मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील शेकडो लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यातील शेकडो लोककलावंत, लोक कलाकार, लोककला पथकांचे चालक, मालक, निर्माते यांना कोवीड आर्थिक संकटाला मोठे तोंड द्यावं लागलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्यासोबत एक बैठक पार घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कलाकारांसाठी एक रकमी कोविड दिलासा पॅकेज देण्यास मान्यता दिली आहे. यासंदर्भात विस्तृत प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर लगेच आणावा असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख यांची एक बैठक झाली होती. (State government has given relief to folk artists who are in financial crisis due to Corona)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोककलावंतांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याचा फायदा शाहिरी, खडीगंमत, संगीतबारी, तमाशा फड, दशावतार, नाटके, झाडीपट्टी, सर्कस, टुरिंग टॉकीज, विधी नाट्य यामधील कलाकारांना होणार आहे. त्यामुळे जवळपास दीड वर्षापासून आर्थिक संकटात सापडलेल्या या लोककलावंतांना काहीसा आर्थिक आधार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्र कोविड संसर्गाशी लढा देत आहे. राज्यातील कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असल्याने अनेक कलाकारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील 56 हजार कलाकारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घोषणा केली.
राज्यात सध्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे येथे जवळपास 8 हजार कलाकार आहेत. राज्यात उर्वरित जिल्हयात जवळपास 48 हजार कलाकार आहेत. या सर्व कलाकारांना प्रती कलाकार 5 हजार रुपये मदत देण्यात येणार असून यासाठी जवळपास 28 कोटी रुपये खर्च होणार आहे.
राज्यात प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात विविध कलापथके कार्यरत आहेत. कोविडमुळे वर्षभरात प्रयोग न झाल्याने त्यांच्यापुढे आर्थि संकट उभे असून शाहिरी, खडीगंमत, संगीतबारी, तमाशा फड पूर्णवेळ, तमाशा फड- हंगामी,दशावतार, नाटक, झाडीपट्टी, विधीनाट्य, सर्कस आणि टुरींग टॉकीज अशा जवळपास 847 संस्थांतील कलाकारांना मदत करण्यात येणार असून यासाठी 6 कोटी रुपये खर्च होणार आहे. याशिवाय राज्यातील कलाकारांचे सर्वेक्षण, कलाकार निवड आणि इतर अनुषंगिक खर्च यासाठी 1 कोटी रुपये खर्च होणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री देशमुख यांनी सांगितले.
आंबेडकरी गायक, भीम शाहीर, भारुड, तमाशा आदी लोककलावंतांना महाराष्ट्र राज्य शासनाने लॉकडाऊनच्या काळात 10 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी 1 मे रोजी केली होती. “महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे राज्य आहे. आज महाराष्ट्राच्या स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन आहे. तसेच जागतिक कामगार दिन कामगारांना प्रेरणा देणारा आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांना 8 तासांचा दिवस आणि साप्ताहिक सुट्टी सारखे अनेक न्याय देणारे निर्णय घेतले,” असंही आठवले यांनी त्यावेळी नमूद केलं.
महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधत रामदास आठवले यांनी राज्यातील आंबेडकरी गायक कलावंतांना प्रत्येकी रुपये 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली होती. आठवले यांचे 1 महिन्याचे वेतन 2 लाख रुपये आहे. त्यातून त्यांनी 40 गायक कलावंतांना प्रत्येकी 5 हजाराची आर्थिक मदत जाहीर केली. यावेळी सीमा आठवले याही उपस्थित होत्या.
आंबेडकरी गायक; भीम शाहीर; तमाशा कलावंत; लोक कलावंत आदी कलावंतांना लॉक डाऊन च्या काळात राज्य सरकार ने प्रत्येकी 10 हजाराची मदत करावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे.त्याबाबत चे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. pic.twitter.com/bvaDS38dqZ
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) May 1, 2021
संबंधित बातम्या :
अंजिठा-वेरुळ परिसरात आंतरराष्ट्रीय बौद्ध केंद्र, प्रस्ताव सादर करण्याचे धनंजय मुंडे यांचे निर्देश
state government has given relief to folk artists who are in financial crisis due to Corona