काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत जागा वाटपावरुन वाद सुरु असताना उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस तसंच संजय राऊत यांनी अमित शाहांची भेट घेतल्याची बातमी एका माध्यमानं दाखवली आणि संजय राऊत प्रचंड भडकले. भाजपसोबतच्या भेटीची बातमी चुकीची असून आमच्यावर शंका घेणारे एका बापाचे नाहीत, असा हल्लाबोल राऊतांनी केलाय. भाजपसोबत हातमिळवणीचा संबंधच नाही. भाजप सोबत जाणं म्हणजे औरंगजेबशी हातमिळवणी करण्यासारखं आहे, असा हल्लाबोल राऊतांनी केलाय.
इकडे काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा वाद मिटवण्यासाठी शरद पवारांनी मध्यस्थी केल्याची माहिती आहे. आधी आदित्य ठाकरे आणि अनिल परबांनी काँग्रेसच्या भूमिकेची माहिती पवारांना दिली. त्यानंतर शरद पवारांनी काँग्रेसच्या हायकमांडशी संपर्क साधला. रात्री उशिरापर्यंत जयंत पाटील मातोश्रीवर होते, पवार-काँग्रेस हायकमांडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती जयंत पाटलांनी ठाकरेंना दिली. आता तिढा असलेल्या जागांवर महाविकास आघाडीची उद्या पुन्हा बैठक आहे.
तर दिल्लीत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गेंच्या उपस्थितीत काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक झाली. ज्यात उमेदवारांच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब झालंय. या बैठकीआधी विदर्भातील 12 जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सोडू नका, अशी भूमिका महाराष्ट्रातील नेत्यांनी काँग्रेस हायकमांडसमोर घेतल्याची माहिती आहे.
काहीही करा विदर्भातील 12 जागा ठाकरे गटाला सोडू नका, अशी भूमिका महाराष्ट्रातील नेत्यांनी घेतल्याची माहिती आहे. दिल्लीतील काँग्रेसच्या बैठकीत राज्यातील नेत्यांची आक्रमक भूमिका घेतल्याचं कळतंय. ठाकरेंच्या शिवसेनेची ताठर भूमिका असून तुम्ही झुकतं माप देऊ नका असं महाराष्ट्रातील नेत्यांनी सांगितल्याचं समजतंय. ठाकरेंची शिवसेना शरद पवारांकडे असलेल्या जागा का मागत नाहीत?, असा सवालही महाराष्ट्रातल्या नेत्यांचा आहे. जागावाटपात ठाकरेंच्या शिवसेनेकडून सहकार्य नसल्याचाही काँग्रेस नेत्यांचा सूर आहे.
विदर्भात विशेषत: नागपूर, अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला काही जागा वाढवून हव्या आहेत. मात्र काँग्रेस त्यासाठी तयार नसल्यानं दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस 105-110 जागा, ठाकरेंची शिवसेना 95-100 जागा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 80-85 जागा लढू शकते. पण सध्या तरी भाजपनं 99 जागांची यादी जाहीर करुन बाजी मारलीये.