मुंबई : राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात महापुराने थैमान घातलं आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर, अकोला आदी भागात पावसानं हाहा:कार माजवला आहे. राज्यात पावसामुळे 129 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. तसंच दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापुरामुळे राज्यात विविध भागात शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. अशावेळी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. (Order to the District Collector to conduct a panchnama of agricultural damage)
महापूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्यातील सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शेतीच्या नुकसानाचे पंचनामेही 48 तासांत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वैयक्तिक स्तरावर पंचनामे करण्याचे राज्याच्या कृषी विभागानं आदेश दिले आहेत. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. लवकरात लवकर पंचनामे करुन भरपाई निश्चित करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत.
रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे ( दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून अनेक मृत्यू झाले. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत व जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 23, 2021
दरम्यान, रायगड जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे मृत्यु पावलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपये सानुग्रह मदत तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत ट्विटरवरुन माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे मृत्यु पावलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपये सानुग्रह मदत तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर @narendramodi यांची घोषणा
— PMO India (@PMOIndia) July 23, 2021
“कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या अनेक भागात नागरिक संकटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सातत्याने महाराष्ट्राच्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून नागरिकांना पिण्याचे पाणी आणि अन्नाची पाकिटे तत्काळ उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. केंद्र सरकारच्याही संपर्कात आहे. चिपळूणमध्ये लष्कराची तुकडी सुद्धा मदतकार्यात आहे,” अशी माहिती माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्याशी संपर्क केला, तेव्हा केंद्र सरकारतर्फे कोकण आणि महाराष्ट्राच्या इतरही भागात पुराच्या स्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची माहिती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सातत्याने राज्य सरकारसोबत संपर्कात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एनडीआरएफला तत्काळ निर्देश देत अतिरिक्त चमू महाराष्ट्रात पाठविल्या आहेत. रायगडमधील भूस्खलनात मृत्यू झालेल्यांच्या आप्तांना 2 लाख रूपये, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे.”
कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या अनेक भागात नागरिक संकटात असताना मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह हे सातत्याने महाराष्ट्राच्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.#MaharashtraRains #MaharashtraFloods #Flood @narendramodi @AmitShah pic.twitter.com/R3Ctp8lh8o
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 23, 2021
संबंधित बातम्या :
Sangli Flood : कृष्णा, वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ, सांगलीत मदतकार्यासाठी लष्कर पाचारण
साताऱ्यावर दु:खाचा डोंगर, तब्बल सहा ठिकाणी दरडी कोसळल्या, अनेक संसार उद्ध्वस्त, कुठे किती मृत्यू?
Order to the District Collector to conduct a panchnama of agricultural damage