मुंबईः राज्यातील (Maharashtra Govt) दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची (Cabinet Expansion) तारीख जवळपास निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. येत्या 12 आणि 13 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या टप्प्यात शिंदे-भाजप (Shinde BJP) युतीतील 18 मंत्र्यांना शपथ देण्यात आली होती. आता दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात 23 मंत्र्यांना शपथ दिली जाणार असल्याचं म्हटलं जातंय.
राज्य सरकारकडून यासंबंधीची अधिकृत घोषणा लवकरच होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी न लागलेल्या महत्त्वाच्या आमदारांची नाराजी यावेळी दूर होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये महायुती झाल्यानंतर कुणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार, याचा फॉर्म्युलाही निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप-शिंदे 60-40 टक्के या फॉर्म्युल्याने मंत्रिपदांचे वाटप होणार आहे, यावर दोन्ही पक्षांचे एकमत झाल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. तर दुसऱ्या50-50 या फॉर्म्युल्यानेही मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगणाराही एक वर्ग आहे. नेमक्या कोणत्या फॉर्म्युल्याने यंदाचा कॅबिनेट विस्तार होईल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
याच फॉर्म्युल्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा-लोकसभेच्या निवडणुकाही होणार का, यावरही महायुतीची गणितं अवलंबून आहेत..
पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार9 ऑगस्ट रोजी झाला होता. त्यावेळी 18 जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. मात्र यात आमदार संजय शिरसाट, बच्चू कडू, भरत गोगावले नाराज झाले होते. आता दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात या आमदारांची नाराजी दूर केली जाण्याची शक्यता आहे.
यांच्यासह मंजुळा गावित, सदा सरवणकर, प्रकाश आबिटकर, बालाजी किणीकर, प्रताप सरनाईक, योगेश कदम आदींच्या नावाचीही चर्चा आहे.
शिंदे गटाचे 10 तर भाजप पक्षाचे 13 जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. भाजपकडून संजय कुटे, नितेश राणे आणि रवी राणा या तिघांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.