Maharashtra Political Crisis | बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंविरोधात पवार कुटुंबातील ‘ही’ व्यक्ती लढवू शकते लोकसभा निवडणूक

| Updated on: Jul 04, 2023 | 8:51 AM

Maharashtra Crisis | आता बारामती मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक कोण लढवणार? हा प्रश्न विचारला जातोय. लोकसभा निवडणुकीच्यावेळी पवार कुटुंबातच सामना रंगण्याची शक्यता जास्त आहे. भाजपाने नेहमीच बारामती जिंकण्यासाठी पूर्ण जोर लावला आहे.

Maharashtra Political Crisis | बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंविरोधात पवार कुटुंबातील ही व्यक्ती लढवू शकते लोकसभा निवडणूक
Sharad pawar-Supriya Sule
Image Credit source: ANI
Follow us on

मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भकूंप झाला आहे. अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांचे काका आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या भूमिकेला आपलं समर्थन नसल्याच म्हटलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अजित पवार आपल्यासोबत आमदार आणि नेत्यांना घेऊन गेले आहेत. अजित पवारांनी त्यांच्याकडे आमदारांच समर्थन असल्याचा दावा केला आहे. अजित पवार यांचे समर्थक नेते आणि शरद पवार गटाचे समर्थक नेते आपणच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस आहोत, असा दावा करतायत.

पुढच्या काही दिवसात शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोणाची? यासाठी दोन्ही गट निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतात. त्याशिवाय न्यायालयीन लढाई सुद्धा लढली जाण्याची शक्यता आहे.

असा निर्माण होईल पेच

अजित पवार भाजपासोबत गेल्याने निश्चित भाजपाची ताकत वाढली आहे. पण त्यासोबतच स्थानिक पातळीवर काही समीकरण बिघडली आहेत. एकनाथ शिंदे गटातील शिवसेना आमदारांचा काही मतदारसंघात थेट राष्ट्रवादी काँग्रेसशी सामना आहे. तिथे विधानसभा निवडणुकीच्यावेळी जागा वाटपाचा पेच निर्माण होऊ शकतो.

बारामती पवार कुटुंबाचा बालेकिल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसमधील हे राजकारण भविष्यात कुठल्या दिशेने जाईल हे लवकरच स्पष्ट होईल. पण असे दोन गट कायम राहिल्यास बारामतीमध्ये काय होणार? हा प्रश्न राजकीय जाणकार उपस्थित करत आहेत. बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. मागच्या अनेक वर्षांपासून बारामतीवर पवार कुटुंबाची घट्ट पकड आहे. इथे लोकसभा असो वा विधानसभा नेहमीच बारामतीकरांनी पवार कुटुंबाला साथ दिली आहे.

बारामतीमधून उमेदवारी कोणाला ?

लोकसभा निवडणुकीत आधी शरद पवार त्यानंतर त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी सातत्याने बारामतीमधून निवडणूक जिंकली आहे. विधासभेला नेहमीच इथून अजित पवार भरघोस मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. आता शरद पवार आणि अजित पवार यांच्यामधील राजकीय लढाई कायम राहिल्यास बारामतीमधून उमेदवारी कोणाला मिळणार? हा प्रश्न विचारला जातोय.

आता त्यांची सुद्धा पंचाईत

बारामती लोकसभा मतदारसंघात मराठा समाजानंतर धनगर मतदारांची संख्या मोठी आहे. सध्या भाजपाने गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेवर पाठवलं आहे. ते धनगर समाजाचे आहेत. गोपीचंद पडळकर हे मूळचे वंचित बहुजन आघाडीचे होते. त्यांनी बारामतीमधून अजित पवारांविरोधात विधानसभेची निवडणूक लढवली. पण त्यांचा मोठा पराभव झाला. गोपीचंद पडळकर यांनी नेहमीच पवार कुटुंबाविरोधात तिखट शब्दांचा वापर केला आहे. आता त्यांची सुद्धा पंचाईत झाली आहे.

भाजपाचा नेहमीच या जागेवर डोळा

2014 च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे या बारामतीमधून 70 हजारच्या फरकाने निवडून आल्य़ा. त्यांच्यासमोर राष्ट्रीय समाज पार्टीचे महादेव जानकर यांचं आव्हान होतं. जानकरांना भाजपाचा पाठिंबा होता. लोकसभा असो, वा विधानसभा भाजपाने नेहमीच पवार कुटुंबाकडून बारामतीची जागा जिंकण्याचा प्रयत्न केला आहे.

सुप्रिया सुळेंविरोधात कुठला पवार मैदानात उतरणार?

आता अजित पवार महायुतीच्या सरकारमध्ये आले आहेत. भाजपा बारामती जिंकण्याच स्वप्न पूर्ण करण्यासाठी अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारला उमेदवारी देऊ शकते. म्हणजे सुप्रिया सुळेंविरोधात पार्थ पवार मैदानात असेल, असं एका वरिष्ठ भाजपा नेत्याने हे सांगितलं. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे. पार्थ पवारने 2019 मध्ये पुण्याच्या मावळमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. पण त्याचा पराभव झाला होता.