अणुशक्तीनगर मतदारसंघातून नवाब मलिक यांना तिकीट मिळणार? कोण देणार तगडं आव्हान

| Updated on: Oct 18, 2024 | 5:03 PM

अणुशक्तीनगर मतदारसंघातून नवाब मलिक हे दोन वेळा आमदार राहिले आहेत. तर एकदा शिवसेनेचे

अणुशक्तीनगर मतदारसंघातून नवाब मलिक यांना तिकीट मिळणार? कोण देणार तगडं आव्हान
Follow us on

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. पण त्याआधी अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढाई पाहायला मिळू शकते. या मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही गटाने दावा केला आहे. २००९ मध्ये पुनर्ररचना झाल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात येथे कांटे की टक्कर झाली. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक या मतदारसंघातून निवडून आले. अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ हा मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. मात्र २०१४ मध्ये शिवसेनेच्या तुकाराम काते यांनी नवाब मलिकांना कडवं आव्हान दिलं आणि विजय मिळवला. त्यानंतर २०१९ मध्ये पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी विजय मिळवला आणि हा मतदारसंघ शिवसेनेकडून हिसकाऊन घेतला. या मतदारसंघात मराठी, दलित, मुस्लीम, उत्तर भारतीय मतदारांची संख्या जास्त आहे.

महाविकास आघाडीत देखील ठाकरे गट आणि शरद पवार गट दोन्ही या जागेवर दावा करु शकतात. त्यामुळे ही जागा कोणच्या पारड्यात पडणार हे पाहणं उत्सूकतेचं असणार आहे. जर ही जागा ठाकरे गटाला मिळाली तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या गटातून तुकाराम काते मैदानात उतरु शकतात. पण नवाब मलिक कोणत्या गटात जातात यावरुन त्यांचं पुढचं राजकीय भविष्य ठरु शकतं.

२००९ आणि २०१९ मध्ये नवाब मलिक यांनी दोनदा या मतदारसंघातून विजय मिळवला होता. पण नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर ते अडचणीत आले होते. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमला जागा हडप करण्यात मदत केल्याच्या आरोप त्यांच्यावर होता. सध्या मलिक हे जामिनावर बाहेर आहेत. अंमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर वानखेडे यांच्याविरोधात त्यांनी मोहीम उघडली होती.

अजित पवार गटाने त्यांना आपल्या पक्षात घेऊ नये असं आधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका जाहीर केली होती. त्यामुळे जर ते जरी अजित पवार गटात आले तरी त्यांना उमेदवारी मिळणार की नाही याबाबत शंका आहे.

२०१९ विधानसभा निवडणुकीचा निकाल

उमेदवार पक्ष मते
नवाब मलिक राष्ट्रवादी ६५,२१७
तुकाराम काते शिवसेना ५२,४६६

२०१४ विधानसभा निवडणुकीचा निकाल

उमेदवार पक्ष मते
तुकाराम काते शिवसेना ३९,९६६
नवाब मलिक राष्ट्रवादी ३८,९५९

२००९ विधानसभा निवडणुकीचा निकाल

उमेदवार पक्ष मते
नवाब मलिक राष्ट्रवादी ३८,९२८
तुकाराम काते शिवसेना ३२,१०३