कदाचित गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क बंधनकारक असा निर्णय मुख्यमंत्री जाहीर करू शकतात, मास्क सक्ती करावी की नाही याबाबत मुख्यमंत्री ठरवतील, मात्र गर्दीच्या ठिकाणी सक्तीचं करावं अशी चर्चा आज झाली आहे, असे संकेत टोपे यांनी दिले.
आता राज्य शासन अलर्ट मोडवर आल्याने पुन्हा रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुविधा वाढवण्याबाबतही आज चर्चा झाली आहे. खर्चाच्या तयारीत महाराष्ट्र देशात सर्वात पुढे आहे. यात राज्याने चांगली कामगिरी केली आहे.
सर्व रुग्णालयांना फायर ऑडिट करण्यास सूचना दिल्या आहेत. तसेच मेंटेनन्सच्या बाबतीतल्याही सूचना दिल्या आहे, अशी माहिती या पत्रकार परिषदेत टोपे यांनी दिली.