मुंबईः राज्यातील सहकारी संस्थ्यांच्या (Cooperative society) शिखर संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चार संस्थांच्या निवडणुकीसाठी (Cooperative society Election) येत्या ऑगस्ट महिन्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेतील राजकीय नाटकांनी जून आणि जुलै महिना गाजला. राज्यस्तरीय राजकारण किती रंग बदलू शकतं, हेही सर्वांनी पाहिलं. आता स्थानिक राजकारणात (Local politics) अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सहकारी संस्थांची निवडणूक ऑगस्ट महिन्यात होत आहे. सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सदर संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तर प्रत्यक्ष मतदान 12 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घेतलं जाणार आहे.
या चार राज्यस्तरीय सहकारी शिखर संस्था निवडणुकीस पात्र असल्याचं निवडणूक प्राधिकरणाने सांगितलं आहे. त्यानुसार मुंबई विभागीय सहनिबंधक कार्यालयाने संबंधित संस्थांच्या मतदार याद्या तयार करून निवडणूक कार्यक्रम सकार निवडणूक प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला होता. आता प्राधिकरणाने सदर संस्थांसाठीचा निवडणूक कार्यक्रम मंजूर केला आहे.
राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदार याद्यांचे अधिक्षण, निर्देशन आणि नियंत्रण करणे तसेच सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका चांगल्या रितीने पार पाडण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य यांचे https://scea.maharashtra.gov.in/ संकेतस्थळ कार्यन्वित झाले आहे. संकेतस्थळाला नागरिकांसह सहकारी संस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्था तसेच निवडणुकीस पात्र असलेल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या यांच्या निवडणूक कामकाजाचे संनियंत्रण या प्राधिकरणामार्फत करण्यात येते.