महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा अखेर थंडावल्या आहेत. प्रचाराचा शेवटचा दिवस हा सर्वाधिक धुमधडाक्याचा ठरला. प्रत्येक पक्षाचे नेते रस्त्यावर उतरलेले बघायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची शेवटच्या तासात बारामतीत सभा पार पडली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीदेखील शेवटची प्रचारसभा ही बारामतीतच पार पडली. शेवटच्या तासाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या देखील सभा पार पडल्या. या सभांमध्ये प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडून विरोधकांवर शरसंधान साधण्यात आलं. प्रत्येक पक्षाच्या सभेमुळे निवडणुकीत प्रचंडल रंगत आलेली बघायला मिळाली. अखेर आज संध्याकाळी 6 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आता अतिशय कडेकोटपणे आचारसंहितेचं पालन राजकीय पक्षांना करावं लागणार आहे. कारण संध्याकाळी सहा वाजेपासून कोणत्याहीप्रकारे प्रचार केल्यास निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाणार आहे.
महाराष्ट्र विधानसभेसाठी आता येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे. त्यानंतर 23 तारखेला निकाल समोर येणार आहे. या निवडणुकीच्या निकालाकडे महाराष्ट्राचं जास्त लक्ष लागलेलं होतं. कारण गेल्या अडीच वर्षांपूर्वी ज्या काही घडामोडी घडल्या ते पाहिल्यानंतर सर्वसामान्य जनतेची त्या घटनांवर प्रतिक्रिया काय आहे? याचं उत्तर या विधानसभा निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे. अर्थात त्या घटनेनंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत महायुतीला यश मिळालं. पण लोकसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला सपाटून मार खावा लागला. लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांची घोषणा केली. विशेष म्हणजे दीड कोटींपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यांमध्ये या योजनेचे पैसे आले आहेत. या योजनेमुळे महायुती सरकारची लोकप्रियता वाढली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वातावरण थोडं वेगळं आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात काँटे की टक्कर आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार संघर्ष बघायला मिळाला. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यभरात ठिकठिकाणी प्रचारसभा घेतल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात सभा घेतल्या. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील राज्यभरात सभा घेतल्या. या निवडणुकीत शरद पवार अतिशय आक्रमक बघायला मिळाले. त्यांनी वयाच्या 83 व्या वर्षी संपूर्ण राज्य पिंजून काढत झुंजारपणे प्रचार केला.
या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ठाकरे बंधूंमध्ये टोकाची टीका-टीप्पणी बघायला मिळाली. राज ठाकरे यांच्याकडून पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांचा गद्दार असा उल्लेख करण्यात आला. राज ठाकरेंच्या या टीकेला उद्धव ठाकरे यांनीदेखील प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे यांच्याकडून राज ठाकरे यांचा पक्षाचा गुजरात नवनिर्माण सेना असा उल्लेख करण्यात आला.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात विधानसभा निवडणुकीदरम्यान, प्रचाराचा झंझावात केला आणि एकूण 64 ठिकाणी त्यांच्या रॅली, रोडशो आणि सभा झाल्या. यातील दिवाळीनंतर झालेल्या 50 वर सभा त्यांनी अवघ्या 13 दिवसांत केल्या, म्हणजे सरासरी 4 सभा त्यांनी दररोज घेतल्या. आज वर्धा जिल्ह्यात आर्वीत शेवटची सभा घेतली आणि प्रचाराची सांगता केली. हा प्रवास त्यांनी 25 पेक्षा अधिक जिल्ह्यात केला असून, उर्वरित जिल्ह्यांत व्हीडिओ संदेशाच्या माध्यमातून त्यांनी प्रतिनिधीत्त्व केले. या सभांमध्ये प्रामुख्याने शेतकर्यांसाठीच्या योजनांवर त्यांनी भर दिला. शेतकर्यांना मोफत वीज, दिवसा वीज, सौरकृषीपंप, एक रुपयांत पीकविमा, यासह सरकार येताच शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्यात येईल, किसान सन्मान निधी 12 हजाराचा 15 हजार करणार, एमएसपीवर भावांतर योजना लागू करुन सोयाबीनला 6000 भाव देणार, खतांवरील राज्य जीएसटीचा परतावा असे अनेक मुद्दे मांडले.
लाडकी बहिण, लेक लाडकी, अर्ध्या तिकिटात एसटी प्रवास, 3 मोफत सिलेंडर, मुलींना मोफत उच्च शिक्षण, लखपती दिदी या महिलांसाठीच्या योजना त्यांनी भाषणातून मांडल्या. लाडक्या बहिणींना आता 1500 वरुन 2100 रुपये देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासोबतच स्थानिक सिंचनाचे प्रकल्प, उद्योग, रोजगार इत्यादींबाबत त्या त्या मतदारसंघात सरकारने काय काम केले, अशा बहुतेक स्थानिक मुद्यांवर त्यांनी भर दिला.
विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आज संपला आहे. राज्यातील विविध पक्षांच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तब्बल ६१ सभांना संबोधित करत सभांची एकसष्टी गाठली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या सभांच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण असे महाराष्ट्राचे पाचही विभाग पिंजून काढले आहे. त्यानुसार पश्चिम महाराष्ट्र ३७, मराठवाड्यात ९, विदर्भात २, उत्तर महाराष्ट्र ५, मुंबई – कोकण विभागात ८ सभांचा समावेश होता.
या सभांमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. राज्यातील शेतकऱ्यांवर असलेला कर्जाचा बोजा, सोयाबीन, कापूस आणि अन्य पिकांना न मिळणारे भाव, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकला. बेरोजगारीवर बोलताना त्यांनी राज्यातील प्रकल्प राज्याबाहेर कसे गेले, राज्यातील पदे कसे रिक्त आहेत, राज्यात गुंतवणूक आणली जात नाही याबाबत सांगितले. लाडकी बहिण योजनेवर बोलत असताना जयंत पाटील यांनी सामान्य गृहिणी आणि सामान्य जनतेला महागाईचा होणारा त्रास सांगितला. विविध आकडेवारी मांडून महिलांना राज्यात सुरक्षित वातावरण नसल्याचे त्यांनी सांगितले. जयंत पाटील यांनी राज्य सरकारच्या विविध विभागात होणाऱ्या भ्रष्टाचार आणि याच भ्रष्टाचारामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याचे सांगितले.
महाविकास आघाडी सत्तेत आल्यास राज्यात पंचसूत्री राबवली अशी ग्वाही द्यायला जयंत पाटील विसरले नाहीत. या पंचसूत्री अंतर्गत कुटुंब रक्षणासाठी २५ लाख रुपयांपर्यंत विमा कवच मिळणार. महालक्ष्मी योजनेंतर्गत माता भगिनींना तीन हजार रुपये महिना, मोफत बसप्रवास सेवा मिळणार. कृषी समृद्धीसाठी शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार तसेच नियमित कर्जफेडीसाठी ५० हजार रुपये प्रोत्साहन मिळणार. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यास जातनिहाय जनगणना करणार, आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटणार. युवकांना उज्ज्वल भविष्यासाठी ४ हजार रुपये दरमहा देणार तसेच राज्यात गुंतवणूक वाढवून रोजगार निर्मिती करण्यासाठी प्रयत्न केले जाईल असे ते म्हणाले.