मोठी बातमी! संतोष देशमुख प्रकरणात न्यायालयीन समितीची स्थापना, राज्य सरकारचं मोठं पाऊल

| Updated on: Jan 15, 2025 | 9:04 PM

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी आता थेट न्यायालयीन समिती गठीत केली आहे.

मोठी बातमी! संतोष देशमुख प्रकरणात न्यायालयीन समितीची स्थापना, राज्य सरकारचं मोठं पाऊल
संतोष देशमुख
Follow us on

बीड सरपंच हत्या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडी आणि एसआयटीकडून सुरु आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एका समितीची स्थापना केली होती. या समितीमध्ये बदल करावा, अशी मागणी केली जात होती. त्या मागणीनुसार राज्य सरकारने त्या समितीमध्ये बदल करत नव्या समितीची स्थापना केली होती. सीआयडी आणि या समितीकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात तपासासाठी न्यायालयीन समितीचीदेखील मागणी काही जणांकडून केली जात होती. या प्रकरणातील प्रत्यक्ष हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. केवळ कृष्णा आंधळे नावाचा आरोपी हा फरार आहे. त्याचादेखील शोध सुरु आहे. तसेच हत्या प्रकरणाचा कट कोणी रचला होता, हत्या का केली? याचा सखोल तपास केला जातोय. या प्रकरणी सीआयडी आणि एसआयटीकडून कोर्टात अनेक दावे करण्यात आले आहेत. त्यानंतर आता याच प्रकरणी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी माजी न्यायाधीश एम. एल. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. राज्य सरकारकडून याबाबत जीआरदेखील काढण्यात आला आहे.

राज्य सरकारने सेवानिवृत्त न्यायाधीश एम. एल. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ही समिती आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणार आहे. माजी न्यायमूर्ती एम. एल. तहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली आता या प्रकरणाचा तपास होणार आहे. तहलियानी यांनी मुंबई 26/11 बॉम्ब हल्याच्या खटल्यात न्यायमूर्ती म्हणून काम केलं आहे. तसेच प्रसिद्ध दिवंगत गायक आणि संगीतकार गुलशन कुमार यांच्या हत्येच्या खटल्यावेळीदेखील न्यायाधीश होते. तहलियानी हे निवृत्त झाले आहेत. पण राज्य सरकारने त्यांच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाची मोठी जबाबदारी दिली आहे.

राज्य शासनाने जीआरमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?

महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०२४ च्या हिवाळी अधिवेशनात मा. विधानसभा सदस्यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेस उत्तर देताना मा. मुख्यमंत्री यांनी सभागृहात आश्वासित केल्यानुसार मस्साजोग, ता. केज, जि. बीड येथील सरपंच श्री. संतोष पंडीतराव देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन चौकशी समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या प्रकरणी शासन निर्णय घेण्यात आला की, मस्साजोग ता. केज, जि. बीड येथील सरपंच श्री. संतोष पंडीतराव देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश मा. एम. एल. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली “एक सदस्यीय चौकशी समिती” गठीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

2) सदर न्यायालयीन चौकशी समितीसाठी संदर्भ अॅटी (The Terms of Reference/ToR) खालीलप्रमाणे असतील :-

  • (अ) मस्साजोग ता. केज, जि. बीड येथील सरपंच श्री. संतोष पंडीतराव देशमुख यांच्या हत्या प्रकरणी घडलेल्या घटनांचा क्रम, त्याची कारणे व परिणाम याचा अभ्यास करणे.
  • (आ) या घटनेसाठी कोणतीही व्यक्ती किंवा संस्था प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार होती का याची तपासणी करणे.
  • (इ) कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने केलेले नियोजन आणि तयारीची पर्याप्तता (Adequacy) पुरेशी होती किंवा कसे ?
  • (ई) उपरोक्त परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी उचललेली पावले योग्य होती का याची तपासणी करणे.
  • (उ) उपरोक्त अट (आ), (इ) आणि (ई) संदर्भात जबाबदारी निश्चित करणे.
  • (ऊ) अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी करावयाच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन कायमस्वरुपी उपाययोजना सुचवणे.
  • (ए) सदर प्रासंगिक दुर्घटनेशी संबंधित इतर कोणतीही महत्त्वाची सूचना करणे.

३. सदर न्यायालयीन चौकशी समितीस खालील अतिरिक्त अधिकार असतील :-

  • १. सदर प्रासंगिक दुर्घटनेशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी चौकशी समिती कोणत्याही व्यक्तीला चौकशीसाठी बोलाविण्याचा अधिकार राहील.
  • २. कोणत्याही इमारतीत / जागेत प्रवेश करण्याचा अधिकार किंवा त्यासाठी कोणालाही प्राधिकृत करण्याचा अधिकार आणि कोणतेही संशयित दस्ताऐवज, खाते किंवा कागदपत्रे इ. जप्त करण्याचा अधिकार राहील.
  • ३. समितीसमोरील कार्यवाही ही न्यायालयीन स्वरुपाची कार्यवाही राहील.
  • ४. चौकशी समितीचे मुख्यालय बीड येथे राहील. चौकशी समिती स्वतः च्या कार्यपद्धतीचे नियमन करेल. चौकशी समिती या दुर्घटनेची चौकशी करुन आपला चौकशी अहवाल आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायांसह सदरहू शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या तारखेपासून तीन ते सहा महिन्यांच्या आत शासनास सादर करेल.
  • ५. चौकशी समितीच्या कामकाजाकरीता कार्यालय तसेच आवश्यक मनुष्यबळ, कार्यालयीन सामुग्री, संगणकीय सोईसुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत तसेच चौकशी समितीच्या अध्यक्षांचे मानधन व भत्ते यांचे निर्धारण करणे, त्यांना वाहन व अनुषांगिक सुविधा उपलब्ध करुन देणे त्यास प्रशासकीय मान्यता तसेच याबाबतच्या संबंधित खर्चासंदर्भातील आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०११५१९१६१२८८२९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे, असं जीआरमध्ये म्हटलं आहे.